आत्माराम
परब आणि नरेन्द्र प्रभू यांनी लिहिलेल्या ‘लडाख प्रवास अजून सुरू आहे’ या नवचैतन्य प्रकाशनाच्या
पुस्तकाचं प्रकाशन सुप्रसिद्ध समाजसेविका आणि लेखिका रेणूताई गावस्कर आणि
न्युरोस्पायनल सर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या शुभहस्ते करण्यात आलं. दादर
मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.
या प्रसंगी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रीया अशा
व्यक्त केल्या.
आत्मारामला लडाखची अलौकीकता अशीच साद घालतांना मी पाहिली
आहे, अनुभवली आहे, त्याच्या आयुष्यातल्या ऎन उमेदीच्या वर्षांमध्ये तो ‘लडाखमय’ होऊन गेला होता. त्याचं श्रेयस, प्रेयस सारं काही
लडाख होतं. त्या आंतरीक हुंकाराचे अनेक पडसाद या पुस्तकातून वाचकापर्यंत सहज
पोचतील याची मला खात्री वाटते.
या पुस्तकाचं पान आणि पान अतिशय वाचनीय झालं आहे. आत्माराम
आणि त्याच्या सहकार्यांनी अक्षरश: मृत्युचं तांडव पाहिलं. तेही एक दोन दिवस नव्हे
तर सतत पंचवीस दिवस.
‘लडाख... प्रवास अजून सुरू आहे’ या पुस्तकाचं पान आणि पान अतिशय
वाचनीय झालं आहे. आत्माराम आणि त्याच्या सहकार्यांनी अक्षरश: मृत्युचं तांडव
पाहिलं. तेही एक दोन दिवस नव्हे तर सतत पंचवीस दिवस. पाराकोटीची भूक, ढासळणारं
मनोधैर्य, घरच्यांची आठवण आणि आसपास पसरलेली प्रेतं. चांगल्या घरातली,
खात्यापित्या कुटुंबातली ही मुलं चहाच्या एका घोटाला महाग झाली. ज्या मुलांनी
आयुष्यात क्वचितच मृत्युचं दर्शन घेतलं त्यांच्या वाट्याला प्रेतच प्रेतं बघणं
आलं. हे सगळे अनुभव विलक्षण आहेत. लाखातील एखाद्याच्याच वाट्याला येतील असे आहेत.
आत्मारामनं ते प्रभावीपणे कथन केले आहेत व श्री. नरेन्द्र प्रभू यांनी त्या कथनाला
तितक्याच उत्कटपणे शब्दात पकडलं आहे.
आत्माराम व श्री. प्रभू ही जोडगोळी म्हणजे दोन देह व एक ‘आत्मा’ त्यांचं हे अव्दैत मी गेली कितीतरी वर्ष बघते आहे. म्हणूनच पुस्तकाला एवढी
परिणामकारकता लाभली आहे.
सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका
रेणू गावस्कर
पुस्तकाचं प्रकाशन करताना डॉ. प्रेमानंद रामाणी, रेणूताई गावस्कर, प्रवीण आम्रे, शरद मराठे आणि लेखकद्वय आत्माराम परब आणि नरेन्द्र प्रभू |
मला हायकींगची फारच आवड आहे. हायकींग प्रमाणे लडाखला जायची
माझी फार इच्छा होती. मला लडाखला जायचं होतं तेव्हा आत्माराम परब यांचं नाव सुचवलं
गेलं. मला फार कुतूहल वाटलं आणि मी लगेच लडाखला जायचं नक्की केलं. माझ्या मनातली
ही इच्छा वयाच्या चौराहत्तराव्या वर्षी पुर्ण झाली. या सहलीत आम्हाला घरगुती वातावरणात
वावरल्याचा आनंद मिळाला, आत्मारम बरोबर केलेली ती सफर अविस्मरणीय अशीच होती. नंतर
मी ईशा टुर्स बरोबर सहकुटुंब भुतानलाही जाऊन आलो. आणखी बर्याच देशात मला आत्माराम
बरोबर जायचं आहे.
आंतरराष्ट्रीय किर्तीचे न्युरो-स्पायनल तज्ज्ञ
डॉ. प्रेमानंद रामाणी
या प्रसंगी
ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी पाठवलेल्या शुभेच्छा पत्रात म्हटलं आहे
की:
आकर्षणाचे प्रत्यक्ष जीवनानुभवात रुपांतर करण्यासाठी लागते
अफाट जिद्द, असीमीत कुतुहल, धाडस आणि निर्भीड वृत्ती. आत्माराम परब यांच्याकडे ती
अमाप आहे. त्यांनी केलेल्या लडाख शोधाच्या साहसी आणि विहंगम प्रवासाचे हे वर्णन.
लडाखच्या निमित्ताने हा अजून सुरू असलेला प्रवास आहे निसर्गशोधाचा,
निसर्गप्रेमाचा, खर्या आनंदाचा, ऎहीकतेतून आध्यात्मिकतेचा.
आत्माराम परब आणि नरेंद्र प्रभू लौकीक अर्थाने
समाजशास्त्रज्ञही नाहीत वा पत्रकारही नाहीत इतिहासकार नाहीत वा भुगोलतज्ज्ञही
नाहीत. पण त्यानी केलेले माणसांचे समाजाचे, स्थानीक जीवनशैलीचे, तेथील संकृतीचे,
ऎतिहासीक संदर्भांचे केलेले वर्णन स्वयंभू पत्रकारांनाही संकोच वाटायला लावेल असे
आहे.
ज्येष्ठ संपादक
कुमार केतकर
प्रसिद्ध
क्रिकेटपटू प्रविण आम्रे यावेळी प्रमूख पाहूणे म्हणून उपस्थित होते. सौ. हर्षदा
प्रभू यांनी कार्यकमाचं सुत्र संचालन केलं.
No comments:
Post a Comment