28 March, 2018

‘हे प्रवासी गीत माझे.... आत्माराम परब यांचा रंजक प्रवास’ या पुस्तकाचं थाटात प्रकाशनलेखक नरेंद्र प्रभू, अच्युत पालव, रेणूदिदि गावस्कर, आमदार प्रसाद लाड, डॉ. प्रेमानंद रामाणी,  एँग्नेलो राजेश अथायडे,आत्माराम परब आणि सुदेशजी हिंगलासपूरकर
ग्रंथाली प्रकाशनाचं  नरेंद्र प्रभू लिखित हे प्रवासी गीत माझे.... आत्माराम परब यांचा रंजक प्रवास या पुस्तकाचं प्रकाशन दादर माटुंगा सांस्कृतीक केंद्र येथे थाटात संपन्न झालं. दिप प्रज्वलनानंतर ईशा टुर्सचे श्री. रघूवीर वैद्य यांनी खुमासदार निवेदनासहं पाहुण्यांचं स्वागत केलं. जेष्ठ लेखिका आणि समाज सेविका रेणूदिदि गावस्कर, आंतरराष्ट्रीय किर्तीचे न्युरो-स्पायनल तज्ज्ञ,शल्य विशारद आणि लेखक डॉ. प्रेमानंद रामाणी, जगप्रसिद्ध सुलेखनकार आणि सदर पुस्तकाचं मुखपृष्ठ ज्यानी आपल्या सुलेखनाने खुलवलं असे   श्री. अच्युत पालव, आमदार आणि उद्योजक क्रिस्टल ग्रुप चे श्री. प्रसाद लाड, सेंट अँजेलो व्हीएनसिटी व्हेंचरचे चेअरमन श्री. एँग्नेलो राजेश अथायडे, बिसीसीआय चे माजी अध्यक्ष श्री. रवी सावंत, ग्रंथालीचे श्री. सुदेशजी हिंगलासपूरकर आणि ईशा टुर्सचे संस्थापक संचालक श्री. आत्माराम परब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. ग्रंथालीचे विश्वस्त सुदेशजी हिंगलासपूरकर  यांनी या वेळी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि ग्रंथालीच्या कामाचा परिचय उपस्थितांना करून दिला.
जेष्ठ लेखिका रेणूदिदि गावस्कर यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली असून त्या सदर पुस्तकाविषयी बोलताना त्या म्हणाल्या “पुढे काय....? पुढे काय....? पुढे काय....? अशी तीव्र उत्कंठा वाचकाच्या मनात निर्माण करून त्याला पानांमागून पानांचा फडशा पाडायला प्रवृत्त करणारं हे पुस्तक आहे! पुस्तकाचं हस्तलिखित मला मिळालं आणि वाचताना मी अक्षरश: तल्लीन झाले. खरंच हे पुस्तक वाचताना वाचक रममाण होतील अशी माझी खात्री आहे.
   
या पुस्तकानं कोकणापासून सुरूवात करून देश विदेशाला आत्मारामने घातलेली गवसणी टिपली आहे. त्यातल्या अद्भुतरम्यतेसह जीवनस्पर्शी बारकाव्यांनाही अवकाश दिला आहे. आत्माराम परब नावाचा एक अवलिया प्रवासी झपाटल्यासारखा प्रवासाला निघतो काय, जगातील अनेक देशातील चित्तथरारक अनुभवांनी संपन्न होतो काय वा या अनुभवांची श्रीमंती अगणित लोकांपर्यंत पोचावी अशी मनीषा बाळगतो काय! आणि त्याच्या या लोकविलक्षण भटकंतीत अनेक वेळा सहभागी झालेले श्री. नरेंद्र प्रभू  ते सारं संचित वाचकांपर्यंत जादूई शब्दात पोचवतात काय ? सगळंच विलक्षण आणि भन्नाट. हा सारा प्रवास आणि वाचन प्रवास वाचकाला तल्लीन आणि तन्मय तर करून सोडेलच.

आत्माराम मूळचा कोकणी माणूस. हिरवीगार झाडं आणि लालमातीशी त्याचं जन्माचं नातं. पण हे नातं केवळ या निसर्ग वैशिष्ट्यांपुरतं सीमित रहात नाही. कोकणी माणसाची न विचारता सल्ला देण्याची सवय आणि तिरकस स्वभाव याचं फार सुंदर वर्णन पुस्तकाच्या आरंभी वाचकाच्या भेटीला येतं. नव्हे, त्याचं एक छोटं आख्यानच प्रभूंनी वाचकाच्या भेटीला सादर केलं आहे.

आत्मारामने भटकंतीच्या नादापायी मुंबई कस्टमची उत्तम नोकरी सोडून स्वत:च्या ईशा टुर्स या कंपनीची स्थापना केली. ईशा टुर्सची पहिली कुल्लू मनाली सहल जाहीर झाली. त्याचवेळी आत्मारामला जीवनाचं एक चिरस्थायी सत्य उमगलं, ते म्हणजे व्यवसाय आणि छंद यात महदंतर असतं. या सत्याचा आविष्कार नंतरच्या व्यवसायाच्या भटकंतीत पावलोपावली उपयोगी पडला. या पहिल्याच सहलीत पर्यटक गोळा करण्यापासून ते पुढे ती सहल पूर्णत्वाला नेईपर्यंत ज्या काही अडचणींचा डोंगर आत्मारामला पार करावा लागला त्याचं वर्णन वाचतावाचता  हसू फूटतं आणि हसताहसता डोळ्यांच्या कडा कधी पाणावतात हे समजतही नाही.
पर्यटक म्हणून आत्माराम अनेकदा लडाखला गेला. लडाखच्या निसर्गाशी त्याचं अंतरीचं नातं जुळलं. लडाख म्हणजे आत्मारामसाठी स्वर्गच. ते स्वर्गसुख त्यानं हजारो पर्यटकांमध्ये भरभरून वाटलं. पण २०१० साली ६ ऑगस्टच्या रात्री लडाखवर ढगफुटीने प्रहार केला. या संकट समयी आत्माराम तिथं पोचला. तिथल्या पद्मा ताशी या त्याच्या जिवाभावाच्या लडाखी मित्रासमवेत आत्मारामने तिथे लडाखींना जमेल ती मदत केली. त्या वेळचा तो प्रसंग, मृत्यूचं तांडव आणि निसर्गाचं उग्र रुप हे सारं वाचकांनी मुळातूनच वाचायला हवं.

आत्मारामनं पर्यटकांना सौंदर्य संपन्न देशांची सफर करवली तसंच ग्रामीण भारताचं दर्शन घडवलं. भव्यता आणि नम्रता हातात हात घालून कशा नांदतात ते दाखवलं. ईशा टुर्सचा हटकेदृष्टिकोन यातच स्पष्ट होतो. या प्रवासात आत्मारामला स्मिता रेगे, पद्मा ताशी यांच्यासारखे हे तितकेच ताकदीचे सहकारी लाभले. यांच्या शिवायही आत्मारामवर जीवाभावाने प्रेम कारणारे, त्याला या प्रवासात कळकळीनं साथ देणारे अनेक सहकारी भेटले म्हणून तर ही यात्रा सुफल संपन्न झाली. श्री. नरेंद्र प्रभूंची ओघवती भाषा, वर्णनात्मक शैली आणि विषयाशी एकरूप होण्याची ताकद यांमुळे हे पुस्तक अत्यंत वाचनीय झाले आहे. याची ग्वाही मी नक्की देऊ शकते. कारण मीसुद्धा आत्मारामच्या या सफरीतील एक आनंदयात्री आहे. अनेक प्रसंगांची साक्षीदार आहे वा प्रवासातील घुसळणीत जे आनंदाचं नवनीत बाहेर आलं त्याची वाटेकरी आहे. या पुस्तकातील व्यक्तीचित्रं आणि आत्मारामची त्यांच्याशी असलेली अपार मैत्री पाहिली की भारत माझा देश आहे सारे,भारतिय माझे बांधव आहेत असा जात-पात, धर्म,पंथ याच्या पलिकडे जाणारा दृष्टिकोन आपसुकच वाचकाच्या मनात निर्माणाहोते. ”
पुस्तकाचे लेखक श्री. नरेंद्र प्रभू आपल्या मनोगतात म्हणाले  “ आपल्या कोषातून बाहेर पडण्यासाठी  लडाखसारख्या ठीकाणी आत्माराम परब सारख्याबरोबर गेलं पाहिजे. पर्यटकांच्या सहलीत रंग भरण्यासाठी हा माणूस काय काय कसरती करतो ते या पुस्तकात लिहिलं आहे. आत्माराम परब यांचा जीवन प्रवास हा एखाद्या सुरेल गाण्यासारखा आहे, तो आपल्याला या पुस्तकातून वाचता येईल. हिमालय ते तळकोकण आणि केनिया-टांझानिया पासून स्कँडेनेव्हियापर्यंतचं  प्रवास वर्णन या पुस्तकात विस्ताराने आलं आहे.”

डॉ. प्रेमानंद रामाणी, सुलेखनकार श्री. अच्युत पालव, आमदार श्री. प्रसाद लाड, श्री. रवी सावंत यांनीही आत्माराम परब यांच्याबरोबर केलेल्या संस्मरणीय सफरींच्या आठवणी यावेळी कथन केल्या. 
अच्युत पालव यांच स्वागत करताना आत्माराम परब


अच्युत पालव यांच स्वागत करताना आत्माराम परब


या प्रसंगी सदर पुस्तकात वर्णिलेली काही व्यक्तिमत्व देशभरातून मुद्दामहून उपस्थित होती त्यात: मनालीच्या  पहिल्या भेटीपासून आत्माराम परब यांची अनेक प्रसंगी साथ देणारे पहाडी  माणूस रमेश ठाकूर हे होते. कोलकात्याहून खास आलेले मित्र सौमित्र म्हणजेच सौमित्र गांगूली हे एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केलेले  वीर या कार्यक्रमाला उपस्थित होते. लडाख... प्रवास अजून सुरू आहे या  पुस्तकात त्यांच्यावर एक पुर्ण प्रकरण लिहिलं आहे. लेह-लडाखहून पद्मा ताशी आले होते. होणत्याही प्रसंगी पर्यटकांना मदतीचा हात देणारे पद्माताशी यांचा सदर पुस्तकात अनेकदा उल्लेख झाला आहे.   २००३ सालच्या ईशा टुर्सच्या पहिल्या लडाख सफरीमधल्या पर्यटक विजया चौहान या प्रसंगी आवर्जून उपस्थित होत्या. या सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 
शिवभक्त हमिदा खान यांचा या सोहळ्यात मानपत्र देऊन सन्मान

पुस्तक प्रकाशन आणि ईशा टुर्सचा १५व्या वर्धापन दिनाचं औचीत्य साधून गेली २४ वर्षं रायगडावर जाऊन शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यालाउपस्थित राहणार्‍या आणि महाराष्ट्रातल्या तीनशेवर गड-किल्ल्यांची भ्रमंती करणार्‍या शिवभक्त हमिदा खान यांचा या सोहळ्यात मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.   


सौमित्र गांगूली यांच स्वागत करताना डॉ. प्रेमानंद रामाणी

रमेश ठाकूर यांच स्वागत करताना एँग्नेलो राजेश अथायडे 
पद्मा ताशी यांच स्वागत करताना रेणूदिदि गावस्करऋषीकेश यादव यांच स्वागत करताना श्री. रवी सावंत

इंद्रायणी गावस्कर यांच स्वागत करताना मा. दिनकर गांगल

रघुवीर वैद्य यांच स्वागत करताना रेणूदिदि गावस्कर


23 March, 2018

रंग सोहळानरेंद्र प्रभू  लिखित ग्रंथाली प्रकाशनाचं नवं पुस्तक

हे प्रवासी गीत माझे.... आत्माराम परब यांचा रंजक प्रवास 

या पुस्तकात असलेली चारोळी ज्या कवितेमधून घेतली ती माझी कविता  


इथे दूरवर अपूर्व उत्सव
सजली धरणी आता रे
आभाळाला रंग धरेचे
धरती अंबर झाले रे

रंग सोहळा हा सृष्टीचा
खेळत आहे कान्हा रे
अशी निळाई आकाशाची
त्याने आहे ल्याली रे

शाम रंग चौफेर दाटला
गोपी काजळ लावी रे
मंद तारका धावत आल्या
नभांगणाची शोभा रे

चंद्र हासरा झाडांमागून
गुपीत हाय हे बघतो रे
अवचीत येतो वारा मागून
चूर-चूर ही राधा रे   

नरेंद्र प्रभू  
21 March, 2018

वाटांवरती काटे रे


नरेंद्र प्रभू  लिखित ग्रंथाली प्रकाशनाचं नवं पुस्तक
हे प्रवासी गीत माझे.... आत्माराम परब यांचा रंजक प्रवास 


या पुस्तकात असलेली चारोळी ज्या कवितेमधून घेतली ती माझी कविता   

कुणी कुणाचा किती सोबती
कुणास ठाऊक आहे रे
कसा पडतसे पाय कुठेहा
पडले आहे कोडे रे

वळणा पुढती वळण येतसे
सुटले सारे मागे रे
वाटांमधुनी वाट फुटे ही
पुढला फाटा कुठला रे

कुठे विसावू मी रे क्षणभर
उन पसरले आहे रे
अफाट आहे पाणी तरीही
पिण्यास नाही थोडे रे

वाटा असती कधी न सोप्या
वाटांवरती काटे रे
त्या काट्यांतून वाट शोधता
नसते अवघड काही रे  

वाटांमधूनी फूटती वाटा
जणू लाटांवरती लाटा रे
हातांमधूनी हात गुंफता
किती गवसल्या आता रे

नरेंद्र प्रभू  
न सुटणारे हे कोडे


नरेंद्र प्रभू  लिखित ग्रंथाली प्रकाशनाचं नवं पुस्तक
हे प्रवासी गीत माझे.... आत्माराम परब यांचा रंजक प्रवास 


या पुस्तकात असलेली चारोळी ज्या कवितेमधून घेतली ती माझी कविता  वाटा असती कधी न सोप्या
अवचित कधी ती वाट अडे
कडेकपारी सह्याद्रीच्या
घालून देती हेच धडे

कधी उन्ह तर कधी सावली
वाटेवरती पाय पडे
कसे किती अन कुठे चाललो
काय असे हे याच पुढे

कुणी कुणाचा असे सोबती
कशी कुणाशी गाठ पडे
आयुष्याच्या वाटेवरती
न सुटणारे हे कोडे

नरेंद्र प्रभू  


20 March, 2018

पायवाटा माझ्या झाल्यालवकरच येत आहे....
नरेंद्र प्रभू  लिखित ग्रंथाली प्रकाशनाचं नवं पुस्तक
हे प्रवासी गीत माझे.... आत्माराम परब यांचा रंजक प्रवास 

या पुस्तकात असलेली चारोळी ज्या कवितेमधून घेतली ती माझी कविता  


उभा पायावर माझ्या
मनी स्वप्न माझे होते
हाती संधी आली त्याचे
सोने मीच केले होते   

अशी चालता चालता
वाट सापडत गेली
गड्या तुझ्यासाठी  तीही
फुले लेऊन सजली

पायवाटा माझ्या झाल्या
झाले माझेच हे घर
किती चाललो तरीही
                                  नाही पायांना या थार                                  

तुला दावीन आभाळ
तुला दावीन सकाळ
दिस मावळला जरी
कुठे थांबतो हा काळ?

मला चालायाचे आहे
दूर दिशेच्या वाटेला
खंड खंड पायतळी
उर भरून भेटीला  


नरेंद्र प्रभू

19 March, 2018

नसे निमंत्रण आधी रेतिथे सृष्टीचा अपूर्व उत्सव
नसे निमंत्रण आधी रे
असा अचानक क्षण सोन्याचा
मिठीत घेता झाला रे

वर्षावातच आभाळाने
केली होती माया रे
भिजली सारी धरती आणि
भिजली सारी काया रे

लोळ धावतो खाली आणि
वीज कडाडे वरती रे
जशी अचानक आठव येऊन
काळीज कापीत जाते रे 

तुडुंब भरले ओहळ नाले
सुसाट झाले पाणी रे
कधी मनाचा बांध फुटोनी
डोळा पाणी आले रे17 March, 2018

हे प्रवासी गीत माझे...!


नरेंद्र प्रभू  लिखित ग्रंथाली प्रकाशनाचं नवं पुस्तक
हे प्रवासी गीत माझे.... आत्माराम परब यांचा रंजक प्रवास 

त्या कथनाचं शीर्षक गीत
पर्यटकांस....

हे प्रवासी गीत माझे
गात आहे रोज मी
गुंफूनी हातात तुझिया
हात आहे आज मी

चाललेल्या विरळ वाटा
ज्या मलाही भावल्या
त्या तुम्हाला दावल्या अन
पायवाटा जाहल्या

शोधीत असतो रोज वाटा
मार्गस्थ असतो सतत मी
त्या तिथे क्षितिजापुढेही
पाहतो ना मार्ग मी

घेऊनी आकाश सारे
चालतो रे हे तुझे
घेऊनी अवकाश ये रे
रंग उधळू त्यात रेज्यांच्यामुळे प्रवासाच्या वाटेवर सोन्याचे क्षण गवसले त्या हजारो पर्यटकांस सविनय अर्पण.

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates