17 October, 2010

ढोल


 ढोल म्हणजे उत्साह , ढोल म्हणजे आनंद , ढोल म्हणजे उन्माद आणि ढोल म्हणजे उत्सव, ढोल म्हटलं की असे अनेक भाव मनात एकवटतात. अगदी लहानपणा पासून पाहतोय गावातली कुठलीच गोष्ट या ढोला शिवाय साजरी होत नाही. ढोलावरकाठी बसली की जणू पहिली घंटा झाली, आता जो काही कार्यक्रम असेल तो सुरू होतोय असा संदेश गावभर जायचा आणि अजून कुणी यायचं असेल तर त्याची धावपळ उडायची. ढोलावर काठी बसली की गावभर उत्साहाचा संचार व्हायचा, आनंदाला उधाण यायचं आणि उत्सवाला  सुरवात व्हायची. सगळा गलबलाट , आवाज , स्वर एक होवून जायचा, ढोलाच्या आवाजात मिसळून जायचा. ढोलावर काठी बसली की मिरवणूक सुरू व्हायची, ढोलावर काठी बसली की पुजा सुरू व्हायची, ढोलावरकाठी बसली की लग्न लागायचं आणि ढोलावर काठी बसली की नाटक सुरू व्हायचं. कुठलीही गोष्ट कुणापासून लपून रहायची नाही. सगळ्याना ढोल बोलावत रहायचा.

आशाढात रवळनाथाच्या देवळा मधून पावणाईदेवी रामेश्वराच्या देवळात रहायला येते आणि दसर्‍याला परत जाते. रामेश्वराच्या देवळाजवळ थांबून आम्ही तीची वाट बघत असू. दुरवर डोंगरात ढोलाचा आवाज येत राही, पावाणाईचं आगमन होतय याची सुचना देत राही. आवाज जसजसा जवळ येत जाई तसा आमचा उत्साह उतू जात असे. आम्ही त्या दिशेने धावत सुटायचो , पावणाईला घेवून देवळाजवळ यायचो. दसर्‍यापर्यंत पावणाईचा खांब मग आमच्या रामेश्वराच्या देवळात राही. रामेश्वराबरोबरचत्या खांबालाही आम्ही मनोभावे नमस्कार करत असू. दुरवर ढोलाचा आवाज आला की आजही ते दृष्य माझ्या डोळ्यापुढे उभं रहातं.

दसर्‍याला पुन्हा देवळाजवळ ढोल वाजायचे. आम्ही पळत देवळाजवळ जात असू. अख्खा गाव देवळाजवळ गोळा झालेला असे. आज पावणाई निघणार, आमच्या मनात कालवाकालव व्हायची. घरातला पाहूणा जातोय तसं वाटायचं. पण आज पावणाईला नेणं हाच कार्यक्रम नसायचा. ढोलाच्या आवाजाने त्या तालावर कुणावर संचार व्हायचा, तो शांत होईपर्यंत ढोल वाजत रहायचा. आता सगळे रवळनाथाच्या देवळाकडे जायला निघायचे, सर्वात पुढे ढोल असायचा. ढोलाचा आवाज दुरदुर जायचा वडीलधारीमाणसं म्हणायची ' वर्षाक राखण लागली'.

तुळशीचं लग्न झालं की जत्रांचा मोसम सुरू व्हायचा. रामेश्वराच्या जत्रेला सकाळपासून ढोल वाजायला सुरवात व्हायची. देवाची पुजा व्हायची, जत्रेला दुकानं थाटणार्‍यांची लगबग सुरू असायची, आम्हाला मात्र शाळेत जावं लागायचं, पण आमचं सारं लक्ष ढोलाच्या आवाजाकडे असायचं. संध्याकाळी शाळेतून घरी आलो की आमचा मुक्काम देवळाकडेच असायचा. अजून जत्रेला रंग चढायला थोडा अवकाश असताना ढोल वाजवण्याचा कार्यक्रम रंगात यायचा, ढोल वाजवणारे ढोल वाजवत नाचायचे,कधी फेर धरायचे. वेगवेगळ्या तालात वाजवणं व्हायचं, बच्चे मंडळी खुश व्हायची. काळोख व्हायला लागला की एक एक गँसची बत्ती पेटवली जायची. जत्रेला रंग चढायचा. मध्यरात्रीच्या दरम्यान पुन्हा ढोल वाजायचे. आता दशावतारी नाटक सुरू होणार याचा तो संदेशच असायचा. पहाटे नाटक संपायचं, पुन्हा ढोल वाजायचे, जत्रा संपलेली असायची.

सोमवती अमावास्येला देवाचे खांब म्हणजे तरंग गावात फिरून समुद्रस्नानाला जायचे त्याची मिरवणूक वाजत गाजत निघायची. ढोल सर्वात पुढे असायचे. दिवसभरच्या फिरण्याने सगळे गावकरी दमायचे पण ढोल नाही, त्याच्या आवाजातला तो बाज तसाच कायम असायचा. कधी रात्रीच्या वेळी देवळाजवळ अवचीत ढोल वाजू लागे आणि अवाठात चर्चा सुरू व्हायची की अमक्या तमक्याच्या लग्नाचं देवाला आमंत्रण आलं देवाकडे पत्रिका ठेवून ही मंडळी पुढे आमच्या घरी येत. दरवाजाला हळदकुंकू लावत आणि आमंत्रणचा नारळ वडीलांच्या हातात ठेवला जाई पुन्हा एकदा ढोल वाजे. एखादा वानर झाडावरून खाली पडे. लग्नघरात सर्वांचा उत्साह वाढवण्यासाठी ढोल हा असायचाच. लग्नातले महत्वाचे विधी ढोलाच्या ढमढमाटातच पार पडायचे.नवरा वेशीपाशी आला ग.., नवरी मांवापाशी आली रे.. , अशी हाळी ढोलच द्यायचा आणि ' आली लग्नघटी समीप नवरा ' हे मंगलाष्टक म्हणताच आता गळ्यात माळा पडणार हो.. असं ढोलच सगळ्यांना ओरडून सांगायचा.

गावात कोण पुढारी येऊ दे, की कुणी निवडून आला म्हणून त्याची मिरवणूक असू दे, ढोल असणारच, निपक्षपातीपणे सेवा करायला, आवाज बुलंद करायला. आमच्या गावात सार्वजनीक गणपती नसायचा पण शाळेतली सरस्वती पोचवताना ढोल सर्वात पुढे असायचा आणि नदीकाठी देवीचं विसर्जन होईपर्यंत वाजत रहायचा.

ढोल सर्व सण-उत्सवात साथ देणारा, आनंद वाढवणारा. कधी थकत नसे की चुकत नसे. हल्ली गावी जाणं झालं. जत्रेला ढोल वाजला नाही, पण माझ्या मनात वाजत राहीला. गतकाळच्या आठवणी सांगत राहीला. माझ्या मनात साठवत राहीला. ढोलढमढम वाजत राहीला.

2 comments:

  1. prabhu saheb dholacyach gajrat ninadu de vijayadashmichya shubhechha

    Shishir Datar

    ReplyDelete
  2. शिशिरजी, आपल्याला आणि सर्व वाचकांना दसर्‍याच्या शुभेच्छा.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates