12 May, 2009

सिंधुदुर्ग - बॅकवॉटर्स
चमकलात ना ? कारण सिंधुदुर्गात बॅकवॉटर्स आहेत याची कल्पना खुद्द सिंधुदुर्गवासियांनाच नाही. असं असलं तरी सिंधुदुर्गात ४२ बॅकवॉटर्स उपल्ब्ध आहेत. अहो असणारच कारण मुळतच हा प्रदेश सागराने श्री. परशुरामासाठी सोडलेला आणि त्यामुळे ' परशुराम भुमी ' म्हणून ओळखला जातो. परशुराम भुमी कशी ? तर त्याने जिंकलेली सर्व भुमी कश्यप ऋषीना दान केली. दान दिलेल्या भुमित राहणे योग्य नाही म्हणून बाण मारून समुद्र मागे हटवला आणि जी भुमी तयार झाली ती कोकणची भुमी. तिला " अपरांत " असेही म्हणतात. ( अपर म्हणजे पश्चिम आणि अंत म्हणजे शेवट ) . सागराने ही जमिन स्वतःहुन परशुरामासाठी सोडली तरीसुध्दा आपल्या जवळ येण्यासाठी अनेक वाटा निर्माण केल्या. अशा या नितांत सुंदर सिंधुदुर्गात नौकानयन करण्यासारखे दुसरे सुख नाही. पण आपली परिस्थिती कस्तुरी मृगासारखीच आहे. या अमुल्य ठेव्याची आपल्याला कल्पनाच नाही.

कर्ली नदीच्या विस्तिर्ण पात्रातुन संथ वहणारे पाणी कापत आपली नौका निघाली कि आपण सारेच देहभान विसरून जातो. दोन्ही बाजुला असलेली गर्द झाडी, माड पोफळींच्या बागा, त्यांच्या छायेत विसावलेली छोटी-छोटी घरकुलं, मंदिरं , मधुनच डोकावणारं एखादं तुळशीवृंदावन, पक्षाची शीळ, खाली हिरवीगार वनराई आणि वर आकाशाची निळाई, वार्‍याची झुळुक आणि खाली वाहणारं शांत, थंड पाणी. भुलोकीचा स्वर्गच जणु. खरतर ही देवभुमीच. परमेश्वरने एकाच ठिकाणी एवढं निसर्गसौंदर्य ओतलय याचा इतरेजनांना हेवा वाटावा असा हा दृष्टीदुर्लभ देखावा याचीदेही याचीडोळा आपण पहातोय हे खरंच वाटत नाही. खरंखुरं स्वप्नातलं गाव.

हळुहळु अपली नौका नेरुरपार जवळ येते. वाटेत नदीच्या तळाशी बुडी मारून रेती काढणारे मजुर त्यांच्या पडावासहीत दिसतात. मधुनच एखादा माड आपल्याशी हस्तांदोलन करून जवळीक साधण्यासाठी पुढे आलेला असतो. दिड-पावणेदोन तासांच्या फेरफटक्यानंतर वालावल हे आणखी एक अप्रतिम गाव लागतं. हेमाडपंथी वास्तुकलेचा नमुन असलेलं श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिर तर बघत राहण्या सारखं. मंदिरा लगतचा सुंदर तलाव आणि वनराईने नटलेल्या या गावात विवीध पक्षांचं दर्शनही घडतं. इतर पक्षांबरोबरच धनेश (Horn-bill) हा हमखास दिसणारा पक्षी. पुढे आपली नाव भोगवे या गावी जाते तेव्हा तो या नौकानयनातला परमोच्य बिंदु ठरतो. इथेच सागर-सरितेचं मिलन होतं. समुद्रपक्षांचे थवेच्या थवे इथे पाहायला मिळतात. एवढा वेळ फिरून क्षुधाशांतीसाठी जर आपल्याला थांबायचे असेल तर येथील गावकरी आपले तशी सोयही करतात.

समुद्र आणि सह्याद्रीचे कडे यांचं सख्य इथे पहायला मिळतं. किनार्‍याने चार किलोमिटर चालत गेल्यास निवतीचा किल्ला लागतो. पुढे डुंगोबा ही देवराई. फार पुर्वीपासून इथल्या वनसंपदेला कुणी हात लावलेला नसल्याने नेहमीपेक्षा वेगळी झाडं इथे पहायला मिळतात. समोरच्या दर्यात आपल्याला डॉल्फीनचं दर्शनही होतं. समुद्रात बुडणारा सोन्याचा गोळा पहाताना एका स्वप्नाची पुर्ती झालेली असते.   

नरेन्द्र प्रभू


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates