28 September, 2009

कासचं पठार




सातारा जिल्ह्यात पाचगणी-महाबळेश्वरला आपण जातोच पण ऑगष्ट ते ऑक्टोबर मध्ये गेलात तर सातार्‍यापासून जवळच असलेल्या कासच्या पठारावर अवश्य जा. "व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' पाहण्यासाठी आपण दूर हिमालयात जातो. तोच आनंद मिळवायचा असेल तर कासला भेट द्यायला पाहीजे. रान फुलांचा गालीचा, दर चार-आठ दिवसागणीक बदलणारा. कधी पिवळीजर्द चादर, तर कधी गुलाबी तिरड्यांची आरास. १५-२० दिवसांचं आयुष्य असणार्‍या असंख्य वनस्पती तिथे फुलत असतात, कोमेजत असतात तेव्हाच त्यांची जागा घ्यायला दुसरी फुलं तयार असतात. नजर जाईल तिथे इवली-इवली सानूली फुलं वार्‍याच्या झोक़्यावर झुलत असतात. दर दोन-तीन दिवसानी रुपं बदलणारी ही फॅशन परेड पाहून थक्क व्हायला होतं. मन हरकून जातं. भान हरपून जातं. गेल्यावर्षी मात्र मला बघायला मिळाली ती निळाई. सात वर्षानी फुलून येणारी कारवी ऎन बहरात होती तेव्हाच आम्ही तिथे पोहोचलो. आता ती फुलं पहायला अजून सहा वर्ष थांबावं लागणार, तरी काही बिघडत नाही. आपल्या स्वागताला इतर फुलं हसत हसत डुलत आहेतच. कासच्या पठाराबरोबरच कास तलाव, तापोळे, बामणोली, वासोटा, ठोसेघर ही रमणीय ठीकाणं आणि सज्जनगड, प्रतापगड यांसारखे ऐतिहासिक किल्ले या परिसरात आहेत त्याना अवश्य भेट द्यावी.

नरेन्द्र प्रभू

27 September, 2009

जीवनाचा कंटाळा आलाय


‘जीवनाचा कंटाळा आलाय’, ‘मला जगावसच वाटत नाही’ हे बोल कुणा दुर्धर आजार झालेल्या, मनोभंग झालेल्या किंवा परिक्षेत नापास झालेल्या व्यक्तीचे नसून माझ्याच मुलीच्या एका मैत्रिणीचे आहेत. क्षमा असं सांगत होती, म्हणून मला जेव्हा माझ्या मुलीने सांगितलं तेव्हा मी सुन्न झालो. सहावीत शिकणारी ही कोवळी पोर, हे तिचं खेळण्या-बागडण्याचं वय. नुकतीच उमलू लागलेली ही कळी हिच्या मनात असे आत्मघातकी विचार का यावेत ? चांगल्या सुशिक्षीत, सधन कुटूंबात, सुरक्षित वातावरणात वाढत असताना ‘मला हे आयुष्य नको आहे, मला नाही जगायच’ असं का म्हणतेय ?

या प्रश्नाचं उत्तर दडलय़ ते अभ्यासात. अतिशय हुशार असलेली क्षमा चौथीला स्कॉलरशीप मिळवलेली. हिन्दी सुबोध, होमी भाभा बाल वैज्ञानीक परीक्षा, पुढच्या वर्षीचा सातवीच्या स्कॉलरशीपचा अभ्यास, एवढी ओझी संभाळत चांगला अभ्यास करतेय. पण तिच्या आईने कमाल केली ती तिला सहावीची सगळी पुस्तकं तोंडपाठ करायच फर्मान काढून. हो ‘तोंडपाठ’, अगदी भुगोलाचे रुक्ष धडेही तोडपाठ हवेत म्हणून बिचारी क्षमा शाळेत मोकळ्या वेळातही ते पाठ करत बसलेली असते. हे असे पालक असतील तर कुणाला जगावसं वाटेल ? काय करावं त्या मुलांनी ? स्पर्धेला तोंड द्यायचं म्हणून त्या मुलांची मनं मारून, त्यांची अभ्यासातली गोडीच नष्ट करून हे पालक काय साध्य करणार आहेत ? अस करून ही मुलं पुढे जीवनात यशस्वी होतील का ? ते जाऊदे, पालकांचं नियंत्रण संपल्यावर कोणत्या थराला जातील ? आणि समजा तिने खरच जिवाचं काही बरं-वाईट केलं तर ?

अभ्यासात गोडी निर्माण झाली पाहीजे. जगण्याची उर्मी, आनंद वढवण्यासाठी अभ्यास असतो हे कघी कळणार आपल्याला ? परीक्षा म्हणजे सर्वस्व नव्हे.

नरेन्द्र प्रभू


तेच ते अन् तेच ते


तेच मुखवटे, तीच तोंडे

स्वतःला समजतात अकलेचे कांदे

पोर, पुतण्या, लेक, नातवंडे

सामान्य कार्यकर्त्याचे झालेत वांदे


तीच आश्वासने, तीच भाषणे

वर्तमानपत्रातूनही जुनीच पुराणे

चोर, खुनी, बदमाशांचे घराणे

उमेदवार बनून गाती गाणे


तोच मतदार, तसाच लाचार

एकपण नाही चांगला उमेदवार

मत दिलं तरी काय होणार ?

तेच बाजारबुणगे राज्य करणार

नरेन्द्र प्रभू

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates