31 December, 2019

नवीन वर्षा तुझ्या स्वागता




उलटी होती पाने झटपट
उकलत जातो असाच हा पट
कुणी कितीही केली खटपट
नाही थांबत उधळे चौपट 

येती लाटा भरतीच्याही
परतून जाती ओहोटी ही  
सुख-दु:खाची वीण तर ही
सागर, तीरी जपतो तरीही

दिवसामागूनी दिवसही सरले
ऋतूमागूनी ऋतू चालले
कुणी मांडीला असेल हा पट?
नाटक करतो कुठला हा नट?

रडवी कधी हा हसता हसता
कोठे जावे? कुठला रस्ता?
माहीत नाही... तरी चाललो
नवीन वर्षा तुझ्या स्वागता 

नरेंद्र प्रभू
३१/१२/२०१९

24 December, 2019

स्वप्नातील नंदनवन - अ‍ॅप्रिकॉट ब्लॉसम




स्वप्न गुलाबी हळवे फुलते हळूच धरतीवर
मग्न सकाळी अंबर उलटे तरुच धरती वर
अशा उमलल्या कोमल कलिका वाटा वाटांवर
कुणी पसरली अथांग येथे दुलई ही सुंदर

जर्दाळूची झाडें वेडी साज ल्याइली किती
कशी न त्यांना जरा भीतीही पानांवाचून रीती
गूज फळांचे उरी दाटले कसे करू स्वागत
अंगरखा हा शुभ्र फुलांचा वाटाही अनवट

कसें करावे कथन तुम्हाला मज न लागला ठाव
हिमालयाच्या कुशीत सजला असा परीचा गाव
सृष्टीचा हा चमत्कार हो पहा इथे येऊन
स्वप्नातील हो नंदनवन हे हरखून जाईल मन


लडाख प्रांतातील कडाक्याची थंडी ओसरून आता वसंताची चाहूल लागणार असं वाटत असतानाच एवढे दिवस निश्पर्ण असलेली जर्दाळूंची झाडं उत्सव साजरा करतात. उघड्या बोडक्या झाडांवर पालवी फुटायच्या आतच  फिकट गुलाबी फुलं उमलू लागतात आणि बघता बघता ही झाडं नुसत्या फुलांनी डवरून जातात. लडाख राज्यामधलं कारगील गाव सोडलं की लेह या राजधानीच्या शहराकडे जातानाचा राष्ट्रीय महामार्ग क्र. १ दुतर्फा जर्दाळूंच्या झाडानी वेढलेला आहे, पण तिथली डहा आणि नू ही गावं तर यासाठी खास प्रसिद्ध आहेत. साधारण एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात पृथ्वीवरचा हा अनोखा नजारा पहायला मिळतो. मैलोंमैल पसरलेली शुभ्र फुलांची चादर, फांदीफंदीवरून फुटून निघालेली गोजीरी फुलं, काटा आणणारी थंडी आणि लडाखचा मनमोहून टाकणारा निसर्ग. हाडं गोठवणार्‍या थंडीमधून जागं होत असताना लडाखला पडणारं हे स्वप्न अनुभवायचं असेल तर ईशा टुर्ससह या वर्षीच चला या बहारदार सफरीवर...




17 December, 2019

स्टॅच्यु ऑफ युनिटी


ईशा टुर्ससोबत नुकत्याच भेट दिलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल:
  

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते आणि एकात्म भारताचे प्रणेते भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा आहे. गुजरात राज्याच्या राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर उभारलेला असून १८२ मीटर (५९७ फूट) उंचीचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांची १८२ मिटर उंचीची भव्य प्रतीमा, वॉल ऑफ युनिटी, प्रदर्शन हॉल, संग्रहालय, १३५ मीटर उंचावर असलेली २०० पर्यटक क्षमता असलेली दर्शक गॅलरी ( पुतळ्याच्या पायथ्यामधून दोन लिप्टव्दारे या ठिकाणी पोचता येतं.), कॅफेटेरीया, सिविनीयर शॉप, लाईट अ‍ॅन्ड साऊंड शो, २३० हेक्टर्वर पसरलेली व्हॅली ऑफ फ्लॉवर्स अशी अनेक आकर्षणं असलेल्या या ठिकणी ८०० वाहनांची पार्किंगची व्यवस्थाही आहे.

लेजर शो
भारतीय मूर्तिकार राम व्ही. सुतार यांनी ही संरचना (डिझाइन) केली होती. ऑक्टोबर २०१४ मध्ये, या प्रकल्पाची संरचना, बांधकाम आणि देखभाल यासाठी २९८९ कोटी रुपयांचा करार लार्सन ॲन्ड ट्यूब्रो यांच्याशी केला होता. पुतळ्याचे बांधकाम ३१ ऑक्टोबर २०१४ पासून सुरू झाले आणि ऑक्टोबर २०१८ मध्ये पूर्ण झाले.  आणि पटेलांच्या जयंतीच्या दिवशी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे उद्घाटन केले.

७०,००० टन सिमेंट, १८,५०० टन रीइनफोर्समेंट स्टील,,७०० टन कांस्य आणि ६,००० टन स्टॅकचरला स्टील यांचा वापर करून साकर झालेल्या या पुतळ्यासाठी भारतातील १,६९,०७८ गावांमधून लोखंड आणि माती जमा केली गेली.

सोमवार वगळता सर्व दिवशी सायंकाळी ७ ते ८ मधल्या अर्ध्यातासात स्टॅच्यु ऑफ युनिटी वर एक लेजर शो आयोजित केला जातो. सरदार पटेलांचं जीवन चरीत्र, ब्रिटीशांविरुद्ध त्यांनी केलेला संघर्ष आणि संस्थांनांचं भारतात केलेलं विलिनीकरण असे विषय या शोमध्ये अंतर्भूत केले गेले आहेत. उच्च प्रतीचं तंत्रज्ञान, भारदस्त आवाज, प्रेरणादायी विवेचन आणि एकात्मतेची भावना निर्माण करणारा हा लेजर शो अवश्य पहावा असाच आहे. शो संपल्यावर उत्स्पूर्तणे भारत मातेचा जयजयकार करत जाणारी जनता त्याची साक्ष असते.          

सातपुडा आणि विंध्याचल पर्वतमाला यांचं मनोहर दृश्य असलेलं गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातल्या केवडीया (बडोद्यापासून ९० किमीवर) या गावातून इथे पोचता येतं.  

१३५ मीटर उंचावर असलेली २०० पर्यटक क्षमता असलेली दर्शक गॅलरी

   

      

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates