अमर हिंद मंडळाच्या ६२ व्या वसंत व्याख्यानमालेचं उद्घाटन साहित्य , समाज आणि संस्कृती या विषया वरील व्याख्यान देऊन डॉ. आनंद यादव यानी केलं. डॉ.आनंद यादव हे नाव गेले दोन महीने चांगलच चर्चेत आहे. साहित्य संस्कृती मंडळाने त्यांची पालखी प्रथम 'कौतिकाने' नाचवली आणि तेवढ्याच चलाखीने गायब केली. साहित्य संमेलना दरम्यान ना त्यांचा कुठे फोटो येऊ दिला ना अध्यक्षीय भाषण प्रसिध्द झालं. असे प्रकार एकदा नव्हे अनेक'वार' वारं'वार' झाले. फक्त 'वार'करी वेगवेगळे होते.
महाबळेश्वरच्या थंड हवामानात त्यांचे शब्द बाहेर फुटू दिले नाहीत पण इकडे मुंबईत प्रखर उन्हाळ्यात ते ऎकता येतील म्हणून वसंत व्याख्यानमालेला गेलो. रामायणात महाभारत नको असं म्हणत डॉ. आनंद यादवांनी झाल्या प्रकारा बद्द्ल चकार शब्द काढला नाही, मात्र दिलेल्या विषयावर प्रबोधन पर भाषण केलं. ते तरी कुणाला झोंबणार नाही. त्या भाषणात आलेले प्रमुख मुद्दे असे.
समाज हा केंद्रस्थानी असून त्याला सुसंस्कृत करण्यासाठी असतं ते साहित्य.
नुसत्या समुदायाला समाज म्हणता येणार नाही तर त्याला कळप असच म्हणावं लागेल.
निती म्हणजे काय तर जी एका ठरावीक दिशेने नेते ती.
स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात फरक केला पाहीजे.
मनुष्य हा प्राणी आहे त्याच्यावर संस्कार केले म्हणजे तो मानव होतो.
माणसावर संस्कार करीत गेल्या शिवाय त्याच्या बुद्धीचा विकास होत नाही.
अणू, परमाणू आणि परमेश्वर हे दाखवता येत नाहीत ते बुध्दीलाच कळतात.
परमेश्वर हे एक सुत्र आहे तर देव-देवता हे शक्तीचं प्रतीक आहे.
सत्य हे प्रथम चित्ताला, बुध्दीला कळतं आणि नंतर आनंद होतो. ते सत् चित् आनंद म्हणजेच सच्चिदानंद तो परमेश्वर.
जे नैसर्गिक आहे प्राकृतिक आहे त्याच्यावर संस्कार करून आपण वापरतो. (उदा. अन्न शिजऊन खातो.)
माणसाला आपल्या सहित नेतं ते साहित्य.
तोंडाला किंवा मुखाला थोबाड म्हणणं म्हणजे विकृती आणि मुखकमल म्हणणं म्हणजे संस्कृती.