न्यू यॉर्क येथील
महाराष्ट्र मंडळाच्या ‘स्नेहदीप’ दिवाळी अंकात प्रसिद्ध
झालेला माझा लेख.
कोट्ट्याधीश पुल आपल्यात नाहीत असं ते
गेले तरी वाटत नाही, कारण ते मराठी माणसाला जेव्हापासून माहित झाले त्यानंतर ते
सतत भेटतच राहीले. मार्मिक कोट्या
आणि नर्म विनोद ही पुलंची हातोटी
असल्याने कुणीही कोटी केली किंवा आपल्याला एखादी कोटी सुचली तरी त्या बरोबरच
पुलंची हमखास आठवण येते. आपण ऎकलेल्या कोटी बरोबरच पुलंनी केलेल्या अनेक कोट्या
आठवतात आणि आपण हसत सुटतो. विनोदबुद्धी, शब्दावर प्रभूत्व आणि हजरजबाबीपणा असल्यामुळे
पुल कोट्या करायचे आणि लोक त्याना दाद
द्यायचे.
या कोट्यांबरोबरच भेटलेल्या माणसांमधले
बारकावे, त्यांची देहबोली, बोलणं आणि स्वभाव यांचं पुलंनी केलेलं निरिक्षण
अफलातूनच होतं. तरी बरं पुल रत्नागीरीच्या अंतू बर्व्या पर्यंतच पोहोचले जर ते
पुढे मालवणात गेले असते तर त्याना ‘व्यक्ती आणि वल्ली’ चे शंभर भाग काढावे लागले असते एवढे बर...वे..., कर...वे,
बाग...वे, नाग...वे पुलंना वे बाय वे (रस्तो रस्ती हो) भेटतच गेले असते. आमचा
कोकणी खास करून मालवणी माणूस हा दुसर्याची टोपी उडवणं हा आपला जन्मसिद्ध हक्कच आहे
असं मानत आला आहे. आपल्या अंगावर फाटके कपडे असले तरी दुसर्याच्या टोप्या उडवणं
हा त्याचा आणखी एक स्वभाव धर्म आहे.
तळ कोकणात तिठ्या तिठ्यावर आणि चव्हट्या
चव्ह्याट्यावर (अजून त्या ठिकाणांचं नामकरण त्रिपाठी किंवा चौपाठी चौक असं झालेलं
नाही, येत्या निवडणूकीपुर्वी कदाचीत दादा, भाई किंवा बाई ते आश्वासन देतील की काय
अशी मात्र साधार भिती वाटते.) अशी माणसं गिर्हाईकं हेरत बसलेली असतात. काही तर
सायकलवरून जाता जाता दिसेल त्याची टोपी
उडवत जातात. इथली माणसं घाटावरच्या माणसांसारखी
प्रत्यक्ष टोपी घालत नसली तरी उडवणार्याला ती दिसतच असते. असाच एक देवचार मालवणात सायकल वरून फिरत होता. लांब
गडग्यावर ( गडगा म्हणजे मराठीत कंपाउंड
वॉल) बाबल्या पेपर वाचत बसला होता. मी माझ्या मित्रासोबत सिधुदुर्ग किल्ल्यावर
जायच्या गडबडीत झपझप चाललो होतो. पण त्या काही क्षणात त्या देवचार आणि
बाबल्यामध्ये जे संवाद झाले ते असे:
देवचार: कायरे बाबल्या आज पेपर वाचतस की
काय? (माणूस समोर काय करतोय ते दिसत असूनही त्याला खोचक पण प्रश्न विचारणे हा त्याचा
आणखी एक स्वभाव धर्म.)
बाबलो: होय तर, हो बग आज पासून ‘लोकमत’ नविन पेपर सुरू
झालोहा, एका रुपयात कितकी पाना बग. आणि हो फोटो बग केदो मोठो.
बाबल्याला लोकमतच्या सिंधुदुर्ग
आवृत्तीचं मनोमन कौतून वाटत होतं. देवचाराची प्रतिक्रीया पहायला मला वेळ नव्हता.
आम्ही तसेच पुढे निघून गेलो. दोन-अडीज तासांनी किल्ल्यावरून आम्ही परतलो तरी
बाबल्या त्याच ठिकाणी बसून आल्यागेल्या माणसाला
लोकमतचं कौतूक सांगत होता. तेवढ्यात तो देवचार पुन्हा सायकलवरून आला बाबल्याच
लोकमत कौतूक चालूच होत ते पाहून त्याने विचारलं “काय रे बाबल्या उद्याचो लोकमत व्हयो? बाबल्या कसंनुसं हसला
आणि लोक मात्र खोखो हसत सुटले. त्या दिवसापुरतं तरी ‘लोकमत’ देवचाराने जिंकलं
होतं.
अशी इरसाल माणसं कोकणात भेटतच रहातात आता
हे बापूच बघा ना. बापूंचं घर मुंबई गोवा
महामार्गाला लागून. हे त्यांचं जुन्यापद्धतीच माडीचं घर, पार
स्वातंत्र्यापुर्वीचं. हायवे झाला त्या आधीपासूनचं. त्या मुळे आता ते महामार्गाला
जरा खेटूनच उभं आहे. घराशेजारच्या जागेवर बापूंचा पुर्वीचा मांगर होता (गुरांचा
गोठा). गायी-गुरं विकल्यावर बापूंनी तिथे एक चाळ बांधली, पुढच्या बाजूला दुकानांसाठीचे
गाळे आणि मागच्या बाजूला भाड्याने देण्यासाठी दोन-दोन खोल्या. शेती सोडल्यावर
त्यांचा संसाराला तेवढाच हातभार.
रस्त्याला लागूनच घर असल्याने शाळेतल्या
शिक्षकांना किंवा नोकरदार वर्गाला बापूंच्या जागा भाड्याने राहाण्यासाठी सोईच्या
होत्या, तीच गोष्ट व्यवसाय करणार्यांचीही. असाच एक दिवस दुपार टळून गेल्यावर मी
बापूंकडे पोहोचलो. बापू माझी आणि आतून येणार्या चहाची वाट पहात आरामखुर्चीत
पहूडले होते. एवढ्यात एक गृहस्थ घाई-घाईत बांपूंच्या ओट्यावर येऊन दाखल झाले.
“कोण बॉ ?” बापूंचा प्रश्न,
तो: “नाय, भाड्याने जागा होई होती”
बापू: ”खयची? रवाची काय गाळ्याची?”
तो: ”गाळ्याची”
बापू: ”कसला दुकान टाकतात?”
तो: ”दुकान नाय, मी डॉक्टर आसय”
बापू: ”होय, माका वाटला दुकान...”
”.....”
बापू: “आमच्याकडे भाड्याक एक डॉक्टर आसत, ‘रोगी मारण्यात
पटाईत’, तुमी कसले?” (आर. एम. पी.
म्हणजे Registered Medical Practitioner त्यालाच बापू ‘रोगी मारण्यात पटाईत’ म्हणत होते.)
तो: ”आर. एम. पीच”
बापू: ”हो.....!, मग ते एक असताना तुमी कित्या आणखी?”
”......”
बापू: ”दुसरा कायतरी करा...!”
तो माणूस उठून गेला.
मी बापूना म्हटलं, “करेना होता का तो व्यवसाय,
तुम्हाला भाडं मिळालं असतं ना?”
“अरे, मेलो हो पण आर. एम. पीच, भाडा खयसून देतोलो?
माय..........” बापूनी एक जोरदार शिवी हासडली.
बापूना समोर आलेला चहा रोजच्यापेक्षा गोड
लागला असावा.
आजचा आघाडीचे संगीतकार कौशल इनामदार,
त्यांच्या बाबतीत घडलेला हा रत्नागीरीचा किस्सा. अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन
रत्नागिरीला भरलं होतं तेव्हाची गोष्ट. त्या संमेलनाच्या पुर्वसंधेला मराठी अभिमान
गीताचं सामुहीक गायन रत्नागिरीतल्या शांळांमधली मुलं एकत्र येवून करणार होती. कौशल
इनामदार त्यासाठी मुद्दामहून रत्नागिरीत दाखल झाले होते. गुळगुळीत दाढी करावी आणि
जरा फ़्रेश होवून कार्यक्रमाला जावं म्हणून ते तिथल्या एका सलून मध्ये गेले. त्या
हुशार न्हाव्याने हा माणूस बाहेरून आला आहे हे हेरून विचारलं, काय संमेलनाला का? कौशलनी हो म्हणताच तो पुढे म्हणाला “नुसती संमेलन कसली
करताय, आज ते ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे गाणं हजारो मुलं गाणार आहेत ते बघायला स्टेडीयम वर जा,
आणि ते गाणं तुम्ही पण म्हणा.” सलूनमध्ये आलेल्या अनोळखी गिर्हाईकाला असा सल्ला तो कोकणी
न्हावीच देवू शकतो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा मुंबईत
येऊन गेले त्यावेळचा हा किस्सा. ओबामा आले आणि त्यानी सर्वच मुंबईकरांची मनं
जिंकली. जगातील एकमेव महासत्ता असलेल्या देशाचा प्रमुख असूनही कसलीच प्रौढी त्यानी
मिरवली नाही. ज्यांना ओबामांची प्रत्यक्ष
भेट लाभली ते खरच सुदैवी म्हटले पाहिजेत. चौपाटीवरच्या मणीभवनची ओबामांची
भेट गाजली. पण त्या आधी त्याच मणीभवन मध्ये एक नाट्य रंगलं होतं. मणीभवन मध्ये
ओबामा येणार म्हणून अमेरिकन अधिकारी तिकडे गेले. ओबामा आल्यावर कोणी कुठे किती
अंशाच्या कोनात वाकून उभं रहायचं, काय करायचं, काय बोलायचं याच्या सुचना दिल्या
जात होत्या. तिथल्या वाचनालयात ते अधिकारी गेल्यावर एक गांधीवादी मात्र म्हणाला हे
जमणार नाही. अधिकारी चक्रावले. का? असं आवासून त्यानी विचारलं तेव्हा “
मला माझ्या पुर्व
नियोजीत कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाला येता येईल असं वाटत नाही”
असं तो गांधीवादी
म्हणाला. अधिक चौकशी केल्यावर समजलं की त्या जेष्ठ गांचीवाद्याने कोकणकन्या
एक्सप्रेसचं तिकिट काढलं होतं आणि भेटीच्या आदल्या रात्री त्यांना कोकणकन्याने कोकणात
जायचं होतं. प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी आपला गावीजायचा बेत न बदलणारा हा माणूस पुलंच्या
अंतु बर्व्याच्याच गावचा. उभी हयात मुंबईत काढली तरी गावावर मनापासून प्रेम
करणारा. त्याला महत्त्वाचं
काय? ओबामांची
भेट की मोठय़ा मुश्किलीने मिळालेले कोकणकन्या एक्स्प्रेसचे तिकीट? त्याने
महासत्तेच्या अधिपतीचे भेट न घेता आपलं गाव गाठणं अधिक पसंत केलं.
अशी माणसं भेटली किंवा त्यांचे किस्से
ऎकले की पुलंची हमखास आठवण येते आणि पुलं या रुपात भेटतच राहातात.
नरेंद्र प्रभू