09 March, 2013

भुतान – आनंदी लोकांचा देश





पैसे किंवा दरडोई उत्पन्न याला जास्त महत्व न देता जिथे आनंदाचा निर्देशांक जीएनएच’ (Gross National Happiness) किती आहे हे पाहिलं जातं तो जगातला एकमेव देश म्हणजे भुतान. थिंपू या देशाच्या राजधानीच्या शहरातही सिग्नल यंत्रणा नसलेला पण वाहतूकीचे नियम अभावानेच मोडणार्‍या लोकांचा देश म्हणजे भुतान. इतर सारं जग उत्पन्न कसं वाढेल याच्या चिंतेत असताना पर्यटकांची गर्दी नाकारणार्‍या पर्यायाने पर्यटन उद्योगामुळे मिळणार्‍या मिळकतीवर पाणी सोडणारा देश म्हणजे भुतान. सगळा देशच जागतीक वारसा आहे असं मानून मनापासून तसं वागणार्‍यांचा देश म्हणजे भुतान. अखिल जगतात लोकशाहीचे वारे वाहात असताना राजेशाही पाहिजे म्हणून निदर्शन करणार्‍या मणसांचा देश म्हणजे भुतान. सार्वजनिक ठिकाणीही कमालिची  स्वच्छता असलेला आरोग्यदायी देश म्हणजे भुतान. टपरी किंवा झोपडपट्टी शोधूनही सापडणार नाही असा देश म्हणजे भुतान. हॉटेल पासून दुकानापर्यंत महिलांचाच दबदबा असलेला देश म्हणजे भुतान. देव भुमी हिमालयात वसलेला आपला सुंदर शेजारी देश म्हणजे भुतान.

बागडोगरा विमातळावर विमान उतरत असतानाच खाली हिरवागार प्रदेश दृष्टीस पडतो आणि मन प्रफुल्लीत होतं. चहाच्या बागांमधला तो गर्द हिरवेपणा पाहाता पाहाता विमान धावपट्टीवर हलकेच उतरतं पण त्या आधीच तिथे आपलं मन पोहोचलेलं असतं. प. बंगाल राज्यातल्या दार्जिलिंग जिल्ह्यातला बागडोगरा हा विमानतळ लष्कराचा असला तरी नागरी विमानं तिथे उतरू दिली जातात. पाच तासांचा विमान प्रवास करून एवढ्या दूरवर येवूनही विमान आणखी पुढे उतरतं ते आपल्याच देशात गुवाहाटीला. आपला भारत देश खरच खंडप्राय असल्याचा अभिमान वाटायला लागतो. केल्याने देशाटन.... खरचं ही उक्ती किती सार्थ आहे याचा प्रत्यय यायला लागतो.

आपल्या देशातील महानगरं सोडली तर इरत ठिकाणची विमानतळं गजबजलेली नसतात. आलेल्या विमानातून उतरलेले प्रवासी तेवढेच बाहेर विखूरले जातात आणि पुन्हा सगळा परिसर सामसूम होवून जातो. आपण तिथून निघाल्यावर थोड्याच वेळात  शहरातली वाट संपवून मोकळ्या प्रदेशात येतो सभोवताली चहाच्या बागा, प्रसन्न करणारी प्रदूषण विरहीत स्वच्छ हवा यामुळे विमानप्रवासाचा थकवा कुठल्याकुठे निघून जातो. अशावेळी आपण नजरेने जे बघत असतो ते सारंच कॅमेर्‍यात टिपून घ्यावं असं वाटायला लागतं. थोडं अंतर गेल्यावर जलपायगुडीचा मैलाचा दगड दिसतो. रल्वेने आलं तर इथपर्यंत येवून पुढचा प्रवास याच मार्गाने सुरू होतो. वाटॆत तिस्ता नदीवरचा पूल लागतो, हिवाळ्यातच या नदीचं पात्र कोरडं पडलेलं असतं. गाडी आणखी पुड्गे जाते तसा जंगलाचा भाग सुरू होतो. आजूबाजूच्या प्रदेशाची मजा लुटत नेत्रसुख अनुभवत आपण जयगाव शहरात येवून पोहोचतो. आता भुतानमध्ये प्रवेश करायला मन अगदी आतूर झालेलं असतं.

भारतातलं भुतानच्या सिमेला लागलेलं शेवटचं शहर जयगाव इथूनच आपल्याला भुतान मध्ये प्रवेश करायचा असतो. भुतानच्या प्रवेशद्वारा मधून फुन्तशोलींग या गावात आपण प्रवेश करतो आणि इथूनच वेगळेपणाला सुरुवात होते. भारतातल्या कुठल्याही शहराचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे गलिच्छपणा जयगावमध्ये तो भरून उरला आहे आणि काही पावलावर असलेला भुतानमधला भाग स्वच्छतेचा नमुना आहे. भुतानमध्ये पवेश केल्या केल्या लक्षात येणारी दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यापेक्षा अर्धा तासाने पुढे असणारी त्यांची घड्याळं.

एरवी अंथरूणात लोळतपडणारे आपण अशा ठिकाणी गेलो की, विशेषत: हिमालयात गेल्यावर लवकर उठतो, तिथल्या हवामानामुळेच आपल्याला ताजतवानं वाटून लवकर जाग येते. थंड हवामान आणि आल्हाददायक हवा या मुळे मन तजेलदार होतंच. हाती असलेला मोकळा वेळ सार्थकी लावण्यासाठी आपण जर बाहेर पडलो तर आदल्या दिवशी काळोखात निट न पाहिलेला भुतान-भारत सिमेवरचा भाग पाहायला मिळतो. भुतानमधले रस्ते झाडून स्वच्छ केल्यासारखे असतात तर पलिकडचे जयगावचे रस्ते कचर्‍याने भरून गेलेले दिसतात. हा वृत्तीतला आणि वागणूकीतला फरक आहे. भुतान मधले लोक आपला परीसर स्वच्छ ठेवू शकतात तर आपण भारतिय का नाही? सार्वजनिक स्वच्छतेबद्दल भुतानची जनता खुप जागरूक आहे.

शंभर सव्वाशे मिटर अंतर गेल्यावर फुन्तशोलींग शहर संपतं आणि चढाव सुरू होतो. गाडी एक घाट चढायला सुरूवात करते, पुढे असे सात डोंगर पार करून आणि १८० कि.मी. गेल्यावर थिंपू या भुतानच्या राजधानीच्या शहरात आपण पोहोचतो. उंचावरून फुन्तशोलींगचं विहंगम दृश्य दिसतं तेव्हा कॅमेर्‍याचं काम सुरू होतं. असच एका वळणावर इंजिनीअरींग कॉलेज दिसतं, हे भुतान मधलं एकमेव इअंजिनीअरींग  कॉलेज. संपूर्ण भुतान हिमालयात वसलेलं असूनही इथले रस्ते दृष्ट लागावेत एवढे उत्तम आहेत. हे भुतानचे रस्ते आपल्या लष्कराच्याच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या Dantak  या कंपनीने बनवलेले आहेत. भुतान मध्ये १९६० पर्यंत मोटरवाहतूकीचे रस्तेच नव्हते. त्यानंतर भारताशी झालेल्या करारानुसार तिथे रस्ते बांधले गेले. भुतानची संरक्षण व्यवस्थाही भारतच पाहतो. त्यामुळे तिथे आपलं भारतिय सैन्य खडा पाहारा देत असतं. 

वाटेत भारतिय लष्कराच्याच एका कॅंटीनमध्ये जेवणाही मिळतं. आपल्या महाराष्ट्रातील पुणे सातार्‍यकडचे काही सैनिक आपल्याला तिथे भेटतात तेव्हा आपण आणि ते सैनिकही सदगदीत होतात. प्रसन्न करणारा गारवा आणि सृष्टी सौंदर्याची मजा घेत आपला प्रवास सुरू असतो. देखण्या हिमालयाच्या आपण प्रेमात आपण केव्हा पडतो ते समजतही नाही. वाटेत कुठेतरी रस्त्याचं काम सुरू असलं म्हणजे गाड्या थांबतात. भुतानमध्ये वाहतूकीचे नियम कसे पाळले जातात त्याचा लगेच प्रत्यय येतो. रस्त्यात एका मागोमाग एक थोडं अंतर ठेवून थांबलेल्या गाड्या पाहून त्यांच्या शिस्तीचं कौतूक वाटतं. पुढे जायची गडबड नाही की कर्कश हॉर्न वाजवणं नाही. सुचिपर्णी वृक्षांचा संभार सांभाळणारे पर्वत न्याहाळत वळणावळंच्या रस्त्याने होणारा दिवसाचा प्रवास आणि  प्रसन्न वाटणार्‍या हवेतला गारवा संध्याकाळ होते तसा वाढत जातो आणि काळोख होता होता कडाक्याच्या थंडीने गारठायला होतं. हिमालयाची हिच तर खासियत आहे.

थिंपू ही भुतानची राजधानी, थोडा बाजाराचा भाग आणि प्रशासकिय इमारती सोडल्यातर हे रुढार्थाने शहर नाहीच. कुठलही उत्तम हिलस्टेशन असावं असा हा परिसर. पण हेच शहर भुतानमधलं सर्वात मोठं शहर आहे. थिंपू शहरात प्रवेश केल्यापासून लक्ष वेधून घेतात ती तिथली घरं आणि इमारती. तिबेटी वास्तूकलेचा पगडा असलेल्या अशा त्या इमारती आहेत, त्यामुळे गाव असो वा शहर घरांची बाह्य रचना सारखीच भासते. प्रत्येकाने आपलं घर सजवलेलं असतं. चोहेबाजूनी पर्वतरांगांनी वेढलेलं थिंपू शहर बघताक्षणीच आपल्या मनात भरतं. वांग चू किंवा थिंपू चू या सुंदर वळणं घेत जाणार्‍या नदीच्या किनार्‍यावर हे शहर वसलं आहे आणि या नदीने शहराच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे. शहरातील सुंदर इमारती मुख्यता मिनिस्ट्री हाऊस (जुना राजवाडा), डेचेंचोलिंग पॅलेसहे भुतान नरेशांच अधिकृत निवासस्थान आपलं लक्ष वेधून घेतात. संध्याकाळच्या वेळेस रोषणाईने नटलेल्या या एमारती पाहणं हा एक सोहळा असतो. मिनिष्ट्री हाऊसमध्ये होणारं ध्वजावरोहण आणि अवतरण पाहणं हे पण आपल्याला आनंद देवून जातं.

भुतान मधली सर्व जनता त्यांच्या भुतानी राष्ट्रीय ड्रेस कोड मध्ये पाहताना आपल्याला वेगळेपणा जाणवतोच शिवाय आधुनिक फॅशनबरोबर वाहवत न जाता आपलं स्वत्व जपणारा हा समाज बघून त्यांच्या बद्दल ममत्वाची भावना आपसूकच तयार होते.   इथली आणखी एक खासियत म्हणजे सगळीकडे असणारा महिलांचा वावर. हॉटेल मध्ये गेल्या गेल्या तिथल्या मुली आपल्या सामानाचा ताबा घेतात आणि ते तुमच्या खोलीत नेवून ठेवतात. मॅनेजरपासून आचार्‍यापर्यंत सगळ्या मुलीच कामं करताना दिसतात. अप्रतिम रुम्स आणि आतलं वातावरण पाहून प्रवासाचा शिण कुठल्याकुठे निघून जातो. गरम पाण्याने आंघोळी झाल्यावरही बुखार्‍याजवळ गर्दी करून उभं राहण्यातच जास्त मजा येते. बाहेर थंडीचा कडाका अजूनच वाढलेला असतो. असं असलं तरी रात्रीच्यावेळी दिसणारं थिंपू शहराचं विहंगम दृष्य पाहण्याची संधी आपण सोडू नयेच.

बौध्द धर्मियांचा देश म्हणूनच भुतान ओळखला जातो. म्हणूनच स्वच्छ आणि सुंदर दिसणार्‍या मॉनेस्ट्रीज हे भुतानचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. भारताल्या लडाखसारख्या प्रांतात असलेल्या मॉनेस्ट्रीजपेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारच्या आणि भव्य अशा या मॉनेस्ट्रीज आहेत. या ठिकाणी अनेक लोक मनोभावे सेवा करताना दिसतात आणि ते आपल्या कामात मग्न असतात. रम्य हिरवागार परिसर आणि विविधरंगात उजळून दिसणार्‍या मॉनेस्ट्रीज पाहताना मन अध्यात्माकडे वळलं नाही तरच नवल. थिंपू शहराजवळच टेकडीवर असलेला बुद्धाचा भव्य पुतळा दूरवरूनही आपलं ध्यान आकर्षीत करत असतो. नजरेच्या एका टप्प्यात येणारं थिंपू शहर आणि हा पुतळा जवळून पाहाण्यासाठी या ठिकाणाला भेट देणं आवश्यक आहे. भुतान नरेश तिसरे जिग्मे वांगचूक यांच्या स्मरणार्थ हे स्थळ विकसित केलं गेलं असून चोरटन मेमोरीयल म्हणून ते ओळखलं जातं.

भुतानचा राष्ट्रीय प्राणी तकीन तिथल्या पार्क मध्ये पाहाता येतो. भुतान प्राणी आणि पक्षांच्या बाबतीतही समृद्ध असा देश असून शोधक नजरेने पाहिल्यास तिथल्या वन्य जीवनाचं सुरेख दर्शन आपल्याला घेता येतं आणि कॅमेर्‍याने ते टिपताही येतं. थिंपू हेरिटेज मुझियमला भेट देणंही आवश्यक आहे कारण भुतानी संकृती आणि परंपरांचा धावता आढावा आणि जुन्याप्रकारची व्यवस्था पाहण्याची ती एक संधी असते.   

थिंपूपासून 85 कि.मी.वर असलेली पुनाखा ही भुतानची पुर्वीची राजधानी तिथल्या अप्रतीम जुन्या राजवाडयासाठी प्रसिद्ध आहे. पो चू आणि मो चू ( चू म्हणजे नदी) या दोन नद्यांच्या संगमावर पुनाखा डझोंग ही राजवाड्याची इमारत वसली आहे. रंगीबेरंगी झाडांनी वेढलेला हा राजवाडा आणि त्याला वळसा घालून जाणारी नदी हे दृष्य छायाचित्रणासाठी एक छान संधी आहे. थिंपूहून पुनाखा कडे जाताना वाटेत लागणारं 108 योध्यांच स्मारक असलेलं चोर्टन मेमोरीयल हे ठिकाण डोचूला पास वर असून तिथली स्मारकं पाहाण्याजोगी आहेत आणि एवढ्या उंचीवर (10000 हजार फुट) असलेल्या या स्मारकांची देखभाल उत्तम रितीने केलेली आहे.     


पारो हे भुतान मधलं आणखी एक ठिकाण पाहाण्यासारखं आहे. गंम्मत म्हणजे देशाची राजधानी थिंपू असूनही भुतान मध्ये असलेला एकमेव विमानतळ मात्र पारो या शहरात आहे. तिथल्या छोटेखानी विमानतळाचं विहंगम दृश्य पाहाण्यासाठी पारो मुझियम कडे जाताना एक व्ह्यू पॉईंट आहे. पुढे असलेलं पारो मुझियमसुद्धा मुद्दम भेट देण्यासारखं आहे. पारो मधली किचू मॉनेस्ट्री तिथल्या अप्रतिम मुर्तींसाठी प्रसिद्ध आहे. पारो पासून तीन तासांचा ट्रेक करून गेल्यास टायगर नेस्ट किंवा टकसंग मॉनेस्ट्री ही बांधकामातील आश्चर्य वाटणारी वास्तू पाहायला मिळते. हवा स्वच्छ असल्यास पारोमधूनही ती दुर्बिणीने पाहाता येते.


छाम नृत्य हे भुतानचं आणखी एक वैशिष्ट्य. नाच करणारे कलाकारच गाणी गात गाता नच करत असतात. वेगवेगळ्याप्रकारचे मुखवटे घालून ते जेव्हा नाच करतात तेव्हा त्यांना आपसूकच टाळ्या पडतात. तिरंदाजी हा भुतानचा राष्ट्रीय खेळ आहे. रविवारच्या दिवशी अनेक ठिकाणी पुरूषवर्ग तिरंदाजीचा खेळ खॆळायला किंवा सराव करायला मैदानात जमतात. भुतानच्या पारंपारीक वेषात तिरंदाजी करणारे हे खेळाडू पाहून मन प्रसन्न होतं.     
 
हिमालयाच्या अंगाखांद्यावर वसलेला हा आपला शेजारी देश पाहण्यासाठी वर्षभरात कधीही आपण जावू शकतो. भारताच्याच सीमा सडक संघटनने बांधलेले रस्ते आणि त्या देशाला संरक्षणाचं अभेद्य कवच देणारे आपले शूर सैनिक आणि अर्थातच भुतानी लोक आपलं हसतमुखाने स्वागत करतील.   
            

2 comments:

  1. स्वतःला शिस्त असली म्हणजे नियमांची गरज पडत नाही आणि ती नसली मग फक्त नियमच पाळले जातात त्यामागचा उद्देश काही साध्य होत नाही.

    लेख उत्तम , फोटोमुळे भूतान फिरल्या सारखे वाटले.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates