21 April, 2015

खळाळता झरा - मनोहर गांगण


सुप्रसिद्ध फाईन आर्ट फोटोग्राफर आणि बॉम्बे आर्ट सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य मनोहर गांगण यांचं नुकतंच दु:खद निधन झालं. मनोहर गांगण यांना श्रधांजली वाहण्यासाठी बॉम्बे आर्ट सोसायटी तर्फे शोकसभेचं आयोजन करण्यात येणार आहे. सदर सभा ऑडीटोरीयम हॉल, जहांगीर आर्ट गॅलरी, एम. जी. रोड, काळा घोडा, मुंबई ४०० ००१ येथे दिनांक २५ एप्रिल २०१५ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे, असं संथेचे अध्यक्ष चित्रकार वासुदेव कामत यांनी कळवलं आहे.    

हरहुन्नरी कलाकार, मनमिळावू; प्रेमळ मित्र आणि ‘चित्रकार फोटोग्राफर’ अशी स्वत:ची वेगळी छाप कलाजगतात सोडून मनोहर गांगण अकाली निघून गेले. उत्साहाचा अखंड झरा असलेला हा माणूस खर्‍या अर्थाने कला आणि निसर्ग जगला. गडचिरोली सारख्या आदीवासी बहूल भागात छायाचित्रण केल्यावर, तिथल्या आदीवासींवर मागासलेपणा आणि नक्षलप्रभाव या दोन्ही गोष्टींसाठी त्यानाच जबाबदार धरलं जातं हे या हळव्या कलाकाराने अनुभवलं आणि त्याचं प्रत्ययकारी दर्शन आपल्या अनोख्या नजरेने टिपून पुढारलेल्या समाजासमोर मांडलं.

मुंबईसारख्या जादुईनगरीत
कलासाधना करीत असताना तळकोकणातला निसर्ग त्यांना सतत खुणावत होता. हजारो शब्दात जे सांगता येणार नाही ते त्यांच्या एका छायाचित्रामधून अनुभवता येतं. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सौदर्याचं दृश्य स्वरूप छायाचित्रांच्या माध्यमातून जगाला घडावं म्हणून गेली काही वर्षं ते धडपडत होते. ते काम हातावेगळं करीत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
आजवर त्यांच्या अनेक एकल आणि समूह प्रदर्शनातून रसिकांना आवर्जून भेटणारे मनोहर गांगण आता मात्र त्यांच्या स्तब्द छायाचित्रातूनच भेटणार आहेत. हजारो फाईन आर्ट दर्जाची छायाचित्रं, एरवी जळावू म्हणून उपेक्षीलेल्या लाकडांची ‘काष्टशिल्प’, अशा अजरामर कलाकृतीमधूनच गांगण आता आपल्यात वावरणार आहेत.

वृत्तपत्रासाठी वरील मजकूर लिहिताना मनोहर गांगण या नावापुढे कै. लिहिण्याचं धैर्य झालं नाही. एखादा खळाळता झरा अचानक आटून जावा तसा हा आमचा मित्र आम्हाला सोडून गेला. हे सत्य असलं तरी ते पटत नाही. मित्रवर्य आत्माराम परब यानीही मनोहर गांगण याना शब्दसुमनं वाहिली आहेत ती त्यांच्याच शब्दात पुढे देत आहे.

नरेंद्र प्रभू 


त्याचं मनोहर असणं

आयुष्यातली एखादी गोष्ट करावी की करू नये? असा प्रश्न आपल्याला पडला असताना योग्य मार्गदर्शन करणारा तो ‘गुरू’. ती गोष्ट का केली पाहिजे? याचं पटेल असं उत्तर देणारा तो ‘तत्वज्ञ’ आणि त्या निर्णयाच्या परिणामांमध्ये साथ देणारा तो ‘मित्र’. मनोहर  गांगण माझ्यासाठी हे तिन्ही होता. हे ‘होता’ म्हणताना जीभ जड होतेय. मनोहरचं नसणं एखादा अवयव गमावण्यासारखं वाटतं मला. देण्याघेण्याच्या पलिकडे जावून फक्त मैत्रीखातर पाठीशी उभा राहणारा हा आधार आता नाहीसा झाला आहे. त्याचं ते ‘मनोहर’ असणं हाच माझ्यासाठी दिलासा असायचा...!

कस्टमच्या नोकरीचा राजिनामा देवून टुर कंपनी काढायचा जगाच्या दृष्टीने आतबट्ट्याचा वाटणारा निर्णय मी घेवू पहात होतो आणि असं करावं की करू नये या व्दंद्वात फसलेला असताना मनोहर गांगण या माझ्या मित्राने मला जीवनाला कलाटणी देणारा तो निर्णय घ्यायला मला मानसिक ताकद दिली. मनोहर सोडून ‘परळच्या गल्लीतल्या माझ्यासारख्या सरकारी नोकरीत स्थिर झालेल्याला’ ती नोकरी सोडायचा सल्ला कुणीही दिला नसता. त्याच्या ‘लेन्सला’ आजचा ‘ईशा टुर्स’चा उज्वल भविष्यकाळ त्या वेळीच दिसला होता.  मनोहर माझा भविष्यकार होता.

गेली सात-आठ वर्षं आम्ही अगोदरसारखे भेटू शकत नव्हतो. पण त्याचं लक्ष असायचं ‘टेली
लेन्स’मधून. जहांगीर दालनातील त्याच्या प्रदर्शन सोहळ्यासारख्या समारंभाना आम्ही आवर्जून एकत्र यायचो. ईशा टुर्सच्या सहलींना तो यायचा, नजर कशावर असली पाहिजे हे शिकायला मिळायचं ते त्याच्या बोलण्यातून आणि छायाचित्रातूनही. पट्टीचा छायाचित्रकार होता तो. कितीतरी गहीरे क्षण कॅमेर्‍यात बंदिस्त करून मनोहर कायमचा निघून गेला. न सांगता सवरता तो असा उठून गेला. माझ्यासारख्या शेकडो जणांना त्याने  प्रेरणा दिली, स्वत:च्या पायावर उभं केलं. आणि पुढच्या पायरीवर हात दिला, साथ दिली.

मी, मनोहरच्या घराचाच मित्र, माझ्या अनेक समस्यांवर विचार करण्यात किती रात्री त्याच्या घरी जागवल्या आम्ही. आणि हे सगळं हक्काने व्हायचं, हट्टाने व्हायचं. आता तो क्षितिजावरचा तारा बनलाय, दिवसाच्या उजेडातही लुप्त होणारा.


आत्माराम परब. 

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates