दिनांक १७ फेब्रुवारी २०१३ हा दिवस ‘गोयकरांसाठी’ एक आगळी वेगळी पहाट घेवूनच आला होता. एरवी
सुशेगात म्हणून ओळखली जाणारी गोवेकरांची पावलं वाडी-तळावली या गावाकडे अगदी
रामप्रहरीच वळली होती. गावातल्या लक्ष्मी-नारायणाच्या देवळाकडे लगबगीने निघालेले
गावकरी एखाद्या लग्न समारंभाला नटून थटून आल्यासारखे भासत होते. गावातले तमाम
आबाल-वृद्ध, बाया-बापडे सगळे सगळे समारंभ स्थळी दाखल होत होते. गोवा मॅराथॉन २०१३
साठी या सर्वांचा उत्साह मॅराथॉन सुरू व्हायच्या आधीच घावत होता. आनंद उत्सवाची
लहर सर्व परिसर व्यापून उरली होती. पताका आणि रंगी बेरंगी रांगोळ्यानी सगळा आवार
सजला होता.
गोव्याचे राज्यपाल श्री. भारत वीर वांच्छू डॉ. रामाणींचा सत्कार करताना सोबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. |
२१ किलोमीटरच्या अर्ध मॅराथॉनला आता सुरूवात होणार
होती. फटाक्यांची आतषबाजी झाली आणि सुवासिनींची लगबग वाढली. सहभागी धावपटू
धावरेषेवर तयारीत उभे ठाकले आणि इशारा होताच मॅराथॉन पटूंची पावलं ट्रॅकवर पडली.
सर्वांना रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या सुवासिनींनी पंचारतींनी ओवाळलं,
पुष्पवृष्टी झाली आणि सलग आठव्या वर्षीच्या मॅराथॉनला सुरूवात झाली.
डॉ. प्रेमानंद रामाणी मार्गावरून धावणार्या
मॅराथॉनपटूंचं नेतृत्व डॉ. रामाणीच करत होते. वाटेत लागणार्या घराघरातून लोक ‘दोतोर’, ‘दोतोर’ म्हणून डॉक्टरांच्या दिशेने
अंगुली निर्देश करीत होते. २१ किलोमीटरच्या मॅराथॉन ट्रॅकवर पन्नासच्यावर असणार्या
मंदीरांमधून देव-देवतांचा आशीर्वाद या मंगल सोहळ्याला लाभत होता. गोव्याचा निसर्ग
वसंतात न्हाऊन निघाला होता आणि वर आकाशातून रवीकिरणांनी सोनेरी बरसात करायला
सुरूवात केली होती. स्वच्छ, सुंदर, प्रसन्न अशा गार हवेत धावपटू आपल्या धेय्याकडे
धावत होते. वाटेत कार्यकर्ते दमलेल्या धावपटूंना पाणी आणि बिस्कीट वाटप करता करता
त्यांची हिम्मतही वाढवत होते. गावात उत्साह ओसंडून वाहत होता, त्याला आज उधाणही
आलं होतं. जीवनाची रेस कशी धावावी याचा धडा डॉक्टर रामाणींनी आपल्या पंचाहत्तर
वर्षांच्या आयुष्यात घालून दिला आहे आणि आजही ते त्या कामात अग्रेसर आहेत.
डॉक्टर रामाणींची कर्मभूमी मुंबई, मुबईहूनही
डॉक्टरांचे चाहते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. आरोग्याचा मंत्र
सर्वानांच जपायचा होता.
माध्यमिक शिक्षणापर्यंतचे धडे गावातच गिरवल्यावर प्रेमानंद
रामाणी मुंबापुरीत दाखल झाले. न्युरोस्पायनल क्षेत्रात निक्ष्णात डॉक्टर बनून जगात
नाव कमावलं, पण वाडी-तळावली या आपल्या मुळ गावाकडे त्यांच कधीच दुर्लक्ष झालं
नाही. आपल्या प्रेमळ आईची आठवण म्हणून डॉक्टरानी अहिल्याबाई रामाणी ट्रस्ट स्थापन
करून त्या योगे आपलं राहातं घर गावाला अर्पण तर केलच पण त्याच जागेवर एक टुमदार
इमारत बांधून त्या इमारतीत ज्ञान आणि आरोग्याचा यज्ञ सतत घगघगत ठेवला. आजची
मॅराथॉन ही त्या यज्ञातलीच एक समिधा होती. २१ किलोमीटरच्या मॅराथॉनमध्ये धावणारे
धावपटू म्हणून डॉक्टर रामाणीसर होते, तसेच गावकरीही त्यात सहभागी झाले होते. एक
प्रकारे ही ज्योतीने तेजाचीच आरती चालली होती.
मॅराथॉन पुर्ण करून येणार्या धावपटूंचं जल्लोषात स्वागत होत होतं आणि पहिला, दूसरा, तीसरा असा त्यांचा क्रमही घोषीत केला जात होता. आता चहापानानंतर होणार्या सत्कार समारंभाकडे सर्वाचंच लक्ष लागलं होतं. तुडुंब भरलेल्या लक्ष्मी-नारायण सभागृहात या नंतर सत्कार समारंभाला सुरूवात झाली.