03 March, 2012

गुवाहाटी ते काझीरंगा



गो एअरचं विमान ठरल्या वेळेपेक्षा तीस मिनिटं उशीराच गुवाहाटी च्या लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं तेव्हा मला आगमन कक्षामधून लवकरात लवकर बाहेर पडायची घाई झाली होती, कारण आमच्या आधीच गुवाहाटीला पोहोचलेले अनिल, अदिती आणि कृपा साळवी, तसच आदित्य माझी वाट पाहात ताटकळत होते. आम्ही एकूण वीसजण आत्ता उतरत होतो. मी सामान घेवून बाहेर पडलो तरी इतर मंडळी बाहेर येईनात. सर्वांनी सामान तर घेतलं होतं. आता काय झालं म्हणून बघायला गेलो तर काहींच्या ब्यागा तुटल्या होत्या. हे विमान कंपनीवाले सामान काळजीपुर्वक हाताळत नाहीत आणि मग प्रवासाच्या सुरवातीलाच लोकांना त्रास सहन करावा लागतो. मंडळी सामानासहीत बाहेर आली तेव्हा तिकडे राम, क्रिष्णा, अमुल्यनाथ वैगेरे आमची वाट पाहत गाड्या घेवून सज्य होते. मंडळी गाडीत बसत असतानाच तिकडे आत्माचं विमान गुवाहाटीला उतरलं होतं. चला हा आला तर. तो आणि इरत सात मंडळी बाहेर यायच्या आत आमची वाहानं काझीरंगाच्या दिशेने निघाली होती.

गुवाहाटी काझीरंगा प्रवास सुरू झाला, हा प्रवास मी या आधी सुद्धा केला आहे. पण त्या वेळी जवळ जवळ काळोखातच सगळा रस्ता पार करावा लागला होता. आता दुपारच्या दोन सव्वादोन च्या सुमारास प्रवास सुरू झाल्याने किमान तीन तास तरी बाहेरचा देखावा दिसणार होता. आम्ही निघालो असा आत्माचा फोन आला......., व्वा...! म्हणजे आता आमच्या मध्ये फक्त पंधरा मिनिटांचंच अंतर होतं तर!  

वाटेतल्या तंदूरबार रेस्टॉरंट मध्ये चहासाठी थांबलो. आमच्या चहा होई पर्यंत आत्मा आणि मंडळी पोहोचतील असा कयास होता, पण पंधरा मिनिटात मंडळी पोहोचली तरी चहा तयार झाला नव्हता. बरं चहा आणायला हा असमला (आसाम नव्हे हा...!) गेला का? असा प्रश्न विचारायची सोय नव्हती कारण आम्ही खुद्द असम मध्येच होतो. आत्माला अचानक समोर पाहून मंडळी चकीत झाली. मी सोडून बाकीच्याना अत्मा इथे भेटेल असं वाटलं नव्हतं. सहलीवरचा पहिला चहा यायच्या आतच दुधात साखर पडली होती. पण तिथलं चहा पुराण संपेपर्यंत चक्क पंचेचाळीस मिनिटं गेली आणि अपेक्षेपेक्षा जास्त पैसेही.

आता संध्याकाळ दाटून यायला लागली. मात्र घड्याळात पाचच वाजले होते. आपल्या भारत देशाच्या अतीपुर्वेकडच्या भागातून आमचा प्रवास सुरू होता. जागो जागी खणलेले अरुंद रस्ते, धुळ यांचा सामना करत मजल दर मजल करणं सुरू होतं. आपल्याकडे रस्ते रुंदीकरणाचं काम चालतं, तसं इकडे रस्ते उंचीकरणाचं काम चालू होतं. पावसाळ्यात ब्रम्हपुत्रेला येणार्‍या महापुरात हे रस्ते पाण्याखाली जातात आणि संम्पर्क तुटतो म्हणून ही उंची करणाची मोहीम. आता पुर्ण काळोख झाला होता. पहाटे पाच पासून सुरू झालेल्या प्रवासामुळे अंग आंबून गेलं होतं. डोळे पेंगुळायला लागले होते. तेवढ्यात सगळ्या गाड्या थांबल्या. खुद्द आत्मा बरोबर असल्याने मी गाडी बाहेर पडलो नाही. पण मग सगळेच बाहेर पडलेले पाहून मी बाहेर आलो तर सगळे जण शहाळी खात होते. (असमीत शहाळ्याला डाब म्हणतात.) चला आणखी अर्धा तास जाणार तर. मंडळी गाडीत बसली, डोळ्यावरची झापडही दूर झाली, आता पुन्हा रिसॉर्ट कधी एकदाचं येतय म्हणून वाट पाहाणं सुरू झालं. ठिकठिकाणी हत्ती, वाघ, हरण रस्ता क्रॉस करत असेल तेव्हा गाडी जपून चालवा, त्यांना इजा पोहचवू नका असे बोर्ड लावलेले दिसत होते. उद्या सकाळची पहिली सफारी डोळ्यासमोर दिसू लागली. मन:पटलावर गेल्या वेळचं काझीरंगा सरकत असतानाच लॅंडमार्क वूड रिसॉर्टचा बोर्ड दिसला, गाडी मुख्य रस्ता सोडून कच्च्या रस्त्याला लागली, हे रिसॉर्ट कसं असेल? अशी उत्सुकता वाटत असतानाच कंदीलाची रोषणाई केलेला रिसॉर्टचा रस्ता लागला,  प्रशस्थ अशा त्या रिसॉर्ट समोर गाडी उभी राहिली. मंडळी खुशीत आली,  चला सुरूवात तर उत्तम झाली. उद्या पहाटे पाच वाजताच्या पहिल्या सफारीला जायला सर्वच उत्सूक होते. खरं म्हणजे उद्या सहलीला खरी सुरूवात होणार होती.

2 comments:

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates