14 February, 2009

लडाख – अनुभूति अध्यात्माची आणि निसर्गाची (भाग ७)

एव्हाना संपुर्ण ग्रुप एकत्र आला होता. मैत्री तर कधीच झाली होती. आज आम्ही डिस्कीट या छोट्याशा गावातच रहायला होतो. रात्री कँम्प फायर झालं, आज सगळ्यानाच कंठ फुटले होते. दोन वाजून गेल्यावर आम्ही झोपेच्या 

स्वाधीन झालो. सकाळी जाग आली तर बाहेर पाऊस पडत होता. डिस्कीट गुंफेला भेट देऊन परतीच्या प्रवासास सुरवात केली. आज खारडुंगलाचं रुप पालटलं होतं. बर्फवृष्टी होत होती. आता मात्र आम्हाला रहावलं नाही. कसल्याही संभाव्य त्रासाची 

पर्वा न करता आम्ही तासभर बर्फवृष्टीचा आनंद घेतला. खुप मजा केली. लेह जवळ आलं तसं वातावरण बदललं स्वछ उन्हाने लेह न्हाऊन निघालं होतं.

लडाखचे धार्मिक उत्सव हा नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. अशा उत्सवासाठी लडाखी आणि पर्यटक खुप दुरवरून येतात. आम्ही गेलो तेव्हा फँग गुंफेत महोत्सव सुरू होता. अनेकविध पुरातन वस्तूंची दुकाने थाटलेल्या त्या जागी गेलो आणि हरवून गेलो. विविध लडाखी खॆळ, नाट्य, नृत्यप्रकार बघण्यासाठी आम्ही हजारोंच्या गर्दीत मिसळून गेलो. त्याच उत्सवातून बाहेर पडून जेव्हा शांतीस्तुपाला भेट दिली तेव्हा संध्याकाळच्या शांत वेळी, एवढ्या उंचीवर बुध्द खरंच भेटल्याचा भास झाला.

(अपुर्ण....)                                    जायचय  लडाखला चला.....


लेखकः नरेंद्र  प्रभू



10 February, 2009

इच्छा, शक्ती आणि इच्छाशक्ती

एखादी गोष्ट करायची झाली तर प्रथम ती करायची इच्छा पाहीजे. पण अनेकांच्या कितीतरी इच्छा अपुर्ण रहातात त्या शक्ती नसल्याने. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तरच कोणतही काम होतं, असं असलं तरी केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर पराक्रम करणारेही आहेत. नाही का ?

आता प्रवासाचच घ्या ना. कुणाला विदेशवारीचं आकर्षण असतं तर कुणाला उंचच उंच शिखरं खुणावत असतात. इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य ते शक्य होतं म्हणूनच एव्हरेस्ट सर करू शकला माणूस, तो सुध्दा एकदा नव्हे अनेकदा. हिमालय पादाक्रांत करायचा म्हटलं तर कित्तेकदा शारिरीक ताकदी पेक्षा मानसिक कणखरपणाच कामी येतो महाराजा. माझी ताकद संपली म्हटलं तर संपली, चालणार असा निर्धार केला तर पोहोचतोच माणूस मुक्कामाला. हे झालं प्रवासाला निघाल्यावरचं पण त्या आधीच इच्छा, शक्ती आणि इच्छाशक्ती या तीन गटांतली माणसं काय करतात बघा.

शक्ती आहे पण इच्छाच नाही त्याना आपण सोडून देऊ, परंतू इच्छा आहे आणि शक्तीही आहे त्याचं काय ? त्याना तर जाणं सहज शक्य असतं तरी काहीजण नाही जात. का ? जायचं तर आहे पण पैसे असले तरी खर्च करवत नाहीत, इथे स्वार्थ किंवा कंजूसपणा आड येतो. मग कारणं सुरू होतात, जाऊ पुढच्या वेळी किंवा अचानक तब्येत बिघडली तर ? पाऊस पडला तर ? भुस्खलन झालं तर ? दरडी कोसळल्या तर ?

एकदा हिमालयात जायच्या गप्पा सुरू होत्या, तर एक महाशय मला म्हणाले तिकडे शिजलेलं अन्न नाही मिळलं तर, सगळच मुसळ केरात. मी म्हणालो " अहो अन्न प्रेशर कुकर मध्ये शिजऊ आणि तिथे लोकं रहातातच की ", पण महाशय मानायला तयार नाही. दुसरे एक असेच पुढच्यावेळी आम्हाला सांगा आम्ही नक्की येणार असं म्हणाले होते म्हणून म्हटलं चला मी जातोय तर नाही पुढच्यावेळी बघू आता बायकोची तब्येत जरा बिघडलीय, आता बोला अशांसाठी हिमालय अधिकच उंच नाही का होणार ?

तिसरा गट मात्र खमका आहे. शारिरीक, आर्थीक ताकदीवर मात करून जायचं म्हणजे जायचच. जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर ही मंडळी गगनाला गवसणी घालतात तेव्हा त्यांच्या इच्छाशक्तीला सलाम करावाच लागतो. एक पाय नसलेली किंवा सत्तरी ओलांडलेली माणसं जेव्हा लडाख सारख्या दुर्गम भागात यशस्वी भ्रमंती करून येतात तेव्हा त्यांच्या निश्चयाला दाद द्यावीशी वाटते. ' पंगुर्लंघते गिरी ' यालाच म्हणतात ना ? शारिरीक अपंगत्व किंवा वाढतं वय याला उपाय नाही पण मानसीक अपंगत्वाचे धनी कोण ? जरा विचार केला पाहीजे नाही का ? करूया

लेखकः नरेंद्र  प्रभू



04 February, 2009

लडाख – अनुभूति अध्यात्माची आणि निसर्गाची (भाग ६)



आज आम्ही नुब्रा व्हॉलीकडे प्रयाण करत होतो. पण त्याआधी आणखी एक मुख्य आकर्षण होतं ते खारदुंगला पासचं - जगातील सर्वात उंच मोटारवाहतुकीचा रस्ता तेथूनच जातो. १६३६० फूट उंचीवर आम्ही पोहोचलो स्वर्ग दोन बोटच उर्ला होता. भारताचा तिरंगा फडकवतच आम्ही ग्रुप फोटो काढला . सैनिकांशी नेहमीप्रमाणे हितगुज करुन आम्ही डिस्कीटच्या दिशेने निघालो. इथे निसर्गाचं आणखी 

एक वेगळं रुप पहायला मिळालं ते हुंडर येथे. लडाखचं 

वाळवंट येथे आहे. उंटावरुन स्वारी, वाळूच्या टेकद्या , तर्‍हेतर्‍हेचे आकार आणि आकाशात ढगांची गर्दी. चारही बाजूला निसर्गाचच वर्चस्व. माणूस इथे शून्य आहे असं वाटत आसतानाच तिथलं आकाशवाणी केंद्र बघून धक्काच बसला. दोन बैठ्या इमारती, त्यातूनच कारभार चाललेला. छप्परही नसलेला जगातला सर्वात उंच पेट्रोलपंप सगळच आश्चर्यकारक. एका पूलाजवळ आम्ही पोहोचलो, तिथून पुढे जायला पर्यटकांना बंदी होती. त्यापुढे एक गाव व नंतर पाकव्याप्त काशिर. सैनिकांशी पुन्हा एकदा मनमोकळ्या गप्पा. वातावरण भारावलेलं.

(अपुर्ण....)                                    जायचय  लडाखला चला.....


लेखकः नरेंद्र  प्रभू


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates