शहरातले डोळे दिपवून टाकणारे दिवे मागे सोडून शुभ्र चांदण्यात न्हाऊन निघायला पाहिजे तर गर्दीतून बाहेर पडून कुठे तरी दूरवर गेलं पाहिजे. गावात, नदी किनारी, सागर तीरी असच कुठे तरी गेलं पाहिजे. पण हल्ली सगळीकडेच विजेचे दिवे चमकू लागल्याने (भार नियमन करून मायबाप सरकार उपकार करतं ते सोडून) चांदण्याच्या आनंदाला आपण पारखे होत आहोत. कोजागिरीच्या रात्री काही तास ब्लॅक आऊट करायला हरकत नसावी. असो..... तर कोजागिरी म्हटलं की मला आठवते ती आम्ही मित्रांनी वेंगुर्ल्याला साजरी केलेली कोजागिरीची रात्र. दिवस कॉलेजचे होते, कोजागिरीची रात्र बाहेर जाऊन जागवायची असते याची बहूतेक त्याच वर्षी जाण आली होती. सावंतवाडीच्या सांसकृतीक वातावरणात या दिवसाला नव्हे रात्रीला अनन्यसाधारण महत्व असायचं. मोती तलावाच्या काठावर कवीसंमेलन असायचं, त्याला बा.भ.बोरकर, मंगेश पाडगावकर, आमचे सर वसंत सावंत या सारखे कवी बहार आणायचे. कोजागिरीच्या स्वच्छ चांदण्यात लोक नुकतेच बाहेर पडायला लागले होते.
आम्ही पाच मित्रांनी सावंतवाडी सोडून सागर किनारा गाठायचं ठरवलं. सायकली घेऊन वेंगुर्ल्याला जायचा बेत ठरला. सुर्य मावळतीला जात होता आणि आम्ही वेंगुर्ल्याला. पौर्णिमेचा चंद्र जसजसा वर येवू लागला तसतसे आमचे चेहरेही उजळले. मित्राच्या आईने करून दिलेलं धोंडस, भेळी साठीचं साहित्य, फरसाण, पाण्याच्या बाटल्या (होय पाण्याच्याच बाटल्या) घेऊन आम्ही रमतगमत वेंगुर्ल्याच्या बाजारपेठेत येऊन पोहोचलो. एका ओळखीच्या घरात सायकली ठेऊन समुद्र किनारा गाठला. आत सारखी वेळेवर फारशी गर्दी नव्हती पण काही मंडळी चांदण्यात फिरायला आली होतीच. आम्हाला त्यांचा सहवास नको होता आणि समोर पसरलेला अथांग सागर जसा होता तशीच समुद्राची वेळही लांबपर्यंत दिसत होती. ती आम्हाला खुणावत होती. आम्ही चालत चालत निघालो. ती उभ्या दांड्याची वेळ असावी. निर्जन किनारा, शुभ्र चांदण्यात चमचमणारं पाणी, फेसाळणार्या लाटा, पिठूळ वाळू आणि पाठीमागे माडाचं बन. मन मोहून टाकणारं वातावरण, गप्पांचा फड जमला आणि कुणालाच वेळकाळाचं भान राहिलं नव्हतं. सागराचं संगीत आणि आमच्या गप्पा यांची जणू चढाओढ लागलेली. समुद्रावरून येणारे उबदार वारे आणि माडाच्या बनातून मधूनच येणारी गार झुळूक आमच्या आनंदात भर घालत होती.
समुद्रावर आल्या आल्या धोंडसाचा फडश्या पाडला होताच पण आता बराच वेळ झाल्याने पुन्हा भुक लागली होती. भेळीचं साहित्य बाहेर काढलं आणि ती बनवायला घेतली. त्या भेळीवर ताव मारला तरी शेवटी थोडी भेळ आणि फरसाण शिल्लक राहिलीच. लांब पाण्यात दोन तीन आकृत्या हुंदडताना दिसल्या. गप्पांचा ओघ कमी झाल्याने आता सर्वजण तिकडेच पाहात होते. ते कुत्रे होते. नेहमी असणार्या कुत्र्यांपेक्षा जरा मोठे, अंगा पिंडाने भरलेले. पाण्यात खेळता खेळता ते आमच्या जवळ येऊन पोहोचले. आमच्या जवळ उरलेली भेळ आम्ही कुत्र्यांना घातली पण ते त्या भेळीला तोंड लावायला तयार नव्हते. मग माझा मित्र दिगंबर इरेला पेटला. “वेंगुर्ल्याचे कुत्रे भेळ कशी खाणत नाय? फरसाण तरी खातत काय बघूया” असं म्हणत त्याने त्याना फरसाण खायला घातली पण ते स्वान समर्था घरचे असावेत तसे त्या फरसाणीलाही तोंड लावेनात. “अरे हे कुत्रेच मा?” राजन ने शंका उपस्थित केली. सगळ्यांच्या कळजाचा ठोका चुकला. कोकणात रात्री बरोबर जोडला गेलेला शब्द म्हणजे ‘भुताटकी’. ही लक्षणं काही बरी नाहीत असा भाव सर्वांच्याच चेहर्यावर येऊन गेला. गणेश आमच्यात नवीन होता. “चला जावया” त्याने सुचना केली. घड्याळा कडे लक्ष गेलं रात्रीचे बारा वाजून गेले होते. त्या अफाट पसरलेल्या समुद्र किनार्यावर आम्ही पाच आणि ते तीन जगा वेग़ळे कुत्रे. ते पाण्यात आत पर्यंत जाऊन पुन्हा येत होते. आम्हाला त्यांची संगत नकेशी झाली. तसेच मागे फिरलो. पण परतीची वाट सापडत नव्हती. वेंगुर्ला शहरापासून आम्ही बरेच दुरवर आलो होतो. उत्साच्या भरात तेव्हा ते समजलं नव्हतं. किनार्य़ावर सगळं सारखच वाटतं. हा चकवा तर नाहीना? मनात अनेक शंकांनी घर केलं. त्यात एखादा घाबरला तर दुसर्या दिवशी त्याचे आई वडील आम्हाला ओरडणार. तेवढ्यात एक भिंत दिसली., जिवात जीव आला, चला इथून नक्की वाट दिसेल म्हणून आम्ही तिकडे गेलो. पण काय तिथे राखेचे ढिग, काही अर्धवट जळालेले ओंडके, फुटकं मडकं असच काहीबाही होतं. ते एकंदर दृष्य पाहून हे स्मशान आहे हे आमच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. आता तर आम्ही आगीतून फुपाट्यात पडल्या सारखे झालो. जाऊदे काहीही असो. आता इथून लवकरात लवकर काढता पाय घेतला पाहिजे म्हणून विरूद्ध दिशेला चालत राहिलो. कधी मळलेली वाट तर कधी आड वाट असं करत मुख्य रस्त्यावर आलो. सगळीकडे सामसुम होती. बाजाराच्या दिशेने चालत राहिलो. ज्या घरात सायकली ठेवल्या होत्या तिथे येऊन दार ठोकलं. पण तो पठ्ठ्या डाराडूर झोपला असावा. को..जा..ग..र...ती याचं उत्तर द्यायला तो बांधील नव्हता. आमचा नाईलाज झाला. आम्ही एस्टी स्टॅन्डचा रस्ता धरला. उरलेली रात्र कुत्र्यांच्याच सहवासात स्टॅन्डवर पेंगत काढली, आधार एवढाच की ते कुत्रे स्मशानातले नव्हते तर प्रवाशाना सरावलेले माणसाळलेले होते.
अशीच काहीशी कोजागिरी यावेळी मीदेखील साजरी केली... मात्र नागावच्या घरी... अप्रतिम अनुभव... घराच्या गच्चीवर रात्री उशिरापर्यंत गप्पा रंगल्या...
ReplyDelete