मेघालय राज्यातलं मॉलिंयॉंग हे गाव पाहाण्यासाठी शिलॉंगपासून जावून येवून 120 कि.मी. अंतर पार केलं पण ते सार्थकी लागलं . शिलॉंग सोडल्यावर थोड्याच वेळात मेघालयाच्या नावात असलेले मेघ जमिनीवर उतरलेले दिसले. चहुकडे दाटून आलं,अ पण ते बरसले नाहीत. पुढे जाताच वातावरण पुन्हा निवळलं. रस्त्याच्या दुतर्फा विविध जातीची बांबूची बनं होती. पुर्वांचलात बांबूचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. मॉलिंयॉंग गाव यायच्या आधी रिवाई या गावात जिवंत पाळामुळांपासून (Living Roots Bridge) बनलेला पुल पाहायला गेलो. निसर्गाचा अद्भुत चमत्कार असाच तो पुल आहे. पुढे मॉलिंयॉंग हे मुख्य आकर्षण होतं. आशिया खंडातलं सर्वात स्वच्छ गाव म्हणून त्याची ख्याती आहे. अवघी शे-दिडशे वस्ती असलेलं हे खासी जमातीची वस्ती असलेलं गाव खरच खुप स्वच्छ आहे. ठिकठिकाणी बांबूच्या सुंदर टोपल्या कचरा पेटी म्हणून ठेवल्या होत्या. येणार्या पर्यटकाला त्या दिसाव्यात अशा ठेवल्या असल्या तरी त्या टोपल्या आणि आजूबाजूचा परिसर खुपच स्वच्छ होता. व्ह्यु पॉईंट म्हणून बनवलेलं उंचच उंच मचाण हे तिथल्या लोकांच्या कल्पकतेच निशाण होतं. जंगलात असलेल्या त्या मचाणावरून सभोवतालच्या रमणीय परिसर न्याहाळण्याची सोय होती. ब्रम्हपुत्रेचं खोरं आणि पलिकडे बांगलादेशचा भाग या मचाणावरून पाहता आला.
इथे हेंरी हा तिथला रहिवाशी आमचा वाटाड्या म्हणून हसत मुखाने हजर होता. त्याने ते गाव, तिथली घरं आम्हाला दाखवून आणली. वांबूचा वापर केलेलं सुंदर घर पहाणं हा एक अनुभव होता. डोनबोक ची छोटेखानी खानावळीत रुचकर जेवणाचा आस्वाद घेतल्यावर आम्ही त्या सुंदर गावाचा निरोप घेतला.
No comments:
Post a Comment