आनंद...! जो सर्वांनाच घेता येतो, पण तो सर्व घेतात का? किंबहूना नसलेल्या दु:खाचा बाऊ करत, उसासे देत जीवन कंठणार्याला काय म्हणायचं? सहलीत फिरताना उल्हासदायक हवा, सभोवती भव्य हिमालयाच्या पर्वत रांगा, खळाळत वाहाणारी सुंदर नदी, सानुल्या, गोजीर्या फुलांनी आच्छादलेली हिरवळ इतका छान प्रदेश न्याहाळत फिरत असताना सकाळी काही मिनीटं उशीरा मिळालेला चहा किंवा न चालणारा फ्लश यांचंच रडगाण गात सहप्रवाशांना हैराण करायचं याला काय म्हणायचं? यावरून एक गोष्ट आठवली.
एका रुग्णालयात दोन रुग्ण दाखल झालेले असतात. ज्या खोलीत त्यांना ठेवलेलं असतं त्या खोलीला एक खिडकी असते. खिडकी जवळ असलेल्या रुग्णाला दिवसातून फक्त एक तास अंथरूणावर बसवलं जातं. दुसरा रुग्ण मात्र चोवीस तास झोपवून ठेवलेला असतो. खिडकी जवळच्या रुग्णाला बसवल्यावर दुसरा रुग्ण त्याला बाहेर काय दिसतं असं विचारत असतो. खिडकी जवळचा त्याला रोज त्या एका तासात बाहेर दिसत असलेल्या दृश्याचं वर्णन करून सांगत असतो. बाहेर रम्य तलावाभोवती लहान मुलं खेळत आहेत. सुंदर-सुंदर फुलं फुलली आहेत, त्या भोवती फुलपाखरं रुंजी घालत आहेत. तलावाच्या पाण्यात बदकांचा जल विहार चालला आहे. निळंशार आकाश दिसत आहे आणि त्यात पक्षांची स्वछंद भरारी घेणं सुरू आहे, असं वर्णन ऎकून पडून राहिलेला सुद्धा उल्हसीत होत असे. एके दिवशी त्या खिडकी जवळच्या रुग्णाचं निधन झालं. आता त्या अंथरुणाला खिळून असणार्याला खिडकीजवळ हलवलं गेलं. खिडकी बाहेर काय दिसतंय त्याचं वर्णन करणारं आता तिथे कुणी नव्हतं. त्याने परिचारीकेला विचारलं. बाहेर काय चाललंय? काय दिसतंय? ती म्हणाली बाजूच्या इमारतीची भिंत सोडून अजून काहीच दिसत नाही. मग तो आधिचा रुग्ण कसलं वर्णन करत होता? परिचारीका म्हणाली तो रुग्ण आंधळा होता.
तो आंधळा असूनही दुसर्याला आनंद देण्यासाठी नेहमी चांगलच वर्णन करत होता. हा दृष्टीतला फरक असतो. ‘जग’ जसं पहावं तसं दिसतं. ते पहायला आपल्याकडे तशी दृष्टी हवी. जे त्या आंधळ्याने पाहिलं ते डोळसांना पाहाता येईल का?
जगातल्या ५०% टक्के लोकांना तुमच्याशी देणं घेणं नसतं, ४९% लोकांना तुमच्या दु:खामुळे मजाच वाटत असते आणि १% लोक असे असतात की जे तुमच्याबद्दल सहनभुती बाळगतात तेव्हा उसासे देत उरासफोड करण्यात काय अर्थ? “सांगा कसं जगायचं? रडत रडत की गाणं म्हणतं ?”
No comments:
Post a Comment