17 January, 2016

कॅलेंडर

































वेळेचं सतत भान असूद्यावं म्हणून हे कॅलेंडर उरलं वर्षभर समोर ठेवीन
तसा केवळ जात असलेला एक क्षणच आपला असतो

असं असलं तरी गेलेले कित्येक सोनेरीक्षण या कॅलेंडरमुळे आठवत राहीन
ते तसे होते म्हणून आपण भुतकाळ जगत असतो

हे कॅलेंडर म्हणतं येणारा दिवस जाऊ शकतो उज्वल भविष्याकडे घेऊन
आशेच्या किरणातच उद्याचा प्रवास सुरू होत असतो  


नरेंद्र प्रभू    
१७/०१/२०१६

02 January, 2016

उघडून दे रे मनाची कवाडे




उघडून दे रे मनाची कवाडे
तमाची मिरास आता पुरे
तुझे चंद्र तारे, तुझे सुर्य सारे
व्यापून उरूदे ते कोपरे

नवे स्वप्न माझ्या उराशी धरोनी
प्रकाशात पाऊल मी टाकिले
अनंता तुझे रुप पाहून माझ्या
उरातील स्वप्नास सांभाळीले

नको रे दुरावा कुणाशी कुणाचा
कुणाचा कसा हात हाती पडे
कुणी मांडली का मानची ही राशी
समजाऊनी सांग, हे साकडे

मनाची मनाला असूदे उभारी
निराशेवरी करी मात रे
करी लख्ख तू पुसूनी मनाला  
काळौघाची काजळी न आता उरे

०१/०१/२०१६
नरेंद्र प्रभू

01 January, 2016

तुझ्या दर्शना व्याकूळ रे !




कवीवर्य मंगेश पाडगावकरांच्या काव्यातल्या उपमा आता पोरक्या झाल्या आहेत, त्याना वाहिलेली काव्यांजली.     


गंध फुलांचा घेऊन वारा
स्वर्गी तुझीया येईल रे
मयुर नाचरा फुलवी पिसारा  
तुझ्या दर्शना व्याकूळ रे

राधे संगे  शाम मुरारी
जागून सारे तुझ्याच दारी
फुलपाखरे भिरभिरणारी
तुझ्या दर्शना व्याकूळ रे

मंद मंद तार्‍यांची लुकलुक
तुझेच होते त्याना कौतूक
चंद्र, चांदणे तुला शोधीती
तुझ्या दर्शना व्याकूळ रे

पानोपानी तुझीच कुजबुज
झरे रुपेरी करीती लगबग   
दवबिंदूंची नक्षी आता
तुझ्या दर्शना व्याकूळ रे

अशी पाखरे येती, आणि
तुझे गीत ते गाती
झाडामागे चंद्र उभा हा     
तुझ्या दर्शना व्याकूळ रे

अंतर्यामी सूर विराला  
श्रावणात घन निळा विखूरला
प्रितपाखरे लाऊन डोळा   
तुझ्या दर्शना व्याकूळ रे

नरेंद्र प्रभू

०१/०१/२०१६ 

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates