29 September, 2010

सिंधू व्हाली – लडाख

सिंधू घाट

आज सर्वात प्रथम आम्ही सिंधु नदीच्या घाटावर जाणार होतो. लेह शहर मागे पडलं तसं हमरस्त्याच्या दुतर्फा छोट्या छोट्या डोंगरांच्या राशी ओतून ठेवाव्यात तसं दिसत होतं. वाटेतच बौद्ध धर्माचे गुरू दलाई लामांचं निवासस्थान लागलं. मध्येच प्रेयींग व्हील्स दिसत होती. थोड्याच वेळात आम्ही सिंधू नदी जवळ पोहोचलो. सिंधू नदिचा बहूतांश भाग फाळणीनंतर आता पाकिस्तानात असला तरी सुमारे तीनशे किलोमीटर एवढा नदीचा भाग हा आजही भारताच्या जाम्मू-काश्मीर राज्यातून वाहत जावून पुढे तो पाकिस्तानात जातो हे फार थोड्यानाच माहीत असेल. जिच्या केवळ नामोच्चाराने कोट्यावधी भारतीयांच्या मनात पवित्र भाव निर्माण होतात. हिंदू संस्कृती जिच्या काठी रुजली, फोफावली ती वेदांची जननी म्हणजे सिंधू. तीच्या काठावर उभा असताना माझ्या मनात भावनांचा कल्लोळ उठतो. सिंधूवरून हिंदू आणि म्हणून हिंदूस्थान, तसच इंडस वरून इंडीया अशी आपल्या देशाला नावं पडली.  तिबेटमध्ये मानसरोवरनजीक सिन-का-बाव इथे उगम पावून पुढे सिंधू नदी आपल्या भारतात लडाख प्रांतात प्रवेश करते. ऋग्वेदापासून महत्वाच स्थान असलेल्या या नदीच्या काठी कधी काळी आर्यानी वस्ती केली होती. तिच्या काठी आम्ही उभे होतो. खळाळणारं स्वछ, शीतल जल घेवून वहात जाणार्‍या या नदीला पुढे झंस्कार व्हाली मधून वाहत येणारी झंस्कार नदी मिळते आणि नंतर पाकिस्तानात जाते. लडाखमध्ये जी शेती होते ती बहुतांश या नदीच्या पाण्यावर. इतर ठिकाणी गवताची पातीही दिसणार नाही पण या नदीच्याकाठी मात्र हिरवळ दिसते. दरवर्षी जून महीन्यात सिंधू घाटावर सिंधूमहोत्सव साजरा केला जातो. या घाटावरून लडाखच्या सर्वात उंच अशा स्तोक कांगरी शिखराच सुरेख दर्शन होतं. 
मैत्र्येय बुद्धाची मुर्ती

लडाखमध्ये मॉनेस्टीज खुप आहेत आणि त्या पहाण्या सारख्याही आहेत. मॉनेस्टी म्हणजे गुंफा किंवा आपण त्याना बौध विहार सुद्धा म्हणतो. 1430 साली बांधून पुर्ण झालेली थिकसे मॉनेस्टी ही सर्वात उत्तम अशी मॉनेस्टी आहे. त्याची सुरवात अगदी प्रवेशद्वारापासून होते. अत्यंत आकर्षक अशी रंगसंगती आणि कलाकुसर असलेलं हे प्रवेशद्वार आहे. सर्वच मॉनेस्टींची उत्तम व्यवस्था ठेवलेली आहे. मी त्या ठिकाणी तीन वेळा गेलो पण प्रत्येकवेळी ती तेवढीच साफ होती. रंगही अगदी काल काढल्या सारखा. ही मॉनेस्टी म्हणजे अख्ख गावच आहे. शाळा, बॅंक, निवासस्थानं प्रार्थनामंदीर सगळ एकाच ठिकाणी, 


चार महीन्याचा उन्हाळा सोडल्यास अतीशित असलेल्या या ठिकाणी सगळी  व्यवस्थाजागच्या जागीच व्हावी अशीच त्या मॉनेस्टीची रचना आहे. शंभरेक पायर्‍या चढताना वाटेत एक भलं मोठ प्रेयींग व्हील आहे. त्या नंतर   सुबक अशी मैत्र्येय बुद्धाची मुर्ती पाहून थक्क व्हायला होतं. पंधरा फुट उंच असलेली ही मुर्ती मात्र अलिकडेच म्हणजे 1980 साली उभारण्यात आली. एकदा पेटवल्यावर वर्षभर पेटतील  अशा समया तिथे तेवत होत्या. समोरच्या इमारतीत प्रार्थना चालू होती. आणि बाजूलाच सुंदर रांगोळी काढलेली होती.
 हे सगळं पहात आम्ही त्या इमारतीच्या गच्चीत   गेलो. तेव्हा सिंधू नदीचं पात्र दूर पर्यंत दिसत होतं. लेह कडून येणार्‍या रस्त्याच्या एका बाजूला हिरवीगार शेती आणि दुसर्‍या बाजूला वैराण जमीन हे दृष्य पहाण्या सारख आहे. एवढा भिन्न किंवा विरोधी चित्र क्वचीतच कुठे पहायला मिळेल. थिकसे गुंफेत आम्ही पोहोचलो तेव्हा अर्ध्यातासात परत फिरु असं वाटलं पण दोन तास कसे संपले ते समजलच नाही. ही प्राचीन गुंफा नेत्रसुखद तर आहेच पण कोणतही औडंबर न माजवता धार्मिक स्थान कसं असावं त्याचं प्रतिकही आहे. उत्तम मूर्तीकाम, नक्षीकाम, कमानी, रंगसंगती यांचं मिश्रण आणि त्याचाच एक भाग बनलेले लामा,
थिकसे मॉनेस्टी
 जेमतेम चार महिने सोडले तर निसर्गाशी दोन हात करत जगणारी ही माणसं पण त्याची कसलीही खूण चेहरर्‍यावर न बाळगणारी, अगदी शांतपणे सगळं चाललेलं, सगळे हसतमुख. प्रार्थना सुध्दा देवासाठी, दिखाव्यासाठी नाही. बुध्दाची भव्य मुर्ती तर बघत रहाण्यासारखी . फोटो काढण्यातच सगळा वेळ जातो खरं तर शांतपणे बसायला हवं होतं. लडाखी स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणूनसुध्दा थिकसे गुंफेकडे पाहिलं जातं.  


हेमिस मॉनेस्टी 
त्यानंतर हेमिस ही लडखमधली सर्वात मोठी गुंफा पाहिली. १६३० मध्ये बांधलेली ही गुंफा इतर गुंफांहून वेगळी आहे. इथे त्या मॉनेस्टींच्या आतापर्यंत होवून गेलेल्या सर्व मुख्य लामांचे पुतळे आहेत. इथे असलेला गौतमबुध्दांच्या शिष्याचा पद्मसंभवाचा मोठा पुतळा आहे. या मॉनेस्टींमध्ये भिंतींवर अप्रतिम अशी पेंटींगज् आहेत. 
शे पॅलेस
नंतर पाहीलेला शे पॅलेस ही मुळात  मुळात गोम्पा होती१६५० मध्ये देलडॉन नामग्याल (King Deldon Namgyal) या राजाने या ठिकाणी स्वतःच्या वडिलांच्या म्हणजे'सिंगाय नामग्याल' (Singay Namgyal) यांच्या आठवण म्हणून राजवाडा बांधला. या ठिकाणी १८३४ पर्यंत राज निवासस्थान होते. आता सध्या येथे फार कोणी रहत नाही. गोम्पाची काळजी घेणारे काही लामा आहेत.  राजवाडा म्हणण्यासारखे सुद्धा काही राहिलेले नाही येथे. बर्‍याचशा  खोल्या बंदच आहेत. तिथल्या  'शे' चे आकर्षण असलेल्या बुद्ध मूर्तीला भेट द्यायला गेलो. ठिकसेप्रमाणे येथे सुद्धा भली मेठी बुद्ध मूर्ती आहे. तितकी रेखीव नाही पण भव्य निश्चित आहेलेह-लडाखमध्ये जिथे पाहाल तिथे तुम्हाला स्तुप दिसत राहातात.

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates