29 September, 2013

सॉंग ऑफ द डे



जीवनाचं, जगण्याचं जर गाणं झालं पाहिजे तर संगीतासारखा सोबती नाही. कळायला लागायच्या आधीच हे संगीत आपल्या अवती-भवती निनादत असतं. पक्षाची शीळ, खळाळता झरा, पानांमधून होणारी वार्‍याची कुजबुज, समुद्राची गाज, छुम-छुम वाजणारे पैंजण या सर्वांमधून एक नादमधूर असा स्वरांचा गोफ आपल्या कानी येतच असतो. हे संगीत ऎकताना त्यातल्या मधुर्याकडे आपलं लक्ष जातच असं नाही, पण जेव्हा एखादा संगीतकार त्याचाच वापर आपल्या गाण्यात करतो तेव्हा मात्र आपण अचंबीत होतो. सहजच शब्द निघतात अरे...वा..!

एखादं गाणं हे काही फक्त त्या संगीतकाराचं नसतं तर ते गीतकार, संगीतकार, वादक आणि आताच्या जमान्यात रेकॉर्डीस्ट या सगळ्यांचा त्यात तेवढाच वाटा असतो. एखादं गाण मनाला भावतं त्याचं कारण काहीही असू शकतं. त्या गाण्याची चाल, त्या गाण्याचे शब्द, सुंदर वाद्य मेळ किंवा गाणं चित्रपटातील असलं तर चित्रीकरण या गोष्टी असतातच, पण या व्यतीरीक्त आपल्या आयुष्यातील एखाद्या प्रसंगाशी एखादं  गाणं कायमचं बांधलं जातं आणि ते गाणं ऎकताच तो सगळा गतपट आपल्या स्मृतीतून जागा होवून नजरे समोर तरळू लागतो. हे सगळं आज आठवण्याचं कारण म्हणजे नविन काळे यांचं सॉंग ऑफ द डे हे पुस्तक. कालच या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अगदी अनौपचारीक वातावरणात विले पारले इथं पार पडला. हे पुस्तक वाचताना आठवणीतली गाणी आणि गाण्यांच्या आठवणी यांची एक मालिकाच आपल्या मनात रुंजी घालायला लागते. पुस्तक वाचताना गाण्यांची सौंदर्यस्थळ आपण नव्याने किंवा काहीवेळा प्रथमच पाहायला, ऎकायला लागतो आणि या आयुष्यात नसंपणारा एक खजिनाच आपल्या हाती लागतो. सव्वीस-सत्तावीस गाण्यांचा उहापोह या पुस्तकात केला आहे,  पण हे पुस्तक वाचता वाचता गाणं ऎकण्याचे संस्कार आपल्यावर नकळत होत जातात आणि आपल्या मनातली कितीतरी गाणी आपण पुन्हा ऎकायला प्रवृत्त होतो आणि त्याची एक मालिकाच सुरू होते. लेखक नविन काळे आणि या पुस्तकाची हीच तर खासियत आहे. जीवन गाणं नव्याने गाण्यासाठी राफ्टर प्रकाशनाचं हे पुस्तक जरूर वाचा.

पुस्तक प्रकाशन सोहळा


      

                   

25 August, 2013

आत्माची शंभरावी लडाख सफर


मित्र हो...!  आज माझा प्रिय मित्र आत्मा आपल्या शंभराव्या लडाखवारीवर चाललाय. एका लडाख बाहेरच्या माणसाने लडाखला शंभरवेळा जाणं हा एक विक्रम असावा. पर्यटकांना घेवून लडाखला जायचं असा ध्यास घेतल्यापासून त्याच्या स्वत:च्या शंभर वार्‍या झाल्या आहेत, असा योग फार क्वचीतच येतो, या भटक्याच्या आयुष्यात तो आलाय. आज हजारो पर्यटक लडाखला ईशा टुर्स बरोबर जावून आलेत, काही आता चाललेत तर काही जायची तयारी करताहेत. पण आत्मासाठी ती आता मळलेली वाट झाली आहे. पण ही वाट त्याची त्याने घडवली. अनेक बिकट प्रसंगांना तोंड देत प्रवास चालू ठेवला. आणि तो प्रवास पर्यटकांसाठी सोपा केला. आज त्याच्या पाठीवर कौतूकाची जी थाप पडते त्यासाठी त्याने आधी खस्ता खाल्ल्यात हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो.
तो लडाखला असा काही भिडला की लडाखने आणि लडाखींनींही त्याला आपलसं केलं. आपल्या स्वत:च्या गावात जेवढा त्याला आपलेपणा वाटतो तेवढाच लडाखलाही वाटतो. लडाखवर जेव्हा ढगफुटीने प्रहार केला तेव्हा तमाम पर्यटक आणि जनता लडाख सोडून जाण्यासाठी विमानतळावर गर्दीकरून होती तेव्हा तो मात्र परदेशातून आल्या आल्या लडाखला दाखल झाला होता. त्याच्या आश्वासक कृतीने तिथल्या अनेक लडाखी मित्रांना नक्कीच आधार मिळाला.

लडाख हिल कौसील, जम्मू काश्मिर सरकारचा पर्यटन विभाग यानी आत्माचं वेळोवेळी कौतूक केलं आहे, ते मोठ्या प्रमाणावर भारतीय पर्यटक लडाखला आणल्याबद्दल पण उन्हाळी पर्यटनाबरोबरच लडाखच्या हिवाळी सहली सुरू करून त्याने इथल्या पर्यटनाचा चेहरा मोहराच बदलून टाकला आहे. पर्यटनाचे चार महिने संपल्यावर मरमॅट सारखी गुडूप होणारी इथली हॅटेल्स आता हिवाळ्यातही उघडी राहू लागली आहेत. नुकतच आमचं लडाख प्रवास अजून सुरू आहे हे पुस्तक प्रकाशीत झालं तेव्हा बोलताना आत्मा म्हणाला होता की आता मी जो काही आहे ती लडाखचीच देन आहे. एवढा तो लडाखशी एकरुप झाला आहे.

त्याच्या पहिल्यावहील्या लदाख सफरीचा थरार लडाख प्रवास अजून सुरू आहे या  पुस्तकात आपल्याला वाचायला मिळाला आहेच पण त्या घटनेनंतर तब्बल शंभरवेळा लडाखला येणं हे येड्यागबाळ्याचं काम नाही. त्यासाठी लागतं ते अफाट धैर्य, अविरत ध्यास, सर्वस्व झोकून द्यायची वृत्ती आणि फायद्या तोट्याचा विचार न करता व्रतस्थतेने पर्यटकांची सेवा करण्याची तळमळ हे सगळ त्याच्या ठायी आहेच. नुकताच कैलासची परिक्रमा करून मी परत आलोय त्या वेळी कैलासपतीला जे साकडं घातलं ते एवढंच होतं की अशीच ताकद, धैर्य आणि आरोग्य त्याला लाभावं. आपल्या सारख्या जीवाभावाच्या पर्यटकांकडेही आज मागत आहे ते आत्मा आणि ईशा टुर्ससाठी असेच अनंत आशिर्वाद.          

          





                            

कैलास


कैलासीचा राणा
भेट घडे आज
विराट ते रुप
दिसे मज

निर्मळ जलाचे
मानसरोवर
जन्मभर आस
असे वारंवार

दर्शन घडले
हात मी जोडले
भरून वाहीले
दोन्ही डोळे

पवित्र तीर्थाचे
स्नान आज घडे
पाप ताप झडे
सर्वकाळ

माझा विठूराया
शंभो शिव माया
एक झाली काया
त्यांच्या संगे

अफाट दर्शन
ज्योतींचे नर्तन
माझे तनमन
त्यात रंगे

कैलास पर्वत
त्याची परिक्रमा
आनंदाची सीमा
नसे आज

भव्य तेची रुप
सामोरे समीप
माझी तगमग
शांत झाली

मायेची पार्वती
गौरीकुंडावर
किती माझा भार
तीच वाही
शिव पार्वतीचे
आशिष लाभले
स्नान आज झाले
अमृताचे

भरून पावलो
माझा न उरलो
त्याचाच जाहलो
शिवरुप


नरेंद्र प्रभू
  




LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates