05 May, 2010

पर्यटनाची ऎसी की तैसी








आज श्री. ज्ञानेश्वर मुळे  यांचा बदलता भारत बदलते विश्व : मालदीव ते मलबार : नवे दुवे! हा लेख वाचला. नेहमीप्रमाणे हा लेखही मनाला भावला. मुळेसाहेबांनी याच लेखात इतर बाबींबरोबरच आपल्या देशातील पर्यटनाविषयी नाराजी आणि खंत व्यक्त केली आहे. ते लिहितात “मालदीवच्या रिजॉर्ट बेटांवरला अनुभव जसा अद्वितीय आहे तसाच केरळमधला बॅकवॉटरचा अनुभव अनुपमेय आहे. दोन्हीही आनंद समुद्राशी आणि पाण्याशी जवळीक असणारे. रिजॉर्टमध्येही संपूर्ण जगापासून अलिप्त होण्यातले सुख आहे, तसेच सुख हाऊस बोटीतून बॅकवॉटरमधल्या मुक्कामातही आहे. साम्य स्थळांबरोबरच आपली काही वैगुण्येही नजरेत येतात. आलेप्पीत ज्या स्थानकावर हाऊसबोटी पर्यटकांना घ्यायला किंवा सोडायला येतात तिथे तलाव आणि तलावाच्या आसपासचे वातावरण हळूहळू घाणेरडे होत चालले आहे. जलपर्णीचा प्रादुर्भाव इतक्या प्रचंड प्रमाणात आहे, की १०-२० वर्षांत बॅकवॉटरऐवजी जलपर्णीचा हिरवा गालिचा दाखविण्यासाठी पर्यटकांना आणावे लागेल. मालदीवमध्ये पर्यटकांची प्रचंड आवक असूनही, स्पीड बोटींचा वावरही खूप असूनही समुद्राचे पाणी धक्क्यांजवळसुद्धा स्फटिकवत पारदर्शक असते. त्यामुळे माशांची विविधता कल्पनेपलीकडची आहे आणि जिथे पाहू तिथे समुद्र म्हणजे एखाद्या नैसर्गिक मत्स्यालयासारखा समोर येतो. पर्यावरण चळवळीत जोपर्यंत हाऊस बोटींचे मालक, तिथले कर्मचारी आणि पर्यटक सर्वाचा सहभाग घेत नाही तोपर्यंत बॅकवॉटरची घसरण होत राहणार आहे. शेजारी छोटा असला तरी त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे असते हे आपल्याला समजणे आवश्यक आहे.”

त्या मालदीव बेटावर त्यांच्या लोकसंखेच्या दुपटीहून अधिक पर्यटक भेट देतात. काय आहे तीथे? केवळ पणीच पाणी आणि तुटपुंजी जमीन, असं ससलं तरी योग्य नियेजनामुळे आणि देशप्रेम तसच शिस्तीमुळे त्यांना ते शक्य होतं. हे वाचताना मला तीन वर्षापुर्वी अनुभावालेलं नैनीताल आणि आसपासचा परिसर आठवत राहीला आणि हे पोस्ट लिहावस वाटलं. निसर्गाने भरभरून दिलं असताना आपल्याला मात्र त्याची पर्वा नाही, किंबहूना अनास्थेपोटी आता ते धन आपण गमावून बसणार की काय अशी भिती वाटायला लागली आहे. मे महिन्यात हिमालयाचं मनोहारी दर्शन घ्यावं, उकाड्यावर उतारा म्हणून नैनीतालला जावं म्हणून आम्ही तिकडे गेलो. चिड पाईन च्या  वृक्षांच्या साथीने फिरताना मनाला आनंद होत होताच पण दुरवरची शिखरं आणि प्रदेश दिसत नव्हता कारण वातावरणात धुरकटपणा भरून राहिला होता. ड्रायव्हरशी बोलताना लक्षात आलं की साधारण एप्रिल पासून हे असच वातावरण असतं. त्याचं कारण जंगलाला लागणारे वणवे  अख्खा परिसर धुराने व्यापून राहिलेला. चिडाच्या झांडांना छेद देऊन त्याचा चिक वनखात्यामार्फत जमा केला जातो. त्या झाडाची वाळलेली पानं आणि हा चिक ज्वालाग्राही असतो. जरा कुठे ठिणगी पडली की बघता बघता त्याचं वणव्यात रुपांतर होतं. मोठमोठी झाडं आणि जंगल आगिच्या भक्षस्थानी पडतं. याला जबाबदार कोण? वाटसरूंनी टाकलेलं एखादं विडीचं थोटूक जसं याला कारणीभूत ठरतं तसच मुद्दामहून लावलेली आग याला कारण असते. जंगलातले प्राणी पकडण्यासाठी एकाबाजूला आग लावून दुसर्‍याबाजूला जाळी लावली जातात, विनासाय्यास शिकार जाळ्यात येते पण वनसंपत्तीची अपरिमीत हानी होते.

नुकतेच माझे काही मित्र नैनीतालला जाऊन आले. अशा प्रकारच्या वातावरणात आणखी भर पडली आहे हे त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं. हे असं किती दिवस चालणार? हे वणवे कधी विझणार? निसर्ग दयामाया दाखवत नाही हे आपणाला कधी समजणर? आपल्या देशातलं पर्यटन वाढलं पाहिजे तर अशा गोष्टींना आपणच पायबंद घातला पाहिजे. आपणच आपल्या पायावर कुर्‍हाड चालवतो आहोत, आता तरी जागे होऊया.       
               
   

04 May, 2010

गिरचे अभयारण्य


गिरच्या अभयारण्यातील सिंहांची संख्या वाढली ही बातमी वाचली आणि मी त्या अभयारण्यात अनुभवलेला थरात आठवला. २००२ च्या नोहेंबर महिन्यात आम्ही द्वारका, सोमनाथ  गिर अशी सहल केली होती. वेरावळहून गिर अभयारण्याच्या दिशेने निघालो. आम्ही मुख्य गेटजवळ पोहोचलो तेव्हा पर्यटकांना सफारीसाठी घेऊन जाणारं वाहन निघून गेलं होतं. आणखी दुसरं सरकारी वाहन तीथे नव्हतं. आम्ही मारुती व्हॅन घेऊन गेलो होतो तीच घेऊन आत जाता येईल असं समजल्यावर बरं वाटलं कारण आमची बरीच रखडपट्टी झाली असती. चार-साडेचार वर्षाची ऋचा, मी आणि हर्षदा अशी आम्ही तीघं व्हॅनमध्ये पाठीमागे बसलो होतो. पुढे वन विभागाचा एक गार्ड आणि ड्रायव्हर. त्या व्हानने जंगलात प्रवेश केला. सगळीकडे खुरटी काटेरी झुडपं. तसा रुक्ष प्रदेश. मधेच एखादं झाड बाकी जंगल म्हणावं असं काही नाही. दुरवर एक सिंह दिसला. मी कॅमेरा घेऊन तयारीतच बसलो होतो. त्याचा फोटो काढला. पुढे एक सिंहीण आपल्या तीन छाव्यांना घेऊन एका झाडाखाली बसली होती. थोडं अंतर राखून आमची गाडी उभी राहीली, तर ती गुरगुरायला लागली. आमच्या उपस्थितीमुळे ती थोडी नाराजच झाली होती. गार्डने गाडी पुढे न्यायला सांगितलं. आमची काहीच हरकत नव्हती. आलो तसे सिंहांच दर्शन तर झालं होतं. आता एका वाटेच्या फाट्याजवळ आलो तर समोरून तीन सिंहीणी येताना दिसल्या. आता आम्ही त्या जंगलाला सरावल्या सारखे झालो होतो. माझ्या वाजूचं व्हॅनचं दार उघड होतं. समोरून येणार्‍या सिंहीणींचा मी एक फोटो काढला. त्या आणखी जवळ आल्या दुसरा फोटो काढला. एक मागोमाग येणार्‍या त्या सिंहीणी समोरच्या वाटेने जाणार असं वाटत असतानाच त्यातली एक आमच्या दिशेने वळली. मी आणखी एक फोटो घेतला, हा फोटो घेतेवेळी  झालेल्या शटरच्या आवाजाने किंवा आमच्या वासाने ती जवळ आली असावी. ती आणखी जवळ आली. मी फोकस करतच होतो. ती खुपच जवळ आली. पुर्ण फ्रेम भरली. नकळत जोरजोरात श्वास सुरू झाला. सगळे जण श्वास रोखुन पहात राहिले. तीचे मासल पंजे माझ्या अधिकच जवळ आले. आता मी तिच्या रेंज मध्ये होतो.  फोकस केला असतानाही मी शटरचा आवाज होईल म्हणून फोटो काढला नाही. म्हटलं उगाच तीचा गैरसमज नको किंवा काहिहि समज असो तीचा मान राखलेला बरा. थोडावेळ हुंगून ती निघून गेली. तीने मला माफ केलं होतं.  
                       

03 May, 2010

मोटरमनचं आंदोलन

 
 
मुंबईकर हा मुळात फार सहनशील प्राणी आहे. ‘प्राणी’ अशासाठी म्हटलं कारण घराबाहेर पडलं (यातले कित्तेक बेघर आहेत, ते कायमचेच घराबाहेर असतात.) की त्याना माणूसकीची वागणूक फारच कमी प्रमाणात मिळते. (ग्रंथालीचे दिनकर गांगल एकदा म्हणाले होते की “आपण माणूस आहेत ही भावना युरोपमध्ये गेल्यावर प्रकर्षाने जाणवली.”) घरातून बाहेर पडल्यापडल्या आपण एकदम रस्त्यावरच येतो. फुटपाथ दाखवा आणि एक लाख मिळवा अशी रस्त्यांची परिस्थिती झालेली आहे. बरं रस्ते तरी नीट आहेत का? तर ते ही सतत खोदलेले असतात. (मलिदा खाण्यासाठी कुठचा रस्ता खोदू असं सगळ्या संबंधिताना झालेलं असतं.) हल्लीच “विकास हवा तर हे सगळं सहन केलचं पाहिजे असा दम मुख्यमंत्र्यानीच भरला.” एवढं करून टॅक्सी, रिक्षा काही करावी तर तो त्याला हवं तिकडेच जाणार म्हणतो. आपलं स्वतःचं वाहन असलं तरी पंचाईत कारण पार्कींगचा प्रॉब्लेम, ट्राफीक जाम. या सगळ्यात एक आधार वाटतो तो म्हणजे लोकलचा. त्या लोकलचं महत्व एवढं की ते आता त्या चालवणार्‍या मोटरमननाही समजलं. त्यानी आता असहकाराचं हत्यार उपसलंय. ते म्हणे उपाशीपोटी लोकल चालवणार. कारण त्याना जो कमीत कमी पन्नास साठ हजारावर मोबदला मिळतो तो पुरत नाही. ते म्हणे ३६५ दिवस गाड्या चालवतात. सगळीच वाहन (बस, टॅक्सी, रिक्षा, ट्रक) ३६५ दिवस चालू असतात. मोटरमना सुद्धा CL, PL असतातच. भत्ते असतातच, ऑपशनल हॉलीडे असतातच.

गेली दोन वर्ष मी पहातोय मध्य रेल्वेची वाहतूक तरी वेळेवर सुरू आहे पण पश्चिम रेल्वेचं काही खरं नाही. सदानकदा गाड्या उशिराने धावत असतात, कारण काय तर त्याना कमी मिळणारा ओव्हरटाईम. सद्ध्या उकाड्याने जीव हैराण होतोय, पावसाळा तोंडावर येतोय. खोदलेले रस्ते, गुडघाभर पाणी, संथ वाहतूक आणि हे सगळ सहन करत, खांबा खांबावरून हसणार्‍या राजकारण्यांची थोबाडं पहात, आपणाला कुणीच वाली राहिला नसल्याचं शल्य उरी बाळगून मुंबईकर वाटचाल करीत रहाणार. अगदीच राग आला तर असं कलकत्त्यात ( चुकलो रे बाबा कोलकात्यात) झालं असतं तर.............! म्हणत आपल्या गंतव्यस्थानी जाण्यासाठी जिवाची बाजी लावणार. काही जण मरणार काही जगणार उद्याचं मरण जगण्यासाठी. 

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates