
ही ताडोबामधली वाट, हो वाटच... रस्ता
म्हणायला इथे माणसाने केलेल्या खुणांपेक्षा जनावरांनी केलेल्या खुणांच जास्त, त्याचंच राज्य आहे
तिथे. आपल्यासारख्या माणसांना तिथे खाणाखुणांनीच बोलायचं असतं आणि काही दिसलं की आsssवासायचा असतो. आता यातल्या
खाणाखुणा करायच्या सुचना आमचे टुर लिडर रत्नदीप पाटील यांनी दिल्या होत्या तर आsssवासणे हे आपसूकच
व्हायचं. असो, तर ताडोबाच्या
जंगलात फिरत असताना त्या दिवशी नशीबाने आमची जीप बंद पडली आणि इतरांपेक्षा काहीतरी
वेगळा अनुभव घ्यायची संधी मिळाली. जीपमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करेपर्यंत आम्हाला
खाली उतरावं लागलं, एरवी मात्र असं
उतरायला परवानगीच नसते. भर दुपारी त्या वाटेवर वाळलेल्या पाल्यापचोळ्यात पाय ठेवला
आणि जंगलाने संवाद सुरू केला. मातीची न तुडवलेली ढेकळं बोलू लागली. आम्हाला असे
अचानक आपल्या जागेवर उतरलेले पाहून काळतोंडी माकडं आणि त्याची वात्रट पोरं हातातली
कामं टाकून का...य? अश्या भावनेने
पाहू लागली आणि नंतर य:किंचीत मानव अशा नजरेने आमच्याकडे दुर्लक्ष करती झाली. चार
दोन हरणं थोडी थबकली आणि जरा अंतर राखून चरायला लागली. कोतवालाने (Drongo) तर लक्षच दिलं
नाही. एरवी
गावी कोकणात आम्ही याला किरकावळा म्हणायचो त्यानेही एखादा कटाक्षही टाकला नाही किंवा विविध आवाज
काढण्याच्या आपल्या कलेने इतर वन्यजिवांना काही सांगितलंच असेल तर ते आम्हाला कसलं
कळणार? या सगळ्याचं काही
वाटून न घेता काही फोटो काढले आणि मार्गस्थ झालो. मुक्कामावर आल्यानंतर मात्र आमचा
रुबाब बघण्यासारखा होता, कारण
आम्ही पुन्हा माणसात आलो होतो. इथे दुर्लक्षण्याची पद्धत वेगळी असते.
No comments:
Post a Comment