कालच ‘
अवघा रंग एकचि झाला’
हे नाटक बघीतलं. बर्याच वर्षांनंतर संगीत नाटक बघायला गेलो होतो, गेल्या काही वर्षात संगीत नाटकाची परंपरा खंडीत झाल्यासारखी झाली होती. जुने कलाकार पडद्याआड गेले आणि नव्या पिढीला संगीत नाटक आवडेल की नाही किंवा जुनी संगीत नाटकं आताच्या काळानुरूप नसल्याने ती चालतील का? या साठमारीत प्रेक्षक संगीत नाटकांना मुकले होते, पण ‘
अवघा रंग एकचि झाला’
या नाटकाने ती उणीव भरून काढली असं नाटक पाहिल्यावर आपण नक्की म्हणू शकतो. किंबहूना जुनी आणि नवी पिढी यातला वैचारीक संघर्ष, जनरेशन गॅप, आणि मुळात स्वार्थी नसल्याने जमवून घेण्याची वृत्ती हाच या नाटकाचा मुळ गाभा आहे. जुनं ते सोनंच पण ते नव्या युगात मंडताना त्याला झाळाळी कशी प्राप्त होईल हे पाहिलं पाहिजे हा नव्या पिढीचा आग्रह शेवटी मान्य होतो.
 |
अमोल बावडेकर |
ग्लोबल खेड्यात आता जात, धर्म या गोष्टींना थारा नाही. माणसं मनाने एकत्र आली पाहिजेत मग भाषा, प्रांत, जात, देश यांची बंधनं तुटून पडतात आणि अशी जवळ आलेली माणसं गुण्यागोविंदाने एकत्र नांदू शकतात हा संदेश या नाटकाने दिला आहे.
प्रसाद सावकार, अमोल बावडेकर, गौतम मुर्डेश्वर, जान्हवी पणशीकर, रश्मी मोघे या सर्वांचेच अभिनय आणि गायकी यांना प्रेक्षकांची दाद मिळत राहते आणि नाटक उत्तरोत्तर रंगतच जातं. नाट्यसंपदाचं हे नाटकही यांच्या लौकीकाला शोभेलसच आहे. लवकरच या नाटकाचा तीनशेवा प्रयोग सादर होणार आहे. आपल्या जवळच्या नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग लागेल तेव्हा तो पहाच, आपल्याला एक सर्वांग सुंदर संगीत नाटक पाहिल्याचा आनंद नक्कीच मिळेल.