24 January, 2014

ईशान्य वार्ताचं दमदार पुनरागमन


ईशान्य वार्ताचे संपादक पुरुषोत्तम रानडे, प्रकाशक जयवंत कोंडवीलकर, संघटक विवेक गानू, समंवयक संजय काठे आणि जनकल्याण समितीचे वसंत देशपांडे यांच्या सततच्या प्रयत्नामुळे हे मासिक पुन्हा नव्या जोमाने सुरू झालं आहे. पुर्वांचलाशी महाराष्ट्राची नाळ कृतीशील प्रयत्नाने जोडण्यासाठी गेली अनेक वर्ष ही मंडळी सात्यत्याने प्रयत्नात असतात आणि अनेक सामाजिक सांकृतीक प्रकल्पांव्दारे त्या कार्यात भर घालत असतात. ईशान्य वार्ता हे मासिक सुरू झालं आणि त्यांचा हा प्रयत्न आणि त्याची माहिती अनेक व्यक्ती आणि संस्थांकडे पोहोचू लागली. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, त्रिपूरा, नागालँड आणि मोझोराम या पुर्वेकडच्या सात राज्यांकडे तसं कुणाचंच लक्ष नसतं, देशाच्या सिमांत भागात असलेली ही राज्य संरक्षण दृष्ट्याही अत्यंत महत्वाची अशी आहेत. देशाचा पंतप्रधान जरी आसम मधून निवडून येत असला तरी तिकडे लक्ष द्यायला गेल्या दहावर्षात त्यांना वेळ मिळाला नाही.

हे मासिक सुरू झाल्यानंतर गेलं जवळ-जवळ वर्षभर बंद होतं. दिवसेंदिवस वाढत जाणाराखर्च आणि काम यांचा मेळ घालण्याची तयारी करून हे मासिक पुन्हा सुरू होत आहे.  

देशप्रेमाच्या केवळ पोकळ गप्पा न मारता आपल्या कृतीने ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ हे वाक्य प्रत्यक्षात आणणार्‍या या मंडळींना आणि ईशान्य वार्ताला प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हार्दीक शुभेच्छा.             


वर्गणी आणि लेखन साहित्य पाठवण्यासाठी  कृपया खाली दिलेल्या पत्यावर संपर्क साधावा. 
पुरुषोत्तम रानडे
कृष्ण कुटीर, आयरे मार्ग,
डोबिवली पुर्व 421201
भ्रमण ध्वनी: 9404762972
  
      


18 January, 2014

‘Scene’कर











हितेंद्र सिनकर
मोबाईलमध्ये कॅमेरा उपलब्ध झाला, तसंच सोशल मिडीयाचा सुळसुळाट झाल्यापासून सगळीकडे फोटोंची लयलुट झालेली दिसते. आता त्यात पहावे असे किती फोटो असतात हा खरा प्रश्न आहे किंवा ज्याच्या त्याच्या अभिरुचीचा तो भाग आहे. पण तुम्हाला खरंच देखणी छायाचित्रं पहायची असतील तर:
जहांगीर आर्ट टेरेस गॅलरी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई ४०० ००१ येथे हितेंद्र सिनकर यांनी छायाचित्र प्रदर्शन मांडलं आहे. हे प्रदर्शन दि. १६  ते २२  जानेवारी २०१४  या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.

हितेंद्र सिनकर या उपजत छायाचित्रकाराने हे प्रदर्शन मांडलं आहे. सिनकरांनी काढलेले फोटो पाहाणं हा एक सोहळा असतो. नेत्रसुखद म्हणजे काय असतं ते त्यांची छायाचित्रं पाहिल्यावर  समजतं. गेली तीस वर्षं फोटोग्राफी तंत्रात झालेले बदल, माध्यमं आणि कॅमेरे याचं पुरेपूर ज्ञान सिनकराना आहेच पण फक्त तांत्रिक बाबीत न अडकता दृष्याचा आत्मा रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांची छायाचित्रं करतात. डिजीटल फोटो;  स्क्रिन आणि प्रिंट मिडीयावर वेगवेगळे दिसतात. फोटो काढल्यावर छपाईपुर्व संस्कार म्हणजे काय आणि ते कसे केले पाहिजेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे सिनकरांचे हे फोटो आहेत.

लेह-लडाखचं अनोखं सौदर्य, त्सो मोरीरी, पॅगॉंग हे तिथले तलाव, गोठलेलं लडाख, कैलास मानसरोवरची पवित्र भूमी, आकाशातल्या ढगांचे विभ्रम, समुद्राच्या लाटांचा जिवंतपणा, ब्रम्हपुत्रेची पुळण, तिबेटच्या गुंफा, मध्यप्रदेशचं शुष्क जंगल, कृष्ण-धवल रंगातील छाया प्रकाशाचा खेळ, इंद्रधनुष्याचे सप्तरंग, विद्युल्लतेचा लोळ, गुढ आकाश, सोनपिवळी उन्हं, पिठूर चांदण्यातला  कैलास पर्वत, विमानातून टिपलेलं एव्हरेस्ट  शिखर, पाण्याच्या विविध रंगछटा, एवढंच नाही तर पाण्यात नुकतच पडलेलं एक पान अशी अनेक छायाचित्रं पाहून आपण चित्रमुग्ध होतो. छयाचित्रण कलेचा आत्मा गवसलेल्या या कलाकाराची छायाचित्रं पाहून त्या त्या ठिकाणाला भेट देण्याचा किंवा आपण आधीच भेट दिली असेल तर पुन:प्रत्ययाचा आनंद आपल्याला ही छायाचित्रं पाहून खचितच होईल. जिज्ञासूंनी सिनकरांच्या http://www.hitendrasinkar.com/gallery/  या संकेतस्थळालाही जरूर भेट द्यावी                                   




12 January, 2014

काल


या उजाड माळावरती
मी उन्हात फिरतो आहे
ती फुले काल रात्रीची
मी अजून शोधतो आहे

तू सांजवेळी आलीस
अवचीत अशी हसलीस
ना कळले मजला काही
की मला तशी दिसलीस


तो गंध फुलांचा होता
की तुझाच होता सांग
पसरला सभोवती होता
नव प्रेमाचा मृदगंध

तारका नभी फुलताना
तू कळ्या मांडल्या होत्या
अन गालावर कुसूमाच्या
निश्वास टाकला होता

तो चंद्र साक्षीला होता
की तुझाच तो फितूर
सामोरा मी तुज आलो
तू गेलीस किती, किती दूर



नरेंद्र प्रभू 

05 January, 2014

संभवामी युगे युगे


"यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्मानं स्रुजाम्याहं
परित्राणाय साधुनां विनाशायच दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे"


भगवान श्रीकृष्णाने दिलेलं हे वचन कसं पुर्ण होणार?

कारण:
घरातून बाहेर पडावं तर चालायला रस्तेच नाहीत अशी शहरांची अवस्था तर गावा गावात रस्त्यांचंच गटार झाल्याची अनुभूती, शाळेत जावं तर पैसे चारून नोकरीला लागलेले मास्तर आणि नेत्याकडे जावं तर त्याच मास्तराकडून पैसे खावून गब्बर झालेला नेता. ‘आदर्श’ वाल्यांचाच मुख्यमंत्री आणि पूढे तिकडे दिल्लीत त्यांचाच वाचाबसलेला पंतप्रधान. बाजारात जावं तर कांद्याचा भाव सुद्धा विचारण्याची भिती, करण तो विचारून चक्कर आली तर एवढा महागलेला कांदाही कुणी नाकाशी धरणार नाही. शाळेत शिक्षण नाही, सरकारात दम नाही, न्यायालयात न्याय .. ... .. . (नाय आणि गांगुली हाय). एवढं सारं झालं म्हणून मिडीयात जावं तर तिकडे करूण की काय म्हणतात तो निस्तेजपाल बसलाय.
सगळी यादी करायला गेलं तर टाईप करून करून बोटं मोडतील.  
कसं व्हायचं म्हाराजा?

असं असलं तरी तो सांगून गेलाय

संभवामी युगे युगे

आता त्यानेच म्हटलय म्हणजे तो येणारच, आलाच पाहिजे, आलाही असेल कदाचीत,

पण आपण त्याला कसे ओळखणार?

तो केजरीवाल तर नाही?

छे देव काय असा असतो? तो ‘आप’लाच आहे. म्हणून त्याला सध्या सोडून देवूया. त्याला किती का खोल्यांच्या असेना पण एकदाचा घरात जाऊदे. तो पाणी फुकट वाटतोय विज अर्ध्या किंमतीला देतोय म्हणजे तो देवच असणार पण तिकडे गोव्यात विज याच्यापेक्षा स्वस्त आहे, पेट्रोल तर सगळ्या देशाभरापेक्षा स्वस्त, त्यांचा मनोहर कारकुनाच्या कपड्यात स्कुटरवरून मंत्रालयात येतो, इकॉनॉमी क्लासने फिरतो, कटींग चाय पितो. 
तो देव असेल काय?  

छे...!  देव एकदम दोन अवतार कसे घेईल?  नाय?

देव बिटकॉईन असेल काय बिटकॉईन?

बिटकॉईन माहीत नाय?

बिटकॉईन, बिटकॉई...न.

अहो.... व्हर्च्युअल चलन.  

नाय समजलं, जयराज साळगावकरांचा लोकसत्ता मधला लेख वाचा म्हणजे जरा समजेल (मला पुर्ण समजलय पण मी सांगणार नाही (कळ्ळच नाही तर सांगणार काय, असं कोण म्हणालं ते?)
देशोदेशीच्या केंद्रींय बँकांतून चाललेल्या एकाधिकारशाहीला आव्हान देऊन अर्थकारणाचे राजकारण करून सामान्यांचे आर्थिक नुकसान करणार्‍या राजसत्तांना आणि अघोरी संपत्तीमुळे आलेल्या त्यांच्या माजाला चाप लावण्याचे काम बिटकॉईन करू शकेल असं म्हणतात.

देशात राजकिय पातळीवर आणि जगात आर्थिक आघाडीवर होऊघातलेल्या बदलातच पुन्हा धर्माचं राज्य येईल, त्याने ‘संभवामी युगे युगे’ म्हटलं होतं त्याच्या या पाऊलखुणा तर नसतील? अपेक्षा करायला काय हरकत आहे. Be Positive.       

02 January, 2014

ओझी नको वाहू


आला दिस गेला दिस
त्याने काय दिलं तुला
दिस मावळतीला गेला
मनी काहूर माजला

अशी दिसांची ही ओझी
नको वाहू रे बालका
गेला दिस हा गुमान
उद्या असेल बोलका

आशा निराशेचा खेळ
जशी दिस आणि रात
रात सरून जाईल
आधी कर सुरूवात

किती दिवसांमध्ये ही
काही नसेल घडलं
येत्या दिसाच्या कुशीत
तुझं सपान दडलं    

नरेंद्र प्रभू 

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates