काझिरंगा.... लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात वाचलेलं हे राष्ट्रीय उद्यान पहिल्यांदा पाहिलं ते नोहेंबर २००५ मध्ये. आसामच्या विद्यार्थी आंदोलनानंतर राजकीय स्थिती बदलली असली तरी पुन्हा बाबाची संध्या मुळावर आल्यासारखा प्रकार होता. बॉम्बस्फोट, बंद चालूच होते आणि त्या रणधुमाळीतच बायको मुलीसह पुर्वांचलाचा २१ दिवसांचा दौरा करायचं ठरवलं आणि आम्ही निघालोही. कोलकाता, गुवाहाटी फिरत होतो तरी काझिरंगाला पोहोचल्यावर मुक्कामाला आल्यासारखं वाटलं, कारण बाकीची जमतील ती ठिकाणं पहायची पण काझिरंगा बघायचंच असं नक्की केलं होतं. संघ्याकाळी सात सव्वासातला मिट्ट काळोखात काझिरंगाच्या बोनानी लॉजमध्ये पोहोचलो तेव्हा या जंगलाचं स्वरूप लक्षात आलं नव्हतं. कारण त्या आधी दोन तासांचा प्रवास हा काळोखातच झाला होता.
दुसर्या दिवशी वरच्या छायाचित्रात दाखवलेल्या
वाटेने काझिरंगात प्रवेश केला आणि अजून त्यामधून बाहेर पडता आलेलं नाही. या जंगलाने
मनात घर करून ठेवलयं. पुढे अनेकदा आत्माराम परब यांच्याबरोबर इथे जात राहिलो. प्रत्येक
वेळी हे जंगल नव्याने उलगडत जातं. हत्तीच्या उंचीचं गवत असलेल्या या नॅशनल पार्कमध्ये
रान हत्ती, वाघ, हरणं असे अनेक प्राणी
असले तरी इथला राजा आहे तो एकशिंगी गेंडा. त्याचं दर्शन झालं आणि तो पुन्हा पुन्हा
वेगवेगळ्या रुपात दर्शन देत राहिला. पहिल्यांदा पाहिला तो हत्तीवरून सफारी करताना, नंतर संध्याकाळच्यावेळी
एका मचाणावर चढण्यासाठी जात असताना काही कळायच्या आत अगदी चार हाताच्या अंतरावर दोन
धुडं अचानक सामोरी आली आणि मागोमाग गार्डने घायीघायीत पुन्हा जीपमध्ये बसण्याची सुचना
केली. एवढा जवळ आलाय तर फोटो घेवूया असं वाटत होतं पण त्या पेक्षा जिवाची भिती वाटत
असल्याने मागे सरलो. पण त्या दिवशी त्याने सर्वांग दर्शन द्यायचं ठरवलं असावं, सुर्य अस्ताला गेल्याने
आम्ही माघारी परतताना जीप थांबली कारण गेंड्याचं धुड वाटेलगतच आपल्याच नादात चाललं
होतं. आता तर फ़ोटो घेतलेच शिवाय व्हिडीओही घेतला. व्हिडीओ काढातोय म्हटल्यावर त्याने
रस्ता ओलांडताना सगळ्या पोज दिल्या. काझिरंगाची भेट सार्थकी लागली.
No comments:
Post a Comment