औरंगाबाद शहर पुर्वीच्या मुघल साम्राजाचा एक भाग, औरंगजेब बादशाहा होण्याआधी जेव्हा या प्रांताचा सुभेदार होता तेव्हाच त्याने खडकी हे या शहराचं नाव बदलून ' औरंगाबाद ' ठेवलं. तर अशा या औरंगाबाद मधून निघालं आणि पुढे दिल्ली दरवाजा मधून बाहेर पडलं की १०२ कि. मी. अंतरावर अजिंठा लेणी आहेत.
औरंगाबादहून निघाल्यावर वाटेत दोन्ही बाजूला दूरवर पसरलेली ऊस, कापूस, गहू, ज्वारी, बाजरीची शेतं सतत दिसत राहिली. या वर्षी पाऊस उशीरापर्यंत पडत राहील्याने कणसं अजून हुरड्याला आली नव्ह्ती. नवीन रस्ता गावाच्या बाहेरून काढल्याने वाटेत वस्ती अशी नव्हती. स्वतःचं वाहन असेल तर दोन तासात आपण लेण्यांच्या परिसरात पोहोचू शकतो. वाटेत खाण्यापिण्याची सोय असली तरी शहरी माणसाला थोडं अवघडल्या सारखं होईल. पदार्थ चविला चांगले असले तरी स्वछता यथातथाच असते. संपुर्ण जगामधून लोक इकडे येत असतात परंतू त्याकडे अजून आपलं लक्षच नाही. स्थानिक लोक गाईडचं काम करतात एवढाच कायतो त्यांचा सहभाग, बाकी आपण या ठिकाणी खाण्याचे पदार्थ घेण्याची हिम्मत दाखवू शकत नाही. परंतू पुढे किमान चार तास आपण लेणी पहाणार असतो म्हणून पोटपुजा केलेली बरी. म्हणजे सौदर्याचा आस्वाद घेताना अस्वथता जाणवणार नाही. आपण जर औरंगाबादहून निघाणार असाल तर न्याहरी, फळं बरोबरच घेवून निघालेलं बरं. परतीच्या प्रवासात मी ड्रायव्हरचा सल्ला मानून एका धाब्यावर जेवलो चव चांगली तरी पहिले पाढे पंचावन्न, असो.
अजिंठा लेण्यांजवळ पोहोचलो तिकडे आपण नेलेलं वाहन ठेवण्यासाठी वाहनतळ आहे. पुढे अशा ठिकाणी असतात तशी दुकानं आहेत आणि अजिंठा लेण्यांविषयी महिती असलेली पुस्तिका विकणारे विक्रेते. पुस्तक विकत घेईपर्यंत मागे लागत रहातात. ६० रु. छापील किंमतीची पुस्तिका ३० रु. द्यायला तयार होतात. मी असच एक पुस्तक घेतलं. पुढे लेणी पाहताना त्याचा उपयोग झाला. एवढं सगळं झालं, पुढे जाण्यासाठी एस्.टी.च्या २x२ आसन व्यवस्था असलेल्या असलेल्या बस जवळ आलो. ( अजिंठा लेण्यांजवळ जाण्यासाठी या बसचा वापर करावा लागतो ) ५ ते ६ मिनीटात उतरायचं झालं. आंध्रप्रदेशमध्ये रामोजी फील्मसिटीत जाताना असचं बसने जाव लागतं त्याची आठवण झाली. नकळत मनातल्यामनात एक तुलना सुरू झाली. ६ \ ७ व्या शतकातल्या प्रगत हिंदुस्थानच्या वेळची कलाकारी बघण्यासाठी आज जात होतो. रामोजी फील्मसिटीत आपण जे बघतो ती २१ व्या शतकातली प्रगती एवढ्या शतकांनंतर आपण एवढेच पुढे गेलो ?
लेणी पहाण्यासाठी ५ रु. प्रती व्यक्ती तिकीट आहे ते काढून पुढे गेलो. घोड्याच्या आकाराची प्रचंड व्ह्याली तीला लागून असलेला पुर्ण डोंगर खडकाचाच त्या खडकात हि लेणी कोरली आहेत. एकूण २९ लेण्यांमधील १,२,१६,१७,२४ ही लेणी पहावीच, बाकी काही अर्धवट तर काही कमी महत्वाची त्यात ९,१०,१९,२६,२९ चैत्य (पुजास्थळं) व इतर विहार (आश्रम) आहेत. बुध्दाच्या जीवनातील विविध प्रसंग आणि बौध्द देव-देवता यांचं व्यापक चित्रण लेण्यातून तसेच चित्रांमधून दाखवलेलं आहे. जवळ- जवळ ७०० वर्षे वापरात असलेली लेणी नंतर अचानक वापरली गेली नाहीत, पुढे हजार वर्षाहून जास्तकाळ अज्ञात असलेला हा परिसर १८१९ साली शिकारीसाठी निघालेल्या जॉन स्मिथ या ब्रिटीश लष्करी अधिकार्याच्या अचानक दृष्टीस पडला आणि पुन्हा उजेडात आला. ४०० वषे खपून आकारास आलेल्या लेण्यांचा हा थोडक्यात इतिहास. थायलंड, मलेशिया, जपान इथून आलेल्या बौध्द पर्यटकां बरोबरच लामा आणि बौध्द भिक्कूही नजरेस पडले.
अमग्डॅलॉईड प्रकारच्या खडकात ५६ मी. उचीवर असून एकंदरीत ५५० मीटर पर्यंत नालाच्या आकारात हिलेणी पसरलेली आहेत. इतका संमृध्द पुरातन वारसा निट जपला गेला आहे असं पाहून वाटत नाही.
महत्वाच्या लेण्यात नेमलेले कर्मचारी पर्यटकांना जुजबी माहिती देवून पैसे उकळण्यातच धन्यता मानतात. लेणी खराब होउनयेत, चित्रांच्या रंगावर परीणाम होउनये म्हणून कॅमेर्याचे फ्लाश वापरू नयेत असे ते सांगतात पण आग्रही रहात नाहीत. महाराष्ट्राला गड-कील्ल्या बरोबरच या लेण्यांचा सुंदर वारसा लाभलाय पण हा जतन कोण करणार ?
लेखकः नरेंद्र प्रभू
No comments:
Post a Comment