28 July, 2009

कीं घेतले व्रत न हें अम्हीं अंधतेने

थोरला आणि धाकटा दोन्ही बंधूनी काळ्यापाण्याच्या शिक्षेची वाटधरली असताना वीर सावरकरांच्या वहिनीला एकच कायतो आधार होता, तो म्हणजे बॅरिस्टर सावरकरांचा पण १९१० च्या मार्च मध्ये वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी सावरकराना ब्रिटीश सरकारने पकडले, गुन्हा होता ‘ हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्रचळवळ ’. देहांताची शिक्षा होऊशकेल असा हा गुन्हा. अअता या जन्मात पुन्हा भेट घडणे असंभवनीय. आपल्या प्रिय वहिनीला हे वृत्त कळवताना, त्या मागील दिव्य आणि उदात्त हेतू स्पष्ट करताना इंग्लंडच्या ब्रिस्टन जेलमधून बहूदा आयुष्यातले शेवटचे होऊपाहणारे पत्र लिहीले. जणू मृत्यूपत्रच होते ते. अशा कठीण प्रसंगीही स्वातंत्रवीर सावरकरांची प्रतिभा, तेजस्वी विचार, जाज्वल्य देशप्रेम कसं उफाळून आली होतं पहा. वीर सावरकर म्हणतात.

हे मातृभूमि, तुजला मन वाहिलेलें ॥

वक्तृत्व-वाग्विभवही तुज अर्पियेलें ॥

तूंतेचि अर्पिलि नवी कविता रसाला ॥

लेखांप्रती विषय तूंचि अनन्य झाला ॥१६॥


त्वत्स्थंडिली ढललिले प्रिय मित्रसंघा ॥

केलें स्वयें दहन यौवन-देह भोगा ॥

त्वत्कार्य नैतिक, सुसंमत सर्व देवा ॥

त्वत्सवेनींच गमलीं रघुवीर सेवा ॥१७॥


त्वत्स्थंडिली ढललिली गृह-वित्-मत्ता ॥

दावानलांत वहिनी, नवपुत्र, कांता ॥

त्वत्स्थंडिली अतुल-धैर्यवरिष्ठ बंधू ॥

केला हवी परम कारूण पुण्यसिंधू ॥१८॥


त्वत्स्थंडिलाचरी बळी प्रिय बाळ माझा ॥

त्वत्स्थंडिली बघ अतां मामा देह ठेला ॥

हें काय ! बंधु असतो जरि सात आम्ही ॥

त्वत्स्थंडिलींच असते दिधले बळी मी ॥१९॥


कीं घेतले व्रत न हें अम्हीं अंधतेने ॥

लब्धप्रकाश-इतिहास-निसर्ग-मानें ॥

जें दिव्य दाहक म्हणूनी असावयाचें ॥

बुध्द्याचि वाण धरिले करिं हें सतीचें ॥२५॥


26 July, 2009

कारगील विजय दिन



आज कारगील विजय दिन. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानवर विजय मिळवला. जोझीलापास पासून द्रास-कारगील, बटलीक सेक्टर सगळीकडे ऊंचावर शत्रू आणि पायथ्याला आपले सैनिक. शत्रू कुठे लपलाय, किती आहे, त्यांच्याकडे शस्त्रास्त्र कोणती याचा काहीच थांगपत्ता नसताना लढून जिंकलेलं हे युद्ध म्हणूनच खुप कौतुकास्पद. या विजयाला आज दहा वर्षं पुर्ण होताहेत.

गेल्यावर्षी याच दिवशी द्रास येथील विजय स्मारकाला भेट देण्याचा योग आला होता. स्मारकाला भेट दिली, माहिती घेतली, तो प्रदेश प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला, त्यामुळे युद्धाचं गांभिर्य आधिकच प्रखरपणे डोळ्यासमोर आलं .


विपरीत स्थितितील युद्ध जिंकणार्‍या, युद्धात कामी आलेल्या वीर सैनिकांना ही भावांजली आणि सिमेवरच्या जवानांना मानाचा मुजरा...!


॥ देश देश म्हणत त्यांनी प्राणांची आहुती दिली

आपण निदान विभूती तरी लावूया ॥




24 July, 2009

वेश्येला मणिहार

महाराष्ट्र शासनाला मंत्रालयात बसून निर्णय घेणं आवडेनासं झालेलं आहे त्यामुळे कधी ओरोस तर कधी नाशिकला मंत्रिमंडळाचं वर्‍हाड जमा होऊ लागलयं. महाराष्ट्रातील आत्मघाताच्या उंबरठ्यावरचा शेतकरी यांनी कधीच नजरेआड केलाय ( डॉ. नरेंद्र जाधवांनीच तसा परवाना दिलाय ) आता दिसते आहे ती केवळ युरोप आणि अमेरीका. म्हणूनच कोकणात मादाम तुस्साँच्या धर्तीवर मेणाच्या पुतळ्यांचे प्रदर्शन ( मायावतीचा आदर्श घेऊन स्वतःचेच पुतळे तिथे ठेवा ) तर उत्तर महाराष्ट्राच्या पॅकेजमध्ये आजपर्यंत विदेशी समजल्या जाणार्‍या वाईनला व्हॅटमध्ये तब्बल १६ टक्के रिबेट. (बघा आता महाराष्ट्राचा कसा कायापालट होतो तो.) वाईनवर २५ टक्के असलेला व्हॅट २० टक्के करण्यात आला आणि त्यात १६ % रिबेट देण्याचा निर्णय घेतला गेला. बघा बाईनवरचा व्हॅट % करण्यासाठी किती कोलांट्या उड्या मारल्या ते. हे सगळे कसरतपटू पद्मसिंहाचेच चेले. कोण आत कोण बाहेर एबढच. सगळ्या नितीमत्तेचा दिवसा ढवळ्या खुन होतोय.

केंद्रसरकारने यंदाच्या अर्थ संकल्पात पुढील पाच वर्षात महानगरं झोपडपट्टीमुक्त करणार अशी घोषणा केलीय. तेवढं मात्र होईलच याची खात्री आत्ताच वाटायला लागलीय कारण साधी तुरडाळ १०० रु. किलोच्या वर गेलीय. ( आजचा भाव १२० रु. ) तेव्हा येत्या पाच वर्षात सगळे गरिबच मरून जातील, मग गरिब रहाणार नाही की झोपडी. आता सद्ध्या गरिब हटाव मोहीम चालू आहे. ते हटले कि झोपडपट्ट्याही जातील, तिथे टॉवर उभे रहातील. ते बांधण्यासाठी आत्तापासून पैसा जमा करायला नको? ( राज्याच्या तिजोरीतून आणि सामांन्यांच्या खिश्यातून ) मग तो साठेबजी करून असो कि कर माफ करून त्याचं सोयर सुतक पाळण्याची काय आवश्यकता ?

पुर्वी शिकवलं जायचं समाधानी वृत्ती ठेवा, ' दाल रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ ' आता डाळ परवडत नाही ना ? मग वाईन प्या , तिच्यावरचा कर कमी केलाय एकूण काय तर ' पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार... '


16 July, 2009

अमर होय ती वंशलता । निर्वंश जीचा देवांकरिता ॥

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे थोरले बंधू गणेशपंत यांना काळ्यापाण्याची शिक्षा झालेली. धाकटा भाऊ बाळ याला वयाच्या १९ व्या वर्षी लॉर्ड मिंटो वर फेकलेल्या बॉंबप्रकरणी अटक झालेली. या दोन्ही वार्ता इंग्लंडमध्ये असलेल्या विनायकरावांना त्यांची वहिनी आणि गणेशपंतांची पत्नी कै. यशोदाबाई यांनी कळवली. दोन्ही भावांना अटक झालेली असताना घरी एकाकी असलेल्या वहिनीला कुणाचाच आधार नव्हता. होता तो फक्त विनायकरावांचा. ते विलायतेत दूर, त्यांचीही क्रांतिकार्याची धामधुम चललेली. त्याही परिस्थितीत विनायकरावांनी वहिनीस सांत्वनपर पत्र लिहीलं, त्याचा सारांश असा.

" खरोखरच आपला वंश धन्य म्हटला पाहिजे. इश्वरी अंश असल्या शिवाय असल्या गोष्टी घडत नाहीत. फुले अनेक फुलतात आणि सुकून जातात त्यांची कोण दखल घेतो ? पण जे फुल गजेंद्राने श्रीहरीला वाहीले ते अमर झाले. त्या गजेंद्राप्रमाणेच आपल्या भारतमातेची केविलवाणी स्थिती झाली आहे. तेव्हा आपल्या वंशातील सर्व फुले खुडून त्याच्या माळा केल्या आणि नवरात्रीत नऊ माळा अर्पण केल्यावर कालीमाता प्रकट होते त्या प्रमाणे ती झाली तर देशाकरीता निर्वंश झाला तरी आपण अमरच होऊ.

आता हे महत्कार्य हाती घेतले आहे तेव्हा मोठ्याप्रमाणेच वागलं पाहीजे. तू तर धैर्याची मुर्ती आहेस, तेव्हा संताना पसंत पडेल असे वर्तन कर. "

(क्रमशः)


नरेन्द्र प्रभू

10 July, 2009

क्रांतीसुर्य सावरकर

दमनकारी ब्रिटीश सत्ताधीशांची दडपशाही आणि अत्याचार आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याच्या उद्देशाने, ब्रिस्टनच्या तुरुंगातून मुंबईला नेत असताना सुटका करुन घ्यायची योजना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आखली होती. त्या योजनेबरहुकूम ८ जुलै १९१० रोजी मार्सेल्सच्या समुद्रात सावरकरांनी जी ऎतिहासिक साहसीउडी मारली त्याला आता ९९ वर्षे पुर्ण झाली. पुढे ३० जानेवारी १९११ रोजी सावरकरांना दोन जन्मठेपेच्या काळ्यापाण्याची शिक्षा झाली. पुढचं वर्ष हे स्वातंत्र्यवीरांना झालेल्या शिक्षेचं शताब्दी वर्ष आहे. वीर सावरकरांचं संपुर्ण आयुष्यच ओजस्वी घटनांनी ओतप्रोत भरलेलं आहे. अनेक प्रसंग, जे आठवले की अंगावर रोमांच उभं रहातं. काय होईल याची पुर्ण जाणीव असतानाही जिवाची बाजी लावून मातृभुमीसाठी आयुष्याचा यज्ञ या क्रांतीसुर्याने पेटवला. त्या यज्ञातील काही समीधारुपी प्रसंग आपण जाणून घेऊया या शताब्दी वर्षाच्या निमीत्ताने क्रांतीसुर्य सावरकर या मालेत.

(क्रमशः)

नरेन्द्र प्रभू

08 July, 2009

गढवाली पाहुणचार

गोमुखची खडतर पायपीट संपवून गंगोत्री गाठली तेव्हा म्हटलं चला खरोखरच गंगेत घोडं न्हालं. तशी वाटेत गोमुखला जाताना अनेक खेचरं अक्षरशः गंगेत न्हात होती. तर वर बसलेले खेचरस्वार प्राण मुठीत घेऊन एक एक पल्ला पार करत होते. पायी चालणारे एकमेकाना ' जय भोले - जय भोले ' म्हणून उत्साह वाढवत होते पण हे खेचरस्वार काहीच बोलत नव्हते, समोर काही अडचण आली तर ती खेचरं मागे परतून पळ काढायला बघत. त्यात पुन्हा आपण काही बोललो आणि त्या खेचरांचा गैरसमज झाला तर, नको ते बोलणं नको, म्हणून खेचरस्वार गप्प.

तर बिकट वाटेने जाऊन आल्यावर पायात त्राण नव्हतच, परंतू गोमुखची यात्रा झाली म्हणून मन समाधानी होतं. कडाक्याची थंडी असल्याने दुपारीही आंघोळ करवेना. ( गंगेच्या बर्फा सारख्या थंड पाण्यात डुबकी मारणार्‍याना आंघोळ न करताच मी प्रणाम करत होतो.) तरी पण गरम पाणी घेऊन आंघोळ आटोपली आणि माझ्या मित्राच्या मित्राला भेटायला त्याच्या दुकानात गेलो. हा गढवाली पंड्या शास्त्र आणि हिशोब, अध्यात्म आणि व्यापार सारख्याच हुशारीने सांभाळत होता. वर जे काही घडतय ते ' गंगामय्या कि कृपा से ' म्हणून सांगत होता. उद्या आम्ही परत जाणार म्हणताच ' अब आजका खाना हमारे साथ खाना होगा ' असा त्याचा आग्रह झाला. गेले चार दिवस तसं आम्हाला व्यवस्थित जेवण जेवता आलं नव्हतं. चला हे घरचं जेऊन बघू म्हणून आम्ही लगेच होकार दिला.

गंगोत्री परिसर पालथा घालून आम्ही पुन्हा त्याच्या दुकानात हजर झालो. जेवण तयार असावं. यजमानाने " नेगी s..s...s " म्हणून जोरात हाक मारली तसा १८ - १९ वर्षाचा एक तरुण आला. जेवणासाठी आम्हाला तो नेणार एवढ्यात लाईट गेली. नेगीने लायटर एवढी बँटरी पेटवली आणि आम्ही त्याच्या मागून चालू लागलो. एका बोळवजा जागेतून दुकानाच्या मागे गेलो. खाली तुफान वेगाने रोरावत जाणारा गंगेचा प्रवाह आणि वर जायला एक कच्ची शिडी. खाली पडलो तर वरच जाणार आणि वर चढलो तर खाली जाणार अशी स्थिती. तो नेगी काजव्यासारखा प्रकाश देणार्‍या बँटरीच्या उजेडात आम्हाला त्या शिडीवर चढण्याचं आवाहन करत होता. गोमुखला जाऊन आलेले आमचे पाय आम्हाला साथ देत नव्हते, दिवसा उजेडी सरळ रस्त्यावर टाकू तिथे पडतीलच अशी शाश्वती नव्हती, मग इथे या काळोखात शिडीवर पायानी दगा दिला तर ? पण नेगीची ती सरावाची वाट. आम्ही का कु करतोय म्हटल्या बरोबर तो म्हणाला थांबा माझ्या पाठीवर बसा, ' डरनेकी कोई बात नही ' असं म्हणत त्याने मला अर्धा उचललाच महत्प्रयासाने त्याला रोखला. आता भीक नको कुत्रं आवर अशी अवस्था झाली. आम्ही सकाळी ' जय भोले - जय भोले ' म्हणत होतो आणि आता सोमरस न घेताच आमचे पाय तळ्यावर नव्हते. नेगी हट्टाला पेटलेला. मग त्याने वर सुरेश s..s...s म्हणून हाक मारली, एक मुलगा मेणबत्ती घेऊन आला. त्या प्रकाशात शिडी तरी दिसत होती. सकाळी जय भोले म्हणत रस्ता पार केला आता 'जिवाचं नाव शिवा' ठेवत शिडी चढलो. थेट छप्परावर आलो. तिथे एक झोपडीवजा आडोसा केलेला , त्यात गँसवर आमच्यासाठी खाना तयार होत होता.

सुरेश मनोभावे जेवण बनवत होता आणि आम्ही ते पहात कुडकुडत होतो. गंगोत्रीच्या दरीतून येणारा गार वारा थेट भिडत होता. नेगीने आमच्या अंगावर रजई टाकली. ( रजई कसली गादीच होती ती. ) दहा मिनीटात पातळ भाजी आणि गरम गरम रोट्या, लोणचं ताटात आलं. अप्रतीम चव. पंचपक्वांनांहून गोड. पोरच्या हाताला चव होती आणि आम्ही त्याच्या हातचं आवडीने खातोय म्हणून नजरेत समाधान. हा पाहुणचार कायमचा लक्षात रहाण्यासारखा.


लेखकः नरेन्द्र प्रभू


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates