25 March, 2020

माणूसकीच्या शत्रूसंगे





आज गुढी पाडवा, नव वर्षाचा पहिला दिवस, चैत्र पालवीने झाडं-वेली नवा साज घेऊन उभी असताना एरवी  आपण सगळे शोभा यात्रा आणि एकमेकांना शुभेच्छा देण्यात मग्न असणार होतो. पण आज ती परिस्थिती नाही. जगभरात सन्नाटा पसरला असून आपल्या भारतात देखील २१ दिवसाची संचारबंदी लागू झाली आहे. एका विषाणूने अखिल मानवजातीला वेठीला धरलं आहे. म्हणून या संकटाचा सामनाही त्याच पातळीवर केला पाहिजे. जगात दोन नंबरची आरोग्य सेवा असणारी इटली हतबल झाली आहे, महाशक्ती अमेरिकेने आपला खजिना रिता करायला घेतला आहे. सगळे देश आपल्यापरीने या संकटाचा सामना करीत असताना या वरचा आत्तापर्यंतचा उपाय म्हणजे माणसा-माणसात अंतर राखणं.

विषाणूच्या या अक्रमणाला तोंड देण्यासाठी पुढे न येता देव मैदान सोडून पळाला असं काही दांभिक आता बोलू लागले आहेत. मित्र हो हे खरं नाही. देव आहेच, तो सामोराही येतोय, पण त्याला पहायला आधी आपला चष्मा बदलला पाहिजे, दृष्टीकोन बदलला पाहिजे. हो तो देव आता रस्त्यावर पोलिस, इस्पितळात डॉक्टर, परिचारीका, परीचारक, दारात दुधाची पिशवी ठेऊन जाणारा दुधवाला, सफाई कामगार अशा अनेक रुपात रोजच्या रोज प्रगट होत आहे. आपल्या जिवावर उदार होऊन धोका पत्करून ही मंडळी आज आपली सेवा करीत आहेत.

अशा कठिण प्रसंगी सर्दी आणि गर्दी या दोन गोष्टींची काळजी घेणं क्रमप्राप्त आहे आणि हे करीत असताना देशासेवा करण्याची संधी दाराशी चालून आली आहे. आपापल्या दाराबाहेर पाऊल न टाकता केवळ घरात राहून आपण ही देशसेवा करू शकतो.

मित्र हो फक्त २१ दिवस घरात राहून आपण हे करू शकतो. सोप्पं आहे, आपण आपल्याच घरात रहात आहोत. (घरात राहून काय करायचं त्याच्या रोचक पोष्ट एव्हाना सर्वांनाच आल्या असतील). सोप्पं आहे म्हणतोय कारण आपल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरंनी ११ वर्षांहूनही जास्त काळ अंदमानच्या काळ कोठडीत व्यतीत करून हाल अपेष्टा सहन करून देशप्रेमाची शर्थ केली, असामान्य साहित्य संपदा निर्माण करून मराठी मातीचं ऋण फेडलं, खरंच या वेळी असं घरात बंद झाल्याबरोबर पहिल्यांदा वीर सावरकरांची आठवण दाटून आली.

माणूसकीच्या शत्रूबरोबर लढत असताना आज आपल्या देशाला आपल्या प्रत्येकाच्या सहकार्याची अपेक्षा आहे ती पुर्ण करूया. मला खात्री आहे आपण ते करणार आहोत आणि यावर विजय मिळवणार आहोत. खरंच माणूसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमूचे सुरू... अंती विजयी ठारू....  


गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! 


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates