एखादी गोष्ट करायची झाली तर प्रथम ती करायची इच्छा पाहीजे. पण अनेकांच्या कितीतरी इच्छा अपुर्ण रहातात त्या शक्ती नसल्याने. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तरच कोणतही काम होतं, असं असलं तरी केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर पराक्रम करणारेही आहेत. नाही का ?
आता प्रवासाचच घ्या ना. कुणाला विदेशवारीचं आकर्षण असतं तर कुणाला उंचच उंच शिखरं खुणावत असतात. इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य ते शक्य होतं म्हणूनच एव्हरेस्ट सर करू शकला माणूस, तो सुध्दा एकदा नव्हे अनेकदा. हिमालय पादाक्रांत करायचा म्हटलं तर कित्तेकदा शारिरीक ताकदी पेक्षा मानसिक कणखरपणाच कामी येतो महाराजा. माझी ताकद संपली म्हटलं तर संपली, चालणार असा निर्धार केला तर पोहोचतोच माणूस मुक्कामाला. हे झालं प्रवासाला निघाल्यावरचं पण त्या आधीच इच्छा, शक्ती आणि इच्छाशक्ती या तीन गटांतली माणसं काय करतात बघा.
शक्ती आहे पण इच्छाच नाही त्याना आपण सोडून देऊ, परंतू इच्छा आहे आणि शक्तीही आहे त्याचं काय ? त्याना तर जाणं सहज शक्य असतं तरी काहीजण नाही जात. का ? जायचं तर आहे पण पैसे असले तरी खर्च करवत नाहीत, इथे स्वार्थ किंवा कंजूसपणा आड येतो. मग कारणं सुरू होतात, जाऊ पुढच्या वेळी किंवा अचानक तब्येत बिघडली तर ? पाऊस पडला तर ? भुस्खलन झालं तर ? दरडी कोसळल्या तर ?
एकदा हिमालयात जायच्या गप्पा सुरू होत्या, तर एक महाशय मला म्हणाले तिकडे शिजलेलं अन्न नाही मिळलं तर, सगळच मुसळ केरात. मी म्हणालो " अहो अन्न प्रेशर कुकर मध्ये शिजऊ आणि तिथे लोकं रहातातच की ", पण महाशय मानायला तयार नाही. दुसरे एक असेच पुढच्यावेळी आम्हाला सांगा आम्ही नक्की येणार असं म्हणाले होते म्हणून म्हटलं चला मी जातोय तर नाही पुढच्यावेळी बघू आता बायकोची तब्येत जरा बिघडलीय, आता बोला अशांसाठी हिमालय अधिकच उंच नाही का होणार ?
तिसरा गट मात्र खमका आहे. शारिरीक, आर्थीक ताकदीवर मात करून जायचं म्हणजे जायचच. जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर ही मंडळी गगनाला गवसणी घालतात तेव्हा त्यांच्या इच्छाशक्तीला सलाम करावाच लागतो. एक पाय नसलेली किंवा सत्तरी ओलांडलेली माणसं जेव्हा लडाख सारख्या दुर्गम भागात यशस्वी भ्रमंती करून येतात तेव्हा त्यांच्या निश्चयाला दाद द्यावीशी वाटते. ' पंगुर्लंघते गिरी ' यालाच म्हणतात ना ? शारिरीक अपंगत्व किंवा वाढतं वय याला उपाय नाही पण मानसीक अपंगत्वाचे धनी कोण ? जरा विचार केला पाहीजे नाही का ? करूया ?
लेखकः नरेंद्र प्रभू
Prabhu lekh chan aahe, mojkya shabdat 'nehami pramanech'barech sangitlet :)Awadle...
ReplyDelete