17 May, 2019

ऑस्ट्रेलिया... ऑस्ट्रेलिया – एक

आम्ही ( मी आणि सदाबहार मित्र आत्माराम परब) एतिहाद एअरवेजने सिडनीला जायला निघालो. मुंबई आंतरराष्ट्रिय विमानतळावरच 'आम्ही आणि आमचे बाप'चे निर्माता मयूर रानडे, अभिनेता अतुल परचुरे भेटले आणि तिथेच गप्पांचा फड रंगला. ऑस्ट्रेलियामधील सिडनी इथे साजर्‍या होणार्‍या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी सम्मेलन २०१९साठी ते ही सदर नाटक सादर करण्याकरीता चालले होते. जेट एअरवेजची घरघर थांबली असल्याने आणि त्याना घरघर लागल्याने ऐन वेळी आम्हाला विमान कंपनी बदलावी लागली होती. मग दक्षिणेला जायच्या आधीच आम्हाला मुंबई-अबू धाबी असा द्रविडी प्राणायाम करावा लागला. अडीज तास मागे पश्चिमेला अबू धाबी करून मग सिडनी गाठायची होती. अबू धाबी जवळ आली तशी ती मरू भूमी दिसायला लागली. मनात अरेबियन नाईट्स, तेल, पैसा, बुरखा, आयसीस, इथलं तेल संपलं तर? नंतर...., असे विचार येत होते.


अबू धाबीला उतरलो, पुन्हा सिडनीकडे प्रयाण करायचं होतं. पुन्हा सुरक्षा तपासणी सुरू झाली. प्रत्येक ठिकाणी थोडा  वेग़ळा प्रकार असतो. इथे बुट, पट्टा, घड्याळ, आमचं लडाखी कंकण सगळं उतरवून हॅन्ड बॅगसह ट्रे मध्ये ठेवलं. माझी तपासणी होऊन मी पुढे जाऊन बसलो, बरोबर मयूर रानडे आणि अतुल परचुरेही होते. आत्मा मात्र पाठीमागे अडकला होता. त्याच्या जवळ मायीने खास बनऊन दिलेलं देशी गायीचं शुद्ध तूप होतं. 

मायीने दिलेलं तूप, त्यासाठी आत्माने केलेली छोटीसी लढाई, १०० ग्राम तूप एका बाटलीत भरून बाकीच त्या कौंटरवरच चाटून खाणं तोच करू जाणे.  आणि तेवढं करून पुन्हा ते अतुल पारचुरेना सांगणं याला हाईट म्हणतात,  त्याने ती कधीच गाठलीय, मध्ये मध्ये renew करतो एव्हढंच.
तू दिलेले तूप मी ते आवडीने खाईले

२०० ग्रामची तुपाची बाटली सुरक्षारक्षक पुढे घेऊन जायला देईनात तेव्हा या पठ्ठ्याने १०० ग्राम तूप एका बाटलीत भरून घेतलं आणि दुसर्‍या बाटलीमधलं तिथेच त्यांच्यासमोर चाटून खाल्लं. क्या बात हैआत्मा मायीला एक फोन करण्यासाठी ८० किमी पायपीट करीत केलॉंगला गेला होता तो प्रसंग आठवला. रात्रीचं जागरण आणि विमान प्रवासाचा थकवा या प्रसंगाने कुठच्या कुठे उडून गेला.                     

विमानाने अबुधाबीहून उड्डाण केलं आणि ते सिडॅनीच्या दिशेने निघालं. पुढचे १४ तास या विमानात बसून काढायचे होते. थोडी झोप, थोडं खाणं, थोडा सिनेमा असं करीत वेळ काढत होतो. जेवणात मात्र पाव आणि केक सदृश्य वस्तू आणि जुस मिळत होता. आता हे एवढं गोड कसं खायचं. वर ठेवलेल्या सॅकमधल्या गोळ्यासुद्धा घेता येत नव्हत्या कारण बाजुला बसलेला वृद्ध गृहस्थ (म्हातारा म्हणू का?) झोपला होता. मग गोड खाऊ नका असे हर्षदाचे (माझी बायको) शब्द कानी पडायला लागले. अजुबाजूला पाहिलं, मी जागाच होतो. कविता सुचायला लागली मग. फोन हाती घेतला आणि ती अशी अवतरली.:         

जिथे दिसतील शिते
तिथे याद तुझी येते
खाऊ नको गोड ते
शब्द आले ।

नको भात, खा चपाती
का खातो पुन्हा माती
नसताना मी संगती
शब्द आले ।

देतील पुरणपोळी
जिलेबीही ती वाटोळी
कितीदा करू टवाळी
शब्द आले 

करीता प्रवास मोठा
तरी आहे मागे सोटा
खाऊन पहा तू त्या
शब्द आले ।

(१७-०४-२०१९
अबू धाबी - सिडनी विमानातून)
     
थोडी डुलकी लागल्यानंतर जाग आली खिडकीमधून बाहेर पाहिलं तर सगळीकडे निळाई भरून उरलेली होती, वर आकाशात तशीच खालीही, इथे कोण कुणाशी स्पर्धा करतंय हा प्रश्नच होता, ते निळं आकाश की खाली अथांग पसरलेला सागर, अरबी समुद्र म्हणावं की दर्या? अरबी समुद्रच बरं, दर्या म्हटलं की मग आपले कोळी बांधव आठवतात आणि अर्थातच मासळी. इथे विमानात मांसाहार म्हणजे नुसतं चिकन, त्याला कोंबडी म्हणणं ही नकोच, उगाच कोंबडी वाड्याची आठवण जागी होते. ते आपलं व्हेज बरं, म्हणजे माझ्यासाठी, बाजूच्या म्हातारबाबाला काहीच पसंत नव्हतं, स्वतःच खाऊन झाल्यावर तो आपला माझ्या जेवणात लक्ष घालून होता.  "भराऊ का एक घास?" विचारावंस वाटत होतं. त्याला फळं हवी होती, अरे इथे कशी देणार...., ये कोकणात ये, तिकडे तूला बोन्डू देतो. जाऊदे

चला खाली पांढऱ्या ढगांनी थोडं चित्र बदललं. खाली गोवा आलं असावं, आता दर्याला उधाण आलं म्हणायला हरकत नाही. उधाण तसं ते मनालाही आलं होतं, खाली आपलं गाव आहे आणि आपण तिकडे न जाताच पुढे चाललोय असं वाटून मन खट्टू झालं. जोराची भूक लागली की घरंची आठवण येतेच. खाली तर प्रत्यक्ष गाव आहे. मालवणी जेवणाची अनीवार लहर आली बाजूच्या म्हात्यार्‍याकडे पाहून ती दाबून टाकली. परळच्या छितरमलकडून वळून जाणारी तांबडी एस्टी पाहिली की गावाहून मुंबईत आलो तेव्हा सुरूवातीला असं व्हायचं. सरळ ती गाडी पकडून गावी निघून जावं असं वाटायचं. गड्या आपला गाव खरंच बरा!

एक सिनेमा पाहून झाला, नंतर पुन्हा काढलेल्या एका प्रदीर्घ डुलकीनंतर खाली सिडनी आलं, आपण ऑस्ट्रेलिया खंडात येऊन पोचलो. आता १४ तासानंतर पुन्हा जमिनीला पाय लागणार. हे जग पहायची खुपच उत्सुकता लागून राहिली होती. विमानाची चाकं सिडनीला टेकली.                         

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates