31 January, 2009

लडाख – अनुभूति अध्यात्माची आणि निसर्गाची (भाग ५)

पुढचं प्रमुख आकर्षण होतं पँगगॉंग लेक. १४५ कि.मी. लांबीचं हे तळं (?) खार्‍या पाण्याचं आहे. भारत-चीन सीमेवरील या ठिकाणी जाताना नयनरम्य अशा प्रदेशातून आपली भ्रमंती होते. वाटेत लागतो छांगला पास. रस्त्यात याक, मरमऑट असे प्राणी दिसले.

आता पासेसना सरावलेले आम्ही कारु, शक्ती शक्ती अशी गावं पार करुन पँगगॉंग ला पोहोचलो. वाटेतलं बर्फ आता रोजचं झालं होतं. पण पासवर पोहोचल्यावर सैनिकांचं भेटणं आणि चहापान याने उबदार वाटायचं. वाटसरुच्या जीविताची काळजी आणि काही वैद्यकीय मदत लागली तर ती पुरवण्यासाठी हे सैनिक सदैव तयार असतात. त्याना पाहून त्यांच्या बाबतचा आदर आधिकच दुणावला. पँगगॉंगच्या काचेसारख्या स्वछ पाण्यात पाय देण्याची हिंमत होत नव्हती, एवढं ते थंड होतं. आत जाऊन लगेचच बाहेर आलो. पण सभोवताली जे सौंदर्य होतं त्याला तोड नाही. एवढ्या शांत धीरगंभीर वातावरणात आपण निसर्गाशी एकरुप होऊन जातो. निसर्गाशी तादात्म्य पावण्याचे असे क्षण आपल्या आयुष्यात फार कमीच येतात. नाही का ?


(अपुर्ण....)                                    जायचय  लडाखला ? चला.....


लेखकः नरेंद्र  प्रभू



28 January, 2009

लडाख - भुतान छायाचित्र प्रदर्शन

हिमालयाची शुभ्र हिमशिखरं सर्वानाच साद घालत असतात, नव्हे अगदी वेद काळापासूनच आपणा सर्व भारतीयाना त्याच प्रचंड आकर्षण आहे. जसे देव, ऋषी- मुनी तिथे वास्तव्य करतात असं आपण मानतो, तसाच निसर्ग देवतेचा नित्यनेमाने नवा अविष्कार आपल्याला तिथे पहायला मिळतो. आपल्या देशाला पुर्वेकडे अरुणाचल प्रदेश पासून उत्तरेकडे काश्मिर पर्यंत हे देणं लाभलं आहे. जगभरातील निसर्गवेडे इथे धाव घेत असतात.

वॉन्डररर्स चे छायाचित्रकार गेले ते थेट लडाखला, जिथे त्यांनी टिपलाय एक अनोखा हिमालय. इतर ठिकाणांहून जवळ वाटणारं क्षितीज इथे पार दूरवर गेलेलं असतं. चोहिकडे रंगांची रांगोळी घातलेली दिसते. एवढ्या रंगछटा, आकार आणि भव्यता खरचं स्तिमीत व्हायला होतं. एक वेगळं जग, जिथे आहे चांद्रभूमी, जगातील सर्वात उंच मोटार वाहतुकीचा रस्ता, बौध्द गूंफा तर आहेतच पण आपल्याला नेहमी दुरावली असं वाटणारी सिधू नदी सुध्दा सामोरी येते. हे सर्व पाहून स्वर्ग भुमीवर आल्याचा भास होतो. हे झालं लडाख विषयी पण तिकडे पुर्वेला आहे भुतान. लडाखच्या अगदी विरूध्द असलेलं हिमालयाचं आणखी एक रुप, जिथे आहे नेत्रसुखद हिरवाई. चिड आणि पाईनचे भले थोरले वृक्ष व त्यातून बागडणार्‍या नद्या. नंदनवन म्हणाव तर हेच. दर मिनीटागणीक बदलणारे सृष्टीचे विभ्रम, वर्णन करणे केवळ अशक्य. हे सर्व पहण्याची संधी आपल्या दारी आणली आहे वॉन्डररर्सने. वॉन्डररर्स या हौशी छायाचित्रकारांच्या गटाची स्थापना श्री. आत्माराम परब यानी १० वर्षांपुर्वी केली, ती छायाचित्रकाराच्या सुप्त गुणांना जनतेसमोर आणण्यासाठी.

अशाच "वॉन्डररर्स " पैकी आत्माराम परब,हितेंद्र सिनकर, तुषार निदांबूर,नरेंद्र प्रभू, अतिष बँनर्जी, दिपांकर बँनर्जी,केदार मालेगावकर, सागर कर्णिक, संजय तिकोटीकर, विनायक परब, विश्वेश आठवले, जीतेंद्र सावंत व डॉ. घनश्याम बोरकर यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पु.ल. देशपांडे कला दालन, रविंद्र नाट्य मंदिर आवार , प्रभादेवी, मुंबई येथे ३१ जानेवारी ते ८ फेब्रूवारी २००९ , सकाळी ११ ते सायंकाळी ८ वा. पर्यंत सर्वंसाठी विनामूल्य आयोजीत करण्यात आले आहे. या प्रदर्शना दरम्यान हिमालयातील भ्रमंती, लडाखवारी, भुतान तसेच अन्य ठिकणांची माहिती, स्लाईड शो, चित्रफीत आणि मार्गदर्शन विनामूल्य उपलब्ध करुन दिले जाईल. संपर्क: ९८९२१८२६५५, ९३२००३१९१०


25 January, 2009

लडाख – अनुभूति अध्यात्माची आणि निसर्गाची (भाग ४)

आज आम्ही लेहमध्येच फिरणार होतो. सिंधू नदी ( Indus) कित्येक वर्षे फक्त वर्णनातून ऎकलेली, वाचलेली आज प्रत्यक्ष समोर होती. घाटावर जाऊन पाण्याला स्पर्श केला. शांत, थंड जल, काठाला थोडीशीच हिरवाई.

भावनांनी मनात गर्दी केलेली. उत्तर-पुर्वेला काराकोरम रांगा, दक्षिण-पुर्वेला हिमालयाच्या रांगा आणि गाभा ट्रांस हिमालयन रांगांचा, अशा प्रदेशात आता आमचा संचार 

सुरू होता. थिकसे गुंफेत आम्ही पोहोचलो तेव्हा अर्ध्यातासात परत फिरु असं वाटलं पण दोन तास कसे संपले ते 

समजलच नाही. ही प्राचीन गुंफा नेत्रसुखद तर आहेच पण कोणतही औडंबर न माजवता धार्मिक स्थान कसं असावं त्याचं प्रतिकही आहे. उत्तम मूर्तीकाम, नक्षीकाम, कमानी, रंगसंगती यांचं मिश्रण आणि त्याचाच एक भाग बनलेले लामा जेमतेम चार महिने सोडले तर निसर्गाशी दोन हात करत जगणारी ही माणसं पण त्याची कसलीही खूण चेहरर्‍यावर न बाळगणारी, अगदी शांतपणे सगळं चाललेलं,

सगळे हसतमुख. प्रार्थना सुध्दा देवासाठी, दिखाव्यासाठी नाही. बुध्दाची भव्य मुर्ती तर बघत रहाण्यासारखी . फोटो काढण्यातच सगळा वेळ जातो खरं तर शांतपणे बसायला हवं होतं. लडाखी स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणूनसुध्दा थिकसे गुंफेकडे पाहिलं जातं. त्यानंतर हेमिस ही लडखमधली सर्वात मोठी गुंफा पाहिली. १६३० मध्ये बांधलेली ही गुंफा इतर गुंफांहून वेगळी आहे. 

शे पँलेस, लेहचा बाजार इत्यादी फिरताना लडाखी संस्कृतीचं दर्शन घडत होतं. आमच्यासारखे काही मोजके पर्यटक सोडले तर बहुसंख्य पर्यटक विदेशी होते. शांतीस्तुपाला गेलो, खाली लेह शहराचं विहंगम दृश्य पाहुन मन हरखून गेलं, भारलेल्या वातावरणातच त्या दिवशीचा सूर्य कधी मावळतीला गेला ते समजलच नाही.




(अपुर्ण....)                                    जायचय  लडाखला ? चला.....


लेखकः नरेंद्र  प्रभू



LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates