‘मी आणि नथूराम’ हे. शरद पोंक्षेंचं चटका लावणारं पुस्तक वाचायला घेतलं आणि एखाद्या कलाकाराने एका भूमिकेसाठी
किती सोसावं याचं आश्चर्य वाटलं. वीस वर्षाच्या कालावधीत ज्या घटना घडत होत्या
त्या, त्या त्या वेळी वाचनात येत होत्या पण त्याचं कलाकारानेच
केलेलं एकत्रित कथन वाचताना अंगावर काटा उभा राहतो. एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या
नावाखाली नाटक सिनेमातून खोटेपणाचा कळस होत असताना दुसरीकडे सत्य कथन बळजबरीने बंद
पाडणं, जाळपोळ आणि जीवघेणे हल्ले करणं असे प्रकार सर्रास सुरू
होते. आणि या सगळ्याशी झुंज देत हा कलाकार आपलं काम कसं करत राहीला हे वाचताना
अनेकदा कंठ दाटून येतो. जीवावर उदार होत, दुष्ट प्रवृत्तीचा सामना करत, प्रचंड अपमान आणि हाल सहन करत नथूराम जगवला,
‘मी नथूराम गोडसे
बोलतोय’ हे नाटक मी तीन वेळा पाहीलं. शिवाजी मंदिरचा तिसरा प्रयोग, नंतर बंदी उठल्यावरचा पार्ल्यातला दीनानाथ मधला प्रयोग आणि शेवटी नाटक बंद
होतय असं समजलं तेव्हा ‘हे राम नथूराम’ पुन्हा एकदा दीनानाथलाच. एक
नाटक नव्हे तर प्रत्यक्ष घटनाच समोर घडत आहे एवढा जिवंत अभिनय मराठी रंगभूमीवर पहायला
मिळणं याला सुद्धा भाग्य लागतं.
नथूराम नाटकासाठी श्री. शरद पोंक्षेंनी जे भोगलं त्याला तोड
नाही. ज्यांना काहीतरी अस्सल वाचायचं असेल त्यानी हे पुस्तक विकत घेऊन वाचावं आणि संग्रही
ठेवावं. शब्दांमृत प्रकाशनाने हा निखारा वाचकाच्या हाती ठेवला म्हणून त्यांचंही अभिनंदन!