11 April, 2018

साता समुद्रापार


आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला.  काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. माका कळ्ळला ता तुका म्हायत आसा काय?’ असली काही वाक्य मी त्याला सांगितली. अमेरिकेत हापूस बरोबरच मालवणी बोलीची गोडी अनुभवली जातेय म्हणून मला बरं वाटलं. तसंच या फोनवरच्या संभाषणामुळे मला मी जिपीओत असतानाचा एक किस्सा आठवला.


त्या दिवशी शिवजयंती होती. आमच्या डिपार्टमेंट मधलं काम आटोपून आम्ही सगळे शिवजयंतीच्या मिरवणूकीत सामील झालो होतो. जिपीओच्या आवारात आणि इमारतीत ती मिरवणूक काढली जात होती. मुख्य इमारतीमधल्या गोल घुमटाखाली मिरवणूक आली. प्रत्येक खात्याच्या ठिकाणी ती मिरवणूक आली की छत्रीय कुलावतंस...... शिवाजी महाराज की जय अशी गर्जना केली जात होती. माझा मित्र  माहिमचा पवार ती ललकारी देत होता. जवळच एसटीडी आणि आयएसडी चे बुथ होते. एका आयएसडी बुथमधून एक माणूस बाहेर आला आणि म्हणाला “इंटरनॅशनल कॉल चालू है भाई, जरा चूप रहीये” पवारने त्याला विचारलं “किधर कॉल कर रहे हो?” त्याने बर्लिन म्हणून सांगून पुन्हा कॉल लावला. पुढे निघालेली मिरवणूक सोडून पवार त्या बुथजवळ गेला आणि दार उघडून जोरदार ललकारी देऊन आला. मला हसू आवरेना. मी त्याला विचारलं असं का केलंस? तर म्हणाला “जाऊदेना शिवजयंती जर्मनीपर्यंत” आता सगळेच आमच्याबरोबर हास्यात सामिल झाले.  साता समुद्रापार आवाज पोहोचला म्हणून पवार भलताच खुश होता आणि याला हे चटकन सुचलं म्हणून आम्ही.




No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates