पुरातन ग्रामीण भारताचं दर्शन आजच्या काळात घ्यायचं असेल तर असम राज्यातल्या जोरहट जिल्ह्यातील माजूली या बेटावर गेलं पाहिजे. आमच्या पुर्वांचलच्या सहलीच हे मुख्य आकर्षण होतं. राहण्याची, खाण्या-जेवणाची सोय हेती पण ती कशा प्रकारची असेल अशी मनात शंका होती. पण ती कशीही असो माजूलीला जायला सगळेच उत्सूक होते. काझीरंगाहून जोरहटच्या दिशेने त्या प्रसन्न सकाळी निघालो तेव्हा आजूबाजूला आदल्या दिवशी पाहिलेले वन्यप्राणी दिसत होते, त्यांना डोळेभरून पाहाताना पुन्हा इकडे यायला हवं असच वाटत होतं. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा भाग संपला आणि रस्त्याच्या दुतर्फा चहाचे मळे लागले. सुखद गारवा आणि हिरवागार निसर्ग मन मोहून टाकत होता. बोखाक़ाट नंतर मुख्यरस्ता सोडून गाडी गावात शिरली, बाग बगीचा आणि स्वच्छ सुंदर गाव प्रवास सुखात चालला होता. थोड्याच वेळात गाडी ब्रम्हपुत्रेच्या काठावर येवून उभी राहिली. समोर समुद्रासारखा पसरलेला ब्रम्हपुत्रेचा प्रवाह दिसत होता, हा पार करूनच तर आम्हाला पलिकडे माजूली बेटावर जायचं होतं.
माजूली, 815 वर्ग कि.मी. चा हा द्वीप असम च्या जोरहट जिल्ह्यात येतो. वल्डॅ हेरिटेज साईट म्हणून माजूलीचा लवकरच समावेश होण्याची शक्यता आहे. ब्रम्हपुत्र नदी ने वेळोवेळी पात्र बदलल्यामुळे हा द्विप तयार झाला आहे. दोन्ही बाजूला समांतर वाहणार्या नदयांमधला प्रदेश म्हणजे माजूली. उत्तरेला ब्रम्हपुत्र आणि दक्षिणेला बुरिहिडींग अशा नदयांच्या मध्ये माजूली बेट वसले आहे. 1661 ते 1696 या काळात एकसारख्या होणार्या भुकंपांमुळे माजूली बेट निर्माण झालं. मुख्यभुमीला लागून असलेल्या जोरहट या ठिकाणी ब्रम्हपुत्रेच्या काठी आम्ही जेव्हा आलो तेव्हा आता आम्ही नेमके कुठे जाणार हे समजत नव्हतं. काठावरची ठिसूळ माती नुसती ढकलली तरी पाय घररून प्रवाहात पडायला होईल अशी परिस्थिती होती. माजूली बेटावर जायची एकमेव सोय म्हणजे तिथे असलेली फेरी बोट. दिवसातून फक्त दोन फेर्या दोन्ही काठादरम्यान होतात. पावसाळ्याचे चार महिने तर ही वाहतूही बंदच असते. तर अशाच एका बोटीमधून आमचा प्रवास सुरू झाला. मुलं, माणसं, सामान आणि जीप, मोटरसायकल अशी वाहनसुद्धा खचाखच भरली आणि बोट निघाली. बरं ही बोट किनार्याला लावण्यासाठी पक्का घाटही तिथे नव्हता. ठिसूळ मातीचा भाग सतत पाण्यात स्वाहा होत असल्याने बोटीतूनच आणलेले ओंडके काठावर टाकून रस्ता तयार केला जातो आणि बोट गेल्यावर काठ पुन्हा रिकामा होतो. ब्रम्हपुत्रेच्या खोल पण संथ प्रवाहामधून प्रवास सुरू झाला. जाताना साधारण पन्नास मिनीटात आटोपलेल्या या प्रवासाने परतीच्या वाटेत मात्र तब्बल दिड तास घेतला. वार्याची आणि पाण्याच्या प्रवाहाची दिशा हा वेळ ठरवत असते. दोन डिझेल इंजिनांचा आवाज आणि बोटीत शांतपणे बसलेली, उभी असलेली माणसं. बरिच गर्दी असली तरी गडबड गोंधळ असा कुठेच नव्हता. पलिकडच्या काठावर माजूली बेटावर पाय ठेवताच मात्र एका वेगळ्याच जगात आल्याचा भास झाला. अफाट पसरलेलं वाळवंट आणि बघावं तिकडे जाणार्या वाटा, आम्हाला घेवून निघालेली जीप स्वतःचा मार्ग शोधत निघाली होती आणि घुळीचे लोट गावभर फसरत होते.
वैष्णव पंथाचे संत शंकरदेव यांनी या बेटाला सोळाव्या शतकात भेट दिल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. त्यांनी त्या ठिकाणी अनेक मठांची स्थापना केली, या मठांना सत्र म्हटलं जातं. अशाच कमलाबारी सत्र, चामागुरी सत्र आणि नातून सत्र अशा तीन सत्रांना भेट दिली तेव्हा तेथील कलाप्रकार, लोक, त्यांचं रहाणीमान पाहून मन मोहून गेलं. आपल्या भारत देशातील प्राचीन संक़ृती या बेटावरील गावात अजून जपून ठेवलेली दिसते. माजूली बेटावर तिथलाच रहिवाशी असलेल्या तिरथ शर्मा बरोबर एक अख्खा दिवस आम्ही फेरफटका मारत होतो. श्री श्री उत्तर कमलाबारी सत्र या सत्रात जाण्यासाठी निघालो आणि एका प्रवाहावरून बांबूच्या पुलावरून जावं लागलं. पुर्वांचलात जागोजागी असे पुल दिसतात. हे बांबूचे पुल खरच भक्कम होते, माणसांबरोबरच मोटरसायकलची वाहतूकही सर्रास सुरू होती. 1673 साली थापन झालेल्या उत्तर कमलाबारी सत्रात गेल्यावर तिरथने संगीत कला अकादमी पुरस्कार प्राप्त अशा तिथल्या सत्राधिकार्याची ओळख करून दिली. त्या सत्रात राहाणारे सर्वचजण सन्यास घेतलेले आणि कृष्णालाच फक्त पुरूष मानणारे होते. डोक्यावर लांब केसांचा आंबाडा घातलेले अनेकजण तालवाद्य आणि नृत्याचा सराव करताना दिसत होते. तिथून बारा किलोमिटरवर असलेल्या चामागुरी सत्रात अनेक प्रकारचे मुखवटे बनवले आणि विकले जातात. बांबूच्या लगद्यापासून बनवलेले ते अप्रतिम मुखवटे धारण करून आम्ही फोटो काढले आणि अनपेक्षीतपणे त्याच घरातून चहाचे कप समोर आले. मनापासून झालेलं ते आदरातीथ्य आम्ही कधीही विसरू शकत नाही. इथल्या नमघर या गावी इथले सर्व लोक नाच-गाण्यासाठी एकत्र येतात इथल्या सत्रांमुळे हा भाग वैष्णव पंथीयांचं तिर्थक्षेत्र बनलं आहे. आज इथे चौविस सत्र चालू आहेत. इथल्या लोकांनी पुरातन नृत्य संकृती अजून जपून ठेवली आहे आणि त्याला आधुनीकतेच वारं अजून तरी लागलेलं नाही. इथे भगवान कृष्णाची आठवण म्हणून तीन दिवसांचा रास महोत्सव सजरा केला जातो.
शेती हा इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. इथे तयार होणार्या सिल्क ला जगभरातून मागणी असते. पुर्वीच्या काळी शेती, बागायतीने समृद्ध असलेला हा भाग आता मात्र तसा राहिलेला नाही. ब्रम्हपुत्रेनं बर्याच शेतजमिनीवर रेताड माती फिरवली. काझीरंगा वगळता पुर्वांचलाच्या इतरभागात अभावानेच दिसणारे पक्षी इथे मात्र मुबलक प्रमाणात आढळून आले. असं हे जैवविविधतेने नटलेलं सुदर बेट आणखी किती दिवस आपल्याला पहायला मिळेल याची शंका वाटते कारण या बेटाचा बराच भाग दरवर्षी पाण्याखाली जात आहे. अजून पर्यंत या बेटाचा तेहत्तीस टक्के भाग ब्रम्हपूत्रेचं भक्ष बनला असून आता दरवर्षी होणारी धुप लक्षात घेतली तर पुढील पंधरा-वीस वर्षात हे बेट पुर्णपणे नष्ट होवू शकतं.
No comments:
Post a Comment