11 January, 2009

जागे व्हा ! अजून हल्ला बाकी आहे !!!

मॅजेस्टीक गप्पांमध्ये 'युध्द दहशतवादाशी' या विषयावर नुकताच एक परिसंवाद झाला. या परिसंवादात सहभाग होता

  1. संदीप वासलेकर, स्ट्रॅटॅजिक फोरसाइट ग्रुपचे प्रमुख  ,आंतरराष्ट्रीय व्यवहाराचे अभ्यासक

  2. व्ही. एन. देशमुख, राज्य गुप्तचर विभागाचे माजी आयुक्त ,माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक  ( 1993 नंतर केंद्र आणि राज्य सरकारने व्ही. एन. देशमुख या कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकार्‍यावर मुंबई किनारपट्टी सुरक्षित कशी करता येईल याची पाहणी करण्याची व उपाययोजना सुचविण्याची कामगिरी सोपविली होती )

  3. भीष्मराज बाम, माजी पोलिस महानिरीक्षक,जेष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ

  4. संजीव लाटकर, ज्येष्ठ पत्रकार,साम मराठी वाहिनीचे प्रमुख (सुत्र संचालन)


या परिसंवादाचा गोषवारा पुढील प्रमाणेः

  • २६/११ ला झालेला दहशतवादी हल्ला हे एक ट्रेलर होतं, अजून मुख्य सिनेमा बाकी आहे. म्हणजेच याहून मोठा दहशतवादी हल्ला नजिकच्या काळात देशातील महत्वाच्या ठिकाणी होऊ शकतो.

  • मुंबईवरील हल्ला हा कोणा दहशतवादी गटाचा नसून पाकिस्तानी लष्कराचा (Military) होता.

  • हे पाकिस्तानने केलेले एक युध्दच होतं.

  • मुंबईवरील हल्ल्यात पोलिसाना पाकिस्तानी सैनिकांशी थेट लढाई लढावी लागली.

  • पाक गुप्तहेर संघटना (ISI), पाक सेना, वेगवेगळे दहशतवादी गट, पत्रकार, यांचा सहभाग होता.

  • ह्ल्याच्या वेळी पहिल्या दिवशीपासून पाकिस्तानी प्रचार यंत्रणा सुनियोजीत प्रचार करत होती.(चोराच्या उलट्या बोंबा.)

  • कराचीहून निघून कसलाही अडथळा न येता पाक सैनिक ताज आणि इतर ठिकाणी पोहोचले याला आपली ढिसाळ सुरक्षा यंत्रणा हे एक कारण.

  • आपल्या देशातील भ्रष्टाचार हे मुळ कारण.

  • लिट्टे आणि ISI ची हातमिळवणी, केरळ मधून हल्ला करण्याचे मनसूभे.

  • प्रत्येक गोष्ट दुसरा करणार ही वृती.

  • स्वतःचा बचाव आपण स्वतःच करण्याची वेळ आली आहे, आपल्या रक्षणासाठी सरकार आहे हा भ्रम.

  • न्युक्लिअर वेपनस् दहशतवादी गटांच्या हातात असण्याची शक्यता.

  • पाक अणु वैज्ञानिक अब्दुल कादिर खान हे तस्कर आहेत. त्यानी अणुसामूग्रीची तस्करी केली आहे.

  • पाक सरकार हे सैन्याच्या हातातलं बाहुलं

  • २००२ पासून फक्त जम्मु-काश्मिरच नव्हे तर सम्पूर्ण भारतभर हल्ले करण्याचं लक्ष नक्की केलं.

  • अमेरिका फक्त आपलं हित जपण्या एवढाच भारताला पाठींबा देत आहे.

  • स्वतःचा देश सुरक्षीत करून अमेरिकेने सम्पूर्ण जगात दहशतवाद पसरवला.

  • भारत-पाक गुन्हेगार हस्तांतरण व्दिपक्षीय करार होण्या बाबत अमेरिका आग्रही नाही.

  • अमेरिका किंबा युरोपीयन युनिअन कडे धाव घेऊन आपले प्रश्न सुटणार नाही.

  • पाकिस्तानी सरकार आणि लष्कराने मुंबईवर हल्ला केला असताना तो दहशतवादी संघटनेने केल्याचा कांगावा अमेरिका किंबा युरोपीयन युनिअन करीत आहे.

  • दहशतवादयांना जात धर्म नसतो.

  • पाक दहशतवादी गट पुर्ण व्यावसाईक, दहशतवादी गटाच्या म्होरक्याला Company Director सारखी वागणूक, त्यांच्या खर्चावर नियंत्रण नाही.

  • कायद्यातील पळवाटा बंद कराव्या लागतील.

  • ३ डिसेंबर २००८ ला तत्कालीन मुख्यमंत्र्यानी वर्तमान पत्रात जाहिरात देउन जाहिर केलेल्या उपाययोजनावर काडिचेही काम झालेले नाही.

  • मुंबईतल्या जमिनींवर लँडमाफीया , दहशतवाद्यांचं लक्ष आहे.

  • देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत, जल मार्गे तसेच जमिन मार्गे घुसखोरी सुरूच. पुर्वेकडील भागात तर बांगलादेशी घुसखोर पोहत येऊन भारतात प्रवेश करतात.

  • पाकिस्तान थेट युध्द करणार नाही.

  • BARC सारख्या ठिकाणी हल्ला होऊ शकतो.

  • किरणोत्सर्ग करणारा हल्ला होऊन पिढ्याच्या पिढ्या बरबाद होऊ शकतात.

  • राष्ट्रीय एकात्मता राखून भारतीय लोक १ प्रगती पासून १०० एवढी प्रगती करू शकतात हे पाक विचारवंतांचं मत, पण आपणाला १०० वरून १० पर्यंत खाली खेचण्याची पाकमध्ये ताकत असल्याची गुर्मी.

  • लोकांच्या दबावापुढे केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यानी राजिनामा दिला हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं. हा दबाव कायम ठेवला पाहीजे.

  • घटना घडून गेली म्हणून गाफील राहाता नये.

  • प्रत्यक्ष जीवनमरणाचा प्रश्न आ वासून उभा राहीला आहे.

  • सरकारी नोकरी ही पगारासाठी नसून त्या मूळॆ मिळणार्‍या फायद्यासाठी ( लाच, बक्षिसी) असते असा समज.

  • दहशतवाद्यांना भरतात योग्य शासन होत नाही. ( अफजल गुरूला अजून फाशी दिलेली नाही.)


उपायः

  • भ्रष्टाचार निर्मुलन.

  • राष्ट्रीय चारित्र्याची जपणूक.

  • भारतीय मुल्यांची जपणूक.

  • 'मला काय त्याचे' ही वृत्ती सोडावी लागेल.

  • राजकारण्यांवर अंकुश.

  • चांगल्या लोकांनी राजकारणात येंण जरूरीच.

  • पोलिसदल, सौरक्षणदलांतील राजकीय हस्तक्षेप बंद करणे.

  • घटना घडल्या नंतर तरी त्यातून बोध घेणे.

  • आजुबाजुला घडणार्‍या, खटकणार्‍या गोष्टींची माहिती पोलिसांना देणे.

वरिल परिसंवाद ऎकून सुन्न व्हायला झालं. काहिही होवो ९ वाजले की उठून जाणार्‍या काही पार्लेकरांसहीत सर्व जागेला खिळून होते. परिसंवादात भाग घेतलेले तज्ञ हे जबाबदारीने बोलत होते आणि तसा उल्लेख वारंवार करत होते. तेव्हा मित्र हो, अजुनही वेळ गेलेली नाही 'जागे व्हा' असं सांगत होते. पाक बरोबर युध्द झाल्यास काय परिणाम होतील या बद्दलचा श्री. संदीप वासलेकरांचा लेख http://www.loksatta.com/daily/20081228/sun04.htm या स्थळावर वाचता येईल.

तेव्हा मित्र हो, आपण जागे होणार का ? खरच जागे होउया. परिसंवादातील या गोष्टी आपणास ज्ञात व्हाव्यात, जाणीव निर्माण व्हावी म्हणून या बॉगची लिंक शक्य तेवढ्या लोकांना पाठवा. जागृतीचं काम सर्व मिळून करूया.

नरेंद्र  प्रभू 

07 January, 2009

नंदीग्राम एक्सप्रेस मधले नंदी

" नागपूर मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस २१.५५ को आनेकी संभावना है । " अशी सुचना ध्वनिक्षेपकावरुन देण्यात आली आणि म्हटलं झालं म्हणजे गाडी अर्धा तास उशिराने येतेय. कधी नव्हे ते एक तास आधी आम्ही औरंगाबाद स्टेशनला आलो होतो, त्यात आणखी अर्ध्यातासाची भर पडली, असो. गप्पा मारत वेळ जाईल म्हणून फलाटावर बसकण मारली.

थोड्या गप्पा झाल्या असतील नसतील, तेवढ्यात दिड-पावणेदोनशे विद्यार्थी फलाटावर येऊन दाखल झाले. वेगवेगळ्या बोगीसाठी पसरून उभे राहीले. म्हणजे त्यांच्या सरांनी आधीच ठरवल्या प्रमाणे ते सर्वजण आरक्षण नसताना सर्व आरक्षित डब्यांमध्ये विभागून चढणार होते. आमच्या बोगीच्या वाट्याचे आसपास उभे राहीले. ते मनमाडला उतरून पुढे कोलकात्याला जाणार होते. चला आज काही झोप नाही मी मनात विचार केला. राष्ट्रीय स्थरावरच्या तिरंदाजी आणि इतर स्पर्धांसाठी आलेल्या या स्पर्धकांची ( भावी पदक विजेत्यांची ) तिकीटं नेम धरून काढली नव्हती.

गाडी २२.१० ला आली नशिबाने माझ्या समोरच आमच्या बोगीचा दरवाजा आला, चपळाईने आत शिरलो आणि आरक्षित असलेल्या ४१,४२ व ४४ बर्थपाशी पोहोचलो. आधीच स्थानपन्न झालेल्या प्रवाशांना उठवलं, बसणार एवढ्यात मी खाली करवलेल्या बर्थवर आणखी एकजण येऊन बसला, नाही आडवा झाला पुढे अर्ध्या-पाऊण तास चाललेल्या नाटकाची ही नांदी होती. गाडीने वेग घेतला होताच, तशात आरक्षित तेवढेच अनारक्षित वेटींगवाले प्रवासी, वर उल्लेखलेल्या विद्यार्थ्यांचे प्रचंड सामान, इकडून तिकडे हालचाल करण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, त्यात एकाच बर्थवर हक्क सांगणारे दोन-दोन प्रवासी. मी माझं तिकीट दाखऊन त्या आडव्या मारूतीला उठवायचा प्रयत्न करत होतो. तो पक्का होता " अरे हमको ए टिटि ने नांदेडमेही सीट लिखके दीया है भाई, हम कैसन उठेगा ? “ याः वर त्याचा आणि माझा संवाद पुढील प्रमाणे झाला.

मीः तुम कैसाभी उठो, मैने तीन महीना पहलेसे यह तिकीट बुक किया है और कनफर्म है.

तोः ऎसा कैसा कनफरम है । हमको टिटि ने जो दिया हुवा है ।

मीः टिटि ने तुमको दीया दिया की बत्ती दिया उससे मुझे क्या मतलब । यह देखो मेरे पास छपा हुवा है । आप किधर जा रहे हो ? ( जवळच उतरणार असेल तर तो पर्यंत बसूदे म्हणून )

तोः हम बि.टी. स्टेसन जा रहे है बंबई मे ।

मीः महाराष्ट्र मे बि.टी. नामका कोइ स्टेशन नही है । ( माझ्यातला मराठी माणूस जागा झाला ) क्या करेगा उधर जा के ?

तोः हम रेल्वेमे नौकरी करता हूँ बि.टी. स्टेसनपर ।

मीः एsss बि.टी. स्टेशन नही है , बिटी काँटन है कपासका बिज  (त्या परिस्थितीतही माझा विनोद करण्याचा प्रयत्न )

तो ऎकायला तयार नव्हता. माझा सय्यम सुटत चालला होता. आमची बाजू मांडण्यासाठी दुसरी टीम म्हणून मी बायकोला पुढे केलं, म्हटलं याला सांग तुझ्या भाषेत. तिने मोर्चा सांभाळत त्याला उठवण्याचे प्रयत्न सुरू केले. माझं छुपं सैन्य पाहून तो प्रथमच वरमला.' टिटि को ही पुछेंगे ' म्हणत खाली आला. कुणीतरी म्हाणालं तिकडे टि.सी. आहे. तिकडे जाऊन माझ्या बायकोने प्रकरण सोडवलं. आम्हाला ४६,४७ व ४९ बर्थ मिळाले. अरे बापरे आता पुन्हा लढाई ? पण तिथे गेलो तर तिथले घुसखोर समंजस निघाले, उठून बसले, आम्ही सामान आणलं, बसलो. असं कसं झालं ? आठ ऎवजी नऊ बर्थ बसवल्याने हा गोंधळ झाला होता. म्हणजे खरा व्हीलन तो नववा बर्थ होता. रेल्वे प्रशासनाची बेपर्वाई तर बघायलाच नको.

पहीला अंक संपला निजानिज झाली, या प्रकरणावर पडदा पडला, चार दोन प्रवासी पायाजवळ बसले. आम्ही झोपलो. मनमाड स्टेशन आलं ते तिरंदाज उतरले. थोडे गाडीतच होते, राजस्थानला जाणारे. एक ग्रहस्थ, दोन बाया, खांद्यावर कोवळं मुल, आले. आल्या आल्या त्या ग्रहस्थाने फर्मान सोडलं ' लाईट लगाओ ' त्याचं ऎकतो कोण इथे, मग तो स्वतःच सरसावला सगळी बटनं चालू केली, सगळे पंखे चालू झाले लाईट बंद. आजुबाजुला आम्ही सगळे सरावलेले, जात्यातून बाहेर आलेले, त्याला मुठीत पहात होतो. त्याने त्वेषाने दुसर्‍या बाजूची बटनं चालू केली. आपले बर्थनंबर तपासले आणि आधीच हैराण झालेल्या दोघा प्रवाशाना हात घातला. चलो उतरो. त्या दोघातला एक विद्यार्थी निघाला दुसरी २४-२५ वर्षाची मुलगी. तिला पण तो खाली खेचू लागला. आता मी मध्ये पडलो. त्या नवव्या बर्थचा फंडा त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागलो. पण कसचं काय तो, त्या बाया ऎकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हत्या. उठो जाओ तुम्हारा सिट है तो टि.सी. को लेके आओ, त्याने त्या दोघांना बजावलं. मनमाडला बराच वेळ गाडी थांबली होती. फलाटावर टि.सी. महाशय दिसले दोघांनीही तिकडे धाव घेतली. नवीन आलेल्यांना वेगळे नंबर दिले गेले. ते आपली दुसरी लढाई लढण्यासाठी ' और कही ' गेले.

रात्रीचा एक वाजुन गेला होता. सगळ्यांच्या झोपेचं खोबरं नाही खोबर्‍याचा रसच निघाला होता. काय हा ' संशय कल्ल्होळ ' एकजण म्हणाला, संशय कल्ल्होळ कसा हा तर ' गोंधळात गोंधळ ' मी म्हणालो. नंदीग्राम एक्सप्रेस कसली आम्ही सगळे नंदी, काही गायी-वासरं सगळे कोंडवाड्यात कोंडलेल्या गुरांसारखे कोंडले गेलो होतो त्या अर्थाने सर्वांकडे बघून हे मला नंदीग्रामच भासू लागलं. पैसे देऊन असह्य त्रास सहन करणारे आपण. त्या पेक्षा सकाळी घृष्णेश्वर मंदिरात पहुडलेला नंदी पाहीला त्याचा मला हेवा वाटू लागला. तो किती मजेत पहुडला होता.


लेखकः नरेंद्र  प्रभू



03 January, 2009

अमेरिकेची नक्कल कराच !

अमेरिकेचा अध्यक्ष म्हणजे 'स्वामी तिन्ही जगांचा' च असतो. सध्याचे 'प्रेसिडेंन्ट इलेक्ट' बराक ओबामा हे फेब्रुवारी २००९ मध्ये शपथ घेणार आहेत, नंतर ते व्हाइट हाऊसमध्ये रहायला जातीलच. पण सध्या त्याना मुलींच्या शाळा सुरू होत असल्याने वाँशिंगटन मध्ये रहाणे क्रमप्राप्त आहे. व्हाइट हाऊसशेजारच्या 'ब्लेअर हाऊस' मध्ये तात्पुरते राहू द्यावे अशी विनंती त्यानी प्रशासनाला केली परंतू १५ जानेवारीपर्यंत ब्लेअर हाऊस 'रिझर्व्हड' आहे असे प्रशासनाने कळवल्यामुळे ओबामा भाड्याच्या हॉटेलात रहात आहेत.

'लोकसत्ता' मधील ही बातमी वाचुन आपल्या लोकशाहीची कींव करावीशी वाटली. सर्वच बाबतीत अमेरिकेची नक्कल करणार्‍या आपल्या राजकारण्यांनी असं जरुर वागावं. खरी लोकशाही असल्या मुळेच अमेरिकेतील प्रशासन 'प्रेसिडेंन्ट इलेक्ट' ला ही असं सांगण्याची हिम्मत दाखऊ शकलं. आपल्या देशात तर या अधिकार्‍याना आयुष्यातून उठवलं असतं. मंत्रिपद गेल्यावरही बंगले खाली न करणारे मंत्री, रेल्वेमंत्री लालू यादवांचे मेहुणे राजधानी एक्सप्रेस सारखी गाडी थांबा नसताना तास-तास स्वतःच्या माजापोटी उभी करून ठेवतात. बहुसंख्य लोकप्रतिनिधी सर्वच सार्वजनिक वाहनात दुसर्‍यांच्या आरक्षित जागेवर आपल्या चेल्या-चमच्यांसह अतिक्रमण करतात. सर्वात मोठ्या लोकशाही देशात ही लोकशाहीची विटंबना चालते तेव्हा ओबामाच्या आदर्शांची नक्कलतरी आपल्या राजकारण्यांनी करुन पहावीच.


नरेन्द्र  प्रभू


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates