11 April, 2015

पुन्हा एकदा त्या वाटेवर


गोव्याच्या सांकृतीक जीवनात देवळांचं महत्व अनन्यसाधारण आहे. अनेक उत्सव पारंपारीक प्रथानुसार अगदी उत्साहात साजरे केले जातात. असाच एक उत्सव कवळ्याच्या शांतादुर्गा मंदीरात सुरू आहे. ‘भागवत सप्ताहा’च्या निमित्ताने गेले सहा दिवस चालू असणार्‍या या उत्सवाची उद्या सांगता होणार आहे. अगदी पहाटेपासून सुरू होणारी पुजा-आर्चा, नंतर भागवत कथेचं संहितावाचन, मग आरती, प्रसाद सायंकाळी चार वाजता निरुपण, आरती, लालखी, पालखी असा अगदी रात्रोपर्यंत चालणारा भरगच्च कार्यक्रम मंदीरात चालू असतो. गोव्यातले, गोव्याबाहेर गेलेले महाजन, आजूबाजूच्या गावातली जनता आणि पाहूणे-रावळे दिवसभरात दर्शनासाठी येत रहातात.

सौ. व श्री. पांडुरंग नाडकर्णी (देवस्थानचे अध्यक्ष) ज्यांच्या
निमंत्रणामुळे आम्ही या संधीचा लाभ घेवू शकलो.
   
अमाप उत्साह आणि तेवढीच शिस्त हे या सोहळ्याचं आणखी एक वैशिषट्य. सात दिवस रोज पाच तास चालणारं ह. भ. प. मकरंदबुवा रामदासी यांचं निरुपण ऎकायला जमणारी गर्दी ही श्रोतृवर्ग कसा असावा याचं उत्तम उदाहरण आहे. श्रवणाची कला हरवत चाललेल्या आताच्या काळात ही गर्दी नन्हे तर दर्दी माणसांची भक्तीरसात न्हावून निघालेली मैफील पाहून धन्य वाटतं.

शांतादुर्गा देवस्थानचा निर्मळ परीसर, मंगलमयी वातावरण, फुलांच्या सुगंधाचा घमघमाट आणि घंटेचा निनाद, टाळ-मृदुंगाची धुन, सनईचा मंजूळ स्वर, धुपाचा दरवळ या सगळ्या वातावरणात घटकाभर म्हणून आलेल्याला खिळवून ठेवण्याची ताकद आहे.


गोव्याचा हा सांकृतीक वारसा जपणारी ही मंदीरं, तिथले लोक आणि कलाकार यांचा नित्यनेमाने चाललेला कुळाचार पाह्ण्याची, अनुभवण्याची संधी जेव्हा केवा मिळेल तेव्हा अवश्य घ्यावी मरगळलेल्या मनाला तजेला आणि आठवणीमधून धुसर होत जाणारा सांकृतीक पट पुन्हा एकदा उलगडवून दाखवण्याची ताकद त्यात नक्कीच आहे.



पुन्हा एकदा त्या वाटेवर
दरवळला की सोनचाफा
बहर मोगर्‍याला आला अन
सडा पसरला प्रजक्ताचा

पुन्हा एकदा त्या वाटेवर
भक्तीसरचा पाझर फुटला
धुप, दिप, नैवेद्य असाहा
तुम्हास देता कितीक उरला

पुन्हा एकदा त्या वाटेवर
शांतादुर्गा पालखीतुनी
देते आशिश सकल जनांना
दिसे साजीरी लालखीतुनी  


05 April, 2015

मित्रांगण – एक वेगळा अनुभव


समाज माध्यमांचा सुळसुळाटात आणि एकावर एक धडकणार्‍यां लाटांत काय निवडावे हे कळेनासं होतं. नेट बंद ठेवल्याशिवाय विचारकरणंही कठीण होवून बसतं. कधी-कधी हे सगळं नकोसं होतं, पण कधीतरी काही हवं हवंसं गवसतं आणि आपण पुन्हा अकदा त्या जाळ्यामध्ये स्वत:ला गुतवून घेतो. ‘मित्रांगण’ने मला असाच सुखद धक्का दिला तो फेसबुकमुळे. या फेसबुकच्या माध्यमातून मित्रांगणचे संपादक श्री. वैभव कुलकर्णी यांची ओळख झाली आणि त्याचं फलित म्हणून मित्रांगणचा देखणा अंक हाती पडला. प्रथमदर्शनी हा देखणा अंक पहून बरं वाटलं, पण असे कित्तेक देखणे अंक वाचल्यावर आवडतातच असं नाही. कागद, छपाई, छायाचित्रं आणि प्रसिद्धी एवढ्या भांडलावर अंक वाचनिय होत नसतो तर त्यातील लिखाण, आशय, विचार यांनीच तो समृद्ध होत असतो. या सर्वांच्या जोडीला जर निटनेटकेपणा आणि देखणेपण असलं तर ‘सोनेपे सुहागा’ (दुघात साखर म्हणत नाही, कारण हल्ली साखर सगळ्यानाच चालत नाही आणि तिचे दुष्परीणाम ‘खायला मरता की मरायला खाता?’ या मित्रांगण मधल्या लेखानेच ठळकपणे समोर आणले आहेत.)

तर, अगदी संपादकियापासूनच चौकटी बाहेरचा वेगळा विचार वाचकांपर्यंत पोहोचवणारा हा अंक खरंच खुप आवडला. ‘खायला मरता की मरायला खाता?’ या लेखामधलं वास्तव समजल्यावर आपली जीभ आता आपल्या ताब्यात राहिलेली नसून ती ‘बहूराष्ट्रीय अंडरवर्ल्ड’ ची गुलाम बनली आहे हे समजलं सुक्ष्म जीवशास्त्राचा लेक्चरर आणि साउथ इंडियन हॉटेलवाला असलेल्या शिवा ऎथाल यानी हा लेख लिहिल्याने त्याला वेगळं महत्व आहे हे विसरून चालणार नाही. कोवळ्या वयात आयुष्य गहाण टाकणारा मुकुंद, ‘बॉर्डरलेस वर्ल्ड’ चे अधिक यांचं गेल्या सतरा वर्षातलं काश्मीर मधलं मानवतेने ओतप्रोत भरलेलं काम, गाळाने भरलेली सुप्त धरणे, नववर्षाचं स्वागत, अजंठ्यातील विज्ञान असे अनेक लेख, हे सगळंच मुळातून वाचण्यासारखं आहे.

असा हा विविध विषयावर वेगळे विचार मांडणारा अंक आवडला. मात्र अर्थ किंवा गुंतवणूक विषयक एखादा लेख सदर अंकात असला तर मराठी माणसाचं तिकडेही लक्ष जाईल.     

मित्रहो, असं लेखन वाचलंच पाहिजे, तुम्ही वाचलं तर ते वाचेल. मी हा अंक वाचला, संपादक वैभव कुलकर्णी म्हणतात तशा वाचलेल्या वेळातून. वेळ काढाल तर वेळ वाचेल. संपादक वैभव कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्‍यांचं अभिनंदन. 

नरेंद्र प्रभू
विलेपार्ले, मुंबई



16 March, 2015

विविध भारती FM वर


जुनी गाणी ऎकणं आणि पांचट बडबड यापासून वाचायचं असेल तर विविध भारतीला पर्याय नाही. पण आजपर्यंत मध्यम लहरीवरच ऎकू येणारं हे केंद्र आता FM च्या 102.8 लहरींवर ऎकता येणार आहे.

कोलकातामध्ये आधीपासूनच असलेली ही सोय आता मुंबईबरोबरच दिल्लीकरांनाही उपलब्ध झाली असून, जुन्या गाण्यांचा सर्वात मोठा खजिना असलेलं हे केंद्र रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.     

    FM वर सुस्पष्टपणे ऎकता येण्याबरोबरच मोबाईल फोन आणि कारडेकवर हे केंद्र आता ऎकायला मिळणार असल्याने जुना रेडिओ नसेल तर होणारी गैरसोय होणार नाही. 

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates