25 September, 2010

दंताजीचे ठाणे उठले......!


दातदुखी किती भयंकर असते हे ती झाल्या शिवाय समजत नाही. मला ती समजली कारण गेले चार दिवस त्यातच गेले (नव्हे घालवले). पहिल्या दिवशी पेन किलर, दुसर्‍या दिवशी डॉक्टर. त्या भल्या गृहस्थाने हातोडी मारून नक्की कोणता दात दुखतोय ते विचारलं, मग हालऊन बघीतला, चार गोळ्या बांधून दिल्या आणि उद्या दात काढून टाकूया म्हणाले. मी अधिक दुखणारा दात घेऊन घरी आलो. (बाकिचे न दुखणारेही बरोबरच होते
.) घरी आल्या आल्या दात काढणार असल्याचं बायकोला सांगताच तीने त्या डॉक्टरवरच दात-ओठ खाऊन संताप व्यक्त केला. (आता माझ्या दाताबरोबरच तीचे ओठही दुखायला लागले असणार.) त्या डॉक्टरला सांगायला काय? दात काय वाटेवर पडलाय? (अग तो दात अजून माझ्या तोंडातच आहे, वाटेवर कसा पडणार? (मी मनातल्या मनात)) तीने तावातावाने दुसर्‍या डेंटीसला फोन केला, वेळ घेतली दुसर्‍या दिवशी दुसर्‍या डॉक्टरकडे गेलो. त्या डॉक्टरीणबाईंनी एक्सरे काढला आणि दोन दात काढून टाकावे लागणार म्हणून निर्णय दिला. (अरे आपण अपिलात कशाला गेलो? खालच्या कोर्टाचा निर्णय बरा होता की. (मी पुन्हा मनातल्या मनातच). त्या काढून टाकलेल्या दातांच्या ठिकाणी ब्रिज करूया म्हणाली. (नको..... नको....... ब्रिज नको. तिकडे कलमाडीने बांधलेला ब्रिज लगेच पडला, तुझा कितीसा टिकेल? माडी कलंडली तर? (मी पुन्हा मनातल्या मनात.) तेवढ्यात ती डॉक्टरीणबाई म्हणाली इंम्प्लांट करना है तो पर टूथ फोर्टीफाय थाउजंट पडेंगे (ऎक, दाता तुझा काय भाव चाललाय बाजारात?) अरे हिच्या खोट्या दाताची एवढी किंमत मग माझ्या खर्‍या नैसर्गिक दाताची किती असायला पाहिजे? पंचेचाळीस हजार तर नक्किच असणार ना? मग तो एक दुखणारा सोडून बाकीचे हिलाच विकूया ना? ३१x४५०००=१३,९५,००० असा हिशेब मी लगेच तयार केला. (पुन्हा मनातल्या मनात)  

एक्सरे आणि दुखरा दात घेऊन आम्ही क्लिनीकच्या बाहेर. ही हट्टाला पेटलेली होती. आणखी एका  डॉक्टरीणबाईंना फोना-फोनी करुन हिने वेळ ठरवली. संध्याकाळी मेट्रो रेल्वेच्या बांधकामांमुळे असलेल्या तुफान ट्राफिकचा सामना करीत अस्मादीक बायकोसह तिसर्‍या क्लिनीकला पोहोचले. मला खुर्चीवर झोपऊन ती वर करण्यात आली. हा दात काढावा लागेल इती. डॉक्टर. (हो काढा, ते विधिलिखील आहे ते चुकणार आहे का आता?) हे सुद्धा मनातच बोलल्याने डॉक्टरना समजलं नाही पण मी बायकोकडे बघत होतो, तेव्हा डॉक्टरांच्या नजरेत अरे दात तुझा काढायचाय की तीचा? असा प्रश्न मला स्पष्ट दिसला. बायको संभ्रमात. शेवटी मी बोललो काढून टाका. (एकदाचा असं पुढे मनात). चला एक दात गेला, आता कुणाला आपली बत्तीशी बाधायला नको.

दात गेल्याच्या दुःखात आणि दुखण्यात घरी आलो. आता त्या दाताची जागा कुणी घ्यायची ब्रिजने की दंतरोपणाने ते अजून ठरतय. दात माझा, तोंड माझं आणि निर्णय घेणार्‍या दोन बायका यात माझे दात पिसले जाताहेत.

ता.क. गेल्या चार दिवसांच्या माझ्या दंतकथेमुळे बायकोला थकवा आलाय. पुढची डॉकक्टरवारी मला एकट्यालाच करावी लागणार असं दिसतय.                                     

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates