09 October, 2010

नुब्रा व्हॉली – लडाख
सिंधू व्हाली, पँगगॉंग लेक नंतरचं प्रमूख आकर्षण होतं नुब्रा व्हॉली. पण या आधी वाटेत आम्हाला खार्दुंगला पास लागणार होता. 18360 फुट उंचीवर असलेला हा पास म्हणजे जगातला सर्वात उंच मोटरेबल रोड आहे. एवढे दिवस खार्दुंगलावर जायची उत्सुकता ताणली गेली होती. नुब्रा व्हॉलीमध्ये एक रात्र रहायचं असल्याने आम्ही त्या तयारीनेच निघालो होतो. लेह शहर सोडलं आणि आमच्या गाड्या खारदुंगलाच्या दिशेनी निघाल्या. खारदुंगलाच्या पायथ्याशी असलेल्या आर्मी चेक पोस्ट वर आमच्या जवळची  IPL Inner line Permit  
दाखवून, गाव सोडून आम्ही जसजसे वरवर जात होतो तसतसा अगदी दूरवरचा प्रदेश आम्हाला नजरेने दिसत होता. एवढ्या लांबवर पहाण्याचा योग या आधी कधी आला नव्हता. हिमालयात अनेक ठिकाणी मी फिरलो असलो तरी तिकडे सगळीकडे झाडं असल्याने मध्ये अडथळा यायचा आणि हवा स्वच्छ नसेल तर पुढचं दृष्य धुसर होत जायचं. इथे तो अडथळाही नव्हता आणि हवाही स्वच्छ होती. आम्ही आणखी वर पोहोचलो. आता संपूर्ण लेह नजरेच्या एका टप्प्यात दिसायला लागलं. त्याही पलिकडे असणारं सिंधू नदीचं पात्र, त्याच्या पुढचं लडाख मधलं उंच शिखर स्तोक कांगरी  हे ही समोर दिसत होतं. एवढं विहंगम दृष्य पाहून सगळेच जण हर्षभरीत झाले होते. मध्येच दिसणारा एक हिरवा पट्टा आणि बाकीचा रुक्ष प्रदेश. आजपर्यंत डोळ्यानी न बघितलेलं असं चित्र डोळ्यात साठवत, जमतील तिथे त्याचे फोटो काढत आम्ही चाललो होतो. थोड्याच वेळात साऊथ पुल्लू हे ठिकाण आलं, केवळ १६ कि.मी. वर असलेल्या खारदुंगला पासवर आता काही मिनीटातच आम्ही पोहोचणार होतो. वळणावळणाचे खराब रस्ते आणि उभा चढ असल्याने ड्रायव्हरचं ड्रायव्हींगचं कसब पणाला लागत होतं. आम्ही हाळूहळू जगातल्या सर्वात उंच मोटर वाहतूकीच्या रस्त्याजवळ पोहोचत होतो. आता रस्त्याच्या दुतर्फा बर्फ होतं.    अचानक एका वळणानंतर रस्ता थोडा सरळ झाला आणि तो आनंदाचा क्षण आला आम्ही १८,३६० फुट उंच अशा खारदुंगला पासवर पोहोचलो होती. हातात तिरंगा घेवून आमचे ग्रुप फोटो काढले. उत्साहाला उधाण आलं होतं. पण अतीशीत आणि जोरदार वाहणारे वारे थंडीचा कडाका वाढवत होते. खारदुंगला पासच्या रस्ता सोडून सगळं बर्फाचच साम्राज्य होतं. विरळ हवा आता आम्हाला त्रासदायक वाटायला लागली. डोकं जड झालं होतं, ठणकायला लागलं होतं. डोळ्यात न सामावणारा निसर्ग मला कॅमेर्‍यात बंद करायचा होता. मी बरेच फोटो काढले. सोविनीअर शॉपमध्ये काही भेटवस्तू विकत घेतल्या आणि  
पुढच्या प्रवासाला निघालो एवढ्यात ड्युटी संपवून परतणारे दोन जवान आमच्या जीपजवळ आले आणि पलिकडे नुब्रा व्हालीत जाण्यासाठी लिप्ट मागायला लागले. त्याना आमच्या जिपमध्ये घेतलं. जिप निघाली. दोन्ही बाजूला बर्फाची तटबंदी आणि मधून जाणारं एखाद दुसरं वाहन. समोर अथांग पसरलेल्या नुब्रा व्ह्यालीचं दर्शन झालं. दूरवर पसरलेल्या बर्फाच्छादीत पर्वत रांगा आम्हाला खुणावत होत्या. समोरच असलेल्या सियाचीन ग्लेशीयर च्या पर्वत रांगा पाहून लाहानपणी शिकलेला भुगोल आठवला. बर्फामुळे निर्माण झालेले वेगवेगळे आकार पाहत असताना सगळ्याचेच फोटो पाहीजेत असं वाटायला लागलं. गाडी आता 16000 फुटांवर आली आणि नॉर्थपुल्लू हे ठिकाण आलं. साउथ पुल्लू ते नॉर्थ पुल्लू हा पुर्ण भाग लष्कराच्या नियंत्रणात असतो. याठिकाणी वाहनांची,माणसांची नोंद करावी लागते आणि पुन्हा परतायचा दिवसही सांगावा लागतो. याच वेळी दुसर्‍या दिवशी कोणत्यावेळी प्रवास करता येईल याची माहिती दिली जाते. त्याच वेळात तिथून प्रवास करावा लागतो. 13 किलोमीटरमध्ये अडीच हजार फुट एवढं खाली आल्याने मागे बसलेल्या त्या जवानाना त्रास व्हायला लागला, मळमळायला लागलं. गाडी थांबवून त्याना पाणी दिलं. पुन्हा पुढचा प्रवास सुरू झाला.  
आता पुन्हा पुढच्या प्रदेशाचं चित्र बदलत गेल. मध्येच खोलगट भागात एखादा हिरवा टापू दिसायला लागला. खार्दुंग, खालसर, डिस्कीट अशी गावं लागली. आम्हाला हुंडर या गावा जवळ पोहोचायचं होतं. एवढ्यात मिलिटरीचं क़ॉंव्हाय आलं. ही आर्मीची वाहन आली की सिव्हिलीयनची वाहनं एकाबाजूला उभीकरून ठेवावी लागतात. शेवटच्या वाहनाने हिरवा झेंडा दाखवला की नंतर आपण जायला हरकत नाही. आमच्या नशीबाने त्यावेळी पन्नस साठच वाहन होती. ती निघून गेली. आम्ही त्या वाहनातल्या जवानांना हात हालवून टाटा करत होतो. ते सुद्धा आनंदाने प्रतिसाद देत होते. खालसर नंतर रस्त्याच्या एका बाजूला शोक नदी आम्हाला साथ करत होती आणि पलिकडे काराकोरम रेंजीस दिसत होत्या. हुंडर जवळ आलं आणि एका ठिकाणी सियाचीन 52 किलोमीटर असा      
बोर्ड दिसला. तो सियाचीन ग्लेशर्सला जाणारा रस्ता होता. आता आम्ही पाकव्याप्त काश्मीरच्या अगदी जवळ जावून पोहोचलो होतो. दुपारचे दोन वाजत आले तेव्हा आम्ही हॉटेल ओलथांगला पोहोचलो आणि नोरबू हा त्या हॉटेलचा मालक सामोरा आला. लडाखच आतिथ्य वाखाणण्याजोग आहे. अतिशय प्रेमाने हे लोक आपलं स्वागत करतात. इथे आणखी एक धक्का बसला. नरेंद्रदत्त हा सातार्‍याचा तरूण तिथला मुख्य आचारी होता. त्याला ते मास्टर म्हणत होते. आज मराठी मंडळी येणार म्हणून तो भलत्याच उत्साहात होता. आपल्या मराठमोळ्या पद्धतीच रुचकर जेवण  त्याने तयार केलं होतं. नुब्रा व्हाली लडाखच्या सखल भागात आहे. 9900 फुट उंची असल्याने इथे हाय ऍल्टीट्यडचा त्रास जाणवत नव्हता. त्यामुळे सगळेच उत्साहात होते. दुपारची जेवणं आटोपली आणि तिथल्या हुंडर इथल्या वाळवंटात आम्ही जायला निघालो. वाळवंटाकडे जिथून आम्ही वळलो तिथे एक पुल लागला. तिथे एक बोर्ड होता. त्यावर लिहीलं होतं NoNo visitors allowed beyond this point तिकडे सैनिक पहारा देत होते. चौकशी केली तेव्हा समजलं की त्या पुला पलिकडे एक खेडं आहे आणि नंतर पाकव्याप्त काश्मीरचा भाग. त्या गावातल्या लोकाना लष्कराने पास दिलेले आहेत.

वाळूच्या टेकड्या , तर्‍हेतर्‍हेचे आकार, सॅंड्युंस आणि आकाशात ढगांची गर्दी. चारही बाजूला निसर्गाचच वर्चस्व. माणूस इथे शून्य आहे असं वाटत आसतानाच तिथलं आकाशवाणी केंद्र बघून धक्काच बसलादोन बैठ्या इमारती, त्यातूनच कारभार चाललेला. छप्परही नसलेला पेट्रोलपंप सगळच आश्चर्यकारक. हुंडरमध्ये डबल हॅम्प कॅमल हे आणखी एक आकर्षण होतं. त्यावरून फेरफटका मारण्यासाठी आमच्या पैकी काही मंडळीनी मोर्चा वळवला. बाकीचे वाळूत खेळण्यात मग्न झाले. नजरेच्या एकाच टप्प्यात बर्फाच्छादीत शिखरं, वाळवंट, पाण्याचा प्रवाह आणि त्याच्याकाठी झुडूपं असं दुर्मिळ दृष्य पाहून डोळ्याचं पारणं फिटलं. काळोख पडे पर्यंत आम्ही हुंडरमध्ये अक्षरशः हुंदडत होतो. त्याच रात्री कॅम्प फायर झालं तेव्हा खास आवाज नसलेल्यांना देखील कंठ फुटला होता.


दुसर्‍या दिवशी डिस्कीट मॉनेस्ट्री पाहीली ती सुंदर आहेच पण उंचावर असल्याने संपुर्ण नुब्रा व्हालीचं तिथून विहंगम दृष्य दिसतं. इकडे जाव तिथे काहीतरी वेगळं बघायला मिळतच. अगदी ते हिमालयीन कावळे सुद्धा काळेकुट्ट, पिवळी चोच आणि भगवे तांबडे पाय. काल आलेल्याच वाटेने आम्ही मागे फिरलो. वाटेत एक मिनिबस बंद पडली होती. त्या बस मधले प्रवासी तिथेच बसले होते. ती आड वाटच होती पणॅ त्याहूनही आड वाटेला असलेल्या दुर्गम खेड्यातले ते प्रवासी असावेत. अगदी  टिपिकल खेड्यातल्या लडाखी वेषात ते असल्याने आम्ही गाड्या थांबऊन त्यांची फोटो काढण्यासाठी उतरलो. आणि आम्हाला दहा मिनीटे थंबून रहावं लागलं. आम्हाला पाहून एखाद्या परग्रहावरच्या प्राण्याला पहावं तसे ते पहिल्यांदा बघत राहीले आणि नंतर हसत सुटले, अगदी पोट दुखे पर्यंत. त्यांची लडखी बोली भाषा आमच्या ड्रायव्हरला येत होती. त्याला विचारायला संगितलं कि त्याना का हसू येतय? ऎसाही हे उत्तर आलं. त्यांचं हसून झाल्यावर आम्ही त्यांचे फोटो घेतले आणि आता हसण्याची आमची पाळी होती. हसत हसतच आम्ही गाडीत बसलो. वाटेत खालसरला थांबून आम्ही लडाखी पक्वान्न  मोमो खाल्ले. ते आपल्या उकडीच्या मोदका सारखे असतात आत सारण मात्र वेगळं. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे मोमो मिळतात. व्हेज मध्ये भाज्या आणि नॉनव्हेज मध्ये मटन चिकन असं काहीतरी असावं. पुन्हा खारदुंगला च्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. आज खारडुंगलाचं रुप पालटलं होतं. बर्फवृष्टी होत होती. आता मात्र आम्हाला रहावलं नाही. कसल्याही संभाव्य त्रासाची पर्वा न करता आम्ही तासभर बर्फवृष्टीचा आनंद घेतला. खुप मजा केलीकाल राहिलेले फोटो घेवून आम्ही लेहच्या दिशेने निघालो. लेह जवळ आलं तसं वातावरण बदललं स्वछ उन्हाने लेह न्हाऊन निघालं होतं.

 लडाख विषयी आणखी काही लिंकस्  
जोझीला               

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates