कोणे एके काळी या भारतभूमीमधून सोन्याचा धूर निघत होता. प्रजा विशेषतः राजा गुण्यागोविंदाने नांदत होती. अयोध्येच्या रामापासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत असे अनेक प्रजाहितदक्षी राजे होऊन गेले. असं असलं तरी वारंवार या भरतभूमीवर परकीयांची आक्रमणं झाली, उद्देश मात्र एकमेव होता इथली संपत्ती लुटण्याचा. महंमद्द घोरी असो की बाबर सगळे आक्रमक आले ते इथला सोन्याचा धूर बघूनच. अगदी अलिकडच्या काळात आले ते गोर्या कातडीचे इंग्रज, व्यापाराचा बहाणा करून त्यानी नंतर या देशावर दिडशे वर्ष राज्य केलं ते इथली संपत्ती लुटण्यासाठीच. लाखो प्राणांची आहूती दिल्यावर आणि स्वातंत्र्य सैनिकानी सळोकीपळो करून सोडल्यावर ब्रिटीशांनी काढता पाय घेतला आणि स्वातंत्र्याचा उदय झाला. तरीही इथे सोन्याचा धूर निघतोच आहे. आणि लुटेरे ते सोनं लुटतच आहेत. पण आता लुटणारे इथलेच आहेत. दक्षिणेचा ‘राजा’ आणि उत्तरेचा ‘सिंग’ (मुलायम). लाखो कोटी लुटताहेत आणि पचवताहेत. कधी मधी पाणी थोडं डुचमळतं खाली सांडतं. थोडी गडबड होते. मग पुन्हा सगळं शांत... शांत. नवीन घोटाळ्याची चाहूल लागे पर्यंत. निर्लज्जपणाचा ‘आदर्श’ असा की चक्रवर्ती ‘अशोका’चं नाव धारण करणारा माजी चालक म्हणतो झाल्या त्या प्रशासकीय त्रूटी याला घोटाळा म्हणायचं नाही. नाही म्हणणार बाबा, घोटाळा = प्रशासकीय त्रूटी असा अर्थ असलेला नवा विश्व कोश निर्माण करा, सत्ता तर आपलीच आहे.
एकमात्र समाधान आहे, या भारतभूमी मधून अजूनही सोन्याचा धूर निघतो आहे. कित्येक परकीय लुटून गेले आता स्वकीयच लुटूत आहेत. गरिबाच्या तोंडचा घास हिरावला जात आहे.
No comments:
Post a Comment