28 March, 2012

तेजपूरदैत्यराज बाणासुराने भगवान शंकराची उपासना करून हजार बाहूंच बळ मिळवलं होतं. त्या मुळे त्याच्याशी कुणीच युद्धाला तयार होत नसत. तो अपराजित असा झाला होता आणि त्याला आपल्या ताकदीचा अहंकार झाला होता. बरिच वर्ष त्याच्याशी कुणीच युद्ध केलं नसल्याने तो अस्वस्थ झाला होता. कुणीच त्याच्याशी युद्धाला तयार होईना तेव्हा तो शंकराला शरण गेला आणि म्हणाला हे भगवन मला युद्ध करण्याची अनिवार इच्छा होत असून माझ्याशी कुणीही युद्ध करायला तयार नाही तेव्हा आता आपण स्वत: माझ्याशी युद्धाला तयार व्हा. त्याचं हे मुर्ख पणाचं बोलणं ऎकून भगवान शंकराला खुप राग आला. पण बाणासुर त्याचा भक्त असल्याने त्याने राग आवरत त्याला सांगितलं की अरे मुर्खा तुझा अहंकार मातीत मिळवणारा या आधीच जन्माला आला आहे. तुझ्या महाला वरचा द्वज जेव्हा खाले पडेल तेव्हा समज की तुझा शत्रू जवळ आला आहे.
 
बाणासुराची उषा नावाची मुलगी होती. एका रात्री तिच्या स्वपनात एक राजबिंडा तरूण आला आणि ती त्याचं सौंदर्य पाहून मोहीत झाली. स्वप्नातून जाग आल्यावरही ती त्याला विसरू शकत नव्हती. ती त्याच्या आठवणी ने बेचैन व्हायला लागली. तीला उदास पाहून तीची हुशार मैत्रिण चित्रलेखा तीच्या जवळ आली. उषेने आपली व्यथा तीला सांगताच चित्रलेखानी आपल्या मायावी सामर्थ्याने त्याचा पुतळा बनवला. उषेने त्याला लगेच ओळखले. आता मी याच्या शिवाय राहू शकत नाही असा ती आलाप करू लागली. तो श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध होता. चित्रलेखा द्वारकेला गेली आणि झोपलेल्या अनिरुद्धाला पलंगासहीत घेवून आली. जेव्हा अनिरुद्ध झोपेतून जागा झाला तेव्हा त्याने आपल्याजवळ एका रुपवतीला पाहिलं. उषा त्याला सामोरी गेली आणि म्हणाली की ती त्याच्याशी विवाह करू इच्छीते. अनिरुद्धही मोहित झाला होता, तो तिच्या बरोबर तिच्याच महालात वास्तव्य करू लागला. बाहेर पहारेकर्‍यांना याची चाहूल लागली. त्यांनी बाणासुराला सुचीत केलं. बाणासुर महालाच्या बाहेर आला आणि त्याला आपल्या माहाला वरचा ध्वज खाली आलेला दिसला. आपला शत्रूच उषेच्या महालात लपून बसला असल्याची त्याला खात्री पटली आणि तो शस्त्रासह उषेच्या महालात गेला. अनिरुद्धाला पाहाताच त्याला क्रोध अनावर झाला. लागलीच त्याने अनिरुद्धाला युद्धासाठी ललकारले. अनिरुद्धाने लोखंडाचा अजस्त्र खांब उचकटून फिरवला आणि बाणासुराच्या अंगरक्षकांना ठार केलं. बाणासुर आणि अनिरुद्धामध्ये घनघोर युद्ध झालं पण कुणीच हरेना शेवटी बाणासुराने अनिरुद्धाला नागपाशाने बांधून टाकलं आणि बंदी बनवलं.
 
इकडे द्वारकेत अनिरुद्धाची शोधाशोध सुरू झाली, एवढ्यात देवर्षी नारद तेथे पोहोचले आणि त्यानी अनिरुद्धाचा ठावठिकाणा सांगितला. मग श्रीकृष्ण, बलराम, प्रदयुम्न, सात्यिकी, गद, सांब आदी वीर आपली चतुरंगिणी सेना घेवून शोणितपूरात पोहोचले. आपल्या राज्यावर आक्रमण झालेलं पाहून बाणासुर युद्धाला तयर झाला. भगवान शंकर आपल्या भक्ताच्या सहाय्याला कार्तिकेय, भुत, प्रेत पिशाच्य, यक्ष, राक्षसासह धावून आले. घनघोर युद्ध झालं. श्रीकृष्णाने ब्रम्हास्त्राचा प्रयोग करून शंकराची सगळी अस्त्र निकामी केली. बाणासुराचे चार हात सोडून सगळे हात तोडून टाकले. शेवटी शंकराने बाणासुराला श्रीकृष्णाला शरण जायचं आवाहन केलं. बाणासुर श्रीकृष्णाच्या पायावर लेळण घेवून त्याला शरण गेला. त्याने आपली मुलगी उषेचा विवाह अनिरुद्धाबरोबर लावून दिला.                   
 

बाणासुर नगरीत त्या युद्धात रक्ताचे पाट वाहिले म्हाणून त्याचं नाव शोणीत असं पडलं.  संकृतमधल्या शोणीतपूरचं असमीया भाषेतलं भाषांतर म्हणजेच तेजपूर. बाणासुराच्या राजधानीचा भाग म्हणजे आजचे अग्नीगढ, त्याला लागूनच चित्रलेखा गार्डन आहे. (एक चांगला कलेक्टर आला त्याने कचर्‍याचा ढिग असलेल्या या जागेवर सुंदर उद्यान उभं केलं आहे.) पच्शिम सम मधले बोडो, लखिमपूर भागातले मिसिड आपल्याला बाणासुराचे वंशज समजतात. बाणासुराला या भागात बान राजा म्हटले जाते.   
 
अग्नीगढ  आणि चित्रलेखा गार्डन शहरात असूनही तिथे गेल्यावर प्रसन्न वाटतं. दोन्ही बागांची देखभाल उत्तम रितीने केलेली आहे. तिथली स्वच्छता तर वाखाणण्याजोगी. झाडानाही भार झालेली फुलं पाहून मन हरखून जातं. तवांगच्या वाटेकडे निघताना छान मुड तयार झाला.

 

25 March, 2012

आनंदाची परिभाषाआनंद...! जो सर्वांनाच घेता येतो, पण तो सर्व घेतात का? किंबहूना नसलेल्या दु:खाचा बाऊ करत, उसासे देत जीवन कंठणार्‍याला काय म्हणायचं? सहलीत फिरताना  उल्हासदायक हवा, सभोवती भव्य हिमालयाच्या पर्वत रांगा, खळाळत वाहाणारी सुंदर नदी, सानुल्या, गोजीर्‍या फुलांनी आच्छादलेली हिरवळ इतका छान प्रदेश न्याहाळत फिरत असताना सकाळी काही मिनीटं उशीरा मिळालेला चहा किंवा न चालणारा फ्लश  यांचंच रडगाण गात सहप्रवाशांना हैराण करायचं याला काय म्हणायचं?  यावरून एक गोष्ट आठवली.

एका रुग्णालयात दोन रुग्ण दाखल झालेले असतात. ज्या खोलीत त्यांना ठेवलेलं असतं त्या खोलीला एक खिडकी असते. खिडकी जवळ असलेल्या रुग्णाला दिवसातून फक्त एक तास अंथरूणावर बसवलं जातं. दुसरा रुग्ण मात्र चोवीस तास झोपवून ठेवलेला असतो. खिडकी जवळच्या रुग्णाला बसवल्यावर दुसरा रुग्ण त्याला बाहेर काय दिसतं असं विचारत असतो. खिडकी जवळचा त्याला रोज त्या एका तासात बाहेर दिसत असलेल्या दृश्याचं वर्णन करून सांगत असतो. बाहेर रम्य तलावाभोवती लहान मुलं खेळत आहेत. सुंदर-सुंदर फुलं फुलली आहेत, त्या भोवती फुलपाखरं रुंजी घालत आहेत. तलावाच्या पाण्यात बदकांचा जल विहार चालला आहे. निळंशार आकाश दिसत आहे आणि त्यात पक्षांची स्वछंद भरारी घेणं सुरू आहे, असं वर्णन ऎकून पडून राहिलेला सुद्धा उल्हसीत होत असे. एके दिवशी त्या खिडकी जवळच्या रुग्णाचं निधन झालं. आता त्या अंथरुणाला खिळून असणार्‍याला खिडकीजवळ हलवलं गेलं. खिडकी बाहेर काय दिसतंय त्याचं वर्णन करणारं आता तिथे कुणी नव्हतं. त्याने परिचारीकेला विचारलं. बाहेर काय चाललंय? काय दिसतंय? ती म्हणाली बाजूच्या इमारतीची भिंत सोडून अजून काहीच दिसत नाही. मग तो आधिचा रुग्ण कसलं वर्णन करत होता? परिचारीका म्हणाली तो रुग्ण आंधळा होता.

तो आंधळा असूनही दुसर्‍याला आनंद देण्यासाठी नेहमी चांगलच वर्णन करत होता. हा दृष्टीतला फरक असतो. जग जसं पहावं तसं दिसतं. ते पहायला आपल्याकडे तशी दृष्टी हवी. जे त्या आंधळ्याने पाहिलं ते डोळसांना पाहाता येईल का?   

जगातल्या ५०% टक्के लोकांना तुमच्याशी देणं घेणं नसतं, ४९% लोकांना तुमच्या दु:खामुळे मजाच वाटत असते आणि १% लोक असे असतात की जे तुमच्याबद्दल सहनभुती बाळगतात तेव्हा उसासे देत उरासफोड करण्यात काय अर्थ? सांगा कसं जगायचं? रडत रडत की गाणं म्हणतं ?         

15 March, 2012

मॉलिंयॉंग - मेघालय

मेघालय राज्यातलं मॉलिंयॉंग हे गाव  पाहाण्यासाठी शिलॉंगपासून जावून येवून 120 कि.मी. अंतर पार केलं पण ते सार्थकी लागलं . शिलॉंग सोडल्यावर थोड्याच वेळात मेघालयाच्या नावात असलेले मेघ जमिनीवर उतरलेले दिसले. चहुकडे दाटून आलं,अ पण ते बरसले नाहीत. पुढे जाताच वातावरण पुन्हा निवळलं. रस्त्याच्या दुतर्फा विविध जातीची बांबूची बनं होती. पुर्वांचलात बांबूचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. मॉलिंयॉंग गाव  यायच्या आधी रिवाई या गावात जिवंत पाळामुळांपासून (Living Roots Bridge) बनलेला पुल पाहायला गेलो. निसर्गाचा अद्भुत चमत्कार असाच तो पुल आहे. पुढे मॉलिंयॉंग हे मुख्य आकर्षण होतं. आशिया खंडातलं सर्वात स्वच्छ गाव म्हणून त्याची ख्याती आहे. अवघी शे-दिडशे वस्ती असलेलं हे खासी जमातीची वस्ती असलेलं गाव खरच खुप स्वच्छ आहे. ठिकठिकाणी बांबूच्या सुंदर टोपल्या कचरा पेटी म्हणून ठेवल्या होत्या. येणार्‍या पर्यटकाला त्या दिसाव्यात अशा ठेवल्या असल्या तरी त्या टोपल्या आणि आजूबाजूचा परिसर खुपच स्वच्छ होता. व्ह्यु पॉईंट म्हणून बनवलेलं उंचच उंच मचाण हे तिथल्या लोकांच्या कल्पकतेच निशाण होतं. जंगलात असलेल्या त्या मचाणावरून सभोवतालच्या रमणीय परिसर न्याहाळण्याची सोय होती. ब्रम्हपुत्रेचं खोरं आणि पलिकडे बांगलादेशचा भाग या मचाणावरून पाहता आला.

इथे हेंरी हा तिथला रहिवाशी आमचा वाटाड्या म्हणून हसत मुखाने हजर होता. त्याने ते गाव, तिथली घरं आम्हाला दाखवून आणली. वांबूचा वापर केलेलं सुंदर घर पहाणं हा एक अनुभव होता. डोनबोक ची छोटेखानी खानावळीत रुचकर जेवणाचा आस्वाद घेतल्यावर आम्ही त्या सुंदर गावाचा निरोप घेतला.  

14 March, 2012

माजूली बेट – असम
पुरातन ग्रामीण भारताचं दर्शन आजच्या काळात घ्यायचं असेल तर असम राज्यातल्या जोरहट जिल्ह्यातील माजूली या बेटावर गेलं पाहिजे. आमच्या पुर्वांचलच्या सहलीच हे मुख्य आकर्षण होतं. राहण्याची, खाण्या-जेवणाची सोय हेती पण ती कशा प्रकारची असेल अशी मनात शंका होती. पण ती कशीही असो माजूलीला जायला सगळेच उत्सूक होते. काझीरंगाहून जोरहटच्या दिशेने त्या प्रसन्न सकाळी निघालो तेव्हा आजूबाजूला आदल्या दिवशी पाहिलेले वन्यप्राणी दिसत होते, त्यांना डोळेभरून पाहाताना पुन्हा इकडे यायला हवं असच वाटत होतं. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा भाग संपला आणि रस्त्याच्या दुतर्फा चहाचे मळे लागले. सुखद गारवा आणि हिरवागार निसर्ग मन मोहून टाकत होता. बोखाक़ाट नंतर मुख्यरस्ता सोडून गाडी गावात शिरली, बाग बगीचा आणि स्वच्छ सुंदर गाव प्रवास सुखात चालला होता. थोड्याच वेळात गाडी ब्रम्हपुत्रेच्या काठावर येवून उभी राहिली. समोर समुद्रासारखा पसरलेला ब्रम्हपुत्रेचा प्रवाह दिसत होता, हा पार करूनच तर आम्हाला पलिकडे माजूली बेटावर जायचं होतं.            

माजूली, 815 वर्ग कि.मी. चा हा द्वीप असम च्या जोरहट जिल्ह्यात येतो. वल्डॅ हेरिटेज साईट म्हणून माजूलीचा लवकरच समावेश होण्याची शक्यता आहे. ब्रम्हपुत्र नदी ने वेळोवेळी पात्र बदलल्यामुळे हा द्विप तयार झाला आहे.  दोन्ही बाजूला समांतर वाहणार्‍या नदयांमधला प्रदेश म्हणजे माजूली. उत्तरेला ब्रम्हपुत्र आणि दक्षिणेला बुरिहिडींग अशा नदयांच्या मध्ये माजूली बेट वसले आहे. 1661 ते 1696 या काळात एकसारख्या होणार्‍या भुकंपांमुळे माजूली बेट निर्माण झालं. मुख्यभुमीला लागून असलेल्या जोरहट या ठिकाणी ब्रम्हपुत्रेच्या काठी आम्ही जेव्हा आलो तेव्हा आता आम्ही नेमके कुठे जाणार हे समजत नव्हतं. काठावरची ठिसूळ माती नुसती ढकलली तरी पाय घररून प्रवाहात पडायला होईल अशी परिस्थिती होती. माजूली बेटावर जायची एकमेव सोय म्हणजे तिथे असलेली फेरी बोट. दिवसातून फक्त दोन फेर्‍या दोन्ही काठादरम्यान होतात. पावसाळ्याचे चार महिने तर ही वाहतूही बंदच असते. तर अशाच एका बोटीमधून आमचा प्रवास सुरू झाला. मुलं, माणसं, सामान आणि जीप, मोटरसायकल अशी वाहनसुद्धा खचाखच भरली आणि बोट निघाली. बरं ही बोट किनार्‍याला लावण्यासाठी पक्का घाटही तिथे नव्हता. ठिसूळ मातीचा भाग सतत पाण्यात स्वाहा होत असल्याने बोटीतूनच आणलेले ओंडके काठावर टाकून रस्ता तयार केला जातो आणि बोट गेल्यावर काठ पुन्हा रिकामा होतो. ब्रम्हपुत्रेच्या खोल पण संथ प्रवाहामधून प्रवास सुरू झाला. जाताना साधारण पन्नास मिनीटात आटोपलेल्या या प्रवासाने परतीच्या वाटेत मात्र तब्बल दिड तास घेतला. वार्‍याची आणि पाण्याच्या प्रवाहाची दिशा हा वेळ ठरवत असते. दोन डिझेल इंजिनांचा आवाज आणि बोटीत शांतपणे बसलेली, उभी असलेली माणसं. बरिच गर्दी असली तरी गडबड गोंधळ असा कुठेच नव्हता. पलिकडच्या काठावर माजूली बेटावर पाय ठेवताच मात्र एका वेगळ्याच जगात आल्याचा भास झाला. अफाट पसरलेलं वाळवंट आणि बघावं तिकडे जाणार्‍या वाटा, आम्हाला घेवून निघालेली जीप स्वतःचा मार्ग शोधत निघाली होती आणि घुळीचे लोट गावभर फसरत होते.         

वैष्णव पंथाचे संत शंकरदेव यांनी या बेटाला सोळाव्या शतकात भेट दिल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. त्यांनी त्या ठिकाणी अनेक मठांची स्थापना केली, या मठांना सत्र म्हटलं जातं. अशाच कमलाबारी सत्र, चामागुरी सत्र आणि नातून सत्र अशा तीन सत्रांना भेट दिली तेव्हा तेथील कलाप्रकार, लोक, त्यांचं रहाणीमान पाहून मन मोहून गेलं. आपल्या भारत देशातील प्राचीन संक़ृती या बेटावरील गावात अजून जपून ठेवलेली दिसते. माजूली बेटावर तिथलाच रहिवाशी असलेल्या तिरथ शर्मा बरोबर एक अख्खा दिवस आम्ही फेरफटका मारत होतो. श्री श्री उत्तर कमलाबारी सत्र या सत्रात जाण्यासाठी निघालो आणि एका प्रवाहावरून बांबूच्या पुलावरून जावं लागलं. पुर्वांचलात जागोजागी असे पुल दिसतात. हे बांबूचे पुल खरच भक्कम होते, माणसांबरोबरच मोटरसायकलची वाहतूकही सर्रास सुरू होती. 1673 साली थापन झालेल्या उत्तर कमलाबारी सत्रात गेल्यावर तिरथने संगीत कला अकादमी पुरस्कार प्राप्त अशा तिथल्या सत्राधिकार्‍याची ओळख करून दिली. त्या सत्रात राहाणारे सर्वचजण सन्यास घेतलेले आणि कृष्णालाच फक्त पुरूष मानणारे होते. डोक्यावर लांब केसांचा आंबाडा घातलेले अनेकजण तालवाद्य आणि नृत्याचा सराव करताना दिसत होते. तिथून बारा किलोमिटरवर असलेल्या  चामागुरी  सत्रात अनेक प्रकारचे मुखवटे बनवले आणि विकले जातात. बांबूच्या लगद्यापासून बनवलेले ते अप्रतिम मुखवटे धारण करून आम्ही फोटो काढले आणि अनपेक्षीतपणे त्याच घरातून चहाचे कप समोर आले. मनापासून झालेलं ते आदरातीथ्य आम्ही कधीही विसरू शकत नाही.  इथल्या नमघर या गावी इथले सर्व लोक नाच-गाण्यासाठी एकत्र येतात इथल्या सत्रांमुळे हा भाग वैष्णव पंथीयांचं तिर्थक्षेत्र बनलं आहे. आज इथे चौविस सत्र चालू आहेत. इथल्या लोकांनी पुरातन नृत्य संकृती अजून जपून ठेवली आहे आणि त्याला आधुनीकतेच वारं अजून तरी लागलेलं नाही. इथे भगवान कृष्णाची आठवण म्हणून तीन दिवसांचा रास महोत्सव सजरा केला जातो.          

वाहत्या पाण्याने वेढलेलं हे जगातलं सर्वात मोठं बेट आहे. ब्रम्हपुत्रेच्या पुराच्या पाण्याने रस्ते पाण्याखाली जावू नयेत म्हणून त्यांची उंची वाढवण्यात आली आहे, तसच इथली बहुतांश घरं बांबू किंवा खांबांवर उभारली आहेत. मिसींग जनजातीचं वास्तव्य असलेल्या माजूलीच्या आदिवासी गावात आम्ही गेलो तेव्हा मुलं-बाळं, बाया-बापड्या गावात आलेल्या आम्हा पाहुण्यांना पाहायला घरा घरातून डोकावून पाहू लागल्या. तिथली घरं संपुर्णपणे  बांबूंचा उपयोग करून उभारली होती. एखाद्या सन्याशाची पर्णकुटी असावी अशी ती घरं छायाचित्राचा विषय झाली तरी ती पाहून अशा प्रकारच्या घरात आयुष्य कंठणं किती कठिण आहे याची साक्ष पटत होती. संपुर्ण घरात जीवनावश्यक अशा काहीच वस्तू दिसत होत्या. असं असलं तरी तिथल्या लोकांच्या चेहर्‍यावर आनंद, उत्साह ओसंडून वाहात होता. मुलं आनंदाने खेळताना दिसत होती.       महाराष्ट्राला अभिमानास्पद अशी गोष्ट म्हणजे एकनाथजी रानडे यांनी सुरू केलेल्या विवेकानंद केंद्राचं एक विद्यालय माजूली बेटावर आहे. उच्च शिक्षणासाठी मात्र मुख्यभुमी जोरहाटला जाण्याशिवाय पर्याय नाही. अशाच काही महाविद्यालयीन मुली आम्हाला परतीच्या प्रवासात बोटीवर भेटल्या. कुठल्याही पुढारलेल्या शहरात असाव्यात अशाच या मुली होत्या. आदल्या दिवशी पाहिलेल्या सांसकृतीक नृत्याच्या कार्यक्रमामुळे असमच्या बिहू संगीताबद्दलचं कुतूहल आमच्या मनात जागृत झालं होतं. सुगीच्या हंगामात गायची गीतं, त्यांचं महत्व, गायनाचे प्रकार, नृत्य या विषयी मनमोकळ्या गप्पा झाल्या.    

शेती हा इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. इथे तयार होणार्‍या सिल्क ला जगभरातून मागणी असते. पुर्वीच्या काळी शेती, बागायतीने समृद्ध असलेला हा भाग आता मात्र तसा राहिलेला नाही. ब्रम्हपुत्रेनं बर्‍याच शेतजमिनीवर रेताड माती फिरवली. काझीरंगा वगळता पुर्वांचलाच्या इतरभागात अभावानेच दिसणारे पक्षी इथे मात्र मुबलक प्रमाणात आढळून आले. असं हे जैवविविधतेने नटलेलं सुदर बेट आणखी किती दिवस आपल्याला पहायला मिळेल याची शंका वाटते कारण या बेटाचा बराच भाग दरवर्षी पाण्याखाली जात आहे. अजून पर्यंत या बेटाचा तेहत्तीस टक्के भाग ब्रम्हपूत्रेचं भक्ष बनला असून आता दरवर्षी होणारी धुप लक्षात घेतली तर पुढील पंधरा-वीस वर्षात हे बेट पुर्णपणे नष्ट होवू शकतं.   

10 March, 2012

काझीरंगा
आजचा दिवस प्रत्येकाचा होता. सहलीत सहभागी झालेल्या मंडळींचा, छायाचित्रकारांचा, हत्तीवरून सफारी घडवणार्‍या माहूतांचा, जीप सफारीला घेऊन जाणार्‍या चक्रधरांचा आणि काझीरंगातल्या वन्यजिवांचाही. प्रत्येकाला आपलं कसब आणि झलक दाखवायची संधी होती. पहाटे साडेपाचला पहिल्या हत्तीवरच्या सफरीला जायला मंडळी उत्सुक होतीच. अंधूक प्रकाशात काझीरंगाच्या बागोरी गेटकडे जीप निघाल्या तेव्हा उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

राष्ट्रीय महामार्ग ३७ वरून जेव्हा आम्ही बागोरी गेटकडे जात होतो तेव्हा आजूबाजूला प्राणी आणि पक्षांचं अस्तित्व जाणवायला लागलं होतं. पण प्रत्यक्ष हत्तीवर बसून जंगलात प्रवेश करायला आम्ही उतावीळ झालो होतो. आजपर्यंत नुसतं ऎकलेलं, पुस्तकातून वाचलेलं, पडद्यावर बघितलेलं आणि छायाचित्रातून दर्शन देणारं काझीरंगा याची देही याची डोळा पाहायचं होतं ना? जागतीक वारसा लाभलेलं हे सुंदर हिरवंगार ४३० वर्ग कि.मी. राष्ट्रीय उद्यान. वन्यजीव, प्राणी, पक्षी, झाडं यानी समृद्ध असं हे जंगल आता उजेडात चांगलच दिसू लागलं होतं. सुर्य अजून वर यायचा होता. बागोरी गेट जवळ वाहन पोहोचली तसे आम्ही लगबगीने हत्तीवर स्वार होण्यासाठी निघालो. सहा सहा माणसं हत्तीवर बसली आणि माहुताने हत्ती जंगलाच्या दिशेने वळवला.
 
थोडीशी मोकळी जागा पारकरून हत्ती त्याच्या एवढ्याच उंच गवतात शिरला. या गवताला एलिफंट ग्रास असंच म्हणतात. हत्तीला जे प्रचंड खाणं लागतं ते या गवतामुळेच त्याला मिळतं. समोर अफाट पसरलेलं मनमोहक जंगल असलं तरी आमची नजर एकशिंगी गेड्याला शोधत होती. तो दिसावा अशी इच्छा असताना अचानक समोरून एक हरणाची जोडी दौडत गेली. चला शुभारंभ झाला तर. एवढ्यात माहुताने हत्ती मोकळ्या जागेत नेला, थोड्या अंतरावर एक धुड गवताआड दिसत होतं, माहुताने हत्ती तिकडे न्यायला सुरूवात केली. तो गेंडाच होता. सगळ्यांचेच श्वास रोखले गेले. हत्ती जवळ जवळ जात होता तसा तो गेंडा मोकळ्या जागेत आला. त्याने दर्शन दिलं. आम्ही धन्य झालो. एकशिंगी गेंड्याचा आधीवास असलेलं हे जंगल जगभरात ज्यासाठी प्रसिद्ध आहे तो महाराजा आमच्या समोर अगदी काही हातांच्या अंतरावर होता. कॅमेरे सरसाऊन त्याचे फोटो घेतले. तिकडे सुर्यदेव वर वर सरकत होता.
 
तो गेंडा जसा पुन्हा वगतात शिरला तसा माहुताने हत्ती जागचा हलवला. गवत सोडून हत्ती त्याच्या पायवाटेवर आला. आजूबाजूला महाकाय झाडं, मधूनच डोकावणारी सुर्यकिरणं, गवतावर हलकेच येवून बसणारे पक्षी, बागडणारी हरणं असं नेत्रसुख घेत असतानाच दोन जंगली डुक्कर सरसरत गेले. या गवतात अशी अनेक स्वापदं होती तर. आम्ही हत्तीवर बसलो होतो म्हणून सुखरूप होतो. पुन्हा हत्ती थांबला, गेंडीण आणि तीचं बाळ (याला काय म्हणायचं गेंड्याची मादी आणि छोटा गेंडा?) सकाळच्या नाष्टयाला निघाले होते. आता सगळीकडे गेंडे दिसायला लागले. पक्षांचे थवे उडताना दिसत होते. जमीनीवर काही पक्षी किटक, किडे खाण्यात मग्न होते. रान फुलांची पखरण झाली होती, रुईची झाडं सभोवार फुलंली होती. त्या रमणीय वातावरणात एक तास कधी संपला ते समजलच नाही. माहुताने हत्ती पुन्हा माघारी आणला होता. एक एक करत मंडळी उतरत होती. आमच्या गटाचे दोन हत्ती अजून यायचे बाकी होते म्हणून आम्ही थांबलो होतो, तेव्हढयात दोन रान रेडे उधळत आले, सगळ्याची पळापळ झाली, वनखात्याच्या गार्डनी बंदूका सरसावल्या, ती धुडं आली तशी वेगात निघून गेली. सकाळची सफारी फटाक्याची माळ लावतात तशा रेड्यांच्या आतषबाजीत संपली.

साडेआठच्या दरम्यान रिसॉर्टवर परतलो. काल रात्रीच्या काळोखात आणि पहाटेच्या अंधूक प्रकाशात पाहिलेला रिसॉर्टचा परिसर आताच्या लख्ख उजेडात मनाला मोहून टाकत होता. काझीरंगाला खेटून असलेल्या त्या परिसरात थोडं उंचावर असलेलं ते रिसॉर्ट म्हणजे आत्माने निवडलेलं सुंदर ठिकाण होतं. मंडळी भलतीच खुश झाली होती. जेवणाच्या आधी जवळच्याच गावात फेरफटका मारावा म्हणून आम्ही बाहेर पडलो. नारळ-सुपारीच्या बागांबरोबरच, बांबूची बेटं असलेलं ते छोटेखानी गाव सगळ्यांनाच आवडलं. वाटेत चहाचे मळे लागले. ते मागे पडतात तोच शेतं लागली. एका ठिकाणी काही लोक जमून एका भल्या मोठ्या कावलीत काहीतरी शिजवत होते. आम्ही जवळ जाऊन पाहिलं तर खिजडी शिजत होती. तो दिवस महाशिवरात्रीचा असल्याने गावची मंडळी एकत्र येवून खिचडी बनवतात. प्रत्येक घरातून शिधा येतो. पुढे एका घराजवळ बरीच मुलं पंगतीला बसली होती. घरची गृहिणी त्यांना केळीच्या पानावर प्रसाद वाढत होती. आम्ही तिथे  पोहोचलो. आमच्याही हातावर प्रसाद ठेवला गेला. फुगऊन सोललेले हिरवे मुग, हरभरे असच काही होतं. आसामी लोकांची शिवरात्र बघायला मिळाली. मुलं, माणसं आनंदी दिसत होती. दिड पावणेदोन तासाचा फेरफटका मारून परतलो तेव्हा  उकाडा थोडा वाढला होता.

सकाळी सफारीवरून परतताना मुख्य रस्त्यावरून पोपटांचे थवेच्या थवे आजूबाजूच्या गवतात दिसत होते त्याच ठिकाणी आता गेंडे दिसत होते. आता त्यांचं तेवढं कौतूक वाटत नव्हतं. दोन वाजण्याच्या सुमारास दुपारची जीपसफारी सुरू झाली. कोहारा गेटवरून उघड्या जीप निघाल्या, नागमोडी वाटा पार करत एका लाकडाच्या पुलावरून जीप जात होती. काझीरंगात ओढ्यावर सगळीकडेच असे लाकडी पुल आहेत. जीप असल्याने थोड्याच वेळात आम्ही जंगल्याच्या आंतवर पोहोचलो. हरणं, सांबरं, रान रेडे, गेंडे नजर वेधून घेत होते. रान हत्तींनी दर्शन दिलं, पक्षी ही मुबलक प्रमाणात दिसत होते. एवढ्यात जीप हळू हळू होत थांबली. रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली रान कोंबडा तोर्‍यात उभा होता. त्याने फोटोला पोजही दिली. जीपच्या ड्रायव्हरची नजर सरावलेली होती. प्राण्याची चाहूल लागताच तो जीप थांबवत होता. एका टेहाळणीसाठी मुद्दाम बनवलेल्या टॉवर जवळ त्याने जीप थांबवली. आम्ही वर चढून गेलो. तीनशे साठ अंशात सारा परिसर नजरेच्या टप्प्यात दिसत होता. पलिकडच्या पाणवठयावरून दोन गेंडे आमच्याच दिशेने येत होते. आता जंगल मनसोक्त पाहाता येत होतं. हवे तसे फोटो घेता येत होते. त्यानीही कॉट वॉक केलं. बघा किती बघायचंय ते...!

आता उन्हं तीरपी होत होती. सावल्या लांबवर पसरायला लागल्या होत्या. टॉवरवरून खाली उतरलो. पुन्हा जीपमध्ये बसलो. थोडा वेळ एक रुट करून परतीच्या वाटेला लागलो. आमचा उत्साह बघून ड्रायव्हरने एका मचाणाजवळ जीप थांबवली. मी आणि साळवी साहेब वर चढून गेलो. जंगल शांत शांत वाटत होतं. खाली सरसर झाली. रान कोंबडा घाईघाईत जमीन उकरत होता. एका फांदीवर स्पॉटेड डोव्ह बसलं होतं. वर पक्षांचे थवे परतताना दिसले. दोन पेलीकन जवळून उडत गेले. आता उन्हं सरली होती. लगबगीने हरण पलिकडे जाताना दिसली. एक गेंडा रस्ता ओलांडून जंगलात निघून गेला. कबूतर झाडामध्ये उडून गेलं. कोंबडा पतार्‍यात दिसेनासा झाला. संधीप्रकाशाचं साम्राज्य पसरायला लागलं तसे आम्ही मचाणावरून पायउतार झालो. आमची जीप गुरगुरत जंगला बाहेर निघाली आणि खर्‍या अर्थाने जंगली प्राण्यांचा दिवस सुरू झाला....!   

03 March, 2012

गुवाहाटी ते काझीरंगागो एअरचं विमान ठरल्या वेळेपेक्षा तीस मिनिटं उशीराच गुवाहाटी च्या लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं तेव्हा मला आगमन कक्षामधून लवकरात लवकर बाहेर पडायची घाई झाली होती, कारण आमच्या आधीच गुवाहाटीला पोहोचलेले अनिल, अदिती आणि कृपा साळवी, तसच आदित्य माझी वाट पाहात ताटकळत होते. आम्ही एकूण वीसजण आत्ता उतरत होतो. मी सामान घेवून बाहेर पडलो तरी इतर मंडळी बाहेर येईनात. सर्वांनी सामान तर घेतलं होतं. आता काय झालं म्हणून बघायला गेलो तर काहींच्या ब्यागा तुटल्या होत्या. हे विमान कंपनीवाले सामान काळजीपुर्वक हाताळत नाहीत आणि मग प्रवासाच्या सुरवातीलाच लोकांना त्रास सहन करावा लागतो. मंडळी सामानासहीत बाहेर आली तेव्हा तिकडे राम, क्रिष्णा, अमुल्यनाथ वैगेरे आमची वाट पाहत गाड्या घेवून सज्य होते. मंडळी गाडीत बसत असतानाच तिकडे आत्माचं विमान गुवाहाटीला उतरलं होतं. चला हा आला तर. तो आणि इरत सात मंडळी बाहेर यायच्या आत आमची वाहानं काझीरंगाच्या दिशेने निघाली होती.

गुवाहाटी काझीरंगा प्रवास सुरू झाला, हा प्रवास मी या आधी सुद्धा केला आहे. पण त्या वेळी जवळ जवळ काळोखातच सगळा रस्ता पार करावा लागला होता. आता दुपारच्या दोन सव्वादोन च्या सुमारास प्रवास सुरू झाल्याने किमान तीन तास तरी बाहेरचा देखावा दिसणार होता. आम्ही निघालो असा आत्माचा फोन आला......., व्वा...! म्हणजे आता आमच्या मध्ये फक्त पंधरा मिनिटांचंच अंतर होतं तर!  

वाटेतल्या तंदूरबार रेस्टॉरंट मध्ये चहासाठी थांबलो. आमच्या चहा होई पर्यंत आत्मा आणि मंडळी पोहोचतील असा कयास होता, पण पंधरा मिनिटात मंडळी पोहोचली तरी चहा तयार झाला नव्हता. बरं चहा आणायला हा असमला (आसाम नव्हे हा...!) गेला का? असा प्रश्न विचारायची सोय नव्हती कारण आम्ही खुद्द असम मध्येच होतो. आत्माला अचानक समोर पाहून मंडळी चकीत झाली. मी सोडून बाकीच्याना अत्मा इथे भेटेल असं वाटलं नव्हतं. सहलीवरचा पहिला चहा यायच्या आतच दुधात साखर पडली होती. पण तिथलं चहा पुराण संपेपर्यंत चक्क पंचेचाळीस मिनिटं गेली आणि अपेक्षेपेक्षा जास्त पैसेही.

आता संध्याकाळ दाटून यायला लागली. मात्र घड्याळात पाचच वाजले होते. आपल्या भारत देशाच्या अतीपुर्वेकडच्या भागातून आमचा प्रवास सुरू होता. जागो जागी खणलेले अरुंद रस्ते, धुळ यांचा सामना करत मजल दर मजल करणं सुरू होतं. आपल्याकडे रस्ते रुंदीकरणाचं काम चालतं, तसं इकडे रस्ते उंचीकरणाचं काम चालू होतं. पावसाळ्यात ब्रम्हपुत्रेला येणार्‍या महापुरात हे रस्ते पाण्याखाली जातात आणि संम्पर्क तुटतो म्हणून ही उंची करणाची मोहीम. आता पुर्ण काळोख झाला होता. पहाटे पाच पासून सुरू झालेल्या प्रवासामुळे अंग आंबून गेलं होतं. डोळे पेंगुळायला लागले होते. तेवढ्यात सगळ्या गाड्या थांबल्या. खुद्द आत्मा बरोबर असल्याने मी गाडी बाहेर पडलो नाही. पण मग सगळेच बाहेर पडलेले पाहून मी बाहेर आलो तर सगळे जण शहाळी खात होते. (असमीत शहाळ्याला डाब म्हणतात.) चला आणखी अर्धा तास जाणार तर. मंडळी गाडीत बसली, डोळ्यावरची झापडही दूर झाली, आता पुन्हा रिसॉर्ट कधी एकदाचं येतय म्हणून वाट पाहाणं सुरू झालं. ठिकठिकाणी हत्ती, वाघ, हरण रस्ता क्रॉस करत असेल तेव्हा गाडी जपून चालवा, त्यांना इजा पोहचवू नका असे बोर्ड लावलेले दिसत होते. उद्या सकाळची पहिली सफारी डोळ्यासमोर दिसू लागली. मन:पटलावर गेल्या वेळचं काझीरंगा सरकत असतानाच लॅंडमार्क वूड रिसॉर्टचा बोर्ड दिसला, गाडी मुख्य रस्ता सोडून कच्च्या रस्त्याला लागली, हे रिसॉर्ट कसं असेल? अशी उत्सुकता वाटत असतानाच कंदीलाची रोषणाई केलेला रिसॉर्टचा रस्ता लागला,  प्रशस्थ अशा त्या रिसॉर्ट समोर गाडी उभी राहिली. मंडळी खुशीत आली,  चला सुरूवात तर उत्तम झाली. उद्या पहाटे पाच वाजताच्या पहिल्या सफारीला जायला सर्वच उत्सूक होते. खरं म्हणजे उद्या सहलीला खरी सुरूवात होणार होती.

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates