श्रीनगर विमानतळावरून विना अडथळा आम्ही नगीन लेकला पोहोचलो. एरवी पाऊण तासाच्या या रस्त्याला जेमतेम पंचवीस मिनिटंच लागली. रस्त्यावर पुर्ण शुकशुकाट होता. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचा खडा पहारा आणि एखाद दूसरा माणूस सोडून सगळं श्रीनगर घराघरात बंद होतं. गेले दोन अडीच महिने संचारबंदी असलेल्या शहरात आम्ही हट्टाने दाखल झालो होतो. मुझफ्फर आम्हाला न्यायला विमानतळावर आला होता त्यामुळे तशी काळजी नव्हती, हाऊसबोट जवळ पोहोचलो तेव्हा तीथे बाहेरच्या तणावाचा बागुउलबुवा नव्हता. जेवणाच्या नादात बाहेरच्या संचारबंदीचा आम्हाला विसर पडला आणि पोटात चार काश्मीरी घास जाताच आमच्या अंगात उत्साह संचारला.
संध्याकाळच्या कलत्या उन्हात शिकार्यातून जलविहाराला सुरवात झाली आणि तो अकबराचा महाल, समोर उंचावर दिसतो तो आद्य शंकराचार्यांचा मठ, तीथे अमक्या सिनेमाचं चित्रीकरण झालं, इथे बाजूला आता मोठं हॉटेल बनतय, शिकारा वल्व्हताना मुक्तार माहीती देत होता. कुणाचं लक्ष त्या माहितीकडे तर कुणाचं समोर दिसणार्या पक्षांकडे. माझं मन मात्र गेल्या चार वेळच्या आणि आत्ता दिसणार्या दृश्यांमध्ये तुलना करण्यात गुंतलं होतं. हेच ते पृथ्वी वरचं नंदनवन. जिथे मोगलांनी राज्य केलं, राजा हरी सिंहानी राज्य केलं, आज कोण राज्य करतय की अराजक आहे इथे?
गेल्या वेळी शिकार्यातून पाहिलेलं ते अर्धवट जळलेलं मदीर, हिंदू पंडीतांची घरं, ती उजाड शाळा हे सगळं माझी नजर शोधत होती. एवढ्यात पाण्यात सूरमारणारी ती दहा-बारा वर्षांची मुलं दिसली. आता उन्ह तिरकी झाली होती. दल सरोवराचं गार पाणी आणि वाहणारा वारा या मुळे पाण्याबाहेर येणारा मुलगा शिरशीरी काढत पुन्हा पाण्यात डुंबत होता. हे एवढच दृश्य पण त्याने तणाव बराच निवळला. याच वयाची मुलं आगी लावताहेत, जवानांवर दगड फेकताहेत अशी दृश्य प्रसारमाध्यात पाहून मन विषण्ण बनलं होतं. असो, पण त्याच श्रीनगर मध्ये अशी सूर मारणारी मुलंसुद्धा आहेत हे पाहून बरं वाटलं. ‘कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो’ कवितेच्या ओळी सहजच मनात, आत कुठेतरी आठवत राहील्या. बाहेर कमळं दिसत होती.
ही खरी कमळं आपल्याकडे असतात ती व्हाईट लिली आपण त्यानाच कमळं म्हणतो. तो पॉंन्ड हेरॉन, ती बघा बदकं, अरे हा तर खंड्या सारखा दिसतोय, हो खंड्याच तो पण राखाडी रंगाचा आपण नेहमी बघतो तो.... तो पहा पलिकडे दिसतोय. अरे इथे तर पक्षांची लयलूट आहे. कॅमेर्यांची बटनं दाबली जात होती... ती ती फ्रेम बंदीस्त होत होती. पण अंत:पटलावर अनेक दृश्य साठवली जात होती. जुन्यांची पुन्हा जुळवा जुळव होत होती. शिकारे फ्लोटींग मार्केट मध्ये थांबले. इथले व्यवहार पुर्वी प्रमाणेच चालू होते. अर्थात ग्राहकांची कमी होतीच.
शिकारे परतीला लागले, अर्थात आम्हीही. इथली परिस्थितीच अशी आहे. कोणतरी हाकतय, बाकीचे त्या दिशेने जातात. त्याना जायचं आहे का? हा वेगळा प्रश्न. दिशा दाखवणारा कुणी नाही. सकाळी लाल चौकातून आलो. आता सगळेच चौक लाल झालेत. रस्ते, पायवाटा सगळं लाल झालय. हे आपलच रक्त....... शरीरात असे पर्यंत ते हिंदू, मुसलमानाचं असतं. बाहेर पडल्यावर त्याचा रंग एक, गुण एक. ते भगवं किंवा हिरवं असतं का? गार वारा अंगाला झोंबत होता. काश्मिरच्या दर्याखोर्यातून वाहात येणारा हा वारा मन प्रसन्न करत होता. बाहेर एक एक दिवा पेटत होता. आकाशात तारकांची उपस्थिती जाणवायला लागली. क्षितिजावर लाली पसरली. अजूबाजूचे डोंगर निळाईने गडद होत गेले. संथपणे चालणार्या आमच्या शिकार्याच्या बाजूने झपाझप वल्हे चालवत छोट्या छोट्या होड्या ये जा करत होत्या. त्यातल्या काही नजरा आमच्याकडे कुतूहलाने तर काही रोखून पहात होत्या.
विस्तीर्ण आकाश आणि त्या खाली तेवढच विस्तीर्ण जलाशय – दल सरोवर. एकमेकाचं प्रतिबिंब निरखून पहात होती जणू. काळोख दाटून आला, दूरवरचे दिवे आता वेशीच्या खुणा बनले होते. तिन्ही सांजा झाल्या... आपाआपसातलं बोलणं थांबलं. तंद्री लागली होती जणू. मुक्तारचा सातवीत शिकणारा भाचा आता वल्हवत होता. कश्मिरी, हिंदी, इंग्रजी पाठ असलेली आठवतील ती गाणी म्हणत होता. ‘यह थोडा तेज है। अंग्रेजी स्कूल मे जाता है।’ मुक्तारने मध्येच माहिती दिली. तो गातच होता.
एवढ्यात त्याने गायला सुरवात केली ‘जन-जण-मन’ हे माझ्यासाठी नवं होतं. आशादायी होतं. लाल चौक, लाल रस्ते, लाल पायवाटांना ते उत्तर होतं. खुप खुप वर्षानी खुद्द काश्मिर मध्ये तो सूर सहजच कानी पडत होता. ‘जन-जण-मन’ ते स्वर माझ्या मनावर अधिराज्य करायला लागले. मन प्रफुल्लीत झालं. त्या सूरात अनेक सूर मिसळले जातील, काश्मिरच्या दर्याखोर्यातून हे सूर गर्जत राहतील. अशी आशा करायला हरकत नाही. तो सूर आजच उमटला आहे.
आज पहिल्यांदाच तुमच्या ब्लॉगला भेट दिली खूप चांगले लिहिता तुम्ही आणि तुमचे अनिभाव तुम्ही उत्तम शब्दात इथे दिले आहेत
ReplyDeleteअतिशय मस्त पोस्ट
विक्रम, मी या भागात चार वेळा गेलो, प्रत्येक वेळीची परिस्थिती वेगवेगळी होती. अद्ध्या तर काश्मिर जळतय. अनिप्राय बद्दल धन्यवाद.
ReplyDelete