15 August, 2019

बलशाली भारतमाताअखंड झाली आता 
बलशाली भारतमाता
करु शर्थ न्यायला पुढती
जग ज्याची गायील महती
गगनाला घालू वळसे
घेवून यान करी मासे
जो ध्यास घेतला आहे
चंद्रमा कवेतून पाहेअभिनंदन शुरवीरांचे 
जो छाताडावर नाचे
शत्रूचा करू निप्पात
कुणी करतील आता घात?
आधार जयाचे घरी  
ये विकास गंगा दारी
बलशाली भारतमाता
दावील मार्ग या जगतानरेंद्र प्रभू
१५ ऑगस्ट २०१९

05 August, 2019

लडाख: Show Must Go Onलडाख जितका सुंदर निसर्ग, तेव्हढाच खडतर प्रवास. लडाखला एकदा भेट दिली की तो प्रत्येकाच्या मनावर गारुड करतोच. १९९५ साली अशाच एका जिप्सीने लडाख-मुंबई-लडाख असा मोटरसायकलने प्रवास करायचा संकल्प केला आणि तो तमाम अडथळ्यांना दूर करत पूर्णही केला. त्यावर लडाख... प्रवास अजून सुरू आहे हे वाचकप्रिय पुस्तकही आलं आहे. आता तो इतिहास झाला. त्या नंतर प्रिय मित्र आत्माराम परब यांनी लडाखला १३१ वेळा स्वत: भेट दिली आणि ३५ हजारावर पर्यटकांना आजवर लडाखला नेऊन सुखरूप परत आणलं. जाऊन आलेले पर्यटक मग त्यांचा प्रवक्ता झाला आणि हा कारवा वाढतच चालला आहे. लडाख... प्रवास अजून सुरू आहे.

पण मंडळी, या लडाखच्या सफरीवर निघालात की अनेक अडचणी समोर उभ्या ठाकतात. आजवर या संकटांवर यशस्वी मात करण्यात आत्माराम परब आणि टीम ईशा सफल झाले आहेत. मग ती २०१० ची ढग फुटी असो की काश्मिर बंदची हाक असो की वाटेत सतत कोसळणारे कडे असोत. आम्ही पर्यटकांचं लडाख पहायचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. या लडाखा प्रवासादरम्यान अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या, राजकिय चळवळी झाल्या, बंद-मोर्चे निघाले पण आत्मारामनी पर्यटकांना लडाख फिरवण्याचा वसा सोडलेला नाही. नुकतेच कालच्या १ ऑगस्टला आम्ही लडाखला २००च्यावर पर्यटकांना लडाख दाखऊन परतलो आणि परवा तीन तारीखचा सुर्य उगवयच्या आधी ईशा टुर्सचे ९० च्यावर पर्यटक लडाखला निघायला सज्ज झाले असतानाच सरकारने पर्यटकांना श्रीनगर खोरं सोडण्याची विनंती केली. आमचे चार टूर लिडर श्रीनगर विमानतळावर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज असताना त्यानाच श्रीनगर सोडण्याची वेळ आली. अशा वेळी आयत्यावेळी निर्माण झालेल्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि ईशा टुर्सच्या पर्यटकांचा हिरमोड होऊ नये म्हणून स्मिता रेगे (संचालक इशा टुर्स) यांच्या नेतृत्वाखाली टीम ईशा कामाला लागली आणि शब्दश: अहोरात्र काम करून या टिमने पर्यटकांना लेहला सुखरूप पोचवण्याचं अतुलनीय काम करून दाखवलं. रात्रभर चालणारी ती धडपड मी पहात होतो आणि या टीमची आश्वासक चाल पाहून प्रत्येक वेळी छाती अभिमानाने फुलून येत होती. सर्व पर्यटकांची श्रीनगरची विमान तिकिटं रद्द करून लेहची नविन तिकिटं काढणं, त्याच वेळी त्यांच्या असंख्य प्रश्नांना न थकता उत्तरं देणं, श्रीनगरमध्ये उभी केलेली यंत्रणा लेहला हलवणं, लेह विमानतळावर पर्यटकांचं स्वागत करणं, श्रीनगर, सोनमर्ग, कारगिलमधल्या निवास व्यवस्थेची करण्यात आलेली सोय स्थगीत करून लेहला आयत्यावेळी एवढ्या मोठ्याप्रमाणावर येणार्‍या पर्यटकांची योग्य सोय करणं, हाय अ‍ॅल्टिट्युड सिकनेस होऊ नये म्हणून काळजी घेणं आणि मुख्य म्हणजे हे सर्व करीत असताना होणार्‍या आर्थिक नुकसानाकडे न पहाणं असं दहा दिशांनी पण निश्चित ध्येय ठेवून झटून केलेल्या त्या कर्तुत्वाला त्रिवार सलाम.

एकीकडे हे काम सुरू असताना आत्माराम परबांबरोबर माझा पुर्वनियोजित नाशिक दौरा ठरलेला होता. लेखक आपल्या भेटीला या ज्योती स्टोअर्स व श्री शंकराचार्य न्यास, नाशिक याच्या सयुक्त उपक्रामांतर्गत आमच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार होता. लडाख सफरीची वर उल्लेखलेली धावपळ सुरू असतानाच मुंबई-ठाण्यात धुवांधार पावसाला सुरूवाता झाली, आम्ही नाशिकरांच्या भेटीला जायच्या आत मुंबईचा पाऊस आम्हाला कडकडून (खरं तर कडाडून)  भेटायला आला. पण त्याची मिठी हलकेच सोडवून आम्ही नाशिककडे रवाना झालो. कसारा घाटात कोसळलेल्या दरडी, झोडपून काढणारा पाऊस आणि विपर्यस्त व खोट्या बातम्या देऊन अडचणीत वाढ करणारी प्रसारमाध्यमं (मिडीया) यांचा मुकाबला करीत आत्माराम आणि मी नाशिकला कार्यक्रम स्थळी सुखरूप पोहोचलो ते अ‍ॅड. रघुवीर वैद्य साहेबांच्या उत्तम सारथ्यामुळेच. नाशिकला होणार्‍या कार्यक्रमाचं मुलाखरुपी सारथ्य करण्याआधी त्यांनी ठाणे ते नाशिक असं सारथ्यकरून आम्हाला उपकृत केलं होतं.

आम्ही कार्यक्रम स्थळी पोचेपर्यंत लडाखची ९० पर्यटकांना घेऊन सुरू झालेली सफर मार्गी लागत होती. गाडीत आत्माराम परब आणि ठिकठिकाणच्या कार्यालयातून काम करणारी टिम ईशा अफाट विश्वासाने आणि धैर्याने कार्यरत होती. स्मिता रेगे, अनिला नाईक, गितांजली पडवळ-माने, सुजाता जोशी, हर्षदा, अमिता सगळीच मंडळी अहोरात्र काम करीत होती आणि तिकडे प्रत्यक्ष फिल्डवर आदित्य जोशी, अमित खोत, धिरज सावंत, संदीप चौगावकर हे किल्ला लढवत होते. शिवाय लेहला पद्मा आणि आमचे तिथले चक्रधर तय्यार होतेच. ४८ तास चाललेला हा थरार अनुभवणं हासुद्धा एक अविस्मरणीय प्रवास होता आणि तिकडे लडाख... प्रवास अजून सुरू आहे...

मित्रहो लडाखला सर्व व्यवहार आजही शांतपणे चालू आहेत. जम्मूमध्येही शांतता आहे, फक्त श्रीनगर खोर्‍यातील पाच जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. देश विघातक शक्तींचा निपटारा करण्यासाठी ते आवश्यकही आहे. तेव्हा आपण सय्यम बाळगणं जरूरीचं आहे. लडाखला जाणार्‍या पर्यटकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. लडाखला जाणारा पर्यटकांचा ओघ कमी होण्याचं काहीच कारण नाही तेव्हा Show Must Go On .  लडाख... प्रवास अजून सुरू आहे... सुरू रहाणार आहे. चला जाऊया...!  

नरेंद्र प्रभू
५ ऑगस्ट २०१९        

                                                          

16 July, 2019

तो माका काय शिकयतलो (विडंबन)
“तो माका काय शिकयतलो!” या एका वाक्यात समस्त गुरूजनांका विचार करूक लावणारी मालवणी कविता”    


तो माका काय शिकयतलो, मीच तेका शिकवीन
मास्तराच्या हातातली पट्टी, तेच्यासकट वाकविन

माका सांगता आईन्सटायनान ऍपल पडताना बगल्यान
हेना आंबो काय आकाशातसून उडताना जिकल्यान?

तो माका काय शिकयतलो, मीच तेका शिकवीन
माज्या वाटेक गेलो तर लिंबू फिरवीन

नेमबाजी कसली शिकयतास, ढपो बगलात माजो?
काजी मोजा नुसते, आताय डाव माजोच

तो माका काय शिकयतलो, मीच तेका शिकवीन
चिपनळीतसून तिरफळा जागेर शेकवीन

माका शिकव नको... सांगान ठेवतय
आसलस कितीय मोठो ना..., तरी तुका पावशेरान मोजतय

तू माका काय शिकयतस, मीच तूका शिकवीन
बगतस काय असो, कानाखाली वाजवीन  

  


लाखो इथले गुरु

मित्रवर्य सचिनदा आणि आत्मा यांनी सोशलमीडियावर गुरूपौर्णिमेनिमित्त 
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू! ही ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांची कविता टॅग केली आणि पुढील कविता सुचली.

कुठे कसे अन कधी भेटले
लाखो तिथले गुरु
मित्र, प्रवासी, गावं भेटले
त्यांच्या गोष्टी करू!

पाय पुढे अन रस्ता मागून
घेऊन आला घरापासून

नव्हते माहीत कुठे जायचे
अखंड यात्रा सुरु
कुठे कसे अन कधी भेटले
लाखो तिथले गुरु

कुणी म्हणाले शिखर गाठूया
नसता पायापुरत्या वाटा

ध्येय गाठायाचे म्हणूनी
शर्थ लढ्याची करू
कुठे कसे अन कधी भेटले
लाखो तिथले गुरु

वाटा नव्हत्या सोप्या कधीही
धडे गिरवले त्यात तरीही

काळ शिकवतो तंत्र उद्याचे
तोही एक गुरु
कुठे कसे अन कधी भेटले
लाखो इथले गुरु

असा माझा प्रवास आहे
नवीन रस्ता खुणवत राहे

जमेल तेंव्हा जमेल तेथे
भ्रमंती माझी सुरु
कुणास ठावे कसे भेटतील
लाखो तिथले गुरु29 June, 2019

उतरलं सारं नभ


उतरलं सारं नभ तिथं डोंगरापल्याड
अन वर्षाव जाहला इथं रानमाळावर

रानपक्षी चिंब ओला उभा असे आडोशाला
तास सरसरा चाले, उभा तरवा कडेला

दिस बुडायला आला, थार नसे पावसाला
तिथं खोप्यामध्ये जीव असे तान्हेला दुधाला

अवचित पावसाने थोडी उघडीप दिली
माय धावते तरारा, चिंब पान्ह्याने जाहली 

नभ भरून आलेलं, उतरलं धरेवर
वर्षावला पान्हा त्याचा... असे कधीचा उधार

नरेंद्र प्रभू
२५ जून २०१९
कोकण रेल्वे मार्गावरून28 June, 2019

नभ झाकळून गेलं

नभ झाकळून गेलं
जलदांची दाटी झाली
बेधुंद पावसाला
तुफानाची साथ आली

वीज कडाडे वरती
लोळ प्रपात पडती
माजे काहूर अंतरी
त्यात कापते धरती

अस्सा पडतो पाऊस
चिंब चिंब रान ओलं
कुठे आसऱ्याला जाऊ
कुठे ठेऊ हे पाऊल

मनी काजळाचे मेघ
आत दाटला कल्लोळ
सैरावैरा धावे बघ
जणू फुटलं वादळ

नरेंद्र प्रभू

17 May, 2019

ऑस्ट्रेलिया... ऑस्ट्रेलिया – एक

आम्ही ( मी आणि सदाबहार मित्र आत्माराम परब) एतिहाद एअरवेजने सिडनीला जायला निघालो. मुंबई आंतरराष्ट्रिय विमानतळावरच 'आम्ही आणि आमचे बाप'चे निर्माता मयूर रानडे, अभिनेता अतुल परचुरे भेटले आणि तिथेच गप्पांचा फड रंगला. ऑस्ट्रेलियामधील सिडनी इथे साजर्‍या होणार्‍या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी सम्मेलन २०१९साठी ते ही सदर नाटक सादर करण्याकरीता चालले होते. जेट एअरवेजची घरघर थांबली असल्याने आणि त्याना घरघर लागल्याने ऐन वेळी आम्हाला विमान कंपनी बदलावी लागली होती. मग दक्षिणेला जायच्या आधीच आम्हाला मुंबई-अबू धाबी असा द्रविडी प्राणायाम करावा लागला. अडीज तास मागे पश्चिमेला अबू धाबी करून मग सिडनी गाठायची होती. अबू धाबी जवळ आली तशी ती मरू भूमी दिसायला लागली. मनात अरेबियन नाईट्स, तेल, पैसा, बुरखा, आयसीस, इथलं तेल संपलं तर? नंतर...., असे विचार येत होते.


अबू धाबीला उतरलो, पुन्हा सिडनीकडे प्रयाण करायचं होतं. पुन्हा सुरक्षा तपासणी सुरू झाली. प्रत्येक ठिकाणी थोडा  वेग़ळा प्रकार असतो. इथे बुट, पट्टा, घड्याळ, आमचं लडाखी कंकण सगळं उतरवून हॅन्ड बॅगसह ट्रे मध्ये ठेवलं. माझी तपासणी होऊन मी पुढे जाऊन बसलो, बरोबर मयूर रानडे आणि अतुल परचुरेही होते. आत्मा मात्र पाठीमागे अडकला होता. त्याच्या जवळ मायीने खास बनऊन दिलेलं देशी गायीचं शुद्ध तूप होतं. 

मायीने दिलेलं तूप, त्यासाठी आत्माने केलेली छोटीसी लढाई, १०० ग्राम तूप एका बाटलीत भरून बाकीच त्या कौंटरवरच चाटून खाणं तोच करू जाणे.  आणि तेवढं करून पुन्हा ते अतुल पारचुरेना सांगणं याला हाईट म्हणतात,  त्याने ती कधीच गाठलीय, मध्ये मध्ये renew करतो एव्हढंच.
तू दिलेले तूप मी ते आवडीने खाईले

२०० ग्रामची तुपाची बाटली सुरक्षारक्षक पुढे घेऊन जायला देईनात तेव्हा या पठ्ठ्याने १०० ग्राम तूप एका बाटलीत भरून घेतलं आणि दुसर्‍या बाटलीमधलं तिथेच त्यांच्यासमोर चाटून खाल्लं. क्या बात हैआत्मा मायीला एक फोन करण्यासाठी ८० किमी पायपीट करीत केलॉंगला गेला होता तो प्रसंग आठवला. रात्रीचं जागरण आणि विमान प्रवासाचा थकवा या प्रसंगाने कुठच्या कुठे उडून गेला.                     

विमानाने अबुधाबीहून उड्डाण केलं आणि ते सिडॅनीच्या दिशेने निघालं. पुढचे १४ तास या विमानात बसून काढायचे होते. थोडी झोप, थोडं खाणं, थोडा सिनेमा असं करीत वेळ काढत होतो. जेवणात मात्र पाव आणि केक सदृश्य वस्तू आणि जुस मिळत होता. आता हे एवढं गोड कसं खायचं. वर ठेवलेल्या सॅकमधल्या गोळ्यासुद्धा घेता येत नव्हत्या कारण बाजुला बसलेला वृद्ध गृहस्थ (म्हातारा म्हणू का?) झोपला होता. मग गोड खाऊ नका असे हर्षदाचे (माझी बायको) शब्द कानी पडायला लागले. अजुबाजूला पाहिलं, मी जागाच होतो. कविता सुचायला लागली मग. फोन हाती घेतला आणि ती अशी अवतरली.:         

जिथे दिसतील शिते
तिथे याद तुझी येते
खाऊ नको गोड ते
शब्द आले ।

नको भात, खा चपाती
का खातो पुन्हा माती
नसताना मी संगती
शब्द आले ।

देतील पुरणपोळी
जिलेबीही ती वाटोळी
कितीदा करू टवाळी
शब्द आले 

करीता प्रवास मोठा
तरी आहे मागे सोटा
खाऊन पहा तू त्या
शब्द आले ।

(१७-०४-२०१९
अबू धाबी - सिडनी विमानातून)
     
थोडी डुलकी लागल्यानंतर जाग आली खिडकीमधून बाहेर पाहिलं तर सगळीकडे निळाई भरून उरलेली होती, वर आकाशात तशीच खालीही, इथे कोण कुणाशी स्पर्धा करतंय हा प्रश्नच होता, ते निळं आकाश की खाली अथांग पसरलेला सागर, अरबी समुद्र म्हणावं की दर्या? अरबी समुद्रच बरं, दर्या म्हटलं की मग आपले कोळी बांधव आठवतात आणि अर्थातच मासळी. इथे विमानात मांसाहार म्हणजे नुसतं चिकन, त्याला कोंबडी म्हणणं ही नकोच, उगाच कोंबडी वाड्याची आठवण जागी होते. ते आपलं व्हेज बरं, म्हणजे माझ्यासाठी, बाजूच्या म्हातारबाबाला काहीच पसंत नव्हतं, स्वतःच खाऊन झाल्यावर तो आपला माझ्या जेवणात लक्ष घालून होता.  "भराऊ का एक घास?" विचारावंस वाटत होतं. त्याला फळं हवी होती, अरे इथे कशी देणार...., ये कोकणात ये, तिकडे तूला बोन्डू देतो. जाऊदे

चला खाली पांढऱ्या ढगांनी थोडं चित्र बदललं. खाली गोवा आलं असावं, आता दर्याला उधाण आलं म्हणायला हरकत नाही. उधाण तसं ते मनालाही आलं होतं, खाली आपलं गाव आहे आणि आपण तिकडे न जाताच पुढे चाललोय असं वाटून मन खट्टू झालं. जोराची भूक लागली की घरंची आठवण येतेच. खाली तर प्रत्यक्ष गाव आहे. मालवणी जेवणाची अनीवार लहर आली बाजूच्या म्हात्यार्‍याकडे पाहून ती दाबून टाकली. परळच्या छितरमलकडून वळून जाणारी तांबडी एस्टी पाहिली की गावाहून मुंबईत आलो तेव्हा सुरूवातीला असं व्हायचं. सरळ ती गाडी पकडून गावी निघून जावं असं वाटायचं. गड्या आपला गाव खरंच बरा!

एक सिनेमा पाहून झाला, नंतर पुन्हा काढलेल्या एका प्रदीर्घ डुलकीनंतर खाली सिडनी आलं, आपण ऑस्ट्रेलिया खंडात येऊन पोचलो. आता १४ तासानंतर पुन्हा जमिनीला पाय लागणार. हे जग पहायची खुपच उत्सुकता लागून राहिली होती. विमानाची चाकं सिडनीला टेकली.                         

02 May, 2019

अखिल ऑस्ट्रेलिया मराठी सम्मेलन २०१९ऑस्ट्रेलियामधील सिडनी इथे १९ ते २१ एप्रिल २०१९ हे तीन दिवस अखिल ऑस्ट्रेलिया मराठी सम्मेलन २०१९ साजरं झालं. संपूर्ण ऑस्ट्रेलिया खंडातल्या एक हजारावर मराठी रसिकांनी यात भाग घेतला होता. यात ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड येथील मराठी बांधव तर होतेच पण ज्या महाराष्ट्रातून ही मंडळी हजारो मैलांवर जाऊन स्थाईक झाली त्या महाराष्ट्रामधून, मुंबईमधून अनेक मान्यवर या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर विचारवंत डॉ. रघुनाथ माशेलकर, तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते अच्युत गोडबोले, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू, ईशा टुर्सचे संचालक आणि या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक श्री. आत्माराम परब, चितळे बंधू मिठाईवालेचे श्री.केदार चितळे या मान्यवरांबरोबरच 'आम्ही आणि आमचे बाप'चे निर्माता मयूर रानडे, अभिनेता अतुल पारचुरे, आनंद इंगळे, पुष्कर स्त्रोत्री, अजित परब, 'लडाख.. प्रवास अजून सुरु आहे' चे लेखक नरेंद्र प्रभू, गायक कलाकार अनिरुद्ध जोशी, विश्वजीत बोरवणकर, शरयू दाते आणि प्रसन्नजीत कोसंबी सिडनीमध्ये दाखल झाले होते.

१९ एप्रिल २०१९ रोजी दुपारी ठिक दोन वाजता दिप प्रज्वलन करून या रंगारंग सोहळ्याला टाळ्यांच्या गजरात सुरूवात झाली. त्यानंतर आत्माराम परब यांच्या पहिल्या मुंबई-लडाख-मुंबई अशा मोटरसायकलवच्या प्रवासाची चित्तथरारक कथा असलेल्या ग्रंथाली प्रकाशनाच्या 'लडाख.. प्रवास अजून सुरु आहे' या वाचकप्रिय पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचं प्रकाशन जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झालं. त्यानंतर लगेचच डॉ. रघुनाथ माशेलकर यांची प्रेरणादायी मुलाखत झाली. गिरगावतल्या गरिबांच्या शाळेत डॉ. माशेलकर यांचं शिक्षण झालं, पण त्याचे शिक्षक विचारांनी श्रीमंत होते. हळद आणि बासमतीचं पेटंट, रिलायंस Jio ची भरारी, Making impossible  possible, आयुष्यातल्या प्रयोगशाळेतलं ज्ञान, जुन्या नव्याचा संगम अशा अनेक विषयांना त्यानी आपल्या मुलाखतीत स्पर्श केला. संपूच नये असं वाटणारी ही मुलाखत जेव्हा संपली तेव्हा संपूर्ण स्त्रोतृवर्गाने उभं राहून टाळ्यांच्या प्रचंड गजरात डॉ. माशेलकरांना मनावंदना दिली.

भारलेल्या या वातावरणतच संमेलनात "आम्ही आणि आमचे बाप" या नाटकाचा प्रयोग साजरा झाला. महाराष्ट्राची दोन लाडकी व्यक्तिमत्व प्रल्हाद केशव अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्या अष्टपैलू जीवाप्रवासावर आणि कलाजीवनावर आधारित हा अफलातून प्रयोग फारच रंगला आणि सर्वच कलाकारांनी वाहवा मिळवली.  महाराष्ट्राचं, मराठी मातीचं हे गतवैभव न्याहाळताना आपल्या मातीपासून दूर देशात स्थाईक झालेला नाट्यागारातील प्रत्येक मराठी रसिक आपापल्या स्मृतीरंजनात न्हाऊन निघाला होता. आचार्य अत्रे आणि पुल यांच्या कलागुणांचा हा गोफ म्हणजे एक अफलातून कलाकृती आहे. मयुर रानडे निर्माता असलेल्या या नाटकाचे तरुण दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी अत्रे आणि पु.ल. या दोन्ही महान कलाकारांना थोडक्या वेळात प्रभावीपणे रंगमंचावर सादर केलं आहे.

दुसर्‍या दिवशी प्रचिती लिमये दिग्दर्शित महाराष्ट्राची गोष्ट’, वैजयंती मोने दिग्दर्शितनाटक मेरी जान’, योगेश पोफळे दिग्दर्शितप्रतिक्षा आणि फ्लाईंग क्विन’, शलाका माळगावकर दिग्दर्शितरुजवा असे मनोरंजनाचे  रंगारंग कार्यक्रम सिडनीमधल्या मराठी कलाकारांनी सादर केले. शलाका माळगावकर यांनी सादर केलेला रुजवा हा नाट्य-नृत्य-गायनाचा-वादनाचा कार्यक्रम सगळ्यांच्याच दीर्घ स्मरणात राहील असा होता. आपल्या माती, संकृती आणि माणसांपासून हजारो मैलावर येऊन स्थाईक झालेल्या अखिल ऑस्ट्रेलियातील मराठी मनाची होणारी घालमेल आणि त्यावर दिलासा देणारी फुंकर या सादरीकरणाने घातली तेव्हा नाट्यगृह सद्गदीत झालं होतं. सिडनीमधल्या हौशी कलाकारांनी सादर केलेला हा कार्यक्रम व्यावसायीक कलाकारांच्या तोडीचा होता हे नक्की. दरम्यान चितळे बंधू मिठाईवालेचे श्री. केदार चितळे यांची मुलाखत इवलेसे रोप लावीयले व्दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी या काव्य पंगतींची आठवण करून देणारी होती. मुळ सांगलीकर असलेले चितळे पुण्यात येऊन स्थाईक झाले आणि आजच्या उंचीला पोचले त्याची खुसखुशीत कहाणी खुद्द केदार चितळे यांच्या तोडून ऐकण्यात वेगळीच मजा होती.

तिसर्‍या दिवशी प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू आणि किमयागार अच्युत गोडबोले यांच्या मुलाखतींनी कार्यक्रमाची सुरूवात झाली. डॉ. मीना प्रभूंच्या भ्रमंतीची कहाणी आणि अच्युत गोडबोले यांचा जीवनाचा प्रवास यांचं कथन प्रेरणादायी होतं. अच्युत गोडबोले यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व, त्यांच्या शिक्षण, संगणक आणि लेखनाचा प्रवास स्त्रोत्यांना जीवनाकडे पहाण्याचा सखोल दृष्टीकोन देऊन गेला. एक माणूस अर्थशास्त्र, संगीत, जीवनगाथा, संगणक, विज्ञान, कलाकौशल्य, गणित, समिक्षा, वैचारिक, मानसशास्त्र, आत्मकथन         अशा विविध विषयातील तज्ज्ञ असू शकतो याचं कौतूक तर होतंच पण त्यांना जवळून ऐकता पाहाता आलं म्हणून रसिक धन्य पावले होते. त्यानंतर भांडा सौख्य भरे ही प्रांजली पळनिटकर दिग्दर्शित नाटीका आणि मनोरंजनाचे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी रंग स्वरांचे हा लोकप्रिय मराठी गीतांचा कार्यक्रम गायक कलाकार अनिरुद्ध जोशी, विश्वजीत बोरवणकर, शरयू दाते, प्रसन्नजीत कोसंबी आणि निहीरा जोशी-देशपांडे या भारतातून आलेल्या गायक कलाकारांनी सादर केला. संपूर्ण नाट्यगृहाने त्यांच्याबरोबर ताल धरला होता. लोकप्रिय गाण्यांवर थिरकताना सगळेच रसिक संमेलनाच्या रंगात न्हाऊन निघाले होते.

आपली मराठी माती, माणसं, भारत देश एवढंच नव्हे तर आशियाखंडही सोडून दूर खंडप्राय ऑस्ट्रेलियात स्थायीक झालेली सिडनी, मेलबर्न, कैर्न, गोल्डकोस्ट आदी ठिकाणची मराठी माणसं या तिन दिवसात मनानेही एकत्र नांदताना दिसली. आपली मराठी संकृती जपताना आणि ती ऑस्ट्रेलियातही वाढवताना दिसली. संमेलनातला उत्साह तर एखाद्या लग्न सोहळ्याला लाजवणारा होता. २०२२ साली मेलबर्न इथे होणार्‍या संमेलनात नक्की भेटायचं असं एकमेकांना सांगत हस्तांदोलनं झाली, निरोपाचे हात हलले आणि दूर देशातही मराठी संकृती जिवंत आहे याचा सार्थ अभिमान वाटला.                             
 
  
                 

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates