उत्तराखंडामधल्या तिर्थस्थानांच्या संखेमुळे हा
प्रदेश देवांची भुमी म्हणून ओळखला जातो. तिथे झालेल्या ढगफुटीने हजारो लोकांचे
प्राण घेतले, हजारो अद्याप बेपत्ता आहेत. वित्तहानी झाली ती वेगळीच. या आपत्तीमुळे
भक्तीपर्यटनाला गेलेले सुमारे पाऊणकोटी लोक तिकडे अडकून पडले होते. आपत्ती
व्यवस्थापन आणि निवारणाच्या बाबतीत जो अनुभव आला तो फारसा चांगला म्हणता येणार
नाही. मुळात कोण कुठे आहे आणि किती लोक एखाद्या ठिकाणी एकत्र येऊ शकतात याचा कसलाच
धरबंद नव्हता. हिमालयाच्या रचनेमुळे कडे कोसळणे, ढगफुटी या तिथल्या नित्याच्याच
बाबी आहेत. मात्र त्या लक्षात घेऊन करावयच्या उपाय योजनांची तिथे पुर्ण वानवा
होती. एकच उदाहरण द्यायचं झाल्यास गंगोत्रीचं देता येईल. हे क्षेत्र अभयारण्य आणि राष्ट्रीय
उद्यान म्हणून घोषीत झालं आहे. अशा ठिकाणी कोणतंही पक्क बांधकाम असता कामानये
किंवा कायम स्वरूपी राहण्याची सोय करता येत नाही. पण या ठिकाणी दुकान, हॉटेलांची
गर्दी झालेली आहे. नदी पात्रात बांधकाम झाली आहेत. उत्तराखंडामधल्या तिव्र डोंगर
उतारावर रस्ते रुंदीकरण, टपर्या-वस्त्या या मधली अर्निबंध वाढ या सर्वांमुळे हा
भाग अधिक आपत्तीप्रवण बनला आहे. त्यात तिथे प्रचंड प्रमाणात येणार्या पर्यटकांनी
भर घातली आहे. याच गोष्टींमुळे आपण आपत्ती
व्यवस्थापनात कमी पडलो आणि निवरणातही तेच झालं. आठ वर्षांपुर्वीच आपत्ती
व्यवस्थापनाचा कायदा होवूनही बचावकार्य करण्यापलिकडे आपलं पाऊल पडलेलं नाही.
केदारनाथ सारख्या ठिकाणी जाणार्या यात्रेकरूंची
संख्या पुर्वी अत्यल्प होती. आता त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एवढेच
नव्हे तर आता त्या भाविकांपेक्षा उत्साही पर्यटकांचाच अधिक भरणा असतो. एका
आकडेवारीनुसार केदारनाथ अभयारण्यात दरवर्षी एकलाखाहून जास्त पर्यटक ये-जा करतात. तिथल्या
हवामानामुळे फक्त तीन महीने एवढ्या कमी कालावधीत ही सर्व धावपळ सुरू असते. त्यात
येणारे बहुतांश पर्यटक ‘लेज-कुरकुरे-पेप्सी’वाले. त्यामुळे ऎशोआरामात येणे, केवळ ‘मज्जा’ म्हणून यात्रा करणे, भरपूर पैसे
खर्च करणे, सर्व सुखसोईंची अपेक्षा करणे आणि त्याचा लाभ घेणे, जास्तीत जास्त
गोष्टी वापरणे या सर्वांमुळे तिथल्या नैसर्गिक साधनांवर त्याचा अतोनात ताण पडतो. गौरीकुंडपर्यंत
गाडीने आल्यावर वर केदारनाथपर्यंत जाण्यासाठी बहुतांश लोक घोड्यांचा वापर करतात,
सामान वाहून नेण्यासाठीही घोडे वापरले जातात. एकट्या केदारनाथ परिसरात पाच हजार
घोड्यांचा वापर होतो. या घोड्यांना खायला काय घालायचे? त्याचा बोजा जंगलातील गवत
आणि झुडूपांवरच पडतो. एवढ्या मोठया प्रमाणात येणार्या पर्यटकांची गरम पाण्याची,
खाण्या-जेवण्याची सोय करण्यासाठी तिथल्याच जंगलाची तोड होतो. या सगळ्याचा एकत्रीत
परिणाम म्हणून त्या जमीनीवरचं आवरण फारच कमी होत गेलं आणि आधीच ठिसूळ असलेली ही
जमीन अधिक उघडी बोडकी झाली. जमीनीची धुप मोठ्या प्रमाणावर होवू लागली. ज्या ठिकाणी
संरक्षक भिंती, कठडे हवे होते त्या ठिकाणी टपर्या, हॉटेल, धर्मशाळा उभ्या
राहिल्या. या सर्वापासून नदीपात्रही वेगळं राहू शकलं नाही. भाविकांना हेलीकॉप्टरने
पोहोचवणार्या कंपन्यांची संख्या बघता बघता नऊ झाली. सतत हेलीकॉप्टरची घरघर सुरू
झाली. अशा ऎशोआरामी पर्यटकाला झालेला आघात पेलण्याजोगा नव्हताच. निसर्ग व्यवस्थेवर
प्रचंड ताण पडला आणि व्हायचं तेच झालं. कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याची तयारी
नसलेल्या पर्यटकांना फार मोठ्या मनुष्यहानीला तोंड द्याव लागलं. आणि खाली हरिव्दार, हृषीकेशला कलेवरं जमा करणं एवढंच
प्रशासनाच्या हाती राहिलं.
मदतीचा हात, तुटपुंजा का होईना पण तो आपत्तीग्रस्त
माणसांपर्यंत पोहोचला पण तिथल्या पशु-पक्षी, प्राण्यांच काय? हजारो घोड्यांमुळे
त्यांना संसर्गाची बाधा झाली, हेलीकॉप्टरची घरघरण्याने वन्यजीवांची संख्या घटली.
प्रजननासाठी येणार्या स्थलांतरीत प्राणी पक्षांवर
गर्दी-गोंगाटाचा विपरीत परीणाम झाला. खोर्याने मिळणार्या पैशापुढे या सर्वाचा
विचार कोण करणार? या सर्वाचा एकत्रीत विचार केल्यास असं दिसतं की या वर्षी फार
काही वेगळं झालं नाही. तर या सगळ्याची तयारी आपणच हळूहळू करून ठेवली होती. एक
निमीत्त पाहिजे होतं त्याचं काम ढगफुटीने केलं त्याचे परिणाम आपण उघड्या डोळ्यांनी
पाहातच आहोत.
नरेंद्र प्रभू
No comments:
Post a Comment