22 September, 2010

लडाख - ऑल इज नॉट वेल



लेह-मनाली राष्ट्रीय महामार्गाची अशी वाताहात झाली
लेह शहरात काळोख असताना प्रवेश केला असला तरी सगळं सामान्य नाही हे समजत होतं. सकाळी बाहेर पडलो आणि सर्वांचं शहरात स्वागत करणारी कमान ओलांडली तेव्हाच आलेलं आसमानी संकट आणि त्यामुळे झालेली वाताहात याचा अंदाज यायला लागला. (तसा तो आधीच ऎकून माहित होता. इशा टूर्स चे संचालक आणि माझे मित्र आत्माराम परब या लडाखी मित्रांना भेटून नुकतेच परतले होते.)  पुर्ण उध्वस्त झालेली घरं, दुकानं दिसायला लागली. शहरालगतचा बस स्टॅन्ड, आजूबाजूच्या इमारती नाहीश्या होवून आता त्या ठिकाणी मातीचा ढिगाराच दिसत होता.
काय आणि कसं शोधणार? 
त्याच ढीगार्‍यात आपलं किडूकमिडूक शोधणारी लडाखी माणसं पाहून मन हेलावून गेलं. एरवी साफसुतरा असलेला,  दलाईलामांच्या निवासस्थानाचा परिसर चिखलाने भरून राहीला होता. व्यासपीठ आणि सभोवतालच्या भागात अजूनही पाणी होतं. चोगलमसर गावाची सगळ्यात जास्त हानी झालेली दिसत होती. रस्त्याच्या दुतर्फा दहा-बारा फुटांचा दगड-मातीचा ढीग ढगफ़ुटीच्या वेळची व्यथा सांगायला अजून तिथेच होता. तो ढीग बाजूला करूनच लेह-मनाली महामार्ग वाहतूकीसाठी खुला केला होता. दोन्ही बाजूची घरं, दुकानं आता माणसांनी नव्हेत तर मोठमोठ्या खडकांनी आणि वाहत आलेल्या वाहनांनी भरलेली दिसत होती. दरोडेखोरांनाही लाजवेल अशाप्रकारे दुकानाची शटर त्या प्रलयाने उचकटून टाकली होती. जुनं लेह शहर आता त्या अवशेषातच बाकी होतं.      

हिच ती रॅन्चोची शाळा, पाठीमागचा डोंगर शाळेच्या इमारतीमधून पुढे आला.  
पुढे लेह-मनाली मार्गावरच थ्री इडीयटस् मधली रॅन्चोची शाळा आहे. त्या शाळेत गेलो. शाळेच्या प्रवेशव्दारातच मातीचे ढिगारे पुढे काय वाढून ठेवलय ते सांगत होते. शाळेचं ऑफिस, पुढचे वर्ग सगळ्याचीच वाताहात झाली होती. ए.सी.सी चे लोक दुरूस्तीच्या कामात व्यग्र होते.   

साबू हे लडाख मधलं मॉडेल व्हिलेज, राष्ट्रीय महामार्गाला लागूनच एक रस्ता त्या गावात जातो. स्वागताची एक कमान याच रस्त्यावर उभारलेली आहे. आता चिखल साफ केला असला तरी ढगफुटीच्यावेळी किती पूर आला होता त्याच्या खुणा त्या कमानीच्या दोन्ही खांबांवर दिसत होत्या. गावात जाणारा पक्का रस्ता पार खणून गेला होता. रस्त्याच्या मधोमध पण्याच्या प्रवाहामुळे नदीचं पात्र असतं तेवढ्याखोल जमीन खणली गेली होती. त्या पेक्षा खोल जखमा लडाखी लोकांच्या मनावर झाल्या होत्या.  मात्र सर्वस्व गमाऊनही कुठे दुःखातिरेकाने केलेला आक्रोश नव्हता.    

पद्माच्या घराची अशी वाताहात झाली
पद्मा ताशी हा आमचा लडाखी मित्र आणि त्या घटनेचा जिवंत साक्षिदार. तो त्या विषयी बोलला पण अगदी थोडक्यात. जणू त्याला तो प्रसंग लवकरात लवकर विसरून जायचा होता. रोज रात्री साडेनऊ-दहाला झोपणारा पद्मा त्या काळ रात्री मात्र जागाच होता. काही पुर्व सुचना, संकेत मिळतात तसच काहीसं झालं पद्मा सांगत होता. सगळी कामं आटोपली तरी झोपेचा विचार मनात येत नव्हता. बाहेर आभाळ चांगलच भरून आलं होतं. रात्रीच्या अंधारातही गडद काळे ढग भयाण वाटत होते. नेहमीच मोकळं आकाश आणि चंद्र-चांदण्या त्या ढगाआड गुडूप झाल्या होत्या. चमचमणार्‍या विजांच्या लख्ख उजेडाने सारा आसमंत प्रकाशीत होत होता. पाठोपाठ कानठळ्या बसवणारा प्रचंड कडकडाट होत होता. त्या आवाजाने धरणी कंप पावत होती. भुकंप झाल्याचा भास व्हायला लागला. आकाशात नेहमीपेक्षा वेगळीच हालचाल दिसायला लागली. पावसाला सुरवात झाली.
ही एक बाजारपेठ होती
 नुकत्याच बांधून पुर्ण झालेल्या गेस्ट हाऊसच्या छतावर   नुसतीच माती पसरली होती, त्यावर पॉलिथीन पसरावं म्हणून मी आणि भाऊ नोरबू चढलो. ते पसरत असतानाच पावसाचा वेग वाढला. वरून येणारे टपोरे थेंब अंगावर ताशा वाजवत होते. त्याचाही वेग वाढला. आता अख्खं आभाळच कोसळणार की काय असा भास झाला. पाण्याच्या खळखळाटाचा आवाज ऎकून कानावर विश्वास बसत नव्हता. एवढ्यात घरासमोरची जर्दाळूची झाडं आमच्या दिशेने चाल करून यायला लागली. पुढे घडलेली सगळी प्रतिक्षिप्त क्रियाच होती. मी आणि भावाने छप्परावरून उडी मारून घराकडे धूम ठोकली. पुढच्या बाजूने घरात प्रवेश करणं अशक्य होतं. खालचा मजला पाण्याखाली गेला होता. एवढं पाणी आयुष्यात बघितलं नव्हतं.
प्रलयाचा शो रुम
 घराच्या मागल्याबाजूने पहिल्या मजल्यावरच्या खिडकितून आरडाओरड करून घरातल्या मंडळीना सावध केलं. भावाचे दोन मुलगे, आई-वडील यांना त्या खिडक्यामधूनच बाहेर काढलं.  उंचावरच्या टेकडीकडे धावत सुटलो. अंधारात काहीच समजत नव्हतं. मधूनच चमकणार्‍या विजांच्या प्रकाशात आजूबाजूचा नेहमीचाच भाग अनोळखी वाटायला लागला. कारण शेजार्‍यापाजार्‍यांची घरं जागेवर नव्हती. भर रात्रीत आरडाओरडा ऎकायला येत होता.  आम्ही तर वाचलो. बाकिच्यांचं काय. आभाळाकडचं सगळं पाणी संपलं तेव्हा पाऊस थांबला. पण खाली प्रलय आला होता.

बसचं कलेवर
 जवळच असणार्‍या बहीण इशेच्या घराची काय अवस्था झाली असेल याच्या नुसत्या विचाराने थरकाप उडाला होता. समोरच्या छातीभर चिखलातून आणि काळोखातून कसलीच हालचाल करणं शक्य नव्हतं. सकाळ व्हायची वाट पहात असहाय्यपणे उभे होतो. पहाट झाली, आकाश मोकळं झालं. झुंजूमुंजू झालं तसा इशेच्या घरा जवळ जाण्याचा प्रयत्न करायला सुरवात केली. चिखलातून कशीबशी वाट काढत तिकडे पोहोचलो तर घराचा मागमूस नव्हता. इशे आणि तीचा नवरा जिगमीत घराच्या ढीगार्‍यावर उभे होते. काळजाचा थरकाप उडवणारी ती घटना होती. त्यांच्या घरा मागून प्रचंड मोठा प्रवाह वाहत गेल्याचं दिसत होतं. आमच्यासाठी आभाळही फाटलं होतं आणि धरतीही दुभंगली होती.

मारुती कार प्रवाहाने चालवलेली
 एवढं बोलून पद्मा काहिसा थांबला. मी सुन्न होऊन ऎकत होतो. त्याने पुढे बोलायला सुरवात केली घरा शेजारी पार्क करून ठेवलेली मारूती कार जाग्यावर नव्हती. ती वाहून गेली होती. सगळ्या गावाची तीच गत होती. अनेक आप्तस्वकीय बेपता झाले होते.

दुकान आणि मकान दोन्ही बरबाद
तिकडे बसस्टॅन्ड वरच्या पद्माच्या मिनीबस मध्ये ड्रायव्हर झोपला होता. बारा-साडेबाराच्या दरम्यान बस वरच्यावर उचलली गेली. बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण ड्रायव्हरला बाहेर पडता आलं नाही. गाडीने आपली जागा सोडली होती आणी ती प्रवाहाबरोबर वाहत जात होती. थोड्यावेळाने ती बुडायला लागली. पाणी, चिखल, दगड-गोटे आत यायल्या लागले. हळूहळू चिखल वाढत गेला. आता श्वास घ्यायला जागा उरली नव्हती. कशालातरी अडकून गाडी तीरकी होऊन थांबली एकदिड फुटाच्या जागेत मान वर काढून जगण्याचा प्रयत्न करत असताना कधीतरी सकाळ झाली, एक झरोखा दिसला त्यातूनच बाहेर पडून सुटका करून घेतली.

दरोडेखोर निसर्ग
अशा अनेक घटना त्या एका काळरात्रीत घडून गेल्या. कितीतरी माणसं जिवाला मुकली. कित्येक अजून बेपत्ता आहेत. त्या नंतरच्या अनेक रात्री लडाखवासीयांनी जागून काढल्या. घरदार सोडून लोक मॉनेस्ट्रीमध्ये रहायला गेले. त्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा आभाळ भरून आलं तर लोकांनी थेट शांतीस्तूप सारखे डोंगरमाथेच गाठले. एकूण काय 'भय इथले संपत नाही अशीच स्थिती अजून आहे.

आभाळ कोसळलं!
गेल्याच फेब्रूवारीत अंदमानला गेलो होतो तेव्हा सुनामीमुळे झालेली हानी पाच वर्षानंतरही दिसून येत होती. आता समुद्रसपाटीपासून साडेअकरा हजार फुटांवर आलेलं हे अरिष्ट लडाखींना येत्या हिवाळ्यातही आपला इंगा दाखवणार. रक्त गोठवणार्‍या वजा वीस-पंचवीस तपमानात नेहमीची उबदार लडाखी घरं त्या काळरात्रीने काही क्षणात ओढून नेली. निळाईने भरलेलं लडाखचं आभाळ नेहमीची माया विसरून गेलं होतं.
अध्यात्म खर्‍या अर्थाने जगणार्‍या हसतमुख लडाखी मित्रांना देव जगण्याचं बळ देवो.                                        

पद्माचे वडील 'मागे प्रकाश होता, पुढे मात्र अंधार  दाटलाय' हे कथन करताना.
ता.क.: काल परवाच पद्माकडून समजलं की सरकारने नुकताच साबू गावात सर्वे सुरू केला आहे. मा. पंतप्रधानानी अडीच महिन्यात नवी घरं बांधून देऊ असं सांगितल्याला आता महिना उलटून गेलाय. हिवाळा तोंडावर आला असताना आत्ता कुठे पहाणी चालू झाली आहे, मग बांधकाम कधी होणार?  कुठे होणार?  




इतर लेख:

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates