05 April, 2015

मित्रांगण – एक वेगळा अनुभव


समाज माध्यमांचा सुळसुळाटात आणि एकावर एक धडकणार्‍यां लाटांत काय निवडावे हे कळेनासं होतं. नेट बंद ठेवल्याशिवाय विचारकरणंही कठीण होवून बसतं. कधी-कधी हे सगळं नकोसं होतं, पण कधीतरी काही हवं हवंसं गवसतं आणि आपण पुन्हा अकदा त्या जाळ्यामध्ये स्वत:ला गुतवून घेतो. ‘मित्रांगण’ने मला असाच सुखद धक्का दिला तो फेसबुकमुळे. या फेसबुकच्या माध्यमातून मित्रांगणचे संपादक श्री. वैभव कुलकर्णी यांची ओळख झाली आणि त्याचं फलित म्हणून मित्रांगणचा देखणा अंक हाती पडला. प्रथमदर्शनी हा देखणा अंक पहून बरं वाटलं, पण असे कित्तेक देखणे अंक वाचल्यावर आवडतातच असं नाही. कागद, छपाई, छायाचित्रं आणि प्रसिद्धी एवढ्या भांडलावर अंक वाचनिय होत नसतो तर त्यातील लिखाण, आशय, विचार यांनीच तो समृद्ध होत असतो. या सर्वांच्या जोडीला जर निटनेटकेपणा आणि देखणेपण असलं तर ‘सोनेपे सुहागा’ (दुघात साखर म्हणत नाही, कारण हल्ली साखर सगळ्यानाच चालत नाही आणि तिचे दुष्परीणाम ‘खायला मरता की मरायला खाता?’ या मित्रांगण मधल्या लेखानेच ठळकपणे समोर आणले आहेत.)

तर, अगदी संपादकियापासूनच चौकटी बाहेरचा वेगळा विचार वाचकांपर्यंत पोहोचवणारा हा अंक खरंच खुप आवडला. ‘खायला मरता की मरायला खाता?’ या लेखामधलं वास्तव समजल्यावर आपली जीभ आता आपल्या ताब्यात राहिलेली नसून ती ‘बहूराष्ट्रीय अंडरवर्ल्ड’ ची गुलाम बनली आहे हे समजलं सुक्ष्म जीवशास्त्राचा लेक्चरर आणि साउथ इंडियन हॉटेलवाला असलेल्या शिवा ऎथाल यानी हा लेख लिहिल्याने त्याला वेगळं महत्व आहे हे विसरून चालणार नाही. कोवळ्या वयात आयुष्य गहाण टाकणारा मुकुंद, ‘बॉर्डरलेस वर्ल्ड’ चे अधिक यांचं गेल्या सतरा वर्षातलं काश्मीर मधलं मानवतेने ओतप्रोत भरलेलं काम, गाळाने भरलेली सुप्त धरणे, नववर्षाचं स्वागत, अजंठ्यातील विज्ञान असे अनेक लेख, हे सगळंच मुळातून वाचण्यासारखं आहे.

असा हा विविध विषयावर वेगळे विचार मांडणारा अंक आवडला. मात्र अर्थ किंवा गुंतवणूक विषयक एखादा लेख सदर अंकात असला तर मराठी माणसाचं तिकडेही लक्ष जाईल.     

मित्रहो, असं लेखन वाचलंच पाहिजे, तुम्ही वाचलं तर ते वाचेल. मी हा अंक वाचला, संपादक वैभव कुलकर्णी म्हणतात तशा वाचलेल्या वेळातून. वेळ काढाल तर वेळ वाचेल. संपादक वैभव कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्‍यांचं अभिनंदन. 

नरेंद्र प्रभू
विलेपार्ले, मुंबईNo comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates