21 November, 2012

आभाराचा एक दिवसनोव्हेंबर महिन्याचा चौथा गुरूवार हा ‘थँक्स गिव्हिंग डे’ म्हणून अमेरिकेत साजरा केला जातो असं नुकतच वाचलं. उद्या २२ नोव्हेंबर हा या वर्षीचा थँक्स गिव्हिंग डे आहे. कृतज्ञता या शब्दा पाठोपाठ ‘व्यक्त’ हा शब्द येतो, म्हणजे आपल्याकडे सुद्धा ती गोष्ट आहे पण आपण ती अगदी हातचं राखून करतो. म्हणून दोन दोनदा कुणी थँक्स थँक्स म्हटलं की मला तरी काय करावं ते सुचत नाही. माझा एक पारसी मित्र खुपच गोड बोलणारा आणि हळूवार स्वभावाचा आहे. दहा वर्षांपुर्वी जेव्हा त्याची पहिल्यांदा ओळख झाली तेव्हा तो एवढा चांगला कसा वागतो म्हणून मला खुप अप्रूप वाटायचं. नंतर मला त्याची सवयच झाली, पण शालीन स्वभाव म्हणजे काय हे त्याच्या वडीलांना भेटलो तेव्हा मला समजलं आणि बेहरामच्या स्वभावचं कोडं ही सुटलं.

खरं म्हणजे जन्माला आल्यापासून आपण सारखं काहीतरी घेत असतो किंवा कुणीतरी आपल्याला सतत सर्व काही देत असतं. हळू हळू आपल्याला त्याची सवय होऊन जाते आणि मग जे मिळतं तो आपला हक्कच आहे असं वाटायला लागलं. इथे सामंज्यस्य संपतं आणि “कोण म्हणतो देणार नाही...“ या पायरीपर्यंत आपण येऊन पोहोचतो. जन्माला आल्या आल्या आई, मग वडील, कुटूंब, मित्र, समाज, कुठल्याही लहान मुलाचं हास्य, एवढच काय प्राणीमात्र, निसर्ग, वर पसरलेलं अनंत आकाश, अथांग सागर, नद्या-नाले सतत आपल्याला काहीना काही देतच असतात. एवढं असूनही तक्रार करण्याची आपली सवय काहीकेल्या जात नाही. “काय करणार...” अशी सुरुवात करून जो तक्रारीचा पाढा सुरू होतो तो मग थांबतच नाही. आपली जेव्हा गैरसोय होते तेव्हा खरं तर जागं व्हायची वेळ असते. आता गैरसोय वाटते म्हणजे अशाच परिस्थितीत आधी कुणीतरी आपली सोय बघितलेली असते किंवा आधार दिलेला असतो. आई किंवा बायको आजूबाजूला नसतात तेव्हा नवरे मंडळींची काय त्रेधा उडते? किती करत असतात ही मंडळी आपल्यासाठी?

शाळेत असताना शिक्षक आपल्या उभ्या आयुष्याला आकार देण्यासाठी सतत झटत असतात. मोलाचं मार्गदर्शन करित असतात. त्या वेळी त्याचं महत्व कळलं नाही तरी नंतर पदोपदी त्यांची आठवण येतच असते. प्रवासात असताना चालक, सहलीत असताना सहल संयोजक किंवा सहलसाथी, निसर्गात असताना झाडं, वेली, फुलं आपल्यावर आनंदाची बरसात करत असतात. अनंत हस्ते दिलं जाणारं हे धन आपण आयुष्याभर घेतच असतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आपलं कर्तव्यच आहे.

‘अमेरिकन फॅड’ म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता ते हा दिवस साजरा करतात म्हणून त्यांच्याप्रती आणि आयुष्यात आपल्याला कितीतरी चांगल्या गोष्टी मिळाल्या म्हणून ते मिळण्यासाठी कारण झालेल्या प्रत्येकाप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करूया. मनापासून दिलेली दाद आणि मनापासून मानलेले आभार खुप काही देऊन जातात देणार्‍यालाही आणि घेणार्‍यालाही.               


        

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates