‘पावसाळा’ नेहमीच मला गत स्मृतींमध्ये घेऊन जातो. सोसाट्याचा वारा आणि गर्जत येणारे
काळे ढग, विजांचा चकचकाट आणि मग कोसळणारा पाऊस. कोकणातला पाऊस असाच यायचा. यायचा असा की थांबायचं नाव घेत नसे. त्या पावसात
मग सगळेच चिंब होवून जात. ओहोळ, नद्या-नाले
ओसंडून वाहू लागत. ‘व्हाळाक पूर इलो...., बघूक येतस?’ असं विचारत मित्र यायचे आणि पावलं आपसूकच तिकडे वळायची. सगळीकडे झर्याचंच
साम्राज्य पसरायला लागायचं. घरासमोरची विहीर तुडूंब भरून वाहू लागे. एकदा का हा
पाऊस सुरू झाला की मग पुढचे चार महिने अगदी दिवाळी पर्यंत विहीर वाहतच असे.
आभाळ दाटून
येई तसा पाऊसही दाट पडायचा. चार-चार दिवस अविश्रांत पडायचा. शेतकरी आणि शाळेतली
आम्ही मुलं सगळेच पावसात चिंब होत असू. मुलांजवळ छत्री असूनही तो पाऊस छत्रीला
जुमानणारा नव्हता. शेतकर्याच्या डोक्यावर मात्र खोळ किंवा ‘इरलं’ (पानं आणि बांबू पासून बनवलेलं) असायचं. आमच्या शाळेच्या
वाटेवर चार ओहोळ होते. ते पार करून शाळेत जाणं म्हणजे काही वेळा खुप कठीण व्हायचं.
ओहोळावर असणार्या साकवांना खालून रोरावत येणारं पाणी वाकूल्या दाखवत स्पर्श
करायचं तेव्हा त्या साकवावर पाय ठेवायला मन धजावत नसे. रामेश्वराच्या देवळाजवळच्या
ओहोळाजवळ शांताराम राहायचा. अशा प्रसंगी तोच आम्हाला हाताला धरून साकव पार करून
द्यायचा. पुढे मग वाटभर पायाने पाणी उडवत, खेळत आम्ही शाळा गाठत असू.
पहिल्याच
पावसात जमीन हिरवीगार होवून जात असे. झाडाखाली तशाच पडून असणार्या काजूच्या
बियांना मग कोंब येत असत. डाब थोडा बाहेर आल्यावर ते खायला फार मजा येत असे.
शेवरी, अळंबी, तेरं, घोटाचे वेल, खडपं अळू, सुरण अशा रान भाज्या तरारून वर येत. फणसाच्या
घोट्या घालून आई त्याची सुरेख भाजी बनवायची. रानातल्या इतर फळांचा सुकाळ संपला तरी
पावसाळ्यात पेरूला लाल लाल पेरू लागायचे. बावल्याखडपात बांदीवर एक जगमाचं झाड
होतं. त्याला लागलेली जगमं काटे वाचवून काढावी लागत. घशाकडे जरा खेपणारी हे जगमं
हातात वाटोळी फिरवून मऊ करायची आणि मग खायची. थोड्याच दिवसात भिरमोळ्याचे वेल वर
झाडावर उंच चढायचे. मोठ्या झालेल्या वेलाचा अंदाज घेवून तो जमिनीत खणून काढला की
खाली असलेला कंद सोलून खायला मिळे. पावसाळा अर्ध्यावर आला की कोवळ्या चिंचा आणि
तोरंजन असा आंबट मेवा आमच्यासाठी तयारच असायचा. जाता जाता वाटेतच मिळणारं किती हे
धन? तिथली जमिनच आमच्यासाठी अन्नपुर्णा असायची.
पावसाळ्यात
शाळेला अचानक सुट्टी मिळायची, कधी काधी मग शाळा सुद्धा ‘पाव’शाळा होवून जायची, शाळेत गेल्या गेल्या एखाद दुसरा तास
घेवून शाळा सोडली जायची. श्रावण सोमवारी शाळा अर्धा दिवस असायची. नागपंचमी, गोकूळ
अष्टमी आणि चतुर्थीतर आम्ही महिनाभर साजरी करायचो. वाटेत असणार्या गणपतीच्या शाळा
या तर आमच्या शाळेनंतरच्या शाळा असायच्या. नागोबा किती तयार झाले. क्रिष्णाच्या मुर्ती
कोणाकोणाच्या? गणपलीला शेड काढून झाली, अशा बातम्या आम्ही गावभर पसरवत असू. श्रावणातच
आईला पुजेसाठी लागणारी पत्री, देवळाकडे उगवणार्या हिरव्यागार दुर्वा, गणपतीच्या
माटवीचं सामान, पावसाळ्यात येणारे सगळे सण अजून मनात ओलावा करून आहेत.
माध्यमीक
शाळा संपली, कॉलेज सुरू झालं, सावंतवाडीला आलो आता गावातला पाऊस दूर गेला.
सावंतवाडीत खुप पाऊस पडतो, पण तो मला आवडायचा नाही. गटार आणि रस्त्यावरचं पाणी
एकत्र व्हायचं, गावी तसं नसायचं. येता जाता डुलणारी शेतं दिसत नव्हती की गणपतीची
शाळा दिसत नव्हती. नळ्यांवर होणार्या आणि रात्रीच्या वेळी मला निजवणार्या पावसाच्या
आवाजाला पण मी पारखा झालो होतो. पुढे मुंबईला आल्यावर तेही दिवस गेले. इथला पाऊस
म्हणजे असून अडचण नसून खोळंबा या धरतीचा. मनात आठवणींची साठवण न करणारा. सव्वीस
जुलैचा पाऊस मात्र आठवतो पाण्याचीच भिती निर्माण करणारा.
खरं तर
पाऊस आपला मित्र आहे, सखा आहे. वरून अनंत असं पडणारं हे दान दोन्ही हातानी
स्विकारलं पाहिजे. पावसाची मजा घेतली पाहिजे. ट्रेनमध्ये, रस्त्यात अडवून ठेवणारा
पाऊसच हल्ली लक्षात राहातो. पण गावाकडचा पाऊस आठवला की वाटतं,
किती पडतो पाऊस
थेंबा थेंबांचा नगारा
कसा घेवू, कुठे ठेवू
त्याचा अफाट पसारा
किती पडतो पाऊस
झाडा पेडांचा आसरा
मुंग्या वारुळाच्यामध्ये
वर अळंब्याच्या गारा
किती पडतो पाऊस
शेत, रान झालं चिंब
वर फुटलासे पान्हा
आड गेले सुर्यबिंब
किती पडतो पाऊस
रानवेली झाल्या मत्त
दूर वाजतसे पावा
झाले चित्त प्रफुल्लीत
नरेंद्र प्रभू
पावसाळा
ReplyDeleteसुंदर आठवणींचा मोहळ येथे ओघळला आहे.
कविता खुपच छान आहे.
ReplyDelete