14 July, 2021

जागेपणीचं स्वप्न




कितीही अंधार दाटला तरी उजाडायचं रहात नाही. एका खळाळत्या प्रवाहाच्या बाजूला आमची बस थांबली होती. डोळ्यावर झोप आरूढ असल्याने मंडळी अजून पेंगतच होती. “चला चहाला उतरणार का?” आत्माराम परबांचा आग्रहाचा प्रश्न आला आणि डोळे किलकिले करून पाहिलं पण बाहेर पावसाळी वातावरण असल्याने किती वाजले असतील याचा अंदाज येत नव्हता. वेग कमी झाला आणि थांबावं लागलं तर आपण हालचाल केली पाहिजे; म्हणून आळोखेपिळोखे देत उठलो. हळू हळू सगळेच खाली उतरले. झोंबणारी पावसाळी थंडी आणि हवेतला ताजेपणा मरगळ दूर करता झाला, चहाची चुसकी अधिकच बहार आणून गेली. निर्झर, झाडं आणि झुडूपं हे मला नवीन नसलं तरी इथला नजारा वेगळाच होता. हिमालयाची मजा काही औरच आहे. सुचीपर्णी वृक्षांची गर्दी पाहिली आणि देवभूमीत आल्याचा आनंद वाटायला लागला.

कालच्या त्या वयोवृद्ध बाई एकट्याच उभ्या दिसल्या. आता मात्र यांना कुठेतरी पाहिल्याचा भास झाला. मग लक्षात आलं की याना प्रदर्शनातच पाहिलं होतं. इतर टूर कंपन्यांनी त्याना वयाचा विचार करून लडाखला न्यायला नकार दिला होता आणि “तुम्ही मला न्याल का? माझ्या एका पायाला चालताना त्रास होतो.” असं त्या तिथे आत्मारामना विचारत होत्या, हे ही आठवलं. जोखिम पत्करून आत्मारामनी त्याना टूरवर आणलं होतं आणि त्याही जिद्दीने एकट्याच आल्या होत्या. एवढं असून कालच्या त्या प्रसंगाने त्याना एकटं पाडलं होतं. “चहा झाला का? हवं तर आणखी एक घ्या” मी त्याना बोलतं करण्याचा प्रयत्न म्हणून म्हटलं. “नको चहा आणखी नको, किती छान आहे ना सगळं?” त्यांनी सभोवार पाहात म्हटलं. एक निर्मळ हास्य केलं. एवढंच पुरे असं मनात म्हणून मी दूर झालो. चाहाचा मुक्काम हलला आणि गाडीने पुन्हा वेग घेतला.

थोड्याच वेळात कुल्लूला आलो आता तासाभरात मनालीला पोचणार असं वाटलं. वेडीवाकड्या वळाणांचा रस्ता, एका बाजूला पहाड, दुसर्‍या बाजूला रोरावत जाणारी व्यास नदी आणि पावसाळी कुंद, थंड हवा, रस्त्याच्या दुतर्फा सफरचंदांनी लगडलेली झाडं, अनेकरंगी टपोरी फुलं झेलत डोलणारी फुलझाडं, पावसात आसरा शोधणारी चिमणी पाखरं, दोन डोळे किती पहाणार? आत्मारामनी बसच्या केबिनमध्ये बोलावलं मग पुढचा प्रवास तिथे बसूनच केला. पुढे झालेल्या लाडाची ही सुरूवात होती. वेळेचं भान विसरून निसर्गात रमून गेलो होतो, तोंडातून अवाक्षर न काढता न्याहाळणं चालू होतं. मनाली यायची तेव्हा आलीच. 

न्याहारी आणि थोड्या विश्रांतीनंतर मनालीच्या मॉल रोडवर आत्माराम आम्हाला घेवून गेले. पावसाची रिपरीप चालूच होती, इथेच एवढी थंडी तर वर काय असेल? म्हणून सगळ्यानीच गरम कपड्यांची खरेदी केली. मध्येच कोडॅकचं दुकान लागलं तिकडे आत्माराम दिसले. 

हॉटेलमध्ये आल्यावर पाहिलं तर आत्माराम त्या बाबांना Kodak KB 10 नवा कोरा कॅमेरा देताना दिसले. आत्मारामनी त्या बाबांचा विरस आणि बाईंचं ओशाळलेपण दोघावरही स्वत:चा  खिसा हलका करून उपाय केला होता. त्याची चर्चाही वेगवेगळ्या प्रकारे होत राहिली. 

हिडींबा मंदीर, मनू मंदीर, वशिष्ट मंदीर आणि गरम पाण्याचं कुंड हे पावसातच केलं आणि सोलॉन्ग व्हाली पावसात सो... लॉन्ग असल्याने तिकडे ना फिरकताही तो दिवसा साजरा झाला. दुसर्‍या दिवशीची सकाळ लख्ख उन्हात न्हावून निघाला होती आणि काल दुरून पाहिलेला रोहतांग पास आता जवळ येणार होता. खरं तर त्याही पलिकडे आपण जाणार आहोत म्हणून आम्ही खुप उत्सूक झालो होतो. विधीवत नारळ वाढवून प्रवासाला सुरूवात झाली. तेव्हा माहित नव्हतं ही वाट सरावाची होणार आहे. आयुष्यात एखाद्या वाटेवर पाऊल पडतं आणि मग तीच वाट कधी कधी पायाखालची होवून जाते. हिमालयात फिरण्यासारखं दुसरं सुख नाही. क्रमशा...


कसे जुळाले बंध कळेना 
तुरा एकेक सफरीचा 
कुणास ठावूक कुठल्या वाटा
वेध घेती हृदयाचा 











13 July, 2021

‘क्यामेरा’ क्या तेरा


मी, नितीन किर, सागर कर्णीक आणि डॉ. रमेश मडव (छायाचित्र : विलास आम्ब्रे)


चालती ट्रेन थांबूच नये; ती पळतच रहावी असं जरी आपल्याला वाटत असलं तरी मधल्या स्टेशनवर ती थांबतेच. आमची पश्चिम एक्स्प्रेसही बोरिवली स्टेशनवर थांबली. ए.सी.३ टायरच्या त्या बोगीत आम्हा मित्रांना आतल्या बाजूच्या ६ सीट मिळाल्या होत्या. बाजुच्या दोन सीटवर एक लेकुरवाळी बेरिवलीला येऊन बसली. तीच्याबरोबर बरंच सामान आणि वर्षाच्या आतलं एक बाळ व ५-६ वर्षांचा एक मुलगाही होता. बाहेर बहुतेक तीचे वडील तीला बसवून द्यायला आले होते. आमच्या सीटवर कुटूंब असतं तर बरं झालं असतं अश्या नजरेचा एक कटाक्ष टाकून तीला अनेक सुचना देऊन हात हलवेपर्यंत गाडी सुटली. गाडीने वेग घेतला तसा हळूहळू आमच्या गप्पांनांही सूर सापडला. हसणं खिदळणं चालू झालं, आत्माराम परबही आमच्यात येवून बसले आणि गप्पांचा ओघ नव्या जोमाने सुरू राहिला. त्या बाईने समोरच्या सीट्खाली आपलं सामान लावलं, त्यात एक निळ्या रंगाचा पिव्हिसीचा ड्रम होता. तो सारखा लुडबूड करू लागला, त्याला मग इरत सामानाचा आधार देऊन तीने स्थिर केला. आम्ही ते पहात होतो, ‘ड्रम मध्ये माल भरलाय’ कुणीतरी म्हणालं. अशावेळी मुड एवढा लाईट असतो की छोटसं कारण मिळालं तरी आपण हसत सुटतो. तेव्हा ही तसंच झालं. त्या बाईला वाटलं की आमचं त्या ड्रमवर लक्ष आहे. थोड्या वेळाने ती फ्रेश व्हायला म्हणून उठली मोठ्या मुलाला सामानाकडे लक्ष देण्यास सांगून ती निघाली आणि लगेचच परत येवून त्या ड्रमच्या झाकणाकडची बाजू आतल्या बाजूला करून आणि आमच्याकडे एक नजर टाकून निघून गेली. कुणीतरी त्या मुलाला नाव विचारलं, कुठे जाणार वैगेरे चौकशी करुन त्या ड्रममध्ये काय आहे? असा प्रश्न केला. त्याने लाडू इत्यादी फराळाची नावं सांगितली. आम्हाला देशील का? विचारलं. तो थोडा सावध झाला. ड्रमला पाय लावून बसला. आम्ही पुन्हा गप्पांत रंगून गेलो. दुपारनंतर थोडी शांतता पसरली, गाडी वेगाने चालली होती, तेव्हढ्यात त्या ड्रमने जागा सोडली आणि तो वाटेत येऊन लुडबडू लागला. कुंटूंब पेंगत होतं. आमच्यापैकी कुणीतरी तो ड्रम आत ढकलताना झाकण बाहेरच्या बाजूला राहील याची काळजी घेतली, हास्याची एक लकेर घेऊन पुन्हा नव्या विषयाकडे गप्पा वळल्या. थोड्या वेळाने ती लेकुरवाळी उठून बसली, ड्रम थोडा बाहेर आला होता. तो आत ढकलताना झाकणाची बाजू बाहेर पाहून ती चमकली. आमच्याकडे संशयी नजर टाकून तीने तो ड्रम तसाच आत ढकलला. ती ची चुळबूळ चालूच होती. मग तीने सरळ उठून ड्रम उभा केला आणि उघडून पाहू लागली. आमच्याही नजरा तिकडे वळल्या. आत बराच फराळ भरलेला होता, तो शाबूत होता हे पाहून ती शांत झाली. तुम्ही काय अगदीच टपोरी नाही अशा अर्थाने आमच्यावर नजर फिरवून ती बाळाला मांडीवर घेवून खिडकी बाहेर पाहात असतानाच पुन्हा ड्रम जागा सोडून इकडे तिकडे जाऊ लागला आता ते धुड आत रेटायचं काम आम्हीच करू लागलो, त्याची मालकीण हालायची तसदीही घेत नव्हती. 

दुसर्‍या दिवशी सोनिपत, पानीपत करत गाडी अंबाल्याला पोहोचली, आम्हाला इथेच उतरायचं होतं. उतरलो आणि चढ-उतर करून एक नंबर प्लॅटफ़ॉर्मवर आलो. आता कुठे जायचं! गेटवर दोन टीसी आणि खुप सामान घेतलेला एक माणूस दिसला, बघतो तर काय ते आत्माराम परबच होते, पाठीवर मोठी ट्रेकिंग सॅक, पुढे छोटी सॅक, दोन्ही खांद्यांना चार पिशव्या, ट्रेकिंगच्या आकड्याने ते सगळं अडकवलं होतं पठ्ठ्याने. साक्षात सुसाईड बॉम्बर! याला पाहून कुणालाही चार हत्तींचं बळ येईल. आम्हाला ते पाहिजेच होतं. कारण आम्ही लडाखला चाललो होतो, लडाखला... 

चंदीगढमधल्या एका हॉटेलमध्ये त्यानी आमची थोडा आराम आणि फ्रेश होण्यासाठी सोय केली होती. बस तिथे पोहोचताच चार-चार जणांना मिळून एक रुम देण्यात आली. सगळेजण पांगले. तासा-दिड-तासाने हॉटेलमधल्या एका हॉलमध्ये सर्वांना एकत्र बोलावण्यात आलं. ४०-४२ जणांचा गृप होता. ओळख करून द्यायचा कार्यक्रम झाला, मग पुढील प्रवासाविषयी सुचना दिल्या गेल्या. (ओळखपरेड मधली परब आणि प्रभू ही दोनच नावं आणि बरोबर मडव, आम्ब्रे, किर ही नावं सोडून बाकीची मला सोडून पुन्हा आपल्या जागी गेली होती.) तीन टूर लिडर होते स्वत: आत्माराम परब, सागर सावंत आणि कौस्तूभ उपाध्ये. आता पंधरा मिनिटात निघायाचं आहे तेव्हा सगळ्यांनी बॅगा घेऊन खाली या, या सुचनेबरहुकूम मंडळी रिसेप्शनला जमली. आपण कुठेही गेलो किंवा जमलो की या पृथ्वी तलावर फक्त आपणच आहोत आणि समोरच्याला मोठ्या आवाजातलंच समजतं अशा प्रकारे आपलं बोलणं असतं, तसं ते चालू होतं, पण स्वर भांडणाचा नव्हता. गप्पाच चालल्या होत्या, आम्हीही त्यात सामिल होतो. काल ट्रेनमध्ये बसल्यापासून अखंड बडबड करून आमचं समाधान झालं नव्हतं. जणू उद्यापासून सहल संपेपर्यत मौनव्रत असल्याने आत्ताच कोटा पुर्ण करायचा होता. (शाळेत असताना वर्गात केलेली बडबड मला इथे आठवते, कुणाबरोबरही बसवा मी बोलायचोच, शेवटी वर्ग शिक्षकानी मला मुलींमध्ये बसवला, तर मी त्यांनाही बोलतं केलं होतं. असो.)                                               

भांडणाचा स्वर नव्हता असं मला वाटलं तरी थोड्यावेळाने तो ऐकू यायला लागला. आई-बाबा आणि मुलगा असं युनीट असलेल्यात त्या दोन तासांसाठी आणखी एका ७३ वर्षांच्या बाईं अशी चार जणांना मिळून एक खोली दिली होती. आणि त्या बाबांचं म्हणणं होतं की त्या त्रयस्थ बाईने दार उघडं टाकल्याने त्यांचा कॅमेरा चोरीला गेला होता. त्या बाईंना घालून पाडून बोलल्यावर तक्रार आत्माराम परबांकडे केली जात होती. दुसर्‍यांच्या भांडणात खुपच रस असल्याने मघापासून चाललेली गडबड शांत झाली आणि जो तो विषय समजून घेण्याची धडपड करू लागला. त्या वयोवृद्ध बाई रडवेल्या झाल्या होत्या. बाबामहाराज ऐकायला तयार नव्हते. आता कॅमेरा तर गेला इथे थांबून काय होणार असं म्हणून आत्माराम परबांनी सगळ्यांना बसमध्ये बसण्याची सुचना केली. हे म्हणजे गणेश पुजेलाच कुसका नारळ निघाला अशी आत्माराम परबांची चर्या झाली काय? अशी मालवणी शंका मला आली.      

‘तसं नाही कॅमेरा माझा नव्हता, मी मित्राचा या सहलीपुरता आणला होता आता त्याला काय सांगू?’ त्यांची अखंड चिडचिड आणि त्या बाईंचं ओशाळलेपण घेऊनच बसने चंदिगढ सोडलं. शेवटी सगळ्यांनीच दुर्लक्ष केल्याने त्यांचा स्वर मंदावत गेला. बाहेर दिवेलागण होत होती मात्र आतला अंधार संपायला तयार नव्हता.  क्रमशा...

अंधार सगळे व्यापण्या
रात्र काळी येतसे, पण
काळोख मनीचा खोल तो
उदयासही लावी पीसे



12 July, 2021

मुक्काम तर येणारच


वर्तमानपत्रात होतकरुंसाठी चार ओळींचा मजकूर छापायचे ते दिवस होते. लोकसत्तामध्ये अशीच एक बातमी वाचून प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीत लडाखवरचं छायाचित्रं प्रदर्शन पहायला वाकडी वाट करून मी गेलो होतो. चार-पाच फोटोग्राफरचं असलेलं ते प्रदर्शन पहातानाच लक्षात आलं की हा आत्माराम परब म्हणून जो कुणी आहे तोच यातला खरा ‘राम’आहे. तशी तिथे सगळ्यावर पकड असलेला एक तरूण पाहून मात्र हा ‘आत्माराम’ असावा असं वाटत नव्हतं, कुणीतरी वयस्क असेल असं वाटलं होतं. चौकशी केल्यावर मात्र ‘तो’ हाच आहे असं समजलं. प्रदर्शन पाहून घरी आलो. दुसर्‍यादिवशीच्या कामाच्या रगाड्यातही आदल्यादिवशी पाहिलेलं प्रदर्शन विसरता येत नव्हतं. पुन्हा तिकडे गेलो. प्रदर्शन डोळेभरून पाहिलं आणि लडाखला जायची तिव्र इच्छा झाली. आत्माराम परबांचा सहकारी अनिल (तो आपली ओळख अणिल अशी करून देत होता.) सवाने याच्याजवळ प्रार्थमिक चौकशी केल्यावर आणि लडाखला जायचं आहे म्हटल्याबरोबर त्याने माझी आत्माराम परबांशी गाठ घालून दिली. त्यावर्षी २००६ सालच्या ऑगष्टची सहल नक्की केली. फोन नंबरची देवघेव केली आणि जुलैपर्यंत मनात लडाखला जायचे मांडे खात बसलो. जुलैमध्ये त्यांचा फोन आला आणि ते जुलैच्या बॅचला यायचं सुचवू लागले. ऑगष्टची सहल रद्द झाली होती आणि मला जुलैची तारीख चालणार नव्हती.  

पुन्हा डिसेंबर महिन्यात लोकसत्तामध्ये ‘गोठलेलं लडाख’ हा आत्माराम परबांचा लेख छापून आला आणि तो वाचून परत एकदा लडाखने उसळी घेतली. मग मार्चमध्ये २००७ मध्ये पुन्हा एकदा पु. ल. देशपांडे कला अकादमीत आत्माराम परबांचं  लडाखवरचं छायाचित्रं प्रदर्शन लागलं. लगोलग मी प्रभादेवी गाठली. बोलणं झालं, २५ जुलै २००७ ची सहल नक्की केली, प्रार्थमिक रकमेचा चेक दिला. काही दिवसानंतर लडाखची माहिती काढता काढता काही शंका मनात आल्या त्याचं निवारण करण्यासाठी आत्माराम परबांची भेट मागितली. ज्यादिवशीची वेळ ठरली त्याचं दिवशी मला एका लग्नाच्या रिसेप्शनला जावं लागलं ते अर्धवट आटोपून मी सांताकृझहून मुलूंडला निघालो. परबांच्या घरी जयला उशीरच होणार होता. रात्रीचे दहा वाजून गेले होते. मग पुन्हा फोन करून एवढ्या उशीरा आलो तर चालेलं का? असं विचारलं ते हो म्हणाले आणि १०.३० च्या दरम्याने त्यांच्या घरी पोहोचलो. साहेब घरी नव्हतेच! ११ वाजायच्या दरम्यान ते प्रकटले आणि मी थोडक्यात शंका निरसन करून घेतलं. त्यांची बॅग भरण्याची तयारी चालू झाली तेव्हा विचारल्यावर समजलं की दुसर्‍याच दिवशी पहाटे ते लडाखला टूर घेवून निघणार होते, नुकतेच केस कापून आले होते. म्हणजे मी झोप मोड केली नाही तर, या समाधानात मी त्यांचा निरोप घेतला. 

जुलै महिना जवळ आला तशी मी लडाखला जातोय ही बातमी विलास आम्ब्रे, नितीन किर, डॉ. रमेश मडव या मित्रवर्यानां समजली आणि ते ही माझ्याबरोबर सहलीला यायला तयार झाले. डॉ. मडव तर मी जातोय म्हणून सहलीला आठदिवस असतानाच ‘मला बी सहलीला येवद्या की’ म्हणत सामील झाले. सहलपुर्व माहिती देण्यासाठी दादरला एक मिटींग झाली त्यात गरम कपडे घ्या एवढं मनावर ठसलं होतं. तर... थोडीशी माहिती आणि प्रचंड उत्साह बरोबर घेऊन आम्ही लडाख सफरीवर जायला तयार झालो. प्रदर्शनातली छायाचित्रं मनात रुंजी घालत होती. आणि जायचा दिवस उजाडला, वानरा टर्मीनसवरून निघणार्‍या पश्चिम एक्स्प्रेसने स्टेशन सोडलं तेव्हापासूनच मन इंजिनापुढे धावत होतं. क्रमशा...

मुक्काम तर येणारच 
प्रवास सुकर झाला पाहिजे 
आनंदाने हसत हसत 
आपण हातभार लावला पाहिजे 

नरेंद्र प्रभू 

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates