कुत्रे
बिस्कीट... खुप दिवसांनी आठवली ही बिस्कीटं. तळ कोकणात त्या काळी (आता खरं तर
त्याला कोणे एके काळी असंच म्हटलं पाहिजे) पाववाला सकाळीच शहरवजा गावामधून पाव, बिस्कीटं विकण्यासाठी सायकलने
फेरी मारायचा. त्याच्या सायकलला घंटी ऐवजी ट्रकला असायचा तसा हॉर्न असायचा. तो पॉsss
पॉsss करीत गावभर फिरायचा. पाववाल्याजवळ गिर्हाईक
यायच्या अगोदर गावातले तमाम कुत्रे जमा व्हायचे. सायकलपासून थोडं अंतर ठेवून मागून धावत रहायचे. बेकरीतल्या
ताज्या पाव-बिस्कीटांचा दरवळ कुत्र्यांना मॉर्निग वॉक करायला भाग पाडायचा. पाववाला
पाव-बिस्कीटं विकायला थांबायचा, मध्येच कधीतरी कुत्र्यांच्या
दिशेने काही बिस्किटं फेकायचा. पुन्हा सायकलचा पॅडल मारून पॉsss पॉsss करीत रस्त्याला लागायचा.
आता
यात कुत्रे बिस्कीटांची महती अशी की ती माणसाला आणि कुत्र्यांना दोघांनाही
आवडायची. कुत्र्याला पावही आवडत असणार पण त्याला तो कोण देणार? रुपयाच्या नाण्याएवढीच असलेली
ही बिस्कीटं मात्र कुत्र्यांना पाववाल्याकडून किंवा गाववाल्यांकडून मिळायची.
काल
ही गोष्ट घरात सांगितली तेव्हा माझी मुलगी विचारायला लागली कुत्र्यांसाठी होती
म्हणून त्या बिस्कीटांना कुत्रे बिस्कीटं म्हणायचे का? म्हटलं नाही, तेव्हाचे कुत्रे एवढे माजलेले नव्हते आणि गाववाले श्रीमंत नव्हते.
कुत्र्यांना द्यायला ती इवलीशी बिस्कीटंच परवडायची, पाववाल्यामागे
बिस्कीटांच्या वासामुळे कुत्रे फिरत रहायचे त्यामुळे असेल किंवा त्याच्याकडून
त्यांना ती बिस्कीटंच मिळायची म्हणून असेल त्या छोट्या बिस्कीटांना ‘कुत्रे बिस्कीटं’ असं नाव पडलं.
आताचे
कुत्रे माणसांनी खायच्या बिस्कीटांना हुंगून बघतात आणि तुम्हालाच लखलाभ होवो अशी
चर्या करून निघून जातात. वक्त वक्त की बात है, काळाचा महिमा अघाद आहे. कुत्रंपण खात नाही ते
माणूस खातो.
Thanku hya post sathi..karan malahi prashna padla hota ki ya biscuits na "kutre biscuit" ka mhantat...mala hi biscuits khup avadtat😊
ReplyDelete