skip to main |
skip to sidebar

या वर्षी पावसाळा बराच काळ लांबला, युरोप बरोबरच आपल्या देशातील लेह-लडाख आणि श्रीनगर सारख्या उत्तरेकडच्या भागात तुफान हिमवर्षाव होऊन उच्चांक गाठला गेला. आता आणखी पुढे काय वाढून ठेवलय? जागतिक तापमान वाढ आणि त्याचे होणारे परिणाम या बद्दल आता जनसामान्यात देखील चर्चा होताना दिसते. प्रसार माध्यमातसुद्धा आता हा चर्चेचा विषय होऊन राहिला आहे. हे सर्व मुद्दे विचारात घेऊन पर्यावरण विषयक साहित्याला वाहिलेलं असं अनोखं साहित्य संमेलन पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांच्या पुढाकाराने दापोली येथे आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन १७ व १८ डिसेंबरला जालगाव-ब्राह्मणवाडी येथील ज्ञानप्रसाद मंगल कार्यालयात होईल. संमेलनाचे उद्घाटन १७ डिसेंबरला दुपारी ४ वाजता होईल. कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या नैसर्गिक साधनसंपत्ती विकास प्रकल्पाचे जी. वासुदेव हे उद्घाटक म्हणून लाभले आहेत. याच दिवशी जैवविविधता : स्वरूप आणि महत्त्व या विषयावर डॉ. प्रकाश गोळे यांचे बीजभाषण, पर्यावरणविषयक अनुबोधपटांच्या निर्मात्यांच्या मुलाखती, नव्या पुस्तकांची प्रकाशने व रात्री प्रबोधक अनुबोधपटांचे प्रदर्शन हे कार्यक्रम होतील. १८ ला पर्यावरण साहित्याचा आढावा, पर्यावरणविषयक पुस्तके, नियतकालिके, शैक्षणिक साहित्य, अनुबोधपट वाहिन्या, संकेतस्थळे आदींचा आढावा घेण्यात येईल. वृत्तपत्रातून सातत्याने पर्यावरण विषयक लेखन करणारे लोकसत्ताचे उपसंपादक श्री. अभिजित घोरपडे, गंगाजलचे श्री. विजय मुडशिंगीकर यांचाही या संमेलनात सहभाग असणार आहे. पर्यावरण हा आता केवळ तज्ज्ञांचाच विषय राहिला नसून सामान्य माणसांमध्येही त्याबद्दल जागृती निर्माण व्हावी असा या संमेलना मागचा उद्देश आहे.
नमस्कार नरेंद्रजी !
ReplyDeleteआपली भेट खरोखरच अनोखी होती !
आज लगेचच मी आपली वेबसाईट पहिली आणि खरोखरच थक्क झालो .
तुम्ही तिघेही खरोखर विलक्षण आहात . आपले फोटो तर अवर्णनीय असे आहेतच पण त्यामागची तुमची प्रेरणा , भावना आणि उत्कटता तसेच समर्पण लपून राहत नाहीत . आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो कि आपणाबरोबर काही क्षण घालवता आले .
आमचे तुम्हा सर्वांना आग्रहाचे आणि कायमचे निमंत्रण आहे कि आपण केव्हाही या बाजूला आलात ,
तरी निःसंकोचपणे आपल्या घरी यावे .
आपली e भेट होत राहिलंच .
- युवराज पेठे , दापोली
प्रिय युवराज, नमस्कार
ReplyDeleteआम्ही दापोलीला आलो आणि ध्यानामनात नसताना आम्हाला एक जीवाभावाचा दोस्त लाभला. आपण आणि आपल्या कुटूंबियांनी केलेल्या आदरतीथ्याने आम्ही भारावून गेलो आहोत. ओळखदेख नसताना सुद्धा दृढ मित्रत्वाच्या नात्याने आपण आम्हा मंडळींचं स्वागत केलत. मध्यरात्री आणि पहाटेच्या थंडीत आपल्या वडीलांनी
चहा,कॉफी,दूध याचा आग्रह केला, वस्तूंपेक्षा त्या मागचा जिव्हाळा मनात घर करून आहे. आभारी.
नरेंद्र प्रभू