25 August, 2013

आत्माची शंभरावी लडाख सफर


मित्र हो...!  आज माझा प्रिय मित्र आत्मा आपल्या शंभराव्या लडाखवारीवर चाललाय. एका लडाख बाहेरच्या माणसाने लडाखला शंभरवेळा जाणं हा एक विक्रम असावा. पर्यटकांना घेवून लडाखला जायचं असा ध्यास घेतल्यापासून त्याच्या स्वत:च्या शंभर वार्‍या झाल्या आहेत, असा योग फार क्वचीतच येतो, या भटक्याच्या आयुष्यात तो आलाय. आज हजारो पर्यटक लडाखला ईशा टुर्स बरोबर जावून आलेत, काही आता चाललेत तर काही जायची तयारी करताहेत. पण आत्मासाठी ती आता मळलेली वाट झाली आहे. पण ही वाट त्याची त्याने घडवली. अनेक बिकट प्रसंगांना तोंड देत प्रवास चालू ठेवला. आणि तो प्रवास पर्यटकांसाठी सोपा केला. आज त्याच्या पाठीवर कौतूकाची जी थाप पडते त्यासाठी त्याने आधी खस्ता खाल्ल्यात हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो.
तो लडाखला असा काही भिडला की लडाखने आणि लडाखींनींही त्याला आपलसं केलं. आपल्या स्वत:च्या गावात जेवढा त्याला आपलेपणा वाटतो तेवढाच लडाखलाही वाटतो. लडाखवर जेव्हा ढगफुटीने प्रहार केला तेव्हा तमाम पर्यटक आणि जनता लडाख सोडून जाण्यासाठी विमानतळावर गर्दीकरून होती तेव्हा तो मात्र परदेशातून आल्या आल्या लडाखला दाखल झाला होता. त्याच्या आश्वासक कृतीने तिथल्या अनेक लडाखी मित्रांना नक्कीच आधार मिळाला.

लडाख हिल कौसील, जम्मू काश्मिर सरकारचा पर्यटन विभाग यानी आत्माचं वेळोवेळी कौतूक केलं आहे, ते मोठ्या प्रमाणावर भारतीय पर्यटक लडाखला आणल्याबद्दल पण उन्हाळी पर्यटनाबरोबरच लडाखच्या हिवाळी सहली सुरू करून त्याने इथल्या पर्यटनाचा चेहरा मोहराच बदलून टाकला आहे. पर्यटनाचे चार महिने संपल्यावर मरमॅट सारखी गुडूप होणारी इथली हॅटेल्स आता हिवाळ्यातही उघडी राहू लागली आहेत. नुकतच आमचं लडाख प्रवास अजून सुरू आहे हे पुस्तक प्रकाशीत झालं तेव्हा बोलताना आत्मा म्हणाला होता की आता मी जो काही आहे ती लडाखचीच देन आहे. एवढा तो लडाखशी एकरुप झाला आहे.

त्याच्या पहिल्यावहील्या लदाख सफरीचा थरार लडाख प्रवास अजून सुरू आहे या  पुस्तकात आपल्याला वाचायला मिळाला आहेच पण त्या घटनेनंतर तब्बल शंभरवेळा लडाखला येणं हे येड्यागबाळ्याचं काम नाही. त्यासाठी लागतं ते अफाट धैर्य, अविरत ध्यास, सर्वस्व झोकून द्यायची वृत्ती आणि फायद्या तोट्याचा विचार न करता व्रतस्थतेने पर्यटकांची सेवा करण्याची तळमळ हे सगळ त्याच्या ठायी आहेच. नुकताच कैलासची परिक्रमा करून मी परत आलोय त्या वेळी कैलासपतीला जे साकडं घातलं ते एवढंच होतं की अशीच ताकद, धैर्य आणि आरोग्य त्याला लाभावं. आपल्या सारख्या जीवाभावाच्या पर्यटकांकडेही आज मागत आहे ते आत्मा आणि ईशा टुर्ससाठी असेच अनंत आशिर्वाद.          

          





                            

कैलास


कैलासीचा राणा
भेट घडे आज
विराट ते रुप
दिसे मज

निर्मळ जलाचे
मानसरोवर
जन्मभर आस
असे वारंवार

दर्शन घडले
हात मी जोडले
भरून वाहीले
दोन्ही डोळे

पवित्र तीर्थाचे
स्नान आज घडे
पाप ताप झडे
सर्वकाळ

माझा विठूराया
शंभो शिव माया
एक झाली काया
त्यांच्या संगे

अफाट दर्शन
ज्योतींचे नर्तन
माझे तनमन
त्यात रंगे

कैलास पर्वत
त्याची परिक्रमा
आनंदाची सीमा
नसे आज

भव्य तेची रुप
सामोरे समीप
माझी तगमग
शांत झाली

मायेची पार्वती
गौरीकुंडावर
किती माझा भार
तीच वाही
शिव पार्वतीचे
आशिष लाभले
स्नान आज झाले
अमृताचे

भरून पावलो
माझा न उरलो
त्याचाच जाहलो
शिवरुप


नरेंद्र प्रभू
  




10 August, 2013

उत्तराखंडचा धडा – भाग तीन : उत्तराखंड आणि पच्छिम घाट


हिमालयाच्या कुशीत वसलेलं देवभूमी उत्तराखंड निसर्ग सौदर्याने ओसंडून वाहात होतं. राजधानी दिल्ली पासून चार-पाच तासाच्या अंतरावर असलेल्या या राज्यात काय नाही ते विचारा. गंगा, यमुना, भागीरथी, अलकनंदा, मंदाकिनी, धवलगंगा, पुष्पावती, भिलंगणा, सोंगनदी सारख्या नद्या, नैनिताल, मसुरी, रानीखेत अशासारखी तीन डझन थंड हवेची ठिकाणं, बिनसर, जिम कॉर्बेटसह चार अभयारंण्य. आणि या निसर्गसंपदे बरोबरच बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री हरिव्दार, हृषीकेश, गौरीकुंड, गुप्तकाशी, रुद्रप्रयाग, हेमकुंड साहेब, जोशीमठ, कर्णप्रयाग, देवप्रयाग अशी हजारोवर्षाची धार्मिक परंपरा लाभलेली तिर्थक्षेत्रं. या सर्व संपदेवर माणसाची वाईट नजर पडली आणि त्याच्या स्वार्थानेच या प्रदेशाचा घात केला. फक्त उन्हाळ्यात चालणार्‍या चारधाम यात्रेला किती पर्यटकांनी जावं याची कुणीच पर्वा केली नाही. उलट तिथल्या लोकसंखेच्या तिप्पट पर्यटकांना सुखसुविधा देण्यासाठी मैदानी भागातून भुसभुशीत डोंगरावर, पहाडांवर सर्व प्रकारचं बांधकाम साहित्य नेण्यात आलं, शंभराहून अधिक रस्त्यांचं कुठलाही शास्त्रीय दृष्टीकोन न ठेवता बांधकाम करण्यात आलं. गेल्या आठ वर्षात तिथल्या वाहतुकीचं प्रमाण १००० प्रतीशत वाढलं आहे  हॉटेल उद्योगाला चालना देण्यासाठी नद्यांची पात्रं वळवण्यात आली, नद्यांच्या पूर-रेषीच्या आत मोठमोठी बांधकामं उभी केली गेली. लोभापायी नद्या, पहाड, जंगलाचा ताबा घेतला गेला. हे सर्व करताना १९९८ साली रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखीमठची भूस्खालनाची घटना आणि तिने झालेली जीवित तसंच वित्तहानी दुर्लक्षीली गेली. अलकनंदा नदीला चार दशकापुर्वी आलेल्या महापुराचा सर्वांनाच विसर पडला. ते रौद्रतांडव विसरल्यामुळेच  आणि पर्यावरण तज्ज्ञांकडून वारंवार देण्यात येणारा धोक्याचा इशारा नजरेआड केला गेल्यानेच  त्याहून मोठा प्रलय आता पाहावा लागला. दिल्लीच्या संटर फॉर सायन्स ऍन्ड एन्व्हायर्नमेंटच्या सुनीता नारायण यांनी ही मानवनिर्मित आपत्ती असल्याचं नमूद केलं आहे.
   
 राष्ट्रीय गंगा नदी खोरे प्राधीकरणाने गोमुख ते उत्तरकाशी हे १३० कि.मी. क्षेत्र पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनाशील म्हणून जाहीर करण्याची शिफारस केली होती. राज्यसरकारने ती साफ धुडकावून लावली. संपूर्ण उत्तर भारतात आता आस्थेची जागा धास्तीने घेतली आहे. उत्तराखंडाचे तांडव आता हिमालयातील सर्व राज्यांसाठी धोक्याची घंटा ठरली आहे. गंगेसारखे रौद्र रुप जर यमुनेने घेतले तर दिल्लीसह उत्तरेतल्या अनेक राज्यात उत्पात घडू शकतो. विनाशाच्या या इशार्‍यांनी आपण जागे होणार आहोत का हा खरा प्रश्न आहे. भारतात दरवर्षी दहा लाख हेक्टर जंगल नष्ट होत आहे असा अभ्यासकांचा अंदाज आहे. आपल्या पश्चिम घाटाचीही अशीच घुसमट होत आहे. सह्याद्रीच्या कुशीत चंगळनगर्‍या उभ्या राहात आहेत. जैवविविधतेचं जागतिक वारसास्थळ म्हणून घोषीत झालेल्या याच सह्याद्रीच्या संदेदनशील भागाचं संरक्षण, संवर्धन करण्यासाठी सुचवलेल्या उपायांकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करून त्याला विरोधही करण्यात येत आहे. पश्चिम घाटाच्या दर्‍या-डोंगरामधून रस्त्यांची, शहरीकरणाच्या प्रकल्पाची कामं होवू घातली आहेत. कोकणातल्या स्थानिक जनतेचा विरोध डावलून धनदांडग्यांचं हित जपलं जात आहे. माथेरानचा ४९८ चौरस कि.मी.चा टापू २००२ च्या फेब्रुवारीत पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषीत केला गेला आणि २००३ मध्ये  मात्र ते क्षेत्र २१५ चौरस कि.मी.वर आणलं गेलं. महाराष्ट्रातल्या सर्वच नद्यांच्या पात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असून बारमाही वाहणार्‍या कित्येक नद्या आता पावसाळ्यातच तग धरून असतात आणि पाऊस निघून गेल्यावर कोरडया पडतात. नदी पात्रात सोडण्यात येणार्‍या रासायनीक द्रव्य आणि मळीमुळेही इथला आधीवास धोक्यात आला आहे. अवैध खाणींच्या मुद्द्यावरून गोव्यातील खाणी गेलं वर्षभर बंद आहेत. पण त्या  आधीच केलेल्या अनिर्बंध खोदकामामुळे तिथल्या निसर्गाची पर्यायने जनसामान्यांच्या सपत्तीची फार मोठी हानी झाली आहे. जैवविविधतेच्या आणि अन्नसाखळीच्या वरच्या  स्थानावर असलेल्या वाघांच्या संखेत वेगाने होणार्‍या गळतीमुळे ती साखळीच धोक्यात येणार आहे. या सर्वाचे तिव्र आघात इथल्या जैवविविधता, हवामान, पूरस्थिती, लोकांची उपजीविका, सुरक्षितता यावर होत असतो याचं भान वेळीच ठेवलं गेलं नाही तर हिमालयातली सुनामी सह्याद्रीत यायला वेळ लागणार नाही. पर्यावरण संवर्धन आणि जतन ही आता लोक चळवळ झाली पाहिजे.

नरेंद्र प्रभू 
   

08 August, 2013

उत्तराखंडचा धडा – भाग दोन : आपत्ती व्यवस्थापन


उत्तराखंडामधल्या तिर्थस्थानांच्या संखेमुळे हा प्रदेश देवांची भुमी म्हणून ओळखला जातो. तिथे झालेल्या ढगफुटीने हजारो लोकांचे प्राण घेतले, हजारो अद्याप बेपत्ता आहेत. वित्तहानी झाली ती वेगळीच. या आपत्तीमुळे भक्तीपर्यटनाला गेलेले सुमारे पाऊणकोटी लोक तिकडे अडकून पडले होते. आपत्ती व्यवस्थापन आणि निवारणाच्या बाबतीत जो अनुभव आला तो फारसा चांगला म्हणता येणार नाही. मुळात कोण कुठे आहे आणि किती लोक एखाद्या ठिकाणी एकत्र येऊ शकतात याचा कसलाच धरबंद नव्हता. हिमालयाच्या रचनेमुळे कडे कोसळणे, ढगफुटी या तिथल्या नित्याच्याच बाबी आहेत. मात्र त्या लक्षात घेऊन करावयच्या उपाय योजनांची तिथे पुर्ण वानवा होती. एकच उदाहरण द्यायचं झाल्यास गंगोत्रीचं देता येईल. हे क्षेत्र अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषीत झालं आहे. अशा ठिकाणी कोणतंही पक्क बांधकाम असता कामानये किंवा कायम स्वरूपी राहण्याची सोय करता येत नाही. पण या ठिकाणी दुकान, हॉटेलांची गर्दी झालेली आहे. नदी पात्रात बांधकाम झाली आहेत. उत्तराखंडामधल्या तिव्र डोंगर उतारावर रस्ते रुंदीकरण, टपर्‍या-वस्त्या या मधली अर्निबंध वाढ या सर्वांमुळे हा भाग अधिक आपत्तीप्रवण बनला आहे. त्यात तिथे प्रचंड प्रमाणात येणार्‍या पर्यटकांनी भर घातली आहे. याच गोष्टींमुळे आपण  आपत्ती व्यवस्थापनात कमी पडलो आणि निवरणातही तेच झालं. आठ वर्षांपुर्वीच आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा होवूनही बचावकार्य करण्यापलिकडे आपलं पाऊल पडलेलं नाही.

केदारनाथ सारख्या ठिकाणी जाणार्‍या यात्रेकरूंची संख्या पुर्वी अत्यल्प होती. आता त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर आता त्या भाविकांपेक्षा उत्साही पर्यटकांचाच अधिक भरणा असतो. एका आकडेवारीनुसार केदारनाथ अभयारण्यात दरवर्षी एकलाखाहून जास्त पर्यटक ये-जा करतात. तिथल्या हवामानामुळे फक्त तीन महीने एवढ्या कमी कालावधीत ही सर्व धावपळ सुरू असते. त्यात येणारे बहुतांश पर्यटक लेज-कुरकुरे-पेप्सीवाले. त्यामुळे ऎशोआरामात येणे, केवळ मज्जा म्हणून यात्रा करणे, भरपूर पैसे खर्च करणे, सर्व सुखसोईंची अपेक्षा करणे आणि त्याचा लाभ घेणे, जास्तीत जास्त गोष्टी वापरणे या सर्वांमुळे तिथल्या नैसर्गिक साधनांवर त्याचा अतोनात ताण पडतो. गौरीकुंडपर्यंत गाडीने आल्यावर वर केदारनाथपर्यंत जाण्यासाठी बहुतांश लोक घोड्यांचा वापर करतात, सामान वाहून नेण्यासाठीही घोडे वापरले जातात. एकट्या केदारनाथ परिसरात पाच हजार घोड्यांचा वापर होतो. या घोड्यांना खायला काय घालायचे? त्याचा बोजा जंगलातील गवत आणि झुडूपांवरच पडतो. एवढ्या मोठया प्रमाणात येणार्‍या पर्यटकांची गरम पाण्याची, खाण्या-जेवण्याची सोय करण्यासाठी तिथल्याच जंगलाची तोड होतो. या सगळ्याचा एकत्रीत परिणाम म्हणून त्या जमीनीवरचं आवरण फारच कमी होत गेलं आणि आधीच ठिसूळ असलेली ही जमीन अधिक उघडी बोडकी झाली. जमीनीची धुप मोठ्या प्रमाणावर होवू लागली. ज्या ठिकाणी संरक्षक भिंती, कठडे हवे होते त्या ठिकाणी टपर्‍या, हॉटेल, धर्मशाळा उभ्या राहिल्या. या सर्वापासून नदीपात्रही वेगळं राहू शकलं नाही. भाविकांना हेलीकॉप्टरने पोहोचवणार्‍या कंपन्यांची संख्या बघता बघता नऊ झाली. सतत हेलीकॉप्टरची घरघर सुरू झाली. अशा ऎशोआरामी पर्यटकाला झालेला आघात पेलण्याजोगा नव्हताच. निसर्ग व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला आणि व्हायचं तेच झालं. कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याची तयारी नसलेल्या पर्यटकांना फार मोठ्या मनुष्यहानीला तोंड द्याव लागलं. आणि खाली  हरिव्दार, हृषीकेशला कलेवरं जमा करणं एवढंच प्रशासनाच्या हाती राहिलं.   

मदतीचा हात, तुटपुंजा का होईना पण तो आपत्तीग्रस्त माणसांपर्यंत पोहोचला पण तिथल्या पशु-पक्षी, प्राण्यांच काय? हजारो घोड्यांमुळे त्यांना संसर्गाची बाधा झाली, हेलीकॉप्टरची घरघरण्याने वन्यजीवांची संख्या घटली. प्रजननासाठी येणार्‍या  स्थलांतरीत प्राणी पक्षांवर गर्दी-गोंगाटाचा विपरीत परीणाम झाला. खोर्‍याने मिळणार्‍या पैशापुढे या सर्वाचा विचार कोण करणार? या सर्वाचा एकत्रीत विचार केल्यास असं दिसतं की या वर्षी फार काही वेगळं झालं नाही. तर या सगळ्याची तयारी आपणच हळूहळू करून ठेवली होती. एक निमीत्त पाहिजे होतं त्याचं काम ढगफुटीने केलं त्याचे परिणाम आपण उघड्या डोळ्यांनी पाहातच आहोत.

               
नरेंद्र प्रभू 



07 August, 2013

उत्तराखंडचा धडा – भाग एक : काय घडलं



आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून परिसर या सदरात दि. १, ३ आणि ३ ऑगष्ट २०१३  उत्तराखंडावरच्या आपत्ती संदर्भात माझं लेखन असलेला कार्यक्रम प्रसारीत झाला त्यातला हा पहिला भाग:


आपल्या भारत देशातलं उत्तराखंड हे राज्य हिमालयाच्या अंगाखांद्यावरचं आणि म्हणूनच निसर्गसंपदेचं वरदान असलेलं आहे. गंगा, भागिरथी, अलकनंदा, मंदाकिनी अशा अनेक नद्या इथेच उगम पावतात आणि पुढे काठावरच्या प्रत्येक गावाला, शहराला भरभरून देतच जातात. या नद्यांच्या पाण्याने आणि त्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे या नद्यांच्या खोर्‍यातला हजारो वर्ग किलोमीटरचा प्रदेश सुजलाम सुफलाम झाला आहे.  या भौतिक संपत्ती बरोबरच आध्यात्मिक आनंदासाठीही जगभरातील लोक तिथेच धाव घेतात. उत्तराखंडचं गुढ गंभिर वातावरण, शुभ्र बर्फाच्छादीत शिखरं, प्रसन्न मोकळी आल्हादायक हवा, हिरवागार परिसर आणि खळाळत्या नद्या या सर्वांमुळे हा भाग तिथे गेलेल्या प्रत्येकालाच भुरळ घालतो. अनेक तपस्वी आणि ऋषीमुनींनी इथे साधना केली आणि तो यज्ञ पुढे तसाच चालू रहावा या उद्देशाने मंदिरांची, धर्म स्थळांची स्थापना केली. या प्रदेशाला देवभुमी म्हणून ओळखलं जातं ते त्याचमुळे. अशा या निसर्गरम्य प्रदेशावर आकाशातून एकच वार झाला आणि काही काळातच होत्याचं नव्हतं झालं. सगळीकडे हाहाकार माजला. या एकाच धक्क्याने आधुनिक संपर्क यंत्रणा हा डाव्या हातचा खेळ समजणार्‍या माणसाला हतबुद्ध करून टाकलं. वाहतूकीचे रस्ते त्यावरच्या लाखमोलाच्या गाड्यासह अदृश्य झाले. नद्यांनी रौद्र रुप धारण केलं आणि दोन्ही हात फैलावत काठावरची गावं, घरं, इमारती, धर्मशाळा, हॉटेलं आपल्या कवेत घेतलं. बरं हे करताना जरा म्हणून उसंत दिली नाही. झर्‍याचा ओहळ, ओहळाची नदी, नदीची महानदी आणि महानदीचा महासागर होवून गेला. हे सारं निमिषात घडलं. राजाने मारलं आणि पावसाने झोडलं तर तक्रार तरी कुणाकडे करायची? नैसर्गिक आपत्तीने उत्तराखंडवर घाला घातला असा आक्रोश सुरू झाला.

पण, ही आपत्ती नैसर्गिक होती की मानव निर्मित? जगातली सर्वात तरूण आणि पृथ्वीच्या उत्पती नंतर सर्वात शेवटी तयार झालेला ठिसूळ प्रदेश म्हणजे हिमालय. जोराच्या वार्‍यानेही या जमीनीची सतत धुप होत असते. तिव्र डोंगर उतारावरून वाहत येणारे प्रवाह तर ही माती घेवून पठारी प्रदेशाकडे सतत धाव घेत असतात. याला अडवायचं कुणी? निसर्गानेच याचं उत्तर शोधलं आणि वनराई आणि वृक्षांच्या मदतीने ही धुप थांबवली. जमीन थोडी स्थिर झाली. या झाड झाडोर्‍याच्या मदतीने तिथल्या कष्टाळू भुमीपुत्रांनी आपलं जीवन सुखकर नसलं तरी सुसह्य बनवलं. तिथली जनाता  निसर्गाच्या कलाने घेत आपलं जीवन जगत होती. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारधामांच्या मंगलमय आसमंतात भक्तीचा ओलावा होता. पण हळूहळू त्याचं बाजारीकरण झालं. पुण्य कमावण्यासाठी तिथे रिघ लागली. त्या गर्दीच्या गरजांची पुर्तता करण्याच्या निमित्ताने व्यापारी वृत्तीची माणसं त्या ठिकाणी गोळा होवू लागली. पार गोमुख पासून गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सगळ्याच नदी काठावर, तसंच पात्रात बांधकामं उभी राहिली. यात्रा आणि पर्यटन या मधली रेषा पुसट झाली. भक्ती बरोबरच भौतिक सुखाची पुर्तता करण्यासाठी जे पाहिजे ते आणि जे खपेल त्याची दुकानं उभी राहिली. पैशाने देव विकत घेतला जावू लागला आणि सगळ्याच प्रकारचा बाजार इथे मांडला गेला. भक्तीभाव हरवला आणि कर्मकांडाला अतोनात महत्व आलं.


एकीकडे हे होत असताना विकासाची गंगा सर्वांच्या दारी पोहोचली पाहिजे या नावाखाली मोठमोठी धरणं आणि विज प्रकल्प याच ठिसूळ प्रदेशात उभारले जावू लागले. अतोनात जंगलतोड करण्यात आली. पर्यावरण तज्ज्ञ आणि संस्थांच्या इशार्‍याकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत सतांध राजकारणी आणि कंत्राटदारांच्या हिताच्या या योजना उत्तराखंडच्या बोकांडी बसत गेल्या. या प्रकल्पांतर्गत फार मोठ्या प्रमाणात खोदकाम झालं, त्यातून बाहेर आलेली दगड-माती नदी पात्रात बिनदीक्कत फेकण्यात आली. काठावरच्या इमारती आणि पात्रातला ढिग यामुळे नद्यांचा श्वास कोंडला गेला, प्रवाह अडवला गेला. एवढं झाल्यावरही पाण्याने आपला धर्म सोडला नाही, ते वाट फुटेल तिकडे सखल भागात जात राहिलं. आणि १७ जून २०१३ हा दिवस उजाडला. प्रलयंकारी पावसाने एकाच झटक्यात होत्याचं नव्हतं केलं. सगळी अतिक्रमणं क्षणार्धात हटवली. सावरायला म्हणून वेळ मिळाला नाही. राहत्या निवार्‍यासहीत माणसं वाहून गेली. बाजार आणि बाजारू सगळंच गांगार्पण झालं.                         

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates